top of page

संकल्प ते विश्वसंस्कार* From Me → We → All (“Sankalp to Lifestyle” मालिकेचा कळस–लेख)


“संकल्प सिद्धी” या मालिकेत

आत्तापर्यंत आपण आतल्या प्रवासाचा मागोवा घेतला.

भाग १ ते ६ मध्ये आपण पाहिलं –

• मोठे संकल्प का

तुटतात,

• Silver Bullets कसे

फसवतात,

• “ध्येय मोठं, पाऊल

छोटं” कसं ठेवायचं,

• व्यसन, cheat day

आणि “उद्यापासून” या

सापळ्यांतून बाहेर कसं

पडायचं,

• मन न समजता संकल्प

का साधत नाहीत,

• आणि शेवटी संकल्प

हा Lifestyle व

ओळखीचा भाग कसा

बनतो.

तोपर्यंत मुख्य प्रश्न असा होता:

“मी माझं आयुष्य कसं बदलू?”

आता या कळस–लेखात आपली चौकट थोडी मोठी करू या:

“माझा संकल्प

फक्त ‘Me’पुरता राहू द्यायचा का?

Me → We → All असा प्रवास होऊ शकतो का?”


*१) वर्षाखेरीचा ताळेबंद : फक्त “मी” की “आपण” आणि “सगळं”?*

डिसेंबर आला की आपण नकळत ताळेबंद काढतो—

• या वर्षी मी किती आणि

काय कमावलं?

• किती गमावलं?

• आरोग्य, नाती, काम,

आर्थिक स्थिती,

मानसिक समाधान…

हे सगळं महत्त्वाचंच आहेच.

पण एक प्रश्न मात्र आपण क्वचितच विचारतो:

*आपण समाज म्हणून,*

*या वर्षी काय कमावलं आणि काय गमावलं?*

कारण समाजाचा ताळेबंद

फक्त पैशात मोजता येत नाही.

या मालिकेच्या भाग ६ मध्ये

आपण समाजाचा आणि पर्यावरणाचा ताळेबंद

सविस्तर पाहिलाच आहे.

आता आपण एक पाऊल पुढे जाऊन

अजून मोठ्या प्रश्नाकडे वळूया ,

या विश्वात्मक व्यवस्थेत

आपण काय भर घातली?

आणि कुठे आपणच व्यवस्था बिघडवली?

हवा, पाणी, माती, जंगलं, नदी–तळी, जैवविविधता आणि परस्पर नात्यांची एकात्मता—

या सगळ्यात आपण काय जमा केलं आणि काय उधळलं, यातून खरा वैश्विक ताळेबंद दिसतो.


आज अनेक ठिकाणी—

• गरम होतं हवामान,

• अस्वस्थ शहरं,

• प्रदूषित नद्या,

• तणावग्रस्त माणसं,

• स्थलांतर–संघर्ष…

हे सगळं एक मोठा इशारा देतं:

फक्त “Me–level” संकल्प आता पुरेसे राहिलेले नाहीत;

“We” आणि “All” हेदेखील विचारात घेतलेच पाहिजे.


*२) कायदा, पळवाटा आणि निसर्गाचं कठोर पण न्याय्य राज्य*

आज शासन अनेक कायदे करतं— सिद्धांततः सगळे समाजहितासाठी.

पण प्रत्यक्षात काय घडतं?

• काही लोक कायद्यात

पळवाट शोधतात,

• कोणी “जुगाड” लावतो,

• कोणी सरळ सरळ

कायदा धाब्यावर

बसवतो.

याहून वेदनादायक गोष्ट म्हणजे—

ज्यांच्यावर समाजाला दिशा दाखवण्याची नैतिक जबाबदारी असते,

• काही नेते,

• काही प्रभावशाली

लोक,

• काही पदाधिकारी—

हेच कधी कधी अशा स्वार्थी वर्तनाला पाठीशी घालतात.

तेव्हा सामान्य माणसाच्या मनात हळूहळू भावना रुजते—

“कायदा कमकुवतांसाठी.

ज्याच्याकडे सत्ता–पैसा–ओळख आहे, त्याला काही होत नाही.”

हळूहळू सामान्य माणसाचा कायद्यावरील विश्वास ढासळतो. कायद्याला भावना कळत नाहीत- भावनेला कायदा समजत नाही.

असं वाटायला लागतं.

