नवरात्रोत्सव* *दिवस सातवा*— *देवी कालरात्रि*
- ME Holistic Centre
- Sep 28
- 1 min read
*🌸

सर्वांना नवरात्रोत्सवाच्या सप्तमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजची उपास्य देवी आहे कालरात्रि — अंधाराचा नाश करणारी, भक्तांना निर्भय करणारी आणि शुभत्व देणारी. तिचं रूप भीषण आहे. गडद काळसर वर्ण, विस्फारित नेत्र, विखुरलेले केश, गळ्यातील माळ, आणि श्वासातून बाहेर पडणाऱ्या अग्नीच्या ज्वाळा… पण या भयानकतेच्या पलीकडे तिचं स्वरूप आहे मंगलकारी. म्हणूनच तिला शुभंकरी असंही म्हणतात.
कालरात्रिच्या हातात एकीकडे लोखंडाचा काटा आणि खटवांग- कवटी आहे तर दुसरीकडे वरद मुद्रा आणि अभय मुद्रा. म्हणजेच ती एकीकडे आसुरी शक्तींचा नाश करणारी आहे तर दुसरीकडे भक्तांना निर्भयता आणि आशीर्वाद देणारी आहे.
तिचं वाहन आहे गाढव. सुरुवातीला हे वाहन विचित्र, तुच्छ वाटतं. पण यामागं गूढ विज्ञान दडलं आहे.
गाढव अज्ञान आणि हट्टीपणाचं प्रतीक आहे. देवी जेव्हा त्यावर आरूढ होते, तेव्हा ती सांगते की — खरी शक्ती म्हणजे अज्ञानावर विजय मिळवणं. गाढव हा प्राणी तुच्छ मानला गेला असला तरी प्रचंड सहनशील आहे. तो भार उचलतो, ओझं वाहतो आणि तरीही पुढे जात राहतो. देवी सांगते की,
*अगदी तिरस्कृत वाटणारं साधेपणही दैवी शक्तीचं वाहक होऊ शकतं*.
भीषण आवाज काढणाऱ्या या प्राण्यावर देवी आरूढ आहे, म्हणजेच भीतीवर ताबा मिळवला की तीच ऊर्जा संरक्षणासाठी वापरता येते.
*सप्तमीचा रंग आहे नारिंगी.* हा रंग सूर्योदयाच्या पहिल्या किरणांसारखा ऊर्जा देणारा, उत्साह जागवणारा आणि कृतीशीलतेला प्रेरित करणारा आहे. नारिंगी रंगाचा संदेश असा — अंधार कितीही गडद असो, प्रकाश निर्माण करण्यासाठी आपल्याला धैर्याने कृती करावी लागेल.
आधुनिक काळात कालरात्रिची उपासना म्हणजे मानसिक अडथळे, चिंता आणि नैराश्यावर मात करणं, चुकीची माहिती आणि अंधश्रद्धा दूर करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीतीचं रूपांतर प्रेरणेत करणं.
सप्तमीचा हा दिवस आपल्याला शिकवतो की *भीषणतेच्या पलीकडेच शुभत्व दडलेलं आहे.*
देवी कालरात्रि आपल्याला धैर्य, निर्भयता आणि ऊर्जा देऊन जीवनात प्रकाश पेटवते.
*जयंत जोशी*










Comments