top of page

खरी कृतज्ञता* *कशी असावी* *तर... ...*


नवी दिल्लीतील ग्रँड कन्व्हेंशन सेंटर मधील एक उबदार संध्याकाळ. सर्वत्र कॅमेऱ्यांचे फ्लॅश झळकत होते. सुरक्षारक्षक वॉकी टाॅकीवर संभाषण करीत होते आणि सुटा बुटातील लोकांची लगबग चालू होती. मंत्री, व्यापारी, मान्यवर प्रतिष्ठित, आणि परदेशी पाहुण्यांनी हॉल गच्च भरलेला होता. पहिल्या रांगेत देशातील सर्वात शक्तिशाली स्त्री-पुरुष बसलेले होते.


तिसऱ्या रांगेतील एका कोपऱ्याच्या खुर्चीत एक फिकट रंगाची कॉटन साडी परिधान केलेली लहानखोर स्त्रि बसलेली होती. तिची उपस्थिती तशी काही फार कोणाच्या नजरेत येण्यासारखी नव्हती. त्या स्त्री चे नाव होते लक्ष्मी पिचाई. ती कोण आहे हे फारच थोड्या लोकांना माहीत होतं. प्रकाशझोतात होता तो त्या स्त्रीचा मुलगा सुंदर पिचाई- गुगलचा सीईओ आणि भारताची शान.

सुंदर पिचाई असा माणूस ज्याने या पदावर पोहोचण्यासाठी अनेक अग्निदिव्य पार केली होती.

आज आजच्या या संध्याकाळी भारत सरकारकडून या भरतपुत्रास गौरविण्यात येणार होते. त्याचा सत्कार ही एक दुर्मिळ घटना होती, यासाठी देशातील हुशार मनांना एकत्र आणले होते. सुंदर ची नजर सारखी आईकडे वळत होती. तिला असं आपल्याकडे लक्ष दिलेले आवडत नव्हते. ती शांतपणे मांडीवर हात ठेवून बसली होती मात्र तिचे डोळे शांत भावनेने भरून आलेले होते.

पंतप्रधान मोदी व्यासपीठावर येताच टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रमाला सुरुवात झाली. अत्यंत प्रभावी शब्दांनी आणि स्वप्नपूर्तीचा ध्यास त्यासाठीचे कष्ट आणि मूलभूत संस्कार यांनी ओतप्रोत भरलेले ते भाषण अत्यंत शक्तिशाली होते. त्यांनी उद्योगपती, शास्त्रज्ञ आणि कलाकारांच्या नावांचा उल्लेख केला ज्याने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. मग त्यांचा आवाज गहिवरून आला. आणि ते म्हणाले, *आज आम्ही काही केवळ सुंदर पिचाई यांचा सन्मान करत नाही आहोत तर आम्ही अशा एका मातेच्या जीवन प्रवासाचा सन्मान करत आहोत जिने आपल्या मुलाला शिकता यावे म्हणून एकेकाळी आपले जेवण सोडले होते.*

सुंदर च्या हृदयाची धडधड वाढली. त्याने हे कधीच जाहीरपणे सांगितलेले नव्हते. सभागृहात निरव शांतता पसरली. कॅमेरे हा प्रसंग टिपण्यासाठी फिरले. लोकांनी आजूबाजूला आपल्या नजरा फिरविल्या.

मोदीजी शांतपणे व्यासपीठावरून उतरले, पण ते सुंदर च्या दिशेने गेले नाहीत तर ते गेले त्या तिसऱ्या रांगेच्या कोपऱ्यात बसलेल्या सामान्य कॉटनची फिकट रंगाची साडी परिधान केलेल्या स्त्री पाशी. लक्ष्मी गोंधळली. तिने वर पाहिले. तिचे हात थरथरले. प्रत्येकाचा जणू श्वास रोखला गेला. मोदीजी अत्यंत नम्रपणे उद्गारले, *केवळ तुमच्या त्यागाने हे शक्य झाले आहे*

आणि मोदीजींनी वाकून त्या माऊलीला पदस्पर्श करून नमस्कार केला. संपूर्ण हॉल नि:शब्दपणे उभा राहिला. धडाधड कॅमेऱ्यांचे फ्लॅश झगमगले. वार्ताहरांची धावपळ झाली. सुंदर चे डोळे अश्रुंनी डबडबले. त्यांनी अशी अपेक्षा स्वप्नातही केली नव्हती. त्याने अनेक वर्ष सिलिकॉन व्हॅलीत घालविली होती, अनेक राष्ट्रांच्या अध्यक्षांशी, पंतप्रधानांशी, राजांशी तिथे त्याची भेट झाली होती. पण कोणी त्याच्या आईचा असा सन्मान केला नव्हता. लक्ष्मीने उभे राहायचा प्रयत्न केला. मोदीजींनी तिला आधार दिला आणि हळुवारपणे त्यांनी तीला स्टेज समोर सर्व उपस्थितांच्या समोर उभे केले. तिने विरोध केला पण मोदीजींनी खंबीरपणे तीला उभे केले. आणि उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांचा गजर केला. सुंदर अत्यानंदाने त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला. जेव्हा तो स्टेजवर आपल्या आई समवेत उभा होता तेव्हा भूतकाळातील आठवणींनी त्याच्या मनात गर्दी केली.


