कामावर प्रेम केले की काम सेवा होते सेवेवर प्रेम केले की सेवा साधना बनते
- JAYANT JOSHI
- Jun 5
- 8 min read

थोर समाजसुधारक, तत्त्वज्ञ, परमपूज्य सद्गुरू पै माऊली आणि मातृतुल्य माई यांना प्रथम *शिरसाष्टांग दंडवत.* आदरणीय प्रल्हाद दादा, तसेच दादांच्या आणि आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थान असलेल्या मिलन वहिनी यांना *कृतज्ञतापूर्वक नमस्कार*. समस्त पै कुटुंबियांना *प्रेमपूर्वक नमस्कार.*
उपस्थित विद्यमान विश्वस्त, अनुभवी विश्वस्त, पदाधिकारी, प्रचारक, प्रसारक, प्रबोधनकार, कार्यकर्ते, समस्त नामधारक आणि उपस्थित ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्ती — या सर्वांना माझा
*आदरपूर्वक नमस्कार.*
विठ्ठल विठ्ठल!
माझ्या विठ्ठल विठ्ठलला सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून मला पुन्हा एकदा म्हणावेसे वाटते — विठ्ठल विठ्ठल!
सद्गुरूंचा पहिला निसर्गनियम आहे — “क्रिया तशी प्रतिक्रिया.” मी विठ्ठल विठ्ठल म्हणून क्रिया केली, तर तुमच्याकडून प्रतिक्रिया आली पाहिजे. आज येथे तीन हजारांपेक्षा अधिक नामधारक उपस्थित आहेत. मग प्रतिक्रिया कशी पाहिजे? ती multiplied आणि magnified पाहिजे.
म्हणून परत एकदा — विठ्ठल विठ्ठल!
भावंडांनो, मी हे का केले? कारण मला तुम्हाला एक गोष्ट जाणवून द्यायची आहे. मी जी कोणतीही कृती करतो, त्या कृतीची प्रतिक्रिया अनेक नामधारकांकडून, अनेक कार्यकर्त्यांकडून माझ्याकडे परत येणार आहे. म्हणून क्रिया करताना मी किती सजग राहिले पाहिजे, याचे भान प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवले पाहिजे.
आज आपण सर्वजण सद्गुरूंचा १४ वा पुण्यस्मरण दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत.
*पुण्यस्मरण म्हणजे काय?* पुण्यस्मरण म्हणजे
*माझे स्मरण पुण्य होणे.*
या एका वाक्यात संपूर्ण अध्यात्म, साधना आणि संतस्मरणाचा सार आला आहे.
सामान्यतः आपण पुण्यस्मरण म्हणजे सद्गुरूंचा किंवा महापुरुषांचा देहत्यागदिन समजतो, त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करणे, प्रवचन, भजन, कीर्तन, आठवणी आणि कार्यक्रम असे समजतो. हे सर्व महत्त्वाचे आहेच; पण *माझे स्मरण पुण्य होणे* हा मुद्दा अधिक खोल आहे.
खरे पुण्यस्मरण म्हणजे केवळ सद्गुरूंचे स्मरण नव्हे, तर *आपले स्मरण पुण्य होणे.* म्हणजे आजचा दिवस असा गेला पाहिजे की,
आपले विचार अधिक शुद्ध झाले पाहिजेत,
आपले बोलणे अधिक नम्र झाले पाहिजे,
आपले मन अधिक शांत झाले पाहिजे,
आपली समज अधिक जागी झाली पाहिजे
आणि
आपल्या कृती अधिक सजग झाल्या पाहिजेत.
म्हणजेच *आपल्या स्मरणात, आपल्या चेतनेत आणि आपल्या वृत्तीत पुण्य जागे झाले पाहिजे.*
कारण सद्गुरूंचे स्मरण करूनही जर मनात राग, अहंकार, कटुता, मत्सर, विभाजन किंवा व्यक्तिकेंद्रीपणा तसाच राहिला, तर तो फक्त कार्यक्रम राहतो; पुण्यस्मरण होत नाही.
