top of page

शंकराचार्यांचा बाप्पा – “तत त्वं असी”* “गणेशपूजेच्या पलीकडचं गणेशतत्त्व… आणि आपल्या आतली त्याची सावली”


ree

🌿 गणपती आपल्या मनात आहे, घरात आहे, पण कधी आपण आपल्या स्वतःला गणेशाच्या “स्वरूपात” अनुभवतो का?

कधी असं जाणवतं का — की ज्या विघ्नहर्त्याची आपण पूजा करतो,

त्या विघ्नहर्त्याचा तोच अंतर्बोध, तोच विवेक, तोच गूढ प्रकाश आपल्या आतही कुठे दडलेला आहे?

आपण रोज बाप्पाला नमस्कार करतो, आरती म्हणतो, मोदक अर्पण करतो —

पण कधी त्याच्याकडे पाहताना मनात न बोलता एक प्रश्न…उमटतो का ?

तो केवळ देव आहे की…

कधी काळी हरवलेलं, आता हळूहळू पुन्हा उलगडत चाललेलं आपलंच स्वरूप आहे?

ते जे स्वरूप – ज्याचं आपल्याला आपल्या प्रपंचाच्या गदारोळात विस्मरण झाल आहे –

त्याच स्वरूपाचं तो आपल्याला पुनः स्मरण करून देत आहे.

आणि हळूच म्हणतो आहे — *तू मीच आहेस… मी तूच आहे*


शंकराचार्यांचं बाप्पाकडे पाहणं हे असं होतं.

त्यांच्यासाठी गणेश म्हणजे एक पारंपरिक पूजा मूर्ती नव्हती,

तर ते होत एक तत्त्व.

अस एक तत्व असा एक गणेश जो आले अहंहर्ता. जो आपल्यातल्या *मीपणाच्या* भ्रामक संकल्पनांचं हरण करतो

आणि आपल्याला सांगतो — *तत त्वं असी*- *ते तूच आहेस!*

म्हणजे,

तो मोदकधारी बाप्पा,

तो शांत, एकदंत, विशालदृष्टिकोन असलेला बाप्पा,

तो साक्षीभावात आरूढ बाप्पा

हा कुठेतरी आपणच आहोत.

तो आपल्याला शिकवत नाही,

तर आपल्याला आपली ओळख पटवून देतो.

आणि म्हणूनच हा लेख —

*गणेशपूजेच्या पलीकडचं गणेशतत्त्व…*

आणि

*आपल्या आतली त्याची सावली ओळखण्यासाठीचा हा एक अंतर्मनाचा संवाद आहे.*


🪷*बाप्पा… आणि आपण-* अंतर्बोधाच्या वाटेवरचे एक अवकाश

गणपती म्हणजे फक्त एक देव नाही,

तो आपल्या मनात जपलेला एक अनुभव आहे.

एक साथ आहे.

कधी न मागता मिळालेली एक शांत साद आहे —

जी म्हणते, *मी आहे… पण तूही आहेस.*

हा ‘अवकाश’ म्हणजे कोणती तरी बाहेरची रिकामी जागा नव्हे,

तर अंतर्मनातली ती जागा आहे जिथे शब्द संपतात, पण अर्थ उमटतो.

जिथे देव भेटत नाही, पण ओळखून घेतला जातो.

जिथे आपण आणि बाप्पा यांच्यातला भेद विरघळतो.


आपण सगळेच त्याला विघ्नहर्ता म्हणतो.

संकटं टाळण्यासाठी त्याला नमस्कार करतो.

यशाची सुरुवात त्याच्या चरणाशी धरतो.

पण कधीकधी मनात एक विचार येतो —

*हा बाप्पा… खरोखर आहे तरी कोण?*

त्याचं डोकं हत्तीचं आहे, पण दृष्टिकोन मानवतावादी.

त्याचे कान मोठे, पण ऐकायला तो आपलं मौन शोधतो —

म्हणजे अशा क्षणांचं ऐकणं, जिथे न आवाज असतो, न तर्क…

फक्त आपलं अंतर्मन स्वतःशी प्रामाणिकपणे बोलतं.


*तो एकदंत आहे.*

पण आपल्याला पूर्णत्वाच्या पलीकडचं अपूर्णतेचं सौंदर्य दाखवतो.