इथे एक मूलभूत सत्य उभं राहतं:

मानवी कायदे आपण बनवतो;

त्यात पळवाट असू शकते.

पण निसर्गाचे कायदे मात्र

कोणालाही पाठीशी घालत नाहीत.

निसर्गाच्या राज्यात—

• ना

“recommendation”,

• ना “adjustment”,

• ⁠ना “माझा माणूस” ही

संकल्पना.

आपण—

• हवा दाट करतो,प्रदूषित

करतो

• पाणी वाया घालवतो,

• जंगलं तोडतो,

• मातीला थकवतो…

निसर्ग ताबडतोब दंड ठोठावायला येत नाही;

कोर्ट–तारखा देत नाही.

पण परिणाम मात्र

न विसरता, न चुकता घडतातच.

• श्वासात धूर वाढतो – फुप्फुसातून आजार बाहेर येतो.

• अति–रसायन शेती – आपल्याच अन्नातून शरीरात उतरते.

• हवामान बिघडतं – पूर, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा येतात.

इथे कोणताही “स्पेशल केस” नाही.

मानवी कायदा तोडून वाचणारे सापडू शकतात;

पण निसर्गाचा नियम मोडण्याचा प्रयत्न

शेवटी निसर्गाला नाही,

आपल्यालाच तोडतो.

इथेच सद्गुरू श्री वामनराव पै यांचा महत्वाचा संदेश प्रकाशात येतो—

*विकासाला विवेकाची जोड हवी.*

विकासाला विवेकाची जोड नसेल तर विकास हा भकास होतो.”

निसर्गाच्या संदर्भातसुद्धा हे तितकंच खरं आहे —

प्रगती असेल, पण विवेक नसेल तर भविष्यात भकासपणा ठरलेलाच.


*३) Me → We → All : अस्वस्थतेपासून पूर्णत्वापर्यंत*

आपले बहुतेक संकल्प

“Me” इथेच अडकतात—

• माझं वजन,

• माझा करिअर–जंप,

• माझी health…

हे चुकीचं नाही;

उलट, ही पहिली पायरी आहे.

पण Me–only जगण्यात

एक सूक्ष्म अस्वस्थता असते—dis-ease.

हा प्रवास तीन टप्प्यांत पाहूया:


*१) Me–only जगणं*= dis-ease (अंतर्गत अस्वस्थता)

सगळा फोकस जेंव्हा “मी आणि माझं” इतकाच असतो

तेंव्हा आयुष्य हळूहळू संकुचित होतं.

इगो, तुलना, असुरक्षितता,

भीती, लोभ—हे वाढू लागतात.

आत एक dis–ease तयार होतं—

“मन शांत नाही, पण कारण कळत नाही” अशी अवस्था.


*२) We–based जगणं*= *wellness (आरोग्य, संतुलन)*

जेव्हा आपण “मी” पासून “आपण”कडे येतो—

कुटुंब, समाज, सहजीवन, सहकार्य—

तेव्हा आत एक वेगळं आरोग्य तयार होतं.

“माझ्या भल्याशी

इतरांचं भलं जोडलेलं आहे”

ही जाणीव wellnessची खरी सुरुवात आहे.


*३) All–inclusive जगणं*= *wholeness (“All is well” आतून जाणवणं)*

जेव्हा नातं

फक्त माणसांपुरतंच न राहता

संपूर्ण सृष्टीशी जोडतं—

नदी–झाड–प्राणी–आकाशाशी—

तेव्हा “All is well” हा संवाद

फक्त चित्रपटातील डायलॉग न राहता खरंच आतून जाणवणारी अवस्था बनतो.

हीच Wholeness आहे.

थोडक्यात—

Me → We → All

हा प्रवास म्हणजेच

संकल्पाचा आंतरिक विस्तार आहे.


*४) प्रार्थना : फक्त तोंडात नाही, हातातही हवी*

आपण प्रार्थनेत किती वेळा म्हणतो—

*देवा, सर्वांचं भलं कर* *कल्याण कर… रक्षण कर…”*

ही प्रार्थना शब्दांनी सुंदर आहे;

विचारांच्या शास्त्राच्या दृष्टीनंही अत्यंत मोलाची आहे;

कारण ती “मी आणि माझं” या चौकटीतून

आपल्याला “सर्व” या व्यापक परिघात घेऊन जाते.

पण एक कठोर सत्य स्वीकारायला लागतं:

शब्दांना कृतीची जोड नसेल,

तर प्रार्थना केवळ शाब्दिक राहते.