सद्गुरूंचे जीवन हे आरसा आहे. त्या आरशात स्वतःकडे पाहणे म्हणजे पुण्यस्मरण. आज आपण सद्गुरूंना आठवतो; पण त्याच वेळी स्वतःला विचारतो का — मी त्यांच्या शिकवणीनुसार जगतो आहे का? माझ्या बोलण्यात समज आहे का? माझ्या वागण्यात प्रेम आहे का? माझ्या सेवेत नम्रता आहे का? माझ्या मतांमध्ये विवेक आहे का? हा आत्मपरीक्षणाचा क्षण म्हणजेच खरे पुण्यस्मरण.
१४ वर्षे… हा काही फार मोठा कालावधी नाही. पण या अल्प कालावधीत जीवनविद्या मिशनच्या कार्याचा पसारा प्रचंड वाढला. कार्य देशाच्या सीमा ओलांडून अनेक देशांपर्यंत पोहोचले. आणि हे शक्य झाले ते सद्गुरूंच्या अद्वितीय तत्त्वज्ञानामुळे, नेतृत्वाच्या दूरदृष्टीमुळे, आदरणीय दादांच्या अखंड प्रेरणेमुळे आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थ, अथक प्रयत्नांमुळे.
१४ वर्षांपूर्वी सद्गुरूंनी आदरणीय दादांच्या हातात संस्थेची सूत्रे सोपवताना जे उद्गार काढले होते, ते आजही आपल्या कानात घुमतात. सद्गुरू म्हणाले होते —
*मला जे कार्य करण्यासाठी ६० वर्षे लागली, त्यापेक्षा अधिक कार्य प्रल्हाद १५ वर्षांत करेल.*
कारण प्रल्हादकडे vision आहे आणि नेतृत्वाचे सर्व गुण आहेत.”
आपण सर्वजण वेळोवेळी याची प्रचिती घेत आहोत.
आजचा दिवस म्हणून केवळ स्मरणाचा नाही; तो कृतज्ञतेचा आणि आत्मपरीक्षणाचाही दिवस आहे.
आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा प्रत्येक वेळी मनात एक प्रश्न उभा राहतो — *खरा कार्यकर्ता कोण?* केवळ पद धारण करणारा? केवळ काम करणारा? केवळ सूचना करणारा? की सद्गुरूंचे तत्त्वज्ञान आपल्या बोलण्यात, वागण्यात आणि आचरणात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा?
मला वाटतं, खरा कार्यकर्ता तोच —
*जो केवळ स्वतः कार्य करत नाही, तर आपल्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडवतो.*
आपल्यासाखे म्हणजे काय तर सद्गुरूंचा तत्वज्ञाने, शिकवणुकीने परावर्तित होऊन शहाणा झालेला कार्यकर्ता.
कारण एकटा माणूस कार्य करू शकतो; पण कार्यसंस्कृती निर्माण करू शकत नाही.
खरा कार्यकर्ता स्वतःभोवती लोक जमा करत नाही; तो ध्येयाभोवती माणसं जोडतो. तो अधिकार वाढवत नाही; सहभाग वाढवतो. आणि
स्वतः पुढे जाण्यापेक्षा इतरांना पुढे आणण्यात आनंद मानतो.
कदाचित म्हणूनच सद्गुरूंचे कार्य एवढे वाढले; कारण त्यांनी अनुयायी निर्माण केले नाहीत, कार्यकर्ते घडवले.
सुरुवातीला मी परमपूज्य सद्गुरूंना आणि मातृतुल्य माईंना शिरसाष्टांग दंडवत घालून अभिवादन केले. कारण खरा कार्यकर्ता दंडवत असला पाहिजे. दंडवत म्हणजे काय? तर जसा दंडावरचा हात सुटला की दंड लोटांगण घालतो, तसेच एकदा नेतृत्वाचा आदेश सुटला की त्या आदेशापुढे नतमस्तक होऊन खऱ्या कार्यकर्त्याने कार्यात झोकून दिले पाहिजे.
