विकासाला विवेकाची जोड हवी* विवेकाशिवाय विकास म्हणजे भकास
- ME Holistic Centre
- Mar 8
- 3 min read

आजकाल भारतामध्ये सर्वत्र “विकास” हा शब्द जणू मंत्रासारखा ऐकू येतो. नवनवीन महामार्ग, फ्लायओव्हर, औद्योगिक वसाहती, उंच इमारती, शहरांची अनियंत्रित वाढ—या सगळ्याला विकासाचं गोंडस नाव दिलं जातं.
पण प्रश्न विकासाचा नाही.
प्रश्न आहे तारतम्याचा.
कारण विकासाचा वेग वाढला, पण विवेकाचा लगाम सैल झाला की प्रगती भकास रूप धारण करते. आणि हे आज आपल्या सभोवताली स्पष्ट दिसत आहे.
ज्या नद्या पूर्वी बारमाही वाहत होत्या त्या आज कोरड्या पडत आहेत. नदीकाठ काँक्रिटमध्ये अडकत आहेत. जंगलांची अनियंत्रित तोड सुरू आहे. डोंगर पोखरले जात आहेत. वस्ती वाढते आहे—पण श्वास घेण्यासाठीची जागा कमी होते आहे.
*यालाच विकास म्हणायचं का?*
निसर्ग ही केवळ झाडं, पाणी आणि प्राणी यांची यादी नाही.
निसर्ग एक जिवंत तंत्र आहे—लयीने चालणारा, परस्परसंबंधांनी जोडलेला. त्या तंत्रातील एक कडी तुटली की संपूर्ण साखळी विस्कटते.
*लय बिघडली की निसर्गात तांडव सुरू होतं* कधी पूर, कधी दुष्काळ, कधी उष्णतेच्या लाटा, कधी अवकाळी पाऊस. आणि आपण म्हणतो—
*”निसर्ग कोपला!”*
पण निसर्ग कोपलेला नसतो; तो फक्त आपल्या कृतींना प्रतिसाद देत असतो.
इथेच सद्गुरू श्री वामनराव पै यांचा विचार मनाला थांबवतो,
*पर्यावरण हाच नारायण आहे.*
म्हणून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन हीच परमेश्वराची खरी पूजा आहे. ही पूजा विधीची नाही—ती विवेकाची आहे.
🌿 *Yellowstone: एक हरवलेली कडी*
अमेरिकेतील Yellowstone National Park बाहेरून निसर्गसौंदर्याने नटलेला होता—उंच डोंगर, विस्तीर्ण दऱ्या आणि जमिनीखालून उसळणारे गरम पाणी व वाफेचे नैसर्गिक फवारे—*गीझर.* विशाल एल्क (हरिणप्रजातीतील मोठे वन्य प्राणी) मुक्तपणे फिरताना दिसत होते.
पण आतून व्यवस्था ढासळत होती.
कारण अनेक वर्षांपूर्वी त्या परिसरातील लांडगे शिकार करून संपवले गेले होते.
लांडगे नसल्यामुळे एल्कची (हरिणप्रजातीतील मोठे वन्य प्राणी) संख्या प्रचंड वाढली. त्यांनी नदीकाठावरील कोवळी झाडं संपवली. मुळे नाहीशी झाली. माती वाहून गेली. नद्या उथळ व चिखलट बनल्या.
झाडं गेली म्हणून पक्षी गेले.
नदीकाठावरील झाडं नाहीशी झाल्यामुळे *बीव्हर—पाण्यात लाकूड वापरून धरणं बांधणारा प्राणी* नाहीसे झाले. धरणं नाहीत म्हणजे तळी नाहीत; तळी नाहीत म्हणजे अनेक जीवांचे जीवनच विस्कळीत.
व्यवस्थापनाने एल्क नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला—पण समस्या सुटली नाही.
१९९५ मध्ये Yellowstone National Park मध्ये लांडगे पुन्हा जंगलात सोडले गेले.
आणि चमत्कार घडला.
लांडग्यांनी फक्त एल्कची शिकार केली नाही; त्यांनी एल्कचं वर्तन बदललं. एल्क नदीकाठ सोडून गेले. झाडं पुन्हा वाढली. पक्षी परत आले. बीव्हर परत आले. तळी निर्माण झाली.
