*जिथे जे उगवायचं असतं, तिथे ते उगवतंच*
- ME Holistic Centre
- Mar 8
- 2 min read

पालकत्व, शिक्षण आणि मुलांच्या अंतरंगातील अंकुर ओळखण्याचा जीवनबोध
कधी कधी एक साधा संवाद संपूर्ण जीवनदृष्टी उलगडून दाखवतो. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बालपणाशी संबंधित एक प्रसंग तसाच मनात ठसतो. ज्योतिबांना शाळेत जायचं असतं; पण घरून विरोध असतो. अशा वेळी त्यांच्या आत्याने आपल्या भावाला अतिशय सहज, पण गहिऱ्या शब्दांत समजावलं—
“दादा, तू त्याला कितीही दाबून ठेवलंस ना, तरी तो उफाळून वर यायचाच.
तू जातीवंत माळी आहेस. जाई-जुई-मोगऱ्याला किती पाणी घालायचं, कसं वाढवायचं हे तुला ठाऊक आहे.
पण वड-पिंपळाचं रोप? ते कुठेही उगवतं. भिंतीतूनही वर येतं.
कसं आहे ना दादा—जिथे जे उगवायचं असतं, तिथे ते उगवतंच.”
या संवादात केवळ ज्योतिबांची गोष्ट नाही; इथे प्रत्येक घराचा प्रश्न दडलेला आहे. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात काहीतरी असं असतं, जे बाहेरून दिलेलं नसतं—ते आतून उगवत असतं. एखादी जिज्ञासा, एखादी आवड, एखादी नैसर्गिक ओढ, एखादा शोधकपणा—ही सगळी बीजं मुलांच्या अंतरंगात आधीच असतात. प्रश्न एवढाच—आपण ती ओळखतो का?
अनेकदा पालक मुलांना वाढवतात, पण त्यांना वाचत नाहीत. त्यांच्या आत काय दडलं आहे, त्यांची रुची कशात आहे, कोणत्या गोष्टीत त्यांचा चेहरा उजळतो, कुठल्या कामात त्यांना वेळेचं भान राहत नाही—हे पाहण्याऐवजी आपण त्यांच्यासाठी आधीच एक साचा तयार करतो. आणि मग नकळत मुलांवर आपल्याच अपेक्षा, भीती आणि अपूर्ण इच्छा लादू लागतो.
कित्येक वेळा पालक मुलांना कमीही लेखतात.
“याच्याकडून काय होणार?”
“ही फारच हळवी आहे.”
“याला अभ्यासात मन नाही.”
“हा serious नाही.”
ही वाक्यं सहज निघतात; पण मुलांच्या मनात खोलवर बसतात. हळूहळू मूलही स्वतःकडे तसंच पाहू लागतं. आणि इथेच त्याच्या नैसर्गिक उर्मीवर पहिला पडदा पडतो.
खरं तर प्रत्येक मूल सारखं नसतं. काही जाई-जुईसारखी असतात—हलक्या स्पर्शानेही फुलणारी. काही मोगऱ्यासारखी—शांत पण सुगंधी. आणि काही वड-पिंपळासारखी—स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करणारी. अशा वेळी पालकत्वाचा अर्थ मुलाला आपल्या मापात बसवणं नसून, त्याचा बीजधर्म ओळखणं हा असतो.
याठिकाणी सद्गुरू श्री वामनराव पै यांची शिक्षणाची सुंदर व्याख्या आठवते—
*क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण.*
या एका वाक्यात शिक्षणाचा खरा अर्थ सामावलेला आहे. शिक्षण म्हणजे फक्त शाळा, परीक्षा, गुण आणि पदवी नाही. शिक्षण म्हणजे अनुभवातून शिकणं, चुकांतून शहाणं होणं, प्रश्नांतून जागं होणं, नात्यांतून समज वाढणं आणि जगाकडे नव्या नजरेने पाहायला शिकणं.
म्हणून मुलगा कसा शिकतो, कशातून शिकतो, कुठे अडखळतो, कुठे उजळतो, कोणत्या गोष्टीत त्याचं मन जिवंत होतं—हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं.
आजचा सर्वांत मोठा धोका असा आहे, की आपण मुलांच्या गुणपत्रिकेकडे पाहतो; पण त्यांच्या अंतरंगाकडे पाहत नाही.
करिअरचा विचार करतो; पण त्यांच्या अंतःप्रेरणेची दिशा ओळखत नाही.
सुरक्षिततेचा आग्रह धरतो; पण जिवंतपणाची किंमत विसरतो.
पालकत्व म्हणजे मुलाला पूर्ण मोकळं सोडणं नाही; पण त्याच्या अंतरंगाला कैद करणंही नाही. त्याला दिशा द्यायची, पण दाबायचं नाही. त्याला शिस्त द्यायची, पण भीती नाही. त्याला आधार द्यायचा, पण स्वतःच्या अपूर्ण स्वप्नांचं ओझं नाही.
माळी प्रत्येक झाडाला सारखं वाढवत नाही. तो त्याची प्रकृती ओळखतो. जाईला जाईसारखं, गुलाबाला गुलाबासारखं, वडाला वडासारखं वाढू देतो. पालकांनीही हेच शिकायला हवं. मुलाकडे “हा काय बनेल?” या प्रश्नाने न पाहता “हा नेमका कोण आहे?” या प्रश्नाने पाहायला हवं.
ज्योतिबांच्या आत्याने सांगितलेलं सत्य म्हणूनच आजही तितकंच जिवंत वाटतं,
*जिथे जे उगवायचं असतं, तिथे ते उगवतंच.*
प्रश्न इतकाच—त्या उगवण्याला आपण अडथळा होणार, की आधार?
पालकांनी मुलांना फक्त शाळेत पाठवू नये; त्यांना जीवनाकडून शिकायला शिकवावं. त्यांच्या हातात पुस्तक द्यावं, पण डोळ्यांत प्रश्नही जिवंत ठेवावेत. त्यांच्या वाटेला दिशा द्यावी, पण त्यांच्या अंतरंगात उगवणाऱ्या रोपट्याला प्रकाशही मिळू द्यावा.
कारण खऱ्या अर्थाने
क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण.
आणि
जिथे जे उगवायचं असतं, तिथे ते उगवतंच.
जागरूक पालकत्व म्हणजे एवढंच—
मुलाला आपल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न न करता,
त्याला तो स्वतः होऊ देण्याची प्रेमळ तयारी.
क्षणा क्षणाला शिकणे-
एक चिंतन
*जयंत जोशी*




Comments