सद्गुरू म्हणतात —
*मरावे परी कार्यरूपे उरावे.*
हे वाक्य केवळ प्रेरणादायी नाही; ते प्रत्येक कार्यकर्त्याच्या जीवनाचा धर्म आहे.
माणूस शरीराने कधीतरी जातो. पदे बदलतात. जबाबदाऱ्या संपतात. पण त्याने जपलेली मूल्ये, घडवलेली माणसं आणि उभं केलेलं कार्य — हेच त्याचं खरं स्मारक बनतं.
आज चौदा वर्षांनंतर आपण इथे उभे आहोत. प्रामाणिकपणे विचार केला तर लक्षात येतं — हे कार्य एका व्यक्तीच्या जोरावर वाढलेलं नाही. कोणी शाखेत शांतपणे सत्संगाची तयारी करत राहिला, कोणी सत्संग घेत राहिला, कोणी आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळल्या, कोणी लोकांना जोडत राहिले, कोणी स्वतः मागे राहून इतरांना पुढे केले. अशा हजारो कार्यकर्त्यांच्या निःशब्द सेवेवर हे कार्य उभं आहे.
पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे — कार्य फक्त वाढून उपयोग नाही; कार्यकर्तेपणही वाढलं पाहिजे. कारण संस्था मोठी होणं ही एक गोष्ट आहे; पण *संस्था संस्कारित ठेवणं ही त्याहून मोठी जबाबदारी आहे.*
संस्थात्मक कार्य म्हणजे केवळ कार्यक्रम, बैठक, पदे किंवा निर्णय नव्हेत. *संस्था म्हणजे एक सामूहिक साधना आहे.* आणि या साधनेत प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असतो; पण त्याहून महत्त्वाचा असतो तो त्या सहभागामागचा भाव.
एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे की संस्थेच्या प्रगतीसाठी व्यक्ती महत्त्वाची असतेच, पण अपरिहार्य नसते.
कोणत्याही संस्थेत कधी संवादातील त्रुटी राहू शकतात, कधी माहिती सर्वांपर्यंत वेळेवर पोहोचत नाही, कधी नियोजनात उणिवा दिसतात, तर कधी निर्णयप्रक्रियेबाबत गैरसमज निर्माण होतात. अशा वेळी भावना तीव्र होणे स्वाभाविक आहे. पण भावना तीव्र असल्या तरी त्यांना योग्य दिशा देणे अधिक आवश्यक असते.
मी कोणालाही उपदेश करत नाही. एक कार्यकर्ता म्हणून मी कस असाव, हे माझे मनोगत मी सद्गुरूंपुढे मांडत आहे. संस्थेच्या कार्याशी जोडलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने शांतपणे आत्मपरीक्षण करावे, आपली भूमिका, भाषा, भाव आणि कृती अधिक समजूतदार व्हावी, आणि कार्यात अधिक सहृदयतेने, नम्रतेने व जबाबदारीने सहभागी व्हावे — एवढाच माझा प्रामाणिक हेतू आहे.
संस्था मोठी होते ती केवळ इमारतींनी नाही, निधीने नाही, पदाधिकाऱ्यांनीही नाही. *संस्था मोठी होते ती निष्ठावान, समजूतदार आणि जबाबदार कार्यकर्त्यांमुळे.*
कोणतीही व्यक्ती संस्थेत कोणत्याही पदावर असो — ट्रस्टी, अध्यक्ष, पदाधिकारी, समिती सदस्य, सेवेकरी, स्वयंसेवक किंवा कर्मचारी — ती मुळात कार्यकर्ताच असते. पदे वेगवेगळी असू शकतात, जबाबदाऱ्या वेगळ्या असू शकतात; पण मूलभूत ओळख एकच असते — *आपण सर्व कार्यासाठी आहोत.*
ही जाणीव जिथे जिवंत राहते, तिथे संस्था निरोगी राहते. आणि ही जाणीव हरवली की पद मोठे होते, कार्य लहान होऊ लागते.
