top of page

*ग गणेशाचा… नवदृष्टीने* “आत्मविकासाच्या मार्गाचा श्रीगणेश” (गणेशोत्सव – दिवस १ : हत्तींमाथा – एक चिंतन)


🌸 *गणपती – विलक्षण जन्म आणि मार्गदर्शक देवता*

गणपतींची जन्मकथा जितकी अद्भुत आहे,

तितकाच त्यांचा संदेशही अद्वितीय आहे.

आई पार्वतीने उटण्यापासून तयार केलेल्या बालकाचा

शिवाने एका क्षणात शिरच्छेद केला…

आणि मग त्या बालकाच्या शरीरावर हत्तीचं डोकं बसवलं गेलं.

*हत्तीचं डोकं — एका देवतेला?*

*हे रूप फक्त एक दैवी चमत्कार नव्हे.*

गणेश हे केवळ पूजेचे नव्हे, तर बुद्धी, विवेक, संयम, त्यागशीलता आणि सहवेदनशीलतेचे प्रतीक आहेत.


भारतीय संस्कृतीत देवता फक्त पूजा करण्यासाठी नसतात —

त्यांचे गुण स्वतःच्या जीवनात बाणवण्यासाठी असतात.

त्यामुळेच स्तोत्रं, आरत्या, पूजा म्हणजे गुणांची आठवण, स्मरण आणि स्वतःशीच घेतलेली एक अंतःप्रतिज्ञा असते.


Leonardo da Vinci म्हणतो:

*The elephant embodies righteousness, reason, and temperance.*

आणि यात अजून एक मौल्यवान गुण स्पष्ट दिसतो – Empathy –

म्हणजेच सहवेदना – दुसऱ्याच्या भावना समजून घेऊन त्याला आधार देण्याची वृत्ती.


हत्ती हा प्राणी बाह्यदृष्ट्या बलवान, पण अंतर्यामी सौम्य आणि भावनिक.

गणेशही तसाच — दु:ख ऐकणारा, समजून घेणारा आणि मार्गदर्शक ठरणारा.

म्हणूनच आरतीत आपण म्हणतो:

*सुखकर्ता, दु:खहर्ता… वार्ता न विघ्नांची…*

*न उर्वी पूरवि प्रेम कृपा जयाची…*

ही आर्त हाक केवळ संकटांपासून वाचवण्यासाठी नाही,

तर आतल्या वेदना समजून त्यावर प्रेम आणि कृपेचा स्पर्श करणाऱ्या शक्तीला उद्देशून असते.


या गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी,

गणपतींच्या हत्तींमाथ्याकडे पाहूया —

आणि आपल्यात हे पाच गुण रुजले आहेत का, हेही तपासू या :

*सूक्ष्म दृष्टिकोन, विनयशील ऐकणं, लवचिक शक्ती,* *त्यागपूर्ण वृत्ती… आणि सहवेदना.*


🐘 *हत्तींमाथा – एक चिंतन*

गणपतींचा हत्तीमाथा हा पाच गुणधर्मांचा संगम आहे —

जे आपल्यातही विकसित होणं आवश्यक आहे.

👁️ १. *डोळे – सूक्ष्म दृष्टीचा गुण*

लहान डोळ्यांतून गहन निरीक्षण करण्याची प्रेरणा.

सतत जागरूक राहणं, दिसणाऱ्या मागचं वाचन करणं, आणि वरपांगी नव्हे तर खोल पाहणं — हीच खरी दृष्टी.

*डोळे मोठे असण्यापेक्षा, “पाहणं” मोठं असावं.*


👂🏼 २. *कान – ऐकण्याची नम्रता आणि समजूत*

मोठे कान = मनापासून ऐकणं.

