top of page

संवाद-नातेसंबंधाचा श्वास


आज आपण सगळे एका अशा विषयावर चिंतन करणार आहोत जो प्रत्येकाच्या घराशी, हृदयाशी आणि नात्यांशी निगडित आहे.

आज जग प्रगतीच्या शिखरावर आहे. तंत्रज्ञान, शिक्षण माहिती या सर्वच क्षेत्रात आपण प्रचंड प्रगती केलेली आहे. पण तरीही एक गोष्ट हरवलेली आहे ती म्हणजे *मन जोडणारा संवाद*


आज एकाच घरात राहून माणसं एकमेकांपासून दूर असतात. आई-वडील आणि मुलं एकाच टेबलावर जेवतात पण मनाने तुटलेली असतात. पती-पत्नी एकाच खोलीत झोपतात पण शब्दांची आणि भावनांची दरी वाढत जाते.

*हे सगळं का होतं?*


कारण-संवादाचा अभाव किंवा असलेला संवादही अर्थहीन, एकतर्फी आणि अहंकार प्रधान झालेला असतो.


आज आपण नातेसंबंधात संवाद किती मूलभूत आणि केंद्रस्थानी असतो यावर चिंतन करणार आहोत.

*संवाद म्हणजे काय?*

संवाद म्हणजे केवळ बोलणं नाही- संवाद म्हणजे संपर्क. संवाद हा शब्द सम अधिक वाद असा तयार झालेला आहे. सम म्हणजे सहभाव, एकत्र समत्वाने आणि वाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण.

संवाद म्हणजे शब्दांच्या अडून जाणारा भावनांचा ओघ. संवाद म्हणजे एका मनाचा दुसऱ्या मनाशी जिव्हाळ्याचा स्पर्श. म्हणजेच संवाद म्हणजे वर्चस्व गाजवणं नाही तर समजून घेण्याचा एक

अंत: प्रवाह.

*संवाद म्हणजे काय नाही* तर संवाद म्हणजे केवळ बोलणं नाही. संवाद म्हणजे केवळ सूचना देणं नाही. संवाद म्हणजे वादविवादही नाही. संवाद म्हणजे मनाला मनाशी जोडणारी अंतःस्पर्शी प्रक्रिया.

*संवाद हरवतो तेव्हा काय होतं*

1. गैरसमज वाढतात- कारण शब्द न बोलता समज करून घेतले जातात.

2. आतल्या भावना दाबल्या जातात आणि त्या वर्तनात दिसतात.

3. विसंवादात राग, उपेक्षा त्रास निर्माण होतो.

4. मुलं आई-वडिलांपासून दुरावतात. पती-पत्नी एकमेकांशी परके होतात.

माझं कोणालाच समजत नाही, मला कोणी समजूनच घेत नाही ही भावना घरोघरी ऐकू येते.

*संवाद हरवण्याची कारणे काय?*

1. वेळ न देणे- संवादाचा गळा घोटतो.

2. अहंकार - मी बरोबर, तू चूक ही वृत्ती.

3. गृहीतक- दुसऱ्याच्या मनात काय आहे ते न विचारता ठरवणे.

4. मौनाचा गैरवापर- बोलण्याऐवजी दुर्लक्ष करणे.

5. स्क्रीनचा अडथळा- मोबाईल, टीव्ही संवादाची जागा घेतात.

*संवादाचे मूळ नसेल तर प्रेमाचं झाडही कोमजतं*


नातं टिकतं ते शब्दांवर नव्हे तर समजून घेण्यावर.आपण सगळे कधी ना कधी म्हणतो, "आमच्यात संवाद नाही" "तो ऐकतच नाही" "ती समजूनच घेत नाही."

हे बोलताना आपण शब्दांच तुटणं नव्हे तर समजण्याची नाळ तुटणं बोलत असतो.


नातं म्हणजे संवादाचा प्रवाह. जिथे संवाद बंद होतो तिथे नातं थीजायला लागतं.


संवादाचा अभाव म्हणजे नात्यात दुरत्व.

एकाच घरात राहणारे आई-वडील, एकाच टेबलावर जेवायला बसणारे नवरा बायको, रोज बोलणारे मित्र पण तरी एकमेकांना ऐकलेलं नसतं समजलेलं नसतं असं का होतं?

कारण संवाद असतो पण हृदयस्पर्शी संवाद नसतो. तो फक्त शब्दांचा धबधबा असतो, पण अंतरंगाची वारी नसते.

*संवाद बिघडतो तो कोठे*

1. अहंकाराची भिंत - मी नेहमी बरोबर, माझंच शेवटी खरं.

2. गृहीतकांवर आधारित संवाद - तो असं बोलतो म्हणजे तो रागावलेला आहे.

3. अपूर्ण श्रवण - बोलण ऐकतो पण भाव समजून घेत नाही.

4. पूर्वग्रह - ऐकण्याआधी ठरवलेलं असतं की ही काय म्हणणार.

5. भावनांचा दडपण - मनात काही आहे पण बोललं जात नाही.