संस्थेचा कारभार सुरळीत चालावा म्हणून व्यवस्था असते. नियम, प्रक्रिया, समित्या, जबाबदाऱ्या आणि निर्णयप्रक्रिया असते. ही व्यवस्था व्यक्तीला कमी करण्यासाठी नसते; तर कार्य सातत्याने, शिस्तबद्ध आणि पारदर्शकपणे चालावे म्हणून असते. म्हणून *व्यवस्थेला मान देणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे.*
प्रत्येक कार्यकर्त्याने आपले मत मांडावे. जागरूक कार्यकर्ता मूक राहू नये. प्रश्न विचारणे, सूचना करणे, उणिवा निदर्शनास आणणे — हे संस्थेच्या वाढीसाठी आवश्यक असते. पण मत मांडणे आणि मताचा अति आग्रह धरणे यात फरक आहे. मत मांडणे म्हणजे योगदान. मताचा अति आग्रह मात्र कधी कधी सामूहिकतेपेक्षा “माझे मत” मोठे बनवू शकतो.
संस्थेत “माझे मत” महत्त्वाचे असू शकते; पण “सामूहिक निर्णय” अधिक मोठा असतो. चर्चा होईपर्यंत मतभेद असू शकतात; पण निर्णय झाल्यावर संस्थेची एकात्मता जपणे ही परिपक्वतेची खूण आहे.
अनेकदा कार्यकर्ता म्हणतो — *माझा सद्गुरू भाव आहे.* मी जे बोलतो, सूचना करतो किंवा प्रश्न विचारतो ते संस्थेच्या हिताच्या कळवळ्यानेच करतो.”
हा कळवळा मोलाचा आहे. पण त्याचबरोबर सद्गुरू भाव म्हणजे नेमके काय, हेही समजून घेणे आवश्यक आहे.
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात —
*भाव म्हणजे संबंध जोडणे.*
ही व्याख्या अत्यंत साधी वाटते; पण तिच्यात मोठं तत्त्वज्ञान आहे. सद्गुरू भाव म्हणजे केवळ सद्गुरूंवर प्रेम करणे नव्हे; तर सद्गुरूंनी दिलेल्या तत्त्वांशी संबंध जोडणे. त्यांच्या जीवनदृष्टीशी, समजुतीशी, विवेकाशी आणि जीवन जगण्याच्या कलेशी स्वतःला जोडत नेणे.
आपण ज्याच्याशी संबंध जोडतो, त्याचे गुणधर्म नकळत आपल्यात उतरू लागतात — आणि उतरले पाहिजेत. सूर्याशी संबंध आला तर प्रकाश मिळतो. अग्नीशी संबंध आला तर उष्णता मिळते. आणि सद्गुरूंशी खरा संबंध जोडला तर जीवनात समज, नम्रता, संयम, विवेक आणि प्रेम उतरले पाहिजे.
म्हणूनच *माझा सद्गुरू भाव आहे* हे केवळ शब्दांत न राहता वर्तनातूनही दिसले पाहिजे.
जर बोलण्यात कटुता वाढत असेल, संवादाऐवजी दुरावा निर्माण होत असेल किंवा सामूहिकतेपेक्षा वैयक्तिक आग्रह अधिक ठळक होत असेल, तर अशा वेळी प्रत्येकाने स्वतःला शांतपणे विचारण्याची गरज आहे — *माझा संबंध खरोखर सद्गुरूंच्या तत्त्वांशी जोडला जातो आहे का, की नकळत मी माझ्या मतांच्या आग्रहाशी अधिक जोडला जातो आहे?*
खरा सद्गुरू भाव व्यक्तीला नम्र बनवतो; आक्रमक नाही. खरा सद्गुरू भाव ऐकायला शिकवतो; फक्त बोलायला नाही.
