संक्रांत म्हणजे संक्रमण* *भाग २* *गतीला दिशा ‘स्थिरता’ देते-आणि त्या दिशेचं नाव ‘चळवळ’*
- ME Holistic Centre
- Jan 15
- 3 min read

मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
*तिळगूळ घ्या, गोड गोड बोला*—
ही आपली सुंदर परंपरा आहे. पण या परंपरेचा अर्थ फक्त शब्द नाही; तो अवस्था आहे. म्हणूनच आपण म्हणतो—*साखर व्हा—गोड व्हा.* आजचा लेख संक्रांत सणाकडे याच दृष्टीने पाहतो:
*जीवनाची गती, त्या गतीला दिशा देणारी स्थिरता, आणि त्या दिशेला समाजात उतरवणारी चळवळ.*
*संक्रांत म्हणजे संक्रमण-* *एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्याकडे जाणं, एका दिशेने वळण घेणं.*
आपल्या परंपरेने हा दिवस फक्त सण म्हणून नाही, तर आठवण म्हणून ठेवला आहे-
जीवन हे सतत चालणं आहे.
श्वास चालतो, रक्त फिरतं, ऋतू बदलतात, पृथ्वी फिरते—म्हणून जीवन आहे. म्हणजेच गती ही आवश्यक आहे.
पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो:
जर जीवन गतीवर चालत असेल, तर गती वाढली की आनंद वाढतो का?
आपल्या अनुभवात उत्तर “नाही” असंच येतं.
कारण गती सुंदर असते—पण एका मर्यादेपर्यंत.
मर्यादा ओलांडली की तीच गती गोंधळ निर्माण करते.
आजच्या आपल्या आयुष्यात हे स्पष्ट दिसतं.
कामाचा, अपेक्षांचा, माहितीचा, स्पर्धेचा…वेग वाढतोय.
मन चालूच राहते. थांबा नसतो.
मग चांगल्या गोष्टी असूनही शांतता टिकत नाही.
म्हणून संक्रांतिचा पहिला संदेश असा:
*गती हवी-पण ‘थांबा’ही हवा*
*गतीला ‘घर’ कोणतं?*
गतीला घर असतं—ते म्हणजे स्थिरता.
स्थिरता म्हणजे आळशीपणा नाही.
स्थिरता म्हणजे आतली जागरूक शांतता—ज्यामुळे गतीला दिशा मिळते.
जसा गाडीत एक्सेलरेटरसोबत ब्रेकही गरजेचा असतो,
तसं मनात गतीसोबत स्थिरता गरजेची असते.
आणि या दिशेचा एकच मंत्र आहे—शहाणपण.
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात—“शहाणपणाला पर्याय नाही.”
गती थांबत नाही, पण शहाणपण गतीला मर्यादा आणि दिशा देते—यालाच आपण समतोल म्हणतो.
*”घेणं” आणि “भानाने घेणं”*
संक्रांतचा दुसरा संदेश इथून पुढे येतो.
आपण आज जे काही आहोत, ते या पृथ्वीवरून घेऊनच-अन्न, पाणी, हवा, ऊब, संसाधनं.
म्हणून प्रश्न “घेणं” थांबवायचा नाही.
खरा प्रश्न आहे-घ्याव पण ते घेणं कस असाव-
हळुवार, मर्यादेत, कृतज्ञतेने?
की हिसकावून, लोभाने, अतिरेकाने?
इथे सद्गुरूंचा एक अत्यंत ठोस विचार आठवतो—*पर्यावरण हाच नारायण.*
म्हणजे निसर्गाला फक्त वापरायचं नाही; नारायण समजून जपायचं.
कारण आपण जे काही आहोत, ते याच निसर्गाच्या कुशीतून घेतलेलं आहे. म्हणून “घेणं” चालू ठेवायचं, पण भानाने—समजूतदारपणे.
