top of page

अध्यात्म आणि विज्ञान लेख 2


अध्यात्म हे विचारांचे

शास्त्र

अध्यात्म आणि विज्ञान या विषयावरच्या पहिल्या लेखात आपण बघितलं की आजची गरज आहे ती अध्यात्म ज्ञानाची पुन:रमांडणी करण्याची. आज खरी गरज आहे ती आध्यात्मला विचारशास्त्र आणि जीवन शास्त्र म्हणून स्वीकारण्याची. कारण अध्यात्म ज्ञानाच्या अंगीकारणानेच आपलं जीवन अधिक शांत सुसंवादी आणि समृद्ध होऊ शकतं.

आज आपण बघणार आहोत अध्यात्म हे विचारांचे शास्त्र कसे आहे.

अध्यात्म हे विचारांचे

शास्त्र

सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात,

"विचार करतो तो माणूस. परंतु आज आम्ही विचारांचा विचारच करत नाही. इतर प्राणी आणि माणूस यात फरक काय आहे तर माणसाला परमेश्वराने विचार करण्याची क्षमता बहाल केलेली आहे सद्गुरूंचा हा एक अत्यंत मुलगामी आणि आत्मपरीक्षणास उद्युक्त करणारा विचार आहे.

"विचार करतो तो माणूस" हे केवळ सद्गुरूंचे एक साधे विधान नाही तर मानवी अस्तित्वाचा मूलभूत पाया स्पष्ट करणारी एक मौलिक घोषणा आहे पण त्यापेक्षाही सद्गुरूंच्या पुढील वाक्यातील खंत अधिक गंभीर आणि विचार प्रवृत्त करणारी आहे

पण आज माणूस विचारांचा विचारच करत नाही.

म्हणजेच विचार करण्याची अद्वितीय क्षमता परमेश्वराने माणसाला दिलेली असली तरी माणूस आज विचार न करताच आयुष्य जगतो आहे आणि ही विसंगती हेच आजच्या आमच्या जीवनाच्या असंख्य समस्यांचे मूळ आहे.

विचार करण्याची क्षमता ही माणसाला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण देणगी आहे. मानव आणि इतर प्राणी यांच्यात खरा फरक काय आहे तर प्राणी जन्माला येतात, त्यांना भावना आहेत, प्रतिक्रिया आहेत पण ते विचारपूर्वक निवड करत नाहीत. प्राणी त्यांच्या सहजस्फूर्त कृती (Instinct) ने आहार, निद्रा,भय आणि मैथुन या नैसर्गिक प्रेरणांनी आयुष्य जगतात. माणूसही याच प्रेरणांनी जीवन जगत असतो. पण माणसाला एक अलौकिक विशेष अधिकार- देणगी मिळालेली आहे ती म्हणजे तो स्वतंत्र विचार करू शकतो. माणूस विचार करू शकतो म्हणजे काय तर तो आपली कृती, पर्याय, उद्दिष्ट, मूल्य यावर प्रश्न करू शकतो . Thinking Animal हीच माणसाची खरी आध्यात्मिक पात्रता आहे. ही विचारशक्तीच माणसाला स्वतःचं जीवन घडविण्याचे, योग्य-अयोग्य ठरविण्याचं, स्वतःत सुधारणा करण्याचं आणि आत्मशोधनाचा मार्ग शोधण्याचा आणि तो मार्ग पकडण्याच सामर्थ्य देते.


परंतु आजची परिस्थिती काय आहे तर आजचा माणूस विचार करत नाही तर तो न विचार करताच विचारांचा स्वीकार करतो. आज तो विचार करतो पण ते त्याचे स्वतःचे विचार नसतात, तर सोशल मीडिया, जाहिराती, राजकारण, इतरांच्या मतांचे अंधानूकरण यावर आधारित त्याचे विचार असतात.

आज माणसाकडे प्रचंड प्रमाणात माहिती आहे पण विचार नाहीत. आज आपण ज्ञानाच्या युगात जगत आहोत असं म्हणतो पण खरंच आपण ज्ञानी झालो आहोत का?


आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात आमच्याकडे डाटा आहे, सल्ले आहेत, गुरु आहेत, निती मूल्यांचे कोट्स आहेत पण आज आमची विचार करण्याची सवय कमी झालेली आहे. आम्ही एखादी सोशल मीडियावर पोस्ट वाचली की लगेच आपले मत बनवतो. एखादा फोटो पाहिला की लगेच प्रतिक्रिया देतो. एखाद्याचं यश पाहिलं की लगेच तुलना करतो. स्वतंत्र विचार न करता नक्कल Imitation करणे ही आमची आजची वृत्ती झाली आहे. आम्ही विचार करत नाही तर आम्ही माहिती पचवत आहोत. परिणामी आम्हाला विचार सुचत नाहीत तर आम्हाला प्रतिक्रिया सुचतात. आणि हो, या प्रतिक्रिया आपल्या नसतात तर त्या कुठून तरी आलेल्या असतात. आणि हेच सद्गुरूंना सुचवायचे आहे की विचार करता करता आज माणूस विचारांचा विचार करायलाच विसरला आहे.


