माझा स्वातंत्र्यदिन* एक अंतर्मुख प्रवास — ‘मी’ पासून ‘सर्वां’ पर्यंत
- ME Holistic Centre
- Aug 15
- 3 min read
❝*तूच आहेस तुझ्या स्वातंत्र्याचा स्वातंत्र्यवीर❞*
१५ ऑगस्ट.
प्रत्येक वर्षी झेंडे फडकतात, भाषणं होतात, गाणी वाजतात…
आणि तरीही – कुठेतरी आत खोलवर,
एक प्रश्न हलकेच डोकावतो:
*माझा स्वतःचा स्वतंत्र दिन कधी उजाडणार ?*
एक असा दिवस…
जेव्हा मी फक्त बाह्य गुलामगिरीतून नव्हे, तर मनाच्या कैदेतून मुक्त होतो.
जेव्हा मी इतरांच्या मतांनी, शब्दांनी, अपेक्षांनी नाही,
तर माझ्या अंतःकरणाच्या साक्षीने जगायला लागतो.
त्या क्षणाला, मी संविधानिक नागरिक नसून,
अंतःप्रवासी माणूस होतो — *आणि तोच असतो, माझा खरा स्वातंत्र्यदिन.*
🌿 *स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय?*
स्वातंत्र्य म्हणजे केवळ साखळ्यांपासून मोकळं होणं नाही.
ते आहे –
* भीतीपासून स्वातंत्र्य,
* लोभ, अपमान, राग,
सवयी, आणि अंध
श्रद्धेपासून मुक्ती,
* विचारांच्या, भावना-
भावनांमधील
गुलामगिरीतून सुटका.
*जो आत्म्याच्या साक्षीने जगतो, तोच खरा स्वतंत्र.*
तेव्हा… मी स्वतःच माझ्या स्वातंत्र्याचा स्वातंत्र्यवीर!
सद्गुरू वामनराव पै यांचा मंत्र मनात घुमतो —
❝ *तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ❞*
आणि त्या क्षणी, माझ्या जीवनावर माझंच स्वामित्व निर्माण होतं.मी गुलामगिरीतून मुक्त होतो. तो क्षण माझ्या स्वतंत्रतेचा.
🪞*“मी” को साफ किया, तो “तू” नजर आया…*
कधी एक आरसा दिसतो. धुळीचा, धुसर, धुसर
त्यात स्पष्ट काहीच नाही.
*आईना साफ किया, तो मै नजर आया…*
आरसा साफ केला, तेव्हा मला मी दिसलो.
पण खरं परिवर्तन तेव्हा घडलं…
*जब “मै” को साफ किया, तो “तू” नजर आया!*
जेव्हा मी माझा “मीपणा” — अहंकार, गरज, अपेक्षा, भय, दु:ख –
साफ करत गेलो,
तेव्हा माझ्यात “तू” जागा झाला.आणि मी माझ्या “मी”पणातून मुक्त झालो.
“तू” म्हणजे —
* माझ्यातलाच एक
प्रकाश,
* दुसऱ्याच्या डोळ्यांत
उमटलेली करुणा,
* आणि कधी — स्वतःच्या
आत उमलणारी एक
व्यापक ओळख.
हा प्रवास आहे — *मी* पासून *सर्वां* पर्यंतचा.
माझं अस्तित्व केवळ “माझं” न राहताच,
“आपलं” होतं, विस्तारतं…
आणि त्या क्षणी — मी खऱ्या अर्थाने मुक्त होतो.
*स्वातंत्र्य म्हणजे वृत्तीची निवड*
“Everything can be taken from a man but one thing:
the last of the human freedoms —
to choose one’s attitude in any given set of circumstances.”
– Viktor Frankl
सगळं हिरावून घेतलं तरी –
माझ्या वृत्तीचं स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
आज काय घडणार , हे नेहमीच आपल्या हातात नसतं.
पण त्याला मी कसा प्रतिसाद देतो — हे मात्र माझ्याच हातात असतं.
हेच मला पूर्णतः स्वायत्त बनवतं.
हीच आहे खरी आत्मिक स्वतंत्रता.
*स्वातंत्र्याची पहिली पायरी – माणूसपण!*
सद्गुरू सांगतात:
❝ *माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं — हाच खरा मानवधर्म आहे. ❞*
स्वतःचं स्वातंत्र्य स्वतः पुरतं सीमित न ठेवता,
जेव्हा मी इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करायला शिकतो,
तेव्हा मी “मी” पासून “आपण-सर्वां” कडे प्रवास करतो.
*स्वतंत्रता म्हणजे जबाबदारीची जाणीव*
प्रत्येक कृती…
ती घरातली असो की कार्यालयातली,
ती धर्मासाठी असो की देशासाठी —
ती जर जागरूकतेने केली असेल,
तर ती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची बनते.
स्वतंत्रता म्हणजे —
माझ्या मनासारखं जगणं नाही,
तर मनाशी प्रामाणिक राहून जगण्यासाठी सजगपणे जबाबदारी घेणं!
*माझा स्वतंत्र दिन म्हणजे…*
* जेव्हा मी इतरांना दोष देणं
थांबवलं,
* जेव्हा मी माझ्या मनात
उठणाऱ्या भावनांचं भान
मिळवलं,
* जेव्हा मी इतरांच्या
स्वातंत्र्याचा आदर
करायला शिकलो,
* आणि जेव्हा मी “मी”चं
ओझं टाकून “तू”ला
पाहायला शिकलो…
*तोच खरा माझा स्वातंत्र्यदिन!*
*स्वातंत्र्य म्हणजे उत्तरदायित्व*
“Freedom is a terrible thing unless you are ready for it.”
हो.
स्वातंत्र्य हवं असतं सगळ्यांना,
पण त्यासाठी तयार असणं हीच खरी परिपक्वता.
गुलामगिरी कधी कधी सुरक्षित वाटते —
कारण ती आपल्याला जबाबदारीपासून दूर ठेवते.
पण तीच जबाबदारी स्वीकारल्यावर –
*आपण स्वतः स्वतंत्रतेचा शिल्पकार बनतो.*
*स्वातंत्र्य म्हणजे गोंडस घोषणा नाही –*
ती आहे एक सतत घडणारी साधना.
*ज्यादिवशी मी स्वतःच्या वृत्तीची जबाबदारी घेतो,*
*प्रतिक्रिया ऐवजी प्रतिसाद निवडतो*
*शिकायचं थांबवत नाही,*
…*आणि “मी”च्या भिंती मोडून “तू”च्या प्रकाशात निघतो —*
*तोच खरा — माझा स्वातंत्र्यदिन!*
स्वातंत्र्य दिना निमित्त एक अंतर्मुख चिंतन:
*जयंत जोशी*










Comments