आयुष्य कर्ज फेडण्यासाठी…* की *ऋण चुकविण्यासाठी…* *नव्हे-आनंदाची उधळण करण्यासाठी!
- ME Holistic Centre
- Sep 29
- 4 min read

तो हळूच दरवाजा ढकलतो…
घरात संपूर्ण शांतता.
बायको तिच्या फोनवर. मुलगा कानात ईअरफोन घालून अभ्यासात. मुलगी कुठेतरी गाडी घेऊन बाहेर गेलेली.
आई पोथी वाचत बसलेली…
तो ऑफिस मधून आलाय याची कोणी दखलही घेतली नाही.
आणि तो… गच्चीत एकटा चहा घेत बसतो.
थोडा वेळ हॉल मधल्या वातावरणाचा कानोसा घेतो, पण काहीही ऐकू येत नाही —
ना हास्य, ना बोलणं, ना आवाज, ना हाक…
सहजच त्याच्या मनात विचार येतो,
“कधीकाळी जेव्हा घर म्हणजे हसणं, बोलणं, साग्रसंगीत जेवणं आणि गप्पांची उब वाटायची…
आज तिथे एक अलक्षित थंडी आहे.
आवाज आहेत, पण संवाद नाहीत.
माणसं आहेत, पण जवळीक नाही.
आणि ऊब?
ती कधी निघून गेली, हेच लक्षात आलं नाही…”
तो कप उचलतो…
चहा थोडा गरम असतो, पण मन मात्र कुठेतरी गारठलेलं.
त्याला प्रश्न पडतो,
आपण नेमकं काय जगतोय?
हे दृश्य केवळ त्याचं नाही —
हे आपल्यापैकी कित्येकांचं आहे, किंवा कदाचित… आपलंच.
“वस्तू विकत घेणं, पैसा कमावणं, सुख मिळवणं, कर्ज फेडणं, कर्ज फेडीसाठी पुन्हा कमावणं…”
या सततच्या चक्रात आपण खरोखर ‘जगणं’च विसरून जातो आहोत की काय?
घर हवं म्हणून आपण कर्ज घेतो. मुलांची शिक्षण, चर्चिली गाडी, सुट्ट्या, ट्रिप्स, प्रतिष्ठा…
सगळं कस ठरावीक वयानुसार, हप्त्यानुसार, पगारानुसार ठरलेलं …
दिवस जातात, आठवडे उलटतात, वर्षं संपतात —
पण मनातून मात्र एक क्षण ‘थांबणं’ होत नाही.कुठे विसावाच नाही.
*पैसा — साधन की सर्वस्व?*पैसा गरजेचा आहेच —
हे कुणीच नाकारत नाही.
पण पैसा हे साधन आहे, साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे
पैसाच आपल्या आयुष्याचा मालक बनतो.
आपण पैसा कमवायला सुरवात करतो आणि काही काळात पैसाच आपल्याला चालवायला लागतो,
आणि अखेर — आपण चालतो ते फक्त हप्ते भरण्यासाठीच चालतो.
*स्पर्धा आणि तुलना — कर्जाची खरी बीजं*
शेजाऱ्याची गाडी बघून आपल्याला तशीच गाडी घ्यावीशी वाटते,
ऑफिसमधल्या मित्राच्या घराच्या फोटोवर ‘Like’ करताना
आपल्या घरातल घरावरून चाललेल भांडण, रुसवे फुगवे आठवतात…
तुलना ही अभावाची जाहिरात असते —
ती मनात नसलेली हाव निर्माण करते,
आणि मग सुरू होतं कर्जाचं आयुष्य —
जे फक्त हिशेब शिकवतं, पण हृदय गहाण ठेवतं.
*गुंतवणूक कशात…*
*हृदयातील गुंतवणुकीचे काय?*
Mutual fund, FD, SIP…
सगळं सगळं माहीत असत आपल्याला… पण
फक्त मनात माणूस ठेवायची ‘गुंतवणूक’ आपल्याला जमत नाही.
हृदयासाठी मेडिक्लेम घेतो,
पण हृदयात माणूस जपणं विसरतो.
नातं टिकवायचं,की तेही ‘EMI चुकवल्यासारखं’ सांभाळायचय…
कर्जाचे प्लानिंग, हप्त्यांचा हिशोब, शिलकीचा अंदाज, नव्या खर्चाचे बजेट आणि गुंतवणुकीचा विचार …सतत पैसा, पैसा अन पैसा
*पण मग ऋण चुकविण्याचे काय ?*
आपण बँकेचं कर्ज फेडतो —
पण आईबाबांचं ऋण?
जे आपल्यासाठी रात्र रात्र जागले… संपूर्ण हयात ज्यांनी केवळ आपल्याला घडविण्यासाठी घालविली त्यांचं ऋण कस चुकविणार …केवळ पैसे पाठवून …. पैसे पाठवून आई वडिलांनचे ऋण चुकत नाही.