खरा सद्गुरू भाव समन्वय वाढवतो; संघर्ष नाही.
खरा सद्गुरू भाव सामूहिकता मजबूत करतो; व्यक्तिकेंद्रीपणा नाही.
म्हणूनच मला वाटतं — सद्गुरू भाव म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करणे नव्हे; तर प्रत्येक परिस्थितीत स्वतःला साधणे.
स्वतःला सिद्ध करणे म्हणजे प्रत्येक वेळी आपणच बरोबर आहोत हे दाखवण्याची धडपड. पण स्वतःला साधणे म्हणजे परिस्थिती कोणतीही असो, स्वतःच्या मनावर काम करणे.
राग आला तरी संयम ठेवणे, मतभेद असले तरी मनभेद होऊ न देणे, आपले मत स्वीकारले गेले नाही तरी संस्थेपासून दूर न जाणे आणि सामूहिक निर्णयाला मान देणे —*हीच खरी कार्यकर्त्याची साधना आहे.*
सेवा म्हणजे केवळ वेळ देणे नाही. सेवा म्हणजे अंतःकरणातील तयारी. “माझे काय?” या भावनेतून “कार्याचे काय?” या भावनेत जाणे — हीच खरी सेवा.
खरा कार्यकर्ता सतत विचार करत असतो — कार्य पुढे कसे जाईल? संस्थेची एकात्मता कशी टिकेल? माझ्या वर्तनातून समज वाढते आहे का?
पद हे सेवेसाठी असते; श्रेष्ठत्वासाठी नाही. पद म्हणजे अधिकार नव्हे; वाढलेली जबाबदारी. म्हणून पदावर असलेला कार्यकर्ता जितका नम्र, संयमी आणि समन्वयकारी असेल, तितकी संस्था निरोगी राहते.
कार्यकर्ता म्हणजे संस्थेचा मालक नाही. कार्यकर्ता म्हणजे संस्थेचा केवळ कर्मचारीही नाही. *कार्यकर्ता म्हणजे ध्येयाचा सेवक.* ध्येयाचा सेवक असल्याची जाणीव आली की बोलण्यात नम्रता येते, मतांत विवेक येतो, कृतीत शिस्त येते आणि सेवेत आनंद येतो.
सद्गुरू म्हणतात —
*काम करा हो काम करा, कामावरती प्रेम करा.*
*कामावर प्रेम केले की*
*काम सेवा बनते. सेवेवर प्रेम केले की सेवा साधना बनते.* सद्गुरूंनी आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवली. मला वाटतं, संस्थात्मक जीवनातही ही कला तितकीच आवश्यक आहे.
सद्गुरू परमेश्वराची एक अत्यंत सुंदर व्याख्या करतात *निसर्ग नियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर*
म्हणजेच परमेश्वर म्हणजे केवळ मूर्ती नाही. परमेश्वर म्हणजे केवळ कल्पना नाही. तर
*परमेश्वर म्हणजे व्यवस्था*?म्हणूनच आज मला वाटतं — सद्गुरू शरीराने आपल्यात नसले तरी ते व्यवस्थारूपाने आपल्यात उपस्थित आहेत.
आणि म्हणून *व्यवस्थेला मान देणे ही केवळ औपचारिकता नाही; ती कार्यकर्त्याची साधना आहे.* कारण व्यवस्था मोडली की व्यक्ती मोठी होते. व्यवस्था टिकली की ध्येय मोठं राहतं.
आज आपण जे काही पाहतो आहोत — देशोदेशी पोहोचलेलं कार्य, असंख्य कार्यकर्ते, अनेक उपक्रम — हे घडलं आहे कारण आजपर्यंत अनेकांनी स्वतःपेक्षा कार्य मोठं मानलं.
