top of page

झोप – शरीराची विश्रांती की आत्म्याचा जागर?*

🌙


ree

विज्ञान, अध्यात्म आणि नामस्मरण यांचा झोपेशी असलेला अतूट संबंध


📊 प्रस्तावना: *झोपेचं जागतिक संकट – एक दुर्लक्षित महामारी*


आपण दररोज झोपतो.

पण खरंच झोपतो का?


२०२५ साली Sleep Cycle या तंत्रज्ञान संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘Sleep Around the World’ या व्यापक संशोधन अहवालानुसार,

जगभरात झोपेची गुणवत्ता सतत कमी होत आहे.

• या अभ्यासात १०५ अब्ज रात्रींच्या झोपेचा डेटा विश्लेषित करण्यात आला.

• साल २०२३ ते २०२४ दरम्यान झोपेचा गुणवत्ता स्कोअर ७४.२६% वरून ७३.९२% वर घसरला.

• जपानसारख्या प्रगत देशांमध्ये झोपेचा दर्जा फक्त ६७.३९% इतका कमी आहे.

• Sleep Cycle संस्थेच्या मते, “झोपेचं हे घटणं ही आता एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.”


झोपेची ही नॉर्मल न वाटणारी समस्या — आता प्रत्येक तृतीय व्यक्तीला स्पर्श करत आहे.


या संख्यांमागे एक धोक्याचा संदेश आहे —

झोप ही आता गृहित धरलेली सवय राहिलेली नाही; ती टिकवण्याची गरज बनली आहे.


🌌 झोप म्हणजे काय?

झोप म्हणजे केवळ डोळे मिटणं नव्हे.

ती एक मानसिक, जैविक आणि आध्यात्मिक प्रक्रिया आहे —

ज्यात शरीर नुसतं सुस्तावत नाही, तर मनही *“शून्य स्थिती”* कडे प्रवास करतं.


*निद्रायाः शुद्धता परा।*

“सर्वश्रेष्ठ शुद्धता ही झोपेमधून प्राप्त होते.”

झोप ही केवळ शरीराचा थकवा घालवणारी क्रिया नसून ती चैतन्यशुद्धीची एक प्रक्रिया आहे.

खरी, गाढ, शांत झोप ही मन, बुद्धी आणि भावना या सर्वांची स्वच्छता करून टाकते.

झोप म्हणजे जणू एक आत्मिक तप:

जिथे आपण दिवसभराचा भार उतरवून, पुन्हा एकदा नव्याने उर्जित होतो.


*झोप का येत नाही?*

आजच्या युगात झोप न येण्याच्या प्रश्नाच्या मुळाशी *मनाचं थांबता न येणं* हे प्रमुख कारण आहे.

आपण अंथरुणावर जातो, शरीर झोपायचं ठरवतं,

पण मन मात्र त्या दिवशीच्या सगळ्या प्रसंगांचा *नेगेटिव्ह रिवाइंड*? चित्रपट चालू करतं.

*मन, एक चंचल सेवक*— दिवसभर साचलेलं दुःख, अपमान, चिंता, भीती यांचा कचरा पुन्हा पुन्हा मन दाखवत राहतं, उगाळत बसत.


झोप येत नाही म्हणून मग झोपेच्या गोळ्या घेतल्या जातात, ध्यानाच्या अ‍ॅप्स लावल्या जातात, पण झोप मात्र सहज लागतच नाही, केन्व्हातरी उगाचच उशिरा येते…

किंवा आली तरी ती फक्त *शरीराची झोप* असते — मन मात्र चालूच असतं!


🛌 *मग झोपेपूर्वी काय करावं?*

१. रात्रीचे भोजन आणि झोप यात कमीतकमी ३ तासाचे अंतर ठेवावे.

२. ⁠रात्रीच्या जेवणात पचायला जड असे पदार्थ खाऊ नयेत.

३. ⁠झोपण्यापूर्वी १ तास आधी सर्व प्रकारच्या स्क्रीनशी संपर्क तोडावा.

४. ⁠सर्वात महत्त्वाचे म्हणजे

आपल्या अंतःकरणात एक गुप्त बटण आहे — *कृतज्ञता आणि क्षमायाचना*

हे दाबलं की मन हळूहळू शांत होतं.