या सर्वांचा परिणाम एकाच ठिकाणी होतो तो म्हणजे नात्याचा कोरडेपणा.

*चांगल्या संवादाची मुलतत्वे*

1. ऐकण्याची तयारी (Active listening)- संवादाचा अर्धा भाग म्हणजे ऐकणं. केवळ कानांनी नाही तर हृदयाने ऐकण. "मी तुझं म्हणणं समजून घेतो" यामध्येच नात्याचं बळ दडलेलं असतं.

2. भाव व्यक्त करणे- प्रामाणिकपणे: "मला राग आलाय" "मला असुरक्षित वाटतय" "मला तुझी गरज आहे" असे भाव सांगता आले की संवाद खोल होतो.

3. आदर - मतभेद असले तरीही नातं ठेवलं की मत जपता येत. मत जपलं आणि नातं तोडलं हे तत्त्वज्ञान नाही व्यावहारिक अपयश आहे.

4. मौनाचं मूल्य ओळखणे- संवाद म्हणजे फक्त शब्द नव्हेत. कधी डोळ्यातून, स्पर्शातून, शांततेतून संवाद साधतो. जे शब्द सांगू शकत नाही ते मौन सांगून जातं.


*संवाद हा नात्याचा नवीन श्वास आहे*

आपण दिवसभर श्वास घेतो तसंच प्रत्येक नातं जपल जात ते संवादातूनच. नवीन प्रश्न, नवीन अवस्था, नवीन अपेक्षा, हे सारं समजण्यासाठी सतत संवाद हवा. नातं म्हणजे एक जिवंत झाड. संवाद हे त्याचे पाणी आहे.


संत तुकाराम म्हणतात, "ऐका वाणी समजून घ्या तरीच होई संत संगत"

संत एकनाथ म्हणतात, "विचार आणि विनय संवादाचे बाळकडू"

संत जनाबाई म्हणते, "आईशी संवाद देवाशी संवाद दोन्ही मनातून"


*संवाद म्हणजे नातं*

नातं म्हणजे काय? एक कायदेशीर संबंध, एक सामाजिक रचना, एक तात्कालिक जबाबदारी, नाही नातं म्हणजे समज, संवाद, सहवेदना आणि स्वीकार. आणि याचं मूळ आहे सतत जपलेला सचोटीचा सहृदय

संवाद.

जिथे संवाद आहे तिथे नातं जिवंत आहे. जिथे संवाद हरवतो तिथे नातं फक्त नावाला उरत.

संवाद ठेवा, नातं फुलवा, समजून घ्या नातं जपा, *प्रेमाने बोला आयुष्य बदला.*


*संवाद वाढवण्यासाठी उपाय*- साधेपण प्रभावी.

1. ऐकण्याची कला विकसित करा- "सांग मी ऐकतोय" ही वाक्य नात्याला जीवदान देतात.

2. दररोज काही वेळ संवादासाठी राखून ठेवा- मोबाईल बाजूला ठेवून, एकमेकांच्या डोळ्यात डोळे पाहून बोलणं.

3. भावनांना शब्द द्या- शांततेत विस्फोट घडतो. "मला दुःख झालेल आहे" "मला तुझी गरज आहे" अशी वाक्य नातं जपतात.

4. चूक मान्य करण्याचे धैर्य ठेवा - संवादात अहंकार झुकला की नातं उंच होतं. प्रेम, आदर, विश्वास ही संवादाची मूलतत्त्वे आहेत.

6. एखादं प्रेमाचं वाक्य "तू आहेस म्हणून माझं जगणं सुंदर आहे" हा संवाद आयुष्यभर पुरतो.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

"ऐकाव जनाच करावं मनाचं" म्हणजे आधी पूर्ण ऐका मग विचार करून कृती करा. संवादा चे हे दोन टप्पे आहेत.


संत एकनाथ महाराज म्हणतात,

"सहविचार हेच सुखाचे मूळ" म्हणजे संवादातच सहजीवनाचे मूळ आहे.


*संवाद हीच नात्यांची श्वासगाठ*

संवाद नसेल तर नातं हे फक्त सामाजिक ओळख राहत. संवाद असेल तर नातं आत्म्याशी बांधलेल असत.

बोलणं तुटलं की नाती दूर होतात.

समजून घेणं संपलं की प्रेम ओसरतं.

एक छोटासा संवाद दुःख, राग, गैरसमज सगळं सगळं हलकं करतो.


*शेवटचा मंत्र*

घरात संवाद जपु या, तीच खऱ्या अर्थाने आपली गुंतवणूक आहे.

प्रेम दाखवायचं असलं तर शब्दातून, हृदयातून आणि वेळेवर.

धन्यवाद

लेखांकन: जयंत जोशी

*सदगुरु नाथ महाराज की जय*

 
 
 

Recent Posts

See All
खरे सुख कुठे आहे?

आजच्या जगात अनेकांना अस वाटतं की, *”एखादी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात आली, की आपलं सगळं काही सुरळीत होईल. आपण सुखी होऊ, आपल जीवन फुलून...

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page