मग
समाजाचे ऋण? त्याचा तर विचार आमच्या मनाला शिवतही नाही. आमच मस्त चाललय, आम्ही कष्ट करतो, पैसा कमावतो मग आम्हाला समाजाची फिकीर करण्याचे कारण काय? ज्या समाजाने आमच्यासाठी
शाळा, रस्ते, वीज, संरक्षण, शिक्षक, आरोग्यसेवा…उभारल्या त्या समाजाला आम्ही सोयीसकरीत्या विसरतो.
समाजाचं आपल्यावर ऋण आहे याच भानच होत नाही.
आणि ऋषी ऋण?
आपल्या विचारांची, संस्कृतीची, भाषेची आणि मूल्यांची शाश्वत परंपरा —
जी आपल्या आत रुजलेली आहे.त्याचा विचार तर अतिदूर…
ऋण चुकविणे म्हणजे काय?
१. *मातृ-पितृ ऋण*
– मातापित्यांचे ऋण केवळ पैसे पाठवून किंवा “केअरटेकर” ठेवून फेडता येत नाही
– त्त्यांना खरी गरज असते ती त्यांच्या बरोबर वेळ घालविण्याची, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची, त्यांची आपुलकीने चौकशी करण्याची आणि त्यांना आधार देण्याची. त्यांना तुमच्या पैशाशी काहीही देणे घेणे नसते.
२. *समाज ऋण*
समाजाने आपल्यासाठी खूप काही केलेले असते. समाज नसता तर जीवन सहज झाल नसत. समाज आहे म्हणून आपण आहोत. या समाजाबद्दल आपण कायम कृतज्ञ राहिले पाहिजे.
– सार्वजनिक मालमत्तेचा आदर राखणे.
– सभ्य संवाद, सर्वांना सहकार्य करणे.
– सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
– “जे जे आपल्याशी ठावे, ते ते इतरांना द्यावे”
– कृतज्ञता केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतून व्यक्त करावी.
३. ऋषी ऋण
ऋषि मुनी, साधू संत यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत.त्या त्या काळातील ऋषि संत हे खऱ्या अर्थाने वैज्ञानिकच होते. त्यांनी लावलेल्या शोधांमुळेच आज आपण आजच्या भौतिक आणि नैतिक स्थराला पोहोचलो आहोत. त्यांच्या तत्वज्ञाचा अंगीकार करणे हीच त्यांच्या प्रती कृतज्ञता आणि त्यांचे ऋण चुकवण्याचा मार्ग आहे. त्यांचे
– ज्ञान, विचार, मूल्यं यांचं संवर्धन करणे
– प्रामाणिकता, संयम, विवेक अशा सद्गुणांची रोज साधना करणे
– आपल्या जगण्यातून ‘परंपरा’ जपणं हीच त्यांच्याप्रती कृतज्ञता होय.
मात्र अशाप्रकारे मातृपितृ ऋण, समाज ऋण आणि ऋषि ऋण चुकविण्यासाठी शहाणपण लागते
*शहाणपण म्हणजे काय?*
🙏 सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात —
“माणसाला थांबायचं कुठे हे समजलं पाहिजे.
ज्याला थांबायचं कुठे हे समजतं, तोच खरा शहाणा.”
हे थांबणं फक्त आर्थिक स्तरावरच नाही तर जीवनाच्या प्रत्येक प्रांतातले आहे.
थोडं थांबा… श्वास घ्या… नातं पाहा… हृदयातील आवाज ऐका…
*यथार्थ जीवन म्हणजे…*
• पैसा आहे — पण पैशात माणूस हरवलेला नाही
• हप्ते आहेत — पण नात्यांमध्ये हिशेब होत नाही
• ज्यात भविष्यासाठी तयारी आहे — पण वर्तमान हरवलेला नाही
• आणि ज्यात भावनात्मक हृदय स्पंदने चालू आहेती— केवळ शरीरिक क्रिया नव्हे.
*एक आनंददायी पूर्णविराम…*
* आपल्या गरजा मर्यादित ठेवा.
* कमीतकमी कर्जाचा आधार घ्या.
* शहाणपणाला पर्याय नाही —
कारण शहाणपण हाच नारायण आहे.
शहाणपण हाच सत्यनारायण होऊ द्या!
मग तुमच्या आयुष्यात येईल आनंदाचा प्रसाद —
जो केवळ तुमचं मन उजळवणार नाही,
तर इतरांचही आयुष्य प्रकाशमन करेल.
मग काय…?
मग ‘आनंदाची दिवाळी’च!
“आनंदी आनंद गडे,
इकडे तिकडे चोहीकडे!”
🙏 **होय… आनंदाने!*
*होऊ द्या सर्वत्र आनंदाची बरसात…*
देवा —
सर्वांचं भलं कर,
कल्याण कर, रक्षण कर…
आणि तुझं अखंड नाम
आमच्या मुखात, मनात, श्वासात वसू दे.
एक फावल्या वेळातल चिंतन
*जयंत जोशी*










Comments