top of page

*गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌷*

“आधी मन घेई हाती” — उप-वास, शुभचिंतन आणि जागृत करणारी पूजा


आज गणेश जयंती (माघ शुक्ल चतुर्थी). गुरुवार, दिनांक २२ जानेवारी.


घरात, वातावरणात एक वेगळीच शांत, प्रसन्न कंपनेची हवा असते. काही जण उपवास करतात, काही जण पूजा करतात, कुणी आरती म्हणतात, कुणी मोदक ठेवतात. पण या सगळ्यांच्या मुळाशी एकच भाव असतो—*नव्या सुरुवातीची तयारी.*


आणि या दिवसाचं सार संत तुकाराम महाराजांनी एका ओळीत सांगितलं आहे—

*तोची गणराज गणपती… आधी मन घेई हाती.*

ही ओळ साधी वाटते, पण ती फार खोल आहे. गणपतीला आपण विघ्नहर्ता म्हणतो. बहुतेकदा आपली अपेक्षा अशी असते की बाहेरच्या अडचणी दूर व्हाव्यात. पण तुकाराम महाराजांची दिशा वेगळी आहे—विघ्न दूर होण्याआधी मन हातात येणं आवश्यक आहे. कारण मन विस्कळीत असेल तर अगदी छोटंसं कामही डोंगर वाटतं; आणि मन स्थिर असेल तर डोंगरही पायरी बनतो.

म्हणून

*गणेश जयंती म्हणजे केवळ “जन्मोत्सव” नाही—तो मन-व्यवस्थेचा उत्सव आहे.*


*उपवास म्हणजे “उप-वास”* आज उपवास करणारे अनेक असतील. पण उपवासाचा खरा अर्थ जर आपण फक्त “काही न खाणं” इतकाच धरला, तर उपवासाचा आत्मा हातातून निसटतो.

उपवास म्हणजे ‘उप-वास’—

म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात अधिक वेळ राहणे.

*सानिध्य म्हणजे काय?*

ते म्हणजे मनाला वारंवार एकाच दिशेला वळवणं—

• *शुभचिंतन:* मनातल्या

शब्दांना उजेड देणं/प्रकट

करणं.

• *विश्वप्रार्थना:* “माझं”

“मी” हे केंद्र थोडं रुंद

करून “आपल्याला

सर्व विश्व” या

व्यापकतेशी जोडणं

• *नामस्मरण/जप:*

विखुरलेली ऊर्जा परत

एकत्र आणणं

आजचा उप-वास म्हणजे शरीराला त्रास देण्याचा दिवस नव्हे; तो मनाला प्रशिक्षित करण्याचा दिवस आहे—*मी माझं मन हातात घेतोय.*


*पूजा-पाठ हे “जाणिवेला दिलेले shocks” आहेत*

पूजा-पाठ हे जाणिवेला दिलेले shocks आहेत.

इथे “shock” म्हणजे धक्का देऊन त्रास देणे नाही;

“shock” म्हणजे झोपेतून जागं करणारा संकेत.

आपण रोज एका ऑटो-पायलटवर जगतो—

घाई, चिंता, तुलना, चिडचिड, मोबाइल, टाळाटाळ…

दिवस संपतो, पण आपण खरंच “जागे” असतो का?

म्हणूनच पूजा-पाठातील घटक—घंटानाद, मंत्र, नमस्कार, आरती, प्रदक्षिणा—हे सगळं आपल्या आतल्या यंत्रणेला सांगतं:

*थांब… आत वळ… केंद्रावर ये… सजग हो.*

मन पुन्हा “हाती” येतं. आणि हेच गणपतीचे काम आहे—विघ्नहर्ता म्हणजे बाहेरची सगळी संकटं नाहीशी करणारा नव्हे; तर आतली विस्कळीतता विरघळवून, सुरुवात नीट करणारा.

क्षणभर मन थांबतं. विचारांची धाव मंदावते. आणि त्या क्षणी मन हातात यायला सुरुवात होते. हीच खरी पूजा.


*आजची “साधी” पण प्रभावी पूजा*

आज पूजा मोठी असावी असे नाही; *जाणीव मोठी हवी.* घरच्या घरी सहज:

१. स्वच्छता करा—ही बाहेरची

नाही, आतली तयारीही

आहे.

२. गणपती प्रतिमेसमोर दोन

मिनिटे शांत उभे/बसून रहा.

३. “ॐ गं गणपतये नमः”

११ किंवा २१ वेळा म्हणा.

४. आरती/प्रार्थना करू शेवटी

एक संकल्प घ्या.

आणि मग खरी सुरुवात होते—विधी संपला तरी जाणीव सुरू राहिली पाहिजे.


*निष्कर्ष: आज बाप्पाकडे काय मागाव*

आज मागणी “हे मिळो-ते मिळो” इतकी मर्यादित नको. आजची सर्वात सुंदर प्रार्थना अशी—

*बाप्पा… माझं मन माझ्या हाती दे.*

*शुभचिंतनाने माझी दिशा उजळू दे.*

*विश्वप्रार्थनेने माझं जीवन विशाल कर.*

*आणि पूजा-पाठाच्या जागृत shocks मुळे मला सजग ठेव.”*


आणि तुकाराम महाराजांची ओळ पुन्हा आठवा—ती आजची गुरुकिल्ली आहे:

*तोची गणराज गणपती… आधी मन घेई हाती.*

मन हातात आलं की आयुष्य हातात येतं.

हीच गणेश जयंतीची खरी भेट.


*गणेश जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा*🙏

*गणपती बाप्पा मोरया!*


*जयंत जोशी*

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page