top of page

आजच्या युगात अध्यात्म ज्ञानाची गरज कां?

सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात,

आपल्या संस्कृतीतील ऋषीमुनी, संत हे त्या त्या काळातील श्रेष्ठ वैज्ञानिकच होते. हे वैज्ञानिक Intuitive Scientist म्हणजेच आंतरदृष्टीने शोध घेणारे संशोधक असतात असेच म्हटले पाहिजे.

आज मात्र आपण आपल्या जीवनात अध्यात्म विज्ञान आणि भौतिक विज्ञान यात फारकत केली आहे. आमच्यापैकी अनेकांचा आज गैरसमज आहे की अध्यात्म हा विषय निवृत्तीनंतरचा विषय आहे. त्यांचं असं म्हणणं असतं की आज जर आम्ही आमच्या या गतिमान भौतिक जीवनात अध्यात्मासाठी वेळ दिला तर त्याचा आमच्या करिअरवर जीवनावर विपरीत परिणाम होईल. मुळात हा समजच तदन खोटा तकलादु आणि अज्ञान मुलक आहे. वास्तविक पाहता विज्ञान आणि अध्यात्म या दोघांचाही एकच हेतू आहे आणि तो म्हणजे जीवनातील सत्याचा शोध घेणे आणि असा शोध घेऊन मानवाचे जीवन आनंदमय आणि सुखी करणे.

बहुतांश लोकांचा असा गैरसमज आहे की अध्यात्माची कास धरणे म्हणजे संसाराचा त्याग करणे. सद्गुरु म्हणतात, *संसार सुखाचा करणे म्हणजेच अध्यात्म-परमार्थ.*


आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असतं की अध्यात्म म्हणजे संन्यास घ्यावयाचा, ध्यान करायचं, मंदिरात जायचं, पूजाअर्चा करायची, तीर्थयात्रा करायच्या. आणि हे सर्व म्हणजे वेळ घालवणं आहे. त्यांचं असं म्हणणं असतं की आता तर आम्ही तरुण आहोत आम्हाला आमचे करिअर करायचे आहे मग आता या वयात हे अध्यात्म परमार्थ कशासाठी करु? एकदा निवृत्त झालो की वेळच वेळ आहे तेव्हा करूयात की परमार्थ. पण हा विचार चुकीचा आहे. कारण आम्हाला अध्यात्माचा नेमका अर्थच समजलेला नसतो . अध्यात्म म्हणजे जीवन जगण्याचे विज्ञान. सद्गुरु तर म्हणतात, *अध्यात्म म्हणजे जीवन जगण्याची कला* अध्यात्म म्हणजे जीवन जगण्याची वर्तन शैली, जी कुणालाही कुठेही कोणत्याही वयात उपयोगी ठरते. अध्यात्म म्हणजे विज्ञान आणि विज्ञानाला निवृत्तीचे वय लागत नाही हे आम्ही सर्वजण जाणतोच.

अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न. आध्यात्म म्हणजे विचार, भावना आणि कृती यांचे निरीक्षण. अध्यात्म म्हणजे बाहेरच्या गोंधळात- गदारोळात शांत संयमी जीवन जगण्याचा मार्ग. अध्यात्म म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांचे सुसूत्रीकरण. आणि हे सर्व दैनंदिन जीवनासाठीच आवश्यक आहे ना? संन्यस्त झाल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर या सर्वांची गरज तरी काय?

आजच्या युगातील माणूस अतिशय वेगाने धावतो आहे. प्रगतीच्या शर्यतीत, यशाच्या मागे, सुख सोयींच्या उपलब्धतेत आणि तंत्रज्ञानाच्या महासागरात तो स्वतःला हरवून गेलेला आहे. या धावण्यात एक गोष्ट मात्र मागेच राहून जात आहे आणि ती म्हणजे स्वतःकडे पाहण्याची क्षमता.

आजच्या या धावपळीच्या युगात परिस्थिती अशी आहे की बहुसंख्य लोक हे बाह्य जगात इतके गुंतलेले आहेत की स्वतःच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. आणि म्हणूनच आज समाजात एक चुकीची समजूत खोलवर रुजलेली आहे - अध्यात्म म्हणजे देव देव आणि हे सगळं करायचं ते निवृत्तीनंतर. पण ही समजूत केवळ चुकीची आहे असं नाही तर धोकादायक देखील आहे.