मग प्रश्न निर्माण होतो, विचारांचा विचार करायचा म्हणजे काय? तर विचारांचा विचार म्हणजे

1. स्वतःच्या विचार प्रक्रियेला तपासणे. मी विचार करतो, पण

का करतो?

2. हे विचार कुठून आले? हे माझे स्वतःचेच विचार आहेत का?

3. हे विचार म्हणजे तात्कालिक भावना आहेत की दीर्घकालीन मूल्यांवर आधारित आहेत?

4. हे विचार भीती, लोभातून आलेले आहेत की विवेकातून?

ही विचारांची प्रक्रिया म्हणजेच स्व-विचार माझे स्वतःचे स्वतंत्र विचार self inquiry. आणि येथेच अध्यात्माची सुरुवात होते. हे प्रश्नच आपल्याला विचार करण्याच्या प्रक्रियेला एका नवीन पातळीवर नेतात, जिथे माणूस सजग होतो.आणि सजग विचार म्हणजेच आत्मशोधाची पहिली पायरी होय.

अध्यात्म याच विचारशक्तीला योग्य दिशा देते.उपनिषिदे सांगतात,

मन: एवं मनुष्याणा कारण बंधमोक्ष:

म्हणजे मन म्हणजेच विचार हेच मनुष्याचे बंधनाचे आणि मोक्षाचे कारण आहे. मनुष्याच्या जीवनातील आनंद, सुख आणि दुःखाची कारणे मनुष्याचे विचारात असतात. सद्गुरु श्री वामनराव पै तर म्हणतात,

जसा विचार तसा जीवनाला आकार

जर विचार आहे तसेच स्वीकारले तर ते बंधनाला कारण ठरतात मात्र जर विचार बघितले,तपासले, समजून घेतले आणि विचारांचा विचार केला तर तेच विचार मोक्षाच्या दिशेने नेतात. म्हणूनच सद्गुरु म्हणतात,

विचार पाहायला शिका मग विचार ओळखायला शिका आणि मग विचारांची दिशा बदला.

"विचार बदला नशीब बदलेल" विचारांच्या या प्रक्रियेतूनच खरी अध्यात्मिक शुद्धी होते.

विचारशक्ती हा माणसाचा परमेश्वरदत्त विशेष अधिकार आहे. बुद्धीच्या पलीकडचा विचार म्हणजे विवेक, नैतिकता, परिणामांचे भान, आणि आत्मजाणीव. परमेश्वराने मानवाला दिलेली विचारशक्ती म्हणजे केवळ बुद्धिमत्ता नाही तर विचारपूर्वक जगण्याची क्षमता, स्वतःला तपासण्याची सजगता, आणि जबाबदारीने कृती करण्याची जागरूकता. हेच इतर प्राण्यांमध्ये नाही म्हणूनच माणूस अध्यात्म ज्ञानात - समजूतदारपणात इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरतो.


सजग विचार म्हणजे काय तर सजग विचार म्हणजे केवळ विचार जसे येतात तसे विचार स्वीकारणे नाही तर विचार करताना स्वतःला बघणं. सजग विचार हे जागृतीचं आणि विवेकाचं कार्य आहे. कोणताही विचार आला की,

1. मी हा विचार का करत आहे?

2. हा विचार मला कोणी दिला आहे का? की, हा विचार माझ्या अनुभवातून आला आहे?

3. या विचारामागे भीती अथवा लोभ आहे की विवेक आहे?

थोडक्यात, विचार आला की त्या विचाराला जसा आहे तसा न स्वीकारता त्या विचाराच्या मुळापर्यंत जाऊन विचाराचा शोध घेणे. ताबडतोब प्रतिक्रिया न देता थोडं थांबून समजून उत्तर देणे. एखाद्याच बोलणं ऐकलं की लगेच उत्तर देणे ही प्रक्रिया आहे पण दुसऱ्याचे ऐकून घेऊन, समजून घेऊन, मनात थोडा अवकाश ठेवून उत्तर देणं- बोलणं, म्हणजे सजग विचारांची प्रतिक्रिया होय. सजग विचार म्हणजे मी हे का बोलतोय याचा आधी विचार करणे.


भावना आणि विचार या मधला फरक ओळखणे म्हणजे सजग विचार. आपण अनेकदा आपल्या भावना म्हणजेच आपले विचार समजतो. उदाहरणार्थ: राग आला की लगेच विचार येतो हे चुकीच आहे.सजग विचार म्हणजे भावना विचारांवर किती प्रभाव टाकत आहेत आणि निर्णय कितपत स्वच्छ आहे ते जाणणं.


