*होळी पौर्णिमा*
होळी पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
होळी हा सण पारंपारिक पद्धतीने भारताच्या सर्व प्रांतातच नव्हे तर सर्व धर्मीयांमध्ये जगभर साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत सणांची रचना फार विचारपूर्वक आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आलेली आहे. प्रत्येक सणाच्या पाठीमागे कृतज्ञता व्यक्त करणे हा प्रमुख हेतू असल्याचे दिसून येते. भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे बहुतेक सर्व सणांची रचना ही शेतीच्या कामाच्या वेळापत्रकानुसार केलेली आढळते.
आज आपण धार्मिक, सामाजिक, वैज्ञानिक, आरोग्य आणि पर्यावरण या दृष्टिकोनातून होळी साजरी करण्याच्या परंपरेचा विचार करणार आहोत.
*धार्मिक महत्त्व:*
आपणा सर्वांना होळीची परिचित असलेली कथा म्हणजे हिरण्यकश्यपू, प्रल्हाद आणि होलिका यांची कथा. उत्तरेत होळी राधाकृष्ण यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरी करण्यात येते. भारताच्या काही प्रांतांमध्ये होळी हा सण कामदहनम म्हणून साजरा केला जातो. होळी हा रंगांचा उत्सव मानण्यात येतो. काही प्रांतांमध्ये होळीचा सण हा पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत साजरा केला जातो तर काही ठिकाणी शिमगा या नावाने सात दिवस होळीचा सण साजरा केला जातो तर काही प्रांतांमध्ये वसंत पंचमी ते होळी पौर्णिमा असा चाळीस दिवस हा सण साजरा केला जातो.
*सामाजिक महत्त्व:*
आपल्या भरत वर्षात वसंत ऋतूचे आगमनाचे स्वागत म्हणून होळी साजरी केली जाते. या दिवसानंतर शेतीच्या कामांना सुरुवात होते. पिके चांगली यावीत आणि त्यासाठी भूमीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजन केले जाते. उत्तरेत होळीच्या दिवशी गुजीया या गोड पदार्थाला महत्त्व आहे. लोक नटून सजून संध्याकाळी एकमेकांना भेटण्यास जातात. रंगाची उधळण केली जाते. भूतकाळात आपल्याकडून झालेल्या चुकांची माफी मागून आपापसातील भांडणे संपविणे, जुने व्यवहार संपवून नवीन व्यवहार सुरू करणे, नवीन मित्र बनविणे, बदलत्या ऋतूचा आनंद लुटणे हे उद्देश हा सण साजरा करण्यामागे असतात.
होळीचा सण साजरा करताना होळीभोवती उभे राहून बोंबा मारल्या जातात. तसेच विविध प्रकारचे अपारंपारिक नृत्ये केली जातात. आदिवासी समाजात हा सण बोहडा या नावाने साजरा केला जातो. या सणात लोक चित्रविचित्र मुखवटे धारण करून नृत्य करतात. या सर्व प्रकारांमागे मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे. मानसिक स्वास्थ्याचा विचार करण्यात आलेला आहे. मानवी जीवन हे नवरसांनी समृद्ध होते. हे नऊ रस म्हणजे शृंगार, हास्य, रौद्र, करूण, बीभत्स, भयानक, वीर आणि अद्भुत. या सर्व रसांचे जीवनात प्रगटीकरण असणे गरजेचे आहे आणी ते निसर्गतः निर्माण होतच असतात. आजच्या धावपळीच्या युगात यातील अनेक रसांचा आपण आस्वाद घेत नाही. बीभत्स या रसाकडे तर विचित्र दृष्टीने बघितले जाते. मानसिक आरोग्याचा विचार केला तर हे रस म्हणजे या प्रवृत्तींचा निचरा होणे गरजेचे असते. होळीच्या निमित्याने या प्रवृत्तींना मोकळी वाट करून दिली जाते. होळीच्या सणात शृंगार, हास्य, रौद्र, बीभत्स, वीर आणि अद्भुत या रसांना स्थान दिलेले आहे.
*वैज्ञानिक महत्व:*
वसंत ऋतूची सुरुवात होताच वातावरण तप्त व्हायला लागते, तसेच अनेक व्हायरस निसर्गामध्ये निर्माण होतात. ज्यातील काही व्हायरस हे जीवघेणे असतात. या सर्वांना सहन करण्याची ताकद शरीरांतर्गत निर्माण व्हावी हा होळी सणाच्या चालीरीतींचा आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या कर्मकांडाचा उद्देश असतो.
*पावसा पाठीमागचे विज्ञान:*
भारतातच फक्त मान्सूनचा पाऊस नियमित होतो. इतरत्र कधीही पाऊस होतो. भारतात नित्य होणाऱ्या मान्सूनची जी आठ कारणे सांगितली जातात, त्यात एकाच दिवशी एकाच वेळी सर्व ठिकाणी पेटविण्यात येणारी होळी हा महत्त्वाचा घटक मानण्यात येतो. आजही आधुनिक वैज्ञानिकांना पावसाचा आणि धुराचा काय संबंध आहे याचा उलगडा झालेला नाही. मात्र फार पूर्वी म्हणजे चौथ्या पाचव्या शतकात कालिदासांनी जे मेघदूत नावाचे काव्य लिहिले त्यात संपूर्णपणे पावसाचे विज्ञान मांडण्यात आलेले आहे. आज आपण मेघदूत या काव्याकडे एक प्रेमगीत,प्रेमकाव्य म्हणून पाहतो. परंतु मेघदूत काव्याचा विज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास होणे गरजेचे आहे. या काव्यात मेघ म्हणजे ढगांची निर्मिती, त्यांचा प्रवास, त्यांच्या प्रवासाचा मार्ग, या मार्गातील थांबे म्हणजे विश्रांतीची ठिकाणे,त्यांच्या प्रवासाकरता अनुकूल वातावरण निर्माण होण्यासाठी आवश्यक असलेले घटक या सर्वांची विज्ञानपूर्ण रीतीने मांडणी करण्यात आलेली आहे.
*पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व*
निसर्गात सतत यज्ञ चालू असतो. यज्ञ हा शब्द यज या धातूपासून आलेला आहे. ज्याचा अर्थ देणे असा आहे. निसर्गात सतत देण्याची प्रक्रिया चालू असते. वेदांमध्ये एक वचन आहे, *यज्ञात पर्जन्य भवती* याचा शब्दशः अर्थ घेतल्यामुळे आज आपण पाऊस पडला नाही तर यज्ञ करतो, हा याचा अर्थ नाही तर निसर्गात जे दिलं जातं त्याचं रूपांतर होऊन ते आपल्याला परत मिळते आणि ते देखील अनेक पटींनी आणि विस्तृत होऊन असा यज्ञाचा खरा अर्थ आहे. या दृष्टीने होळीमध्ये जी सामग्री दहन केली जाते त्याचे रूपांतर होऊन ती आपल्याला परत मिळते. आताच्या काळात आपण विचार न करता होळीमध्ये कोणत्याही वस्तूंचे दहन करतो. वृक्ष तोडण्याने पर्यावरणाची हानी करतो. शहाणपणाचा वापर करत नाही.
आजच्या या होळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांमधील दुर्बुद्धीचा नाश होवो आणि आम्हा सगळ्यांना चांगली बुद्धी प्राप्त होवो, हीच सद्गुरू चरणी प्रार्थना.
सर्वांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद.
सद्गुरु नाथ महाराज की जय
תגובות