प्रार्थना म्हणजे फक्त “दे” अशी मागणी नाही;

प्रार्थना म्हणजे वृत्तीची निवड आहे.

मी रोज शंभरेक वेळा “रक्षण कर” म्हणालो

आणि त्याच वेळी—

• पाणी वाया घालवलं,

• प्लास्टिकचा ढीग

लावला,

• कचरा रस्त्यावर

फेकला,

• निसर्गाला दुखावणाऱ्या

घातक सवयी कायम

ठेवल्या

तर माझी प्रार्थना आणि माझं जगणं एकमेकांविरुद्ध उभं राहतं.

म्हणून आजची गरज अशी—

प्रार्थना ओठांतून हातापर्यंत आणायची आहे


*५) “भलं–कल्याण–रक्षण” : प्रार्थनेची कृती–त्रिसूत्री*

“देवा, सर्वांचं भलं कर…

कल्याण कर… रक्षण कर…”

हे तीन शब्द

आपल्या रोजच्या कृतीचं मार्गदर्शन करू शकतात.

*भलं कर = नुकसान कमी कर (Reduce)*

भलं म्हणजे फक्त शुभेच्छा नाही; इतरांवर आणि निसर्गावर टाकलेला

अनावश्यक भार कमी करणं.

• वीज वाया न घालवणं,

• पाणी जपून वापरणं,

• “फक्त हवयं म्हणून”

खरेदी कमी करणं,

• गॅझेट्स, लाइट्स –फॅन

A. C.विवेकाने

वापरणं—

हे *भलं कर* च पहिलं

पाऊल.

*कल्याण कर = निसर्गाला परत दे (Regenerate)*

कल्याण म्हणजे केलेलं नुकसान थांबवणं नव्हे;

ते म्हणजे जीवन वाढवणं.

• ओला कचरा कंपोस्ट

करणं,

• देशी झाडं लावणं

आणि ती जिवंत ठेवणं,

• लहानसा जैवकोपरा

तयार करणं

(फुलझाड + पाणवठा – टेरेस/गॅलरीतील छोटा कोपरा),

• पाणीसाठा जपण्याच्या

साध्या पद्धती वापरणं

ही पृथ्वीला परतफेड आहे.

*रक्षण कर = भावना + प्रणाली (Protect)*

रक्षण म्हणजे फक्त भावना नाही;

नियम + शिस्त + सातत्य.

• कार्यक्रम / सत्संग

प्लास्टिक–मुक्त ठेवणे,

• घर–संस्थेत कचरा वेगळा

करणे,

• कचरा कोण टाकेल?

याऐवजी

मी कचरा कसा कमी करू

शकतो?” असा प्रश्न

विचारणे,

• आपापल्या स्तरावर

ऊर्जा–वापराचा साधा

हिशेब ठेवणे—

इथून खर रक्षण सुरू होतं.

येथे आदरणीय प्रल्हाद दादांचे एक अमृत वचन आपल्या संपूर्ण दृष्टिकोनाला दिशा देतं:

*प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची.*

ही केवळ प्रेरणादायी ओळ नाही;

*हा कृती–धर्म आहे.*

माझा रोजचा व्यवहार,

माझी खरेदी, माझा कचरा, माझा प्रवास,

माझं कामकाज, माझी सेवा—

माझी प्रत्येक कृती

जर थोडी जरी “राष्ट्रहिताची, विश्वशांतीची”

या भानाने केली,

तर भलं–कल्याण–रक्षण

हे तीन शब्द

प्रार्थनेतील शब्द न राहता

जगण्याची शैली बनू लागतात.


*६) माझा संकल्प, माझा Footprint : Me पासून All पर्यंत*

या मालिकेने आपल्याला सांगितलं—

*संकल्प म्हणजे शिक्षा नाही; संकल्प म्हणजे स्वतःवरच्या प्रेमाचा उच्चार आहे.”*

आता या प्रेमाचा विस्तार करू या:

मी माझ्यावर जे प्रेम करतो,

त्यात पृथ्वीवरचा आदरही जोडू शकतो का?

मी जे खातो, वापरतो, घालतो, फेकतो—

यातून निसर्गावर एक ठसा पडतो—footprint.