आणि त्यासाठीचा एक हमखास मार्ग म्हणजे — *नामस्मरण- विश्वप्रार्थना जप*


🔁 *झोपेपूर्वीचा नामजप – वैज्ञानिक दृष्टिकोन*


मन शंभर विचार करतं, पण एक नाम — एक जप — तो मनाला एक ‘ध्वनिलहरीचा ठाव’ देतो.

जेव्हा आपण एकच नाम शांतपणे, भावपूर्वक घेतो —

तेव्हा त्या नावातील ध्वनीकंपनं (vibrations) आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात.

माणसाच्या शरीरात जवळपास ३० ट्रिलियन पेशी (Cells) असतात.

झोपेच्या वेळेस त्या पेशींना जर नकारात्मक विचारांचा संदेश मिळाला,

तर शरीरात रासायनिक गडबड होते — इन्फ्लॅमेशन, तणाव, बीपी, शुगर, सर्दीचा त्रास, हार्मोनल असंतुलन यांचं प्रमाण वाढतं.

परंतु, जर त्याऐवजी आपण शांत नाम, प्रार्थना, कृतज्ञता साधना करत झोपलो —

तर त्या ध्वनीकंपनांच्या सकारात्मक ऊर्जा प्रत्येक पेशीला आराम, विश्रांती आणि पुन्हा निर्माण होण्याचे संकेत देतात.

शास्त्र सांगतं: *झोपेतच growth hormones स्रवतात.*

आणि मन शुद्ध असेल तर तो स्राव अधिक सुरळीत होतो —

ज्यामुळे शरीराची दुरुस्ती (repair), नवसर्जन (regeneration) आणि समतोल (reset) प्रक्रिया चांगली पार पडते.


🔄 *मनशुद्धीचा मंत्र*

आपलं मन हे फार मेहनती आणि सेवकासारखं आहे.

हे सतत आपल्यासाठी वाईट आठवणी उकरून आणतं…

म्हणून त्या आठवणींकडे पाहून आपण फक्त एकच भावना ठेवायची — *कृतज्ञता आणि क्षमा.*

“धन्यवाद देतो त्या घटनांना, त्या लोकांना,

ज्यांनी मला त्रास दिला — कारण त्यामुळे मी स्वतःला समजून घेतोय.

मी तुम्हाला माफ करतो, आणि मला दिलेला त्रास विसरतो…

आता माझं मन शांत आहे. माझं मन रिकामं आहे.

हे नामच आता माझ्यासोबत झोपेपर्यंत जाईल.”


🧘‍♀️ *राजकुमार की कामगार?*

झोपेच हे सुख कोणाला मिळतं?

तो राजकुमार जो मखमली गादीवर तळमळतो…

की तो कामगार जो उन्हातान्हात राबून थकतो आणि तासाभरात गाढ झोपतो?

राजकुमाराजवळ चिंता आहे — ego आहे — विचारांचा भार आहे.

कामगाराजवळ फक्त श्रम आहेत, पण मन रिकामं आहे.

यावरून कळतं, झोप शरीराने नाही, तर मनाने येते.


🙏 *झोपेप्रती कृतज्ञता*

“झोप लागणे ही केवळ जैविक प्रक्रिया नाही — ती ईश्वरी कृपा आहे,

देवा,

आजही मी विसावत आहे — ही तुझीच देणगी आहे.

दिवसभर जे जमलं नाही, ते विसरण्याची संधी तू देतो आहेस…”


🌙 *निष्कर्ष – झोप म्हणजे आंतरिक यात्रा*

झोप ही विस्मृती नाही — ती शुद्धी आहे.

ती मृत्यूची झलक नाही — ती जीवनाच्या नवस्फूर्तीची सुरुवात आहे.

जो झोपतो तो पुनः उगम पावतो.

पण जो नाम घेऊन प्रार्थना म्हणत म्हणत झोपतो, तो केवळ शरीरच नव्हे, तर मन आणि आत्म्यालाही विश्रांती देतो.


लेखन – एक चिंतन : जयंत जोशी

(जागृतीसाठी समर्पित)

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page