नवरात्र : दिवस १ — शैलपुत्री देवी*🌸
- ME Holistic Centre
- Sep 22
- 1 min read
सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज नवरात्रीचा पहिला दिवस *शैलपुत्री म्हणजे शैलजा या देवीचा दिवस.*
“शैल” म्हणजे पर्वत, आणि “पुत्री” म्हणजे कन्या.
हिमालयाची कन्या म्हणून तिला शैलपुत्री म्हटलं जातं.
*शैलपुत्रीचं प्रतीक काय दर्शविते तर-*
पर्वत कसा अढळ, स्थिर आणि निर्मळ असतो, तसंच मनाचं स्थैर्य आणि शुद्धता ही खरी जीवनाची शक्ती आहे.
शैलपुत्रीचं वाहन आहे वृषभ- बैल.
बैल म्हणजे कष्ट, सातत्य आणि कर्म.
म्हणजेच, आळस, भीती, राग यावर मात करून चिकाटीने पुढे जाणं — हेच शैलपुत्रीचं दर्शन आपल्याला शिकवतं.
*आजचा रंग आहे पांढरा म्हणजे शुभ्र रंग- बाह्य आणि अंतरंगाचा रंग*
आजचा दिवसाचा रंग आहे शुभ्र. शुभ्र म्हणजे फक्त कपड्यांचा पांढरा रंग नाही.
तर शुभ्र म्हणजे अंतरंगाची शुद्धता, विचारांची निर्मळता आणि भावनेची पवित्रता.
बाहेर शुभ्र वस्त्र परिधान करणं ही परंपरा आहे, पण त्यामागचा अर्थ आहे —
“मनातील कपट, स्वार्थ, असूया यांचा मळ धुऊन अंतःकरण निर्मळ कर.”
जशी हिंदी गाण्यातील ओळ म्हणते :
“हम काले हुए तो क्या हुआ, दिलवाले हैं।”
खरं सौंदर्य बाह्य रंगात नसतं, ते असतं हृदयाच्या उदारतेत.
तसंच संत चोखा मेळा त्यांच्या अभंगात विचारतात —
“काय भुललासी वरल्या रंगा,”
बाह्य वस्त्रांच्या रंगात न भुलता, मनाच्या रंगाला — म्हणजे भक्तीच्या, निर्मळतेच्या रंगाला — महत्त्व द्यावं.
*नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा संदेश आहे —
हिमशिखरासारखं स्वच्छ आणि अढळ मन, बैलासारखी सातत्याची ताकद, कर्मप्रवृत्त वृत्ती आणि अंतःकरणातील शुभ्रता!
आज आपण देवीला वंदन करताना शुभ्र वस्त्र परिधान करू, पण खरी पूजा तीच —
जेव्हा मनही शुभ्र होईल, विचारही शुभ्र होतील, आणि जीवनही शुभ्र वाटेल.
🌸 शैलपुत्री सांगते : *भीतीवर विजय मिळव, आळस झटकून टाक, निर्मळ मनाने सत्कर्म करत रहा आणि स्थैर्याने पुढं चालत राहा.विजयी भव*🌸
*जयंत जोशी*










Comments