कोणी श्रेय न घेता काम केलं, कोणी शांतपणे जबाबदाऱ्या पेलल्या, कोणी स्वतः मागे राहून इतरांना पुढे केलं, कोणी अडचणी असूनही कार्य सोडलं नाही — हीच तर कार्यकर्त्यांची खरी परंपरा आहे.
सद्गुरूंनी दिलेला विचार केवळ ग्रंथात राहू नये; तो आपल्या वागण्यात, बोलण्यात आणि आचरणात दिसला पाहिजे.
सद्गुरू अनुग्रह देताना सांगत — “तुम्ही सुखी झालात, म्हणजे मला माझी अर्धी गुरुदक्षिणा मिळाली. आणि जेव्हा तुम्ही इतरांना सुखी कराल, तेव्हा मला उरलेली अर्धी गुरुदक्षिणा मिळेल.”
मला वाटतं, संस्थेच्या कार्यातही हीच खरी गुरुदक्षिणा सद्गुरुंना अभिप्रेत आहे.
माझ्या कृतीमुळे सहकाऱ्यांचे काम सोपे झाले, संस्थेला बळ मिळाले, कार्य अधिक सुसंवादी झाले — तर ती खरी गुरुदक्षिणा.
आणि शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला एक प्रश्न विचारायचा — माझ्या स्पर्शाने, माझ्या सहवासाने आणि माझ्या सहभागाने कार्य अधिक सुंदर झाले का?
जर या प्रश्नाचं उत्तर “हो” असेल, तर समजावं — आपण खऱ्या अर्थाने सद्गुरूंच्या कार्याशी जोडले गेलो आहोत.
चला, या पुण्यस्मरण दिनी आपण सर्वजण स्वतःसाठी एक शांत संकल्प करूया — *मी कार्य करेन; पण कार्यासोबत समजही वाढवेन.*
*मी मत मांडेन; पण मताग्रह टाळेन.*
*मी प्रश्न विचारेन; पण सहृदयतेने विचारेन.*
*मी व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करेन.* *मी कार्यासोबत कार्यकर्तेही घडवण्याचा प्रयत्न करेन.* *मी “मी”पेक्षा “आपण” मोठं मानेन*
*मी व्यक्तीपेक्षा ध्येय मोठं मानेन. आणि ध्येय टिकवणाऱ्या व्यवस्थेला मनापासून मान देईन.* *सद्गुरूंनी दिलेली समज माझ्या बोलण्यात, वागण्यात आणि आचरणात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.*
सद्गुरूंचे ध्येय आहे — हे जग सुखी व्हावे आणि आपले राष्ट्र सर्वार्थाने प्रगती करून पुढे जावे. आपण सर्वजण सद्गुरूंचे हे ध्येय पूर्ण करण्यासाठी कार्य करत आहोत. पण हे कार्य करत असताना जर आपण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, आपल्या मताप्रमाणे आणि मनाप्रमाणे कार्य केले, तर ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी शेकडो वर्षे लागतील. पण जर आपण एका सक्षम नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले, तर आपण आपले ध्येय काही दशकांत साध्य करू शकू.
*सद्गुरू कृपेने आणि आपल्या सर्वांच्या भाग्याने आपल्याला आदरणीय प्रल्हाद दादांसारखे समर्थ, सहृदय आणि सक्षम नेतृत्व लाभले आहे. आज आपण दादांना शब्द आणि आश्वासन देऊया — *दादा, आम्ही सर्वजण एकदिशेने, एकमताने आणि एकदिलाने कार्य करू.*
आजच्या दिवशी हीच खऱ्या अर्थाने सद्गुरूंना आदरांजली ठरेल. हीच कार्यकर्त्याची खरी साधना. आणि हाच सद्गुरू भावाचा खरा मार्ग.
विठ्ठल विठ्ठल!
धन्यवाद.
सद्गुरूनाथ महाराज की जय.



Comments