समज वयाने नाही - जागेपणाने येते
- ME Holistic Centre
- Mar 8
- 2 min read
सावीच्या समजूतदारपणातून उलगडलेलं जीवनज्ञान
टीव्हीवर अनेक मालिका चालू असतात.
अनेकदा लोक सहज म्हणतात — “या मालिकांमध्ये काय असतं? भांडणं, तंटे, गैरसमज, कावेबाजपणा… अशा गोष्टी बघून मन का खराब करून घ्यायचं? आणि वेळ का वाया घालवायचा?”
हे म्हणणं पूर्णपणे चुकीचंही नाही.
कारण आपण जे सतत पाहतो, ते नकळत आपल्या विचारांवर आणि मनःस्थितीवर परिणाम करत असतं. नकारात्मकता पाहिली की मनही नकळत तसाच विचार करू लागतं.
पण जीवन नेहमी एकाच बाजूने पाहायचं नसतं.
कारण कधी कधी याच मालिकांमध्ये एखादा असा प्रसंग येतो - जो केवळ मनोरंजन राहत नाही; तो आरसा बनतो. आपण स्वतःकडे पाहायला लागतो.
म्हणून प्रश्न मालिका चांगली की वाईट हा नाही.
खरा प्रश्न आहे -
आपण त्यातून काय घेतो?
इथेच लागतो निरक्षिरविवेक,
सार घ्यायचं, असार सोडायचं.
🌿*एक साधा प्रसंग… पण खोल अर्थ*
सध्या टी व्ही वर *मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले* ही मालिका सुरू आहे.
त्यातील एक प्रसंग मनाला खोल स्पर्श करून जातो.
ज्योतिबांना शिक्षणासाठी शाळेत जायचं असतं.
पण त्यांच्या वडिलांचा विरोध असतो. कारण त्या काळात समाजाची भीती मोठी होती - कुणबी-माळी समाजातील मुलाने शिक्षण घेणे समाजाला मान्य नव्हते. लोकमत, परंपरा आणि सामाजिक दबाव यांच्यात अडकलेला एक बाप… आणि स्वप्न पाहणारा मुलगा.
एक दिवस याच विषयावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होतं.
रागाच्या भरात वडील ज्योतिबांना मारतात.
ज्योतिबांच्या मनात संताप उसळतो. ते सगळ्यांशी अबोला धरतात.
*रागाचा एक स्वभाव असतो,*
*तो आपल्याला सत्यापासून दूर नेतो आणि जवळच्या माणसांनाही परके करून टाकतो.*
🌼*सावी- सावित्रीबाई वयाने लहान, समजाने मोठी*
दुसऱ्या दिवशी सावित्रीबाई-अवघ्या दहा-बारा वर्षांच्या - शांतपणे ज्योतिबांना समजावतात.
त्या सांगतात -
आई-वडिलांचा राग, त्यांचं बोलणं, त्यांची कठोरता… हे सगळं अनेकदा मुलांच्या भल्यासाठीच असतं. ते त्या क्षणी समजत नाही; पण आयुष्य पुढे गेल्यावर त्याचा अर्थ कळतो. आई-वडील शेवटी आपल्या लेकरांच्या भल्याचाच विचार करत असतात. त्यांच्या डोळ्यांत रागापेक्षा काळजी जास्त असते.
म्हणून त्या ज्योतिबांना सांगतात —
राग सोडा… अबोला सोडा… संवाद करा.
इतक्या लहान वयातली ही समजूतदारता मनाला थक्क करून जाते.
🪔*शहाणपणाची मुळं*
सावीच्या शब्दांत केवळ भावना नाहीत; तिथे जीवन समजण्याची दृष्टी आहे.
आणि याच ठिकाणी सद्गुरू श्री वामनराव पै यांचे वचन आठवते —
*शहाणपण (Wisdom) जेथून निर्माण होते त्याला ज्ञान असे म्हणतात; आणि हेच ज्ञान माणसाला सुख, शांती, समाधान, यश, उत्कर्ष व उन्नती प्राप्त करून देण्यास समर्थ ठरते.*
ज्ञान म्हणजे माहिती नव्हे;
ज्ञान म्हणजे जीवन समजण्याची क्षमता.
आणि *जेव्हा ज्ञान मनात उतरते, तेव्हा शहाणपण जन्माला येते.*
म्हणूनच वय लहान असूनही सावी मोठी वाटते - कारण तिच्याकडे ज्ञानातून आलेली दृष्टी आहे.
🌱*राग की काळजी?*
आज अनेक नात्यांमध्ये समस्या मोठ्या नसतात;
समज कमी असते.
आपण शब्द ऐकतो - भावना नाही.
आपण राग पाहतो - काळजी नाही.
आपण अहंकार जपतो - नातं विसरतो.
अबोला हा जिंकण्याचा मार्ग वाटतो, पण प्रत्यक्षात तो नात्याचा श्वास रोखतो.
सावी जणू सांगते —
रागाच्या मागे कधी कधी प्रेम असतं.
कठोर शब्दांच्या मागे जबाबदारी असते.
ज्याला हे दिसायला लागतं, त्याच्यात जागेपण सुरू होतं.
🌸*एक ओळ… जी सार सांगून जाते*
या सगळ्याच्या शेवटी कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या ओळी मनात अलगद उमटतात -
*लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते…*
पालकांचं जगणं अनेकदा स्वतःसाठी नसतं.
ते पुढच्या पिढीच्या आधारासाठी असतं.
म्हणून त्यांच्या रागातही माया असते - फक्त ती ओळखण्याची दृष्टी हवी.
✅ जीवनासाठी छोटा सार
* समजूतदारपणा वयावर
अवलंबून नसतो.
* निरक्षिरविवेक असेल तर
प्रत्येक अनुभव गुरु
बनतो.
* अबोला नातं तोडतो;
समज नातं जोडते.
* जागेपण म्हणजे
दुसऱ्याच्या भावनेत
डोकावण्याची क्षमता.
🪔*लेख इथे संपतो… पण चिंतन इथून सुरू होतं.*
एक आगळ वेगळ चिंतन
*जयंत जोशी*




Comments