नवीन वर्षाचा संकल्प

असा असू शकतो:

• माझ्या आरोग्यासाठी मी जे, जे करीन, ते शक्य तितकं निसर्ग–स्नेही ठेवण्याचा प्रयत्न करीन.

• माझ्या रोजच्या सवयी

“फक्त माझं सोयीस्कर” इथे अडकू न देता,

“आपल्याला, सगळ्यांना काय फायदेशीर”

या निकषाने पाहायला सुरुवात करीन.

याने संकल्पाचा व्यास

Me → We → All असा वाढतो


*७) Michelangelo आणि माझा “विश्व–giornata”*

भाग १ मध्ये आपण पाहिलं—

Sistine Chapel च १२,००० sq.ft. छत

Michelangelo ने एका झटक्यात रंगवलं नाही.

त्याने fresco पद्धत वापरली,

दररोज ताजं ओलं प्लॅस्टर,

आणि त्या दिवसात

फक्त तेवढाच भाग रंगवायचा.

या छोट्या भागाला म्हणतात,

“giornata” – एक दिवसाचं काम.

त्याचा प्रश्न कधीच असा नव्हता—

“पूर्ण छत केव्हा संपणार?”

तो रोज एवढंच विचारत असे—

“आजचं माझं giornata काय?”

आपल्याकडेही आज

जग वाचवण्याची मोठमोठी घोषवाक्यं आहेत.

पण प्रत्यक्षात,

“आज काय बदलायचं?”

इथे आपण गोंधळतो.

आपल्यालाही लागतो

एक छोटासा, स्पष्ट “विश्व–giornata”:

• आज मी एकही single-use प्लास्टिक न वापरण्याचा प्रयत्न करेन.

• आज मी नळ चालू ठेवून दात घासणार नाही.

• आज मी किमान एका मुलाला / मित्राला

निसर्गाबद्दल एक जिवंत, प्रेरणादायी गोष्ट सांगीन.

• आज मी घर–ऑफिसच्या वीज–बिलाकडे

एक प्रामाणिक नजर टाकीन.

लहान आहे,

पण सातत्याने केलं तर

यातूनच संकल्पाचे

विश्व–संस्कार घडू लागतात.

*एक घर – एक संकल्प.*

*एक संस्था – एक नियम.*

*एक समुदाय – एक कृती.*

हे जमत गेलं,

की “वसुधैव कुटुंबकम”

भीषण आव्हान न राहता

हळूहळू रुजणारी जगण्याची शैली बनते.


*८) निष्कर्ष: Sankalp ते Lifestyle, Lifestyle ते World–Style*

भाग १ ते ६ ने

आपल्याला आतून बांधलं—

• मन समजून घेणं,

• आपली ओळख

बदलणं,

• छोट्या पावलांनी मोठं ध्येय गाठणं,

• संकल्पांना Lifestyle बनवणं.

हा कळस–लेख

एक पाऊल पुढे टाकतो:

*माझा संकल्प फक्त माझ्या शरीर–मनापुरता नाही*

*तो या पृथ्वीशी, या विश्वाशी केलेला सूक्ष्म करार आहे.*

प्रार्थनेत आपण म्हणतो—

“देवा, सर्वांचं भलं कर…

कल्याण कर… रक्षण कर…”

आजपासून प्रार्थना

थोडी अशीही म्हणू या—

“मीही सर्वांचं भलं करेन.

मीही कल्याणासाठी काही करेन.

मीही रक्षणासाठी

माझ्या हातून ठोस पावलं उचलीन.”

आणि मनात सतत आठवण ठेवूया—

आदरणीय प्रल्हाद दादा म्हणतात,

*प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची.*

संकल्पाचा प्रवास मग अतिशय स्पष्ट दिसतो—

Me → We → All

• Me–only जगणं = dis-ease (अस्वस्थता)

• We–based जगणं = wellness (आरोग्य, संतुलन)

• All–inclusive जगणं = wholeness (“All is well” आतून जाणवणं)

नवीन वर्षासाठी

एक साधा, पण शक्तिशाली संकल्प करू या—

मी माझ्या वैयक्तिक संकल्पांबरोबरच

समाजासाठी आणि पृथ्वीसाठीही

निदान तीन ठोस संकल्प करीन;

आणि त्यांचं कसोशीने पालन करीन.

भलं करीन.

कल्याण करीन.

रक्षण करीन.

*आतां विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥*


संकल्प सिद्धी पूर्तता चिंतन लेख

*जयंत जोशी*

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page