आणि हे भान टिकवायला सर्वात सोपी शक्ती कोणती?तर
*कृतज्ञता.*
सद्गुरू म्हणतात—
*कृतज्ञता म्हणजे पुण्य.*
कारण कृतज्ञ मन “हिसकावत” नाही; ते जपून घेतं.
कृतज्ञता आली की अतिरेक कमी होतो, संवेदनशीलता वाढते, आणि आपली गतीही “सुंदर” होते.
रामदासस्वामी म्हणतात—*सामर्थ्य आहे चळवळीचे.*
इथे “चळवळ” म्हणजे निव्वळ हालचाल/गती नाही.
चळवळ म्हणजे समूहाने एकत्र येऊन, निष्ठेने, शिस्तीने केलेलं शुभ कार्य.
आता संक्रांत आणि ‘चळवळ’ यांचा संबंध नीट समजून घेऊया.
संक्रांत म्हणजे संक्रमण—म्हणजेच दिशा बदलण्याची वेळ. जसं उत्तरायण सुरू झालं की आपल्याला प्रकाश वाढताना जाणवतो, तसंच आपल्या आयुष्यातही कधी तरी ठरवावं लागतं—“आता मी जुन्या सवयींच्या दिशेने नाही, चांगल्या दिशेने वळणार.” हा निर्णय म्हणजे संक्रांत. पण फक्त निर्णय पुरेसा नसतो; मनात स्थिरता नसेल तर आपण पुन्हा जुन्याच वेगात, जुन्याच रुळावर घसरतो. म्हणून स्थिरता म्हणजे मनाला ‘थांबा’ देणं—आणि त्या थांब्यातून शहाणपण जन्माला येतं: काय ठेवायचं, काय सोडायचं, किती घ्यायचं, किती थांबायचं—हा विवेक. आणि जेव्हा हा विवेक केवळ माझ्या मनापुरता न राहता, कुटुंब, समाज, परिसर यांच्यासाठी एकत्र येऊन निष्ठेने कृती बनतो—तेव्हाच त्याला रामदासस्वामींच्या अर्थाने “चळवळ” म्हणता येईल. म्हणजेच संक्रांत आपल्याला दिशा देते; स्थिरता-शहाणपण त्या दिशेला टिकवतात; आणि चळवळ त्या दिशेला जगात उतरवते.
*उत्तरायण–तिळगूळ–पतंग: संक्रांतचे तीन सोपे अर्थ*
संक्रांत आपल्याला तीन प्रतीकांतून एकाच गोष्टीची आठवण करून देते.
उत्तरायण सांगतं—जीवनाची दिशा बदला; प्रकाशाकडे वळा. म्हणजेच सवयी, विचार आणि कृती, उन्नतीकडे वळवा.
तिळगूळ सांगतो—जीवनात गोडवा वाढवा; नात्यांत समरसता ठेवा, गोड बोलून एकमेकांना तिळगुळासारखे जोडून ठेवा.
आणि पतंग सांगतो—भरारी घ्या, पण शहाणपणाने; विश्वास ठेवा, पण धागा हातात ठेवा. म्हणजेच वेग असावा पण त्याचबरोबरीने संतुलन असाव.
*समारोप*
संक्रांत म्हणजे “फक्त बदल” नाही—तो शहाणपणाचा बदल आहे.
गती थांबत नाही—पण गतीला स्थिरतेची दिशा मिळाली, तर ती सुंदर होते.
आणि तीच दिशा समाजात उतरली, की तिचं नाव चळवळ
कारण सामर्थ्य आहे चळवळीचे.
म्हणून संक्रांतची खरी आठवण अशी—
*गतीत रहा… पण स्थिरता मिळवा.*
*घ्या पण भानाने घ्या*
कारण
*पर्यावरण हाच नारायण.*
आणि *कृतज्ञ राहा*-
कारण
*कृतज्ञता म्हणजे पुण्य.*
संक्रमण-गती-थांबा
एक चिंतन
*जयंत जोशी*









Comments