कोजागिरी* *को-जागरती* - कोण जाग आहे
- ME Holistic Centre
- Oct 6
- 2 min read
🌕

कोजागिरी म्हटलं की सगळ्यांना आठवतं ते मसाल्याचं दूध,
रात्री अंगणात किंवा गच्चीवर बसणं,
चांदण्यात गप्पा मारणं, आणि मध्यरात्रीपर्यंत जागणं.
आजकाल आपण या सणाचा अर्थ एवढाच घेतो —
चंद्राची पूजा करायची, दूध प्यायचं आणि थोडं उशिरापर्यंत जागायचं.
पण खरंच कोजागिरी म्हणजे एवढंच असतं का?
नाही.
आज या चांदण्यांच्या उजेडात
थोडं आतल्या प्रकाशाचंही दर्शन घेऊया.
🌸
को-जागरती — म्हणजे कोण जागं आहे?
ही जाग म्हणजे फक्त झोप न येणं नव्हे,
तर मन, विचार आणि भावना यांच्या झोपेतून जागं होणं.
आपण रोज काम करतो, बोलतो, खातो, हसतो —
पण हे सगळं करताना आपण पूर्णपणे भानात असतो का?
शरीर इथे असतं, पण मन भूतकाळात किंवा भविष्याच्या काळजीत हरवलेलं असतं.
डोळे उघडे, पण मन झोपलेल,
हीच अजाणतेपणाची निद्रा.
🌿
*खरी जाग म्हणजे भान*
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात —
*आपुलें स्वरूप जाणावे, हेचि परम कल्याण.*
माऊलींच्या विचारात “भान” म्हणजे फक्त विचार नव्हे,
तर स्वतःच्या आत्मस्वरूपाचं जाणतं भान ठेवणं.
ते म्हणतात, माणसाचं खरं कल्याण त्याने स्वतःला ओळखण्यात आहे —
*मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे?*
या जाणिवेतूनच खरी जागृती सुरू होते.
ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या दोन्ही ग्रंथांत
माऊलींनी “भान” आणि “स्वरूपज्ञान” यावर भर दिला आहे.
त्यांच्या तत्त्वज्ञानात भान म्हणजेच जागृतीकडे जाणारं पहिलं पाऊल.
म्हणूनच कोजागिरीच्या या रात्री,
ही ओळ जणू आपल्याला आठवण करून देते —
*फक्त जागं राहू नको, जाणीवेत राहा.*
🥛
*उकळणारं दूध आणि जागणारं मन*
कोजागिरी म्हटलं की गरमागरम आटवलेलं मसाल्याचं दूध.
यातही एक अर्थ दडलेला आहे.
जसं दूध आचेवर उकळलं की त्याचा सार निघतो,
तसंच जीवनही अनुभवाच्या आचेवर उकळलं पाहिजे —
तेव्हाच त्यात गोडवा आणि शुद्धता येते.
थंड दूध सुख देतं,
पण गरम दूध ऊब आणि शक्ती देतं.
आणि कोजागिरी म्हणजे हीच ऊब —
सजगतेची, भानाची आणि आत्मजागृतीची ऊब.
🌞
एका शिष्याने गुरुंना विचारलं,
“गुरुवर्य, आत्मजागृतीपूर्वी आणि नंतर तुमच्या आयुष्यात काय फरक पडला?”
गुरु शांतपणे म्हणाले —
“पूर्वी मी जे करत होतो तेच आजही करतोय,
पण आता मी जे करतोय ते फक्त तेच करतोय.
मी जेवताना फक्त जेवतो.”
पूर्वी ते जेवत असताना मन दुसरीकडे जायचं —
विचार, आठवणी, चिंता…
पण आता ते जेवतात तेव्हा पूर्णपणे त्या कृतीत उपस्थित असतात.
भूतकाळ नाही, भविष्य नाही — फक्त हा क्षण.
हीच आहे जाणीवेची अवस्था.
💫
*ज्ञान, जाणीव आणि जागृती — एकच प्रवास*
सद्गुरू श्री.वामनराव पै म्हणतात —
*ज्ञान हाच देव आणि अज्ञान हाच सैतान.*
ज्ञान म्हणजे प्रकाश,
अज्ञान म्हणजे अंधार.
प्रकाश आला की अंधार नाहीसा होतो.
म्हणूनच ज्ञानाचा उदय म्हणजेच जाणीवेचा उदय.
ज्ञान म्हणजे काय आहे हे जाणणं,
जाणीव म्हणजे ते जाणणं अनुभवणं,
आणि जागृती म्हणजे त्या अनुभवात जगणं.
ज्ञान हे दिव्याचं तेल आहे,
जाणीव म्हणजे त्याची ज्योत,
आणि जागृती म्हणजे त्यातून पसरलेला प्रकाश.
🌕
*कोजागिरीचा खरा अर्थ*
कोजागिरी म्हणजे फक्त चंद्र आणि दूध यांचा सण नाही.
ती आहे-अंतर्मनाच्या जागरणाची रात्र.
चंद्र बाहेर प्रकाश देतो,
पण जाणीव-ती आत प्रकाश देते.
ही रात्र विचारण्यासाठी आहे.
*मी खरंच जागा आहे का?*
जागणं म्हणजे फक्त झोप न घेणं नव्हे,
तर अजाणतेपणातून सजगतेकडे जाणं.
हीच खरी को-जागारती
*कोजागिरी पोर्णिमा*
🌺
कोजागिरी म्हणजे फक्त पौर्णिमेचा उत्सव नाही,
ती म्हणजे आतल्या प्रकाशाचा सण.
चंद्राचा प्रकाश काही काळ टिकतो,
पण जाणीवेचा प्रकाश कायम राहतो.
“ज्ञानाचा उदय म्हणजेच जाणीवेचा उदय,”
आणि “जाणीवच जागृती” —
हेच कोजागिरीचं खऱ्या अर्थानं दर्शन.
🌕
*मी जेवताना फक्त जेवतो,*
*मी जगताना फक्त जगतो-*
*हाच कोजागिरीचा खरा अर्थ.*
कोजागिरी निमित्त जागृतीच्या मार्गावरील चिंतन:
*जयंत जोशी*










Comments