आणि सर्वात आश्चर्यकारक-नद्या पुन्हा जिवंत झाल्या.
*एक हरवलेली कडी परत आली… आणि संपूर्ण व्यवस्था स्वतः सावरली.*
🧠 *आपल्या जीवनातलं Yellowstone*
ही कथा जंगलाची नाही—ती आपल्या जीवनाची आहे.
आज सुविधा वाढल्या, वेग वाढला, माहिती वाढली; पण मनाची शांतता कमी झाली. आपण विचारांशी आणि भावनांशी सतत संघर्ष करत राहतो.
न्यूरोसायन्स सांगते—मेंदू सतत धोक्याच्या अवस्थेत राहिला की शरीर survival mode मध्ये जातं. विचार वाढतात, अस्वस्थता वाढते. जितकं नियंत्रण वाढवतो, तितकी अस्थिरता वाढते.
म्हणजे समस्या व्यक्तीची नसते;
व्यवस्था असंतुलित झालेली असते.
🌿 *विवेक म्हणजे काय?*
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात—
*विवेक म्हणजे शहाणपण.*
हे शहाणपण म्हणजे माहिती नव्हे;
ते आहे- योग्य काय, अयोग्य काय, किती आणि कसं हे ओळखण्याची क्षमता.
*ज्ञान कृती शिकवतं;*
*विवेक दिशा देतो.*
म्हणूनच सद्गुरू म्हणतात—
*शहाणपण हाच नारायण.*
🌿 *विवेक (शहाणपण) येतं कसं?*
विवेक (शहाणपण)हे शाळेत शिकवलं जात नाही.
ते जागं करावं लागतं.
१. *थांबणं*
क्षणभर थांबलो की पाहणं सुरू होतं.
२. *स्वतःकडे पाहणं*
“आत्ता माझ्या आत काय चाललं आहे?”
३. *अनुभवातून शिकणं*
जीवन प्रत्येक क्षणी शिकवत असतं.
🔑 साधी कृती
• संथ श्वास
• भावना ओळखा —
आत्ता मला ___ वाटत
आहे.”
• एक काम पूर्ण
उपस्थितीने
इथून विवेक उगवतो.
🌎 *पर्यावरण आणि विवेक — एकच सत्य*
“पर्यावरण हाच नारायण” आणि “शहाणपण हाच नारायण” हे दोन वेगळे विचार नाहीत.
*पर्यावरण म्हणजे बाहेरची व्यवस्था.*
*विवेक म्हणजे आतली व्यवस्था.*
आत विवेक नसेल तर बाहेरचं पर्यावरण नष्ट होतं.
आणि बाहेरचं पर्यावरण बिघडलं की आतलं जीवनही अस्थिर होतं.
नारायण म्हणजे
*व्यवस्था टिकवणारी बुद्धिमत्ता*
बाहेर ती निसर्ग म्हणून दिसते, आत ती विवेक म्हणून जागते.
🌿 *विकास आणि दिशा*
विकास मग तो राष्ट्राचा असो, समाजाचा, कुटुंबाचा किंवा वैयक्तिक—
विकासाला विवेकाची जोड नसेल तर तो विकास शेवटी भकासच ठरतो.
रस्ते रुंद होतात पण नद्या आटतात.
घरे मोठी होतात पण घरपण कमी होतं.
साधनं वाढतात पण शांतता हरवते.
खरा प्रश्न विकासाचा नसून दिशेचा आहे.
🌼*निसर्ग आपल्याला एकच धडा देतो-*
वाढ हवी, पण समतोलासह.
विवेक हरवला की संघर्ष सुरू होतो.
विवेक जागा झाला की जीवन स्वतः सावरतं.
म्हणूनच सद्गुरूंचा संदेश जीवनधर्म ठरतो—
*पर्यावरण हाच नारायण.*
आणि
*शहाणपण हाच नारायण.*
🌿 Development is not mere growth; true progress is growth guided by wisdom.
*विकास म्हणजे फक्त वाढ नव्हे; विवेकाने राखलेला* *समतोलच खरी प्रगती घडवतो.*
विकास एक चिंतन
*जयंत जोशी*




Comments