येथे आपल्याला प्रश्न पडेल की आजच्या या वैज्ञानिक जगात अध्यात्माची गरज तरी काय आहे?


आजचे जग हे स्पर्धात्मक जग आहे, अस्थिर आहे, तणावपूर्ण आहे आणि सतत तुलनात्मक आहे. अशा या वातावरणाचा आपल्या शरीरावर आणि मनावर प्रचंड परिणाम घडून येतो. ज्या आनंदी जीवनासाठी आम्ही ही सगळी धडपड करत आहोत ते आमचे जीवन आनंदी नाही तर ते दुःखमय होऊन जाते. आमच्या जीवनातील प्रत्येक अडचणीवर आणि समस्येवर आम्हाला अध्यात्म ज्ञान उपाय सुचवते आणि मार्गदर्शन करते.

बघा,,*ताण तणावाची समस्या* यावर अध्यात्म काय उपाय सांगते तर *विश्वप्रार्थना, ध्यान आणि श्वसन साधना*

*राग आणि वैफल्य* यावर अध्यात्म उपाय सांगतो तो म्हणजे *कृतज्ञता, क्षमा आणि समत्व*

आमच्या जीवनात अनेक वेळा आम्ही *नेमका आणि योग्य काय निर्णय घ्यावा* हे आम्हाला सुचत नाही, म्हणजेच आपले निर्णय हे दोषपूर्ण असतात त्यावर अध्यात्म ज्ञान उपाय सांगते तो म्हणजे *शहाणपण, विवेक आणि अंतःप्रेरणा*

आज अनेक कुटुंबांमध्ये समाजामध्ये कार्यालयांमध्ये *नातेसंबंधांमध्ये ताण-तणाव* दिसून येतो. यावर अध्यात्म आपणास उपाय सांगतोय तो म्हणजे *आत्मचिंतन, संवाद आणि स्वीकार*

आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये अनेकांना *थकवा* जाणवतो यावर अध्यात्मज्ञान आम्हास उपाय सांगतोय तो म्हणजे

*शरीर साधना, मौन आणि आत्ममूल्य जपणं*


अध्यात्म म्हणजे केवळ मठात आश्रमात किंवा देवळात अथवा हिमालयात बसून केलेली साधना नाही तर ती घरात घरकाम करत असताना, कार्यालयात कार्यालयीन काम करत असताना, रस्त्यावर चालतांना, दैनंदिन जीवनात घडणारी गोष्ट आहे.

1. *नातेसंबंधात :*

क्षमाशीलता, सहिष्णुता,

संवाद हे अध्यात्मिक

गुणच नातेसंबंध टिकवून

ठेवतात अधिक घट्ट

करतात.

2. *कार्यालयीन कामकाजात:*

विवेक म्हणजे

शहाणपण, स्थैर्य,

समर्पण,कामावरचे प्रेम

हे गुण कर्मचाऱ्यांपासून

नेतृत्वा पर्यंत प्रत्येकाला

उपयोगी पडतात.

3. *पालकत्वात :*

मूल्याधारित संस्कार,

आदर्श वर्तन, संयम याचे

ज्ञान अध्यात्म देते-

शिकवते.

4. *आरोग्यात :*

मनशांती, नैसर्गिक

आहाराकडे कल,

शारीरिक शिस्त हे

अध्यात्म ज्ञानामुळे अंगी

बाणतात. जीवनशैलीत

सुधारणा होऊन

शारीरिक आणि

मानसिक आरोग्य

सुधारते.