त्याला आठवले आपले चेन्नईतील रंग उडालेले दोन खोल्यांचे घर ज्या घरात साधा फ्रिज देखील नव्हता‌. सुंदर चे वडील एक इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम करत होते. ते घरी नकाशे आणि सोल्डरिंग वायर आणत. आपल्या मुलांना खेळणी आणण्याची देखील त्यांची ऐपत नव्हती. म्हणून ते मुलांना तुटके फुटके रेडिओ घेऊन येत असत जेणेकरुन ते उघडून ते शिकतील असे त्यांना वाटे. सुंदर तासन तास त्यांना प्रश्न विचारत असे. त्याची आई त्याला धान्याच्या दाण्यांचा उपयोग करून गणित शिकवीत असे. सुंदरला जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तेव्हा त्याच्या आईने आपल्या लग्नातील सोन्याच्या बांगड्या विकल्या होत्या हे त्याचे आईने कोणालाही कधीही सांगितले नव्हते ती फक्त म्हणत असे "आपण व्यवस्था करू."

शाळेत असताना सुंदर अतिशय शांत मुलगा होता. तो कधीही आक्रमक नव्हता. पण अतिशय चौकस होता. त्याचे शिक्षक म्हणत,

"सुंदर ची स्मरणशक्ती आरशासारखी आहे. एकदा डायल केलेला नंबर अथवा लिहिलेला कोड त्याचा तोंड पाठ होत असे."

कधी कधी त्याचे शाळेतले मित्र त्याच्या जुना बुटांवरून आणि घरून आणलेल्या डब्यावरून त्याची टर उडवत असत. पण त्याने कधीही कोणालाही प्रतिउत्तर केले नाही. तो केवळ स्मित असे करत असे आणि तेथून काढता पाय घेत असे.

कधी कधी घरी रात्रीच्या वेळी लाईट गेल्यामुळे पंखे चालत नसत. सुंदर आणि त्याचा भाऊ जमिनीवर झोपलेले असताना घामाघुम होत असत. त्यावेळी त्यांची आई त्यांना पुठ्ठ्याने कित्येक तास न झोपता वारा घालत असे आणि सकाळी लवकर उठून कामाला लागत असे.

जेव्हा सुंदरला अमेरिकेत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली तेव्हा आपण जाऊ शकू याचा सुंदरला विश्वास नव्हता. कारण अमेरिकेत जाण्याचे तिकीट फार महाग होते. पण आई म्हणाली, तु जा मी बँकेशी बोलते. पण ती बँकेशी बोलली नाही. तिने आपल्या जवळचा शेवटचा सोन्याचा दागिना विकला.


आणि आज दिल्लीतील अतिशय मानाच्या प्रतिष्ठित हॉलमध्ये तो आपल्या आईसोबत भारताच्या पंतप्रधानांच्या समोर स्टेजवर उभा होता. आणि क्षणभर त्याला संपूर्ण जगाचा विसर पडला त्याला फक्त आईचा संथ सौम्य श्वास आणि आईच्या हाताची उब जाणवत होती. पत्रकारांनी या तंत्रज्ञानाच्या सम्राटाविषयी आणि पंतप्रधानांबद्दल अनेक लेख प्रसिद्ध केले.

परंतु सुंदर च्या आठवणीत राहिली ती त्या रात्री शांतपणे हॉटेलवर परतल्यावर आईने लहानपणीसारखा त्याचा हात हातात घेऊन म्हटले,

"तू विसरला नाहीस, एवढेच मला पुरेसे आहे."

त्यावर सुंदर उत्तरला, "आई तू कधीही काहीही मागितले नाहीस हेच आम्हाला कधीही विसर न पडण्यास कारण आहे."


शब्दांकन

जयंत जोशी.

 
 
 

Recent Posts

See All
खरे सुख कुठे आहे?

आजच्या जगात अनेकांना अस वाटतं की, *”एखादी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात आली, की आपलं सगळं काही सुरळीत होईल. आपण सुखी होऊ, आपल जीवन फुलून...

 
 
 

Komentarze


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page