• अहंकार न ठेवता दुसऱ्याचं म्हणणं समजून घेणं

• निर्णयाच्या घाईपेक्षा समजूतदारपणे ऐकणं

• खोटं बोलून बाजू मारण्याऐवजी, शांतपणे ऐकून न्यायाने कृती करणे

*बोलणं प्रतिक्रिया देतं, पण ऐकणं रूपांतर करतं.*


🐘 ३. *सोंड – लवचिकतेची आणि ताकदीची जोड*

सोंड हे बौद्धिक आणि कृतीशील संतुलन आहे.

ती कधी नाजूक स्पर्श करते, कधी संकट उखडते.नाजूक फूल देखील उचलते तर प्रचंड वृक्ष जमीनदोस्त करते.

• परिस्थितीनुसार आपली शैली बदलणे, कधी नजाकत तर कधी कठोरपणा

• कठोर होण्याआधी समजून घेणं

• आपल्या शक्तीचं योग्य नियंत्रण राखणं.कुठे किती शक्ती वापरावी त्याचे भान ठेवणे

*सोंड म्हणजे: शक्तीतली सौम्यता आणि सौम्यतेतली शक्ती.*


🦷 ४. *एकदंत – अपूर्णतेतील पूर्णत्व*

महाभारत लेखनासाठी गणपतीने स्वतःचा एक सुळा मोडला —

ही केवळ कथा नाही, ती वृत्ती आहे.

• स्वार्थ बाजूला ठेवून कार्याला प्राधान्य

• “माझं काही कमी झाल, मला काही कमी पडलं तरी चालेल, पण कार्य खंडित होऊ नये”

• यशाचं मोजमाप शरीराच्या आकाराने नव्हे, तर मनाच्या व्यापकतेने करावं

*पूर्णत्व हे केवळ रूपात नसतं, ते वृत्तीत असतं.*

म्हणजेच — *’मी’ दिसतो किती याने नव्हे, ‘मी’ काय असतो याने मोजा. प्रदर्शन नव्हे तर दर्शन*


💗 ५. *सहवेदना – भावना समजून कृपेचा स्पर्श देणं*

गणपती म्हणजे Empathetic Intelligence.

• केवळ दु:ख पाहणारा नाही, तर दु:ख समजणारा

• तिथेच त्याची कृपा उद्भवते — प्रेमाने दिलेला मानसिक आधार

• म्हणून त्याला “दु:खहर्ता” म्हणतात — कारण तो आतून ऐकतो.

Empathy म्हणजे –

*दुसऱ्याच्या अश्रूंना केवळ पुसणं नव्हे, तर त्यातून बाहेर पडण्याचा हात देणं.*


🎯 *आजचं स्वतःशी प्रामाणिक चिंतन:*

* मी पाहतो ते खोलवर असतं का, की केवळ वरवरचं?

* मी ऐकतो ते समजून, प्रेमाने ऐकतो का?

* माझ्या कृती लवचिक आहेत का, की Rigid/ताठर.

* मी काही तरी सोडून देण्याचं धाडस दाखवतो का?

आणि…

*मी दुसऱ्याच्या भावना समजतो का — की फक्त तर्क करतो?*


🌺 गणेश आज आपल्या घरी आले आहेत —

पण खरा श्रीगणेशा आपल्या अंतःकरणात होण्यासाठी,

केवळ पूजा-आरती नव्हे, तर स्वभावगुणांची प्रतिष्ठापना आवश्यक आहे.

केवळ आरतीचा उच्चरव नको,

गणेशाचे गुण घ्या, आत्मसात करा आणि आत्मविकासाकडे वाटचाल करा.

गणपती म्हणजे *रचना, शिस्त, सौम्यता आणि संवेदनशीलता.*

जो या गुणांचा स्वीकार करतो — तोच गणेशमय होतो.


*गणपती बाप्पा मोरया!*

“गणराज मनोभावे नमिला”… पण मनपरिवर्तनाच्या आशेने.

🙏🏼

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने

आत्मविकासाच्या मार्गावरील वाटसरू

*जयंत जोशी*

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page