अनेक थोर व्यक्तींची चरित्रे जर आपण बघितली तर आपल्याला दिसून येतं की आध्यात्मिक ज्ञान म्हणजे जीवन जगण्याची कला हा त्यांच्या जीवनातील दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होता. त्यांचे जीवन दोन पातळ्यांवर विभागताच येत नाही. उदाहरणार्थ महात्मा गांधी- सत्य, अहिंसा आणि आत्मपरीक्षणाच्या जोरावर जग बदललं. डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम - विज्ञानाची कास धरून अध्यात्मिक जीवनाचा अंगीकार. स्टीव्ह जॉब्स यांनी झेन साधनेतून ध्यान प्रक्रियेने निर्णयक्षमतेत नवीन पैलू आणले. स्वामी विवेकानंद - आध्यात्मिक विज्ञानाची जगाला ओळख करून देऊन जगाला प्रेम बंधुभाव शिकवून स्व उन्नतीचा मार्ग दाखविला. सद्गुरु श्री वामनराव पै यांनी अध्यात्म ज्ञान ही जीवन जगण्याची कला आहे हे शिकवून लोकांना दैववादाकडून प्रयत्न वादाकडे वळून शांतीसुखाचा राजमार्ग दाखविला. दैनंदिन जीवन अध्यात्मिक ज्ञानाच्या साह्याने जगून स्वतःचे व लोकांचे जीवन आनंदमय करण्याचे असे असंख्य उदाहरणे आहेत


आजची गरज आहे ती आध्यात्म ज्ञानाची नव्याने मांडणी करण्याची. लोकांना लोकांच्या भाषेत अध्यात्मिक ज्ञान देणे गरजेचे आणि आवश्यक आहे. अध्यात्मिक ज्ञान हे कारण नसताना आम्ही क्लिष्ट करून ठेवलेले आहे. सद्गुरु वामनराव पै यांनी अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात अध्यात्म ज्ञान हे जीवन विद्या तत्वज्ञानातून जगापुढे मांडले आहे. गरज आहे ती हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्याची. गरज आहे ती हे ज्ञान आचरण्यात आणण्याची कला शिकविण्याची. जोपर्यंत अध्यात्म विज्ञानाचे ज्ञान हे आचरणात आणले जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्या ज्ञानाचा उपयोग जीवन आनंदमय करण्यासाठी होणार नाही. गरज आहे ते अध्यात्म ज्ञानाला नवीन लोकमान्य परिभाषा देण्याची. जेणेकरून लोक अध्यात्म ज्ञानाचा अंगीकार करतील.

अध्यात्म ज्ञानामध्ये ज्याला आपण *मौन* म्हणतो त्याला नवीन परिभाषेमध्ये *मेंटल डिटॉक्स* म्हणता येईल.

तसेच *प्रार्थना* म्हणजे *एकाग्रतेचा फोकस वाढविणारा मानसिक व्यायाम.*

तर *ध्यान* म्हणजे *स्मरणशक्ती, स्वतःची ओळख करून देणार मनाचं विज्ञान*

आणि *कृतज्ञता* म्हणजे *डोपामिन आणि सारेटोनिन वाढविणार भावनिक टॉनिक.*


अध्यात्म ज्ञान प्राप्ती आणि त्या ज्ञानाच आचरण हा निवृत्तीनंतर करायचा साईड प्रोजेक्ट नाही तर हे ज्ञान हे आमच्या प्रत्येक दिवसाच्या कर्माच्या केंद्रस्थानी असल पाहिजे. *प्रत्येक कृती ही राष्ट्रीय हिताची विश्वशांतीचीच असली पाहिजे* जेव्हा आपण अध्यात्म ज्ञानाला फक्त भावनिक आधार न मानता आचारधर्म म्हणून स्वीकारतो तेव्हा आपले संपूर्ण जीवनच बदलून जाते. अध्यात्म म्हणजे उभ्या आयुष्याला मिळणारी दिशा आहे निवृत्तीनंतरची निवड नाही.


आज खरी गरज आहे ती *अध्यात्माला विचारशास्त्र, आणि जीवनशास्त्र* म्हणून स्वीकारण्याची. कारण अध्यात्म ज्ञानाच्या अंगीकारणानेच *आपलं जीवन अधिक शांत, सुसंवादी आणि समृद्ध होऊ शकत.*

हे कसं करायचं आणि त्यासाठी काय केले पाहिजे? त्याचे वेदांतिक सिद्धांत आणि विश्लेषण आपण पुढील लेखात करू.


*लेखांकन:* जयंत जोशी.

धन्यवाद.

*सद्गुरु नाथ महाराज की*

*जय.*

 
 
 

Recent Posts

See All
खरे सुख कुठे आहे?

आजच्या जगात अनेकांना अस वाटतं की, *”एखादी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात आली, की आपलं सगळं काही सुरळीत होईल. आपण सुखी होऊ, आपल जीवन फुलून...

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page