विचार करताना अंतर्मनातील छुपे हेतू देखील कार्यरत असतात. ते आपल्या विचारांवर प्रभाव टाकतात. असे अंतर्मनातील छुपे हेतू शोधणे ही देखील सजग विचारांची प्रक्रिया असते. आम्ही अनेक वेळा काहीतरी चांगलं करीत आहोत असा आमचा समज असतो पण त्या कृतीमागे प्रसिद्धी, मान आणि अपेक्षा लपलेल्या असतात.


सजग विचार म्हणजे आपल्या कृती मागील मनोदृष्टी समजून घेणे.

या ठिकाणी आपल्याला आदरणीय दादांचे अमृत वचन प्रत्येक कृती ही राष्ट्र हिताची, विश्वशांतीची याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे.


सजग विचार म्हणजे जणू काही आरशासमोर उभे राहून आपले स्वतःचे विचार न्याहाळणं. मी काय विचार करतोय यापेक्षा हे विचार कोठून येत आहेत हा प्रश्न विचारणं.


भगवान बुद्धांनी सम्यक दृष्टी ही अष्टांग मार्गातली पहिली पायरी सांगितलेली आहे. ही सम्यक दृष्टी हीच सजगतेची सुरुवात होय सम्यकदृष्टी याचा अर्थ पूर्णतः योग्य, समतोल, सुसंगत, यथार्थ आणि शुद्ध बुद्धी. या शुद्ध बुद्धीने म्हणजेच सम्यक दृष्टीने विचार करणे म्हणजेच सम्यक विचार म्हणजेच सजग विचार.

भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला विचार करायला प्रवृत्त करतात. भगवान हे कर, किंवा हे करू नको असे अर्जुनाला सांगत नाहीत.तर निर्णय अर्जुनावर सोपवीतात. कारण सजग विचार केल्याशिवाय निर्णय 'धर्म' बनत नाही


सजग विचार म्हणजे विचार करत असताना मी जागृत आहे का? मी विवेकाने म्हणजे शहाणपणाने विचार करत आहे का? आणि या विचारामागे मी कुठून चाललो आहे याची मला जाणीव आहे का? असं झालं म्हणजे विचार ही केवळ यांत्रिक प्रक्रिया न राहता ते आत्मोन्नतीच साधन बनतात.


सजग विचार हे व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात उन्नती साधण्यासाठी उपयुक्त असतात. जर प्रत्येक माणूस विचारांचा सजग विचार करू लागला तर-

1. मतभेदा ऐवजी सहमती म्हणजेच मत विवेक तयार होईल.

2. अंधश्रद्धा कमी होतील.

3. रागापेक्षा संयम वाढेल.

4. भीती ऐवजी विवेक म्हणजे शहाणपण प्रबळ होईल.

5. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी संबंध अधिक दृढ, जिव्हाळ्याचे आणि समजूतदार होतील.

विचार करतो तो माणूस पण विचारांचा विचार करतो तोच खरा माणूस. केवळ विचार करणं म्हणजे माणूस होण नाही तर सजग विचार करणं हेच खरं माणूसपण आणि हीच सजगता माणसाला अहंकारापासून आत्मज्ञानापर्यंत घेऊन जाते.


माणूस म्हणून जन्माला येणे ही संधी आहे पण माणूस पण जपणं हे प्रत्येक क्षणाच्या सजग विचारातूनच शक्य आहे. देवाचिया द्वारी उभा क्षणभरी म्हणजेच प्रत्येक क्षणी सजग विचार करणे होय.


परमेश्वराने मानवाला जी अभूतपूर्व देणगी दिलेली आहे ती म्हणजे स्वतः विचार करण्याची क्षमता. ही क्षमता जर आपण यथार्थ रीतीने वापरली नाही तर आपण माणूस म्हणून फक्त वावरतो माणूस म्हणून जगत नाही.

आणि म्हणूनच सद्गुरु पै महाराज म्हणतात,

विचार करतो तो माणूस पण आज विचारांचा विचार कोणी करीत नाही

सद्गुरूंचे विचारांबाबतचे हे वचन म्हणजे आजच्या या धावपळीच्या, माहितीच्या आणि भ्रमाच्या जगात थांबा, पहा विचार करा असं सांगणारी एक तीव्र जागृती आहे.


या पुढील लेखात आपण अध्यात्म हे विचारांच शास्त्र कस त्याचा पुढील भाग बघणार आहोत.

धन्यवाद

सद्गुरु नाथ महाराज की जय

लेखांकन: जयंत जोशी.

 
 
 

Recent Posts

See All
खरे सुख कुठे आहे?

आजच्या जगात अनेकांना अस वाटतं की, *”एखादी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात आली, की आपलं सगळं काही सुरळीत होईल. आपण सुखी होऊ, आपल जीवन फुलून...

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page