कारण त्या एकाच दातात एक मोठं सत्य लपलेलं असतं—

अपूर्णता म्हणजे कमीपणा नाही;

तर अपूर्णतेचा स्वीकार, जिथे आपण स्वतःला न बदलता समजून घेतो.

म्हणूनच कधी कधी वाटतं…

तो फक्त देव नाही-

तो आहे एक विचार. एक आर्त निवांतपणा.


शतकांपूर्वी एक महान तत्वज्ञ जन्माला आले.

*आदि शंकराचार्य.*

त्यांनी देवतेकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलून टाकली.

ते म्हणाले —

देव म्हणजे केवळ पूजेसाठी असणारा कोरडा पाषाण नव्हे,

तर तो आहे आपल्या मनातला एक गूढ प्रकाश.

जो आपल्याला आपल्या न सापडलेल्या *स्व* ला शोधायला मदत करतो.


गणेश म्हणजे ते तत्त्व —

जे आपल्याला बाहेरच्या विघ्नांपासूनच नव्हे,

तर आपल्या आतल्या अहंकारापासून मुक्त करतो.

आपण बाप्पाकडे यश मागतो, बुद्धी मागतो, मार्गदर्शन मागतो…

पण बाप्पा मात्र एका क्षणात आपल्याला अंतर्मनात नेतो,

आणि हलकेच विचारतो —

*स्वतःला ओळखतोस का?*

*का जगाच्या आरश्यात फक्त आपलं प्रतिबिंब शोधतो आहेस ?*


त्याच्या हातात असतो मोदक

पण तो काही केवळ गोडधोड प्रसाद नाही, तर तो आहे आपल्या आतल्या समाधानाचा सुगंध.

तो तेंव्हाच मिळतो-

जेव्हा आपण आपल्या स्वतःकडे पाहतो आणि थांबतो.*देवाच्या द्वारी बसावे क्षणभरी*


*त्याच्या पायाशी बसलेला उंदीर-ज्या वाहनावर बाप्पा आरूढ होतो, ते वाहन म्हणजे

वासना, अस्थिरता, हाव यांचा प्रतीक.

आणि बाप्पा त्यावर आरूढ असतो —

कारण त्यानं मनावर / इद्रियांवर प्रभुत्व मिळवलं आहे.

आणि बाप्पा आपल्यालाही हेच शिकवत असतो

बाहेर कितीही धावाधाव केली तरी खरी शांतता आतच मिळते.


शंकराचार्य सांगतात —

*गणेश म्हणजे विघ्नहर्ता नाही, तो अहंहर्ता आहे.*

विचारांनी भरलेल्या *मीपणा* चा नाश करणारा.

तो म्हणजे आपला सततचा रोजच्या श्वास आहे,

म्हणूनच तो फक्त पूजेसाठी नाही तर आपल्या

प्रत्येक श्वासात अनुभवण्यासाठी आहे.


आपण बाप्पाला मखरात ठेवतो,

मात्र आपल्या मनात घर द्यायला विसरतो.

विसर्जनाच्या क्षणी डोळे भरतात,

पण जरा आत डोकावून बघितलं,

तर कळतं —

विसर्जन हे फक्त बाहेरचं नको

तर आतल्या नकली ओळखींचं - आपल्या मुखवट्यांच सुद्धा व्हायला पाहिजे.


गणपतीला निरोप देताना आपण एकच मागणी करूया

*बाप्पा, राहा — पण रूपात नाही, तर आमच्या वृत्तीत,* *आमच्या आवडी निवडीत,*

*आमच्या मौनात, आणि आमच्या जागृतीत.*


कारण शेवटी शंकराचार्यांचं सांगणं हेच आहे —

बाप्पा हा काही फक्त पूजेसाठी नाही, तर

तो आपल्या आतील प्रकाशाला अधिक उज्ज्वल, आधीक प्रकाशमान करण्याच्या शक्यतेचा भाग आहे.

जो वेळोवेळी आपल्या कानात कुजबुजतो —

*सांभाळ स्वतःला… सावध हो… तूच आहेस ‘गणेश’-*

*स्वतःच्या मोहावर, रागावर, भ्रमावर आरूढ होऊन त्याला प्रगट कर. *मन मी ची करी*


बाप्पा… तू केवळ मोदकधारी नाहीस तर तू आहेस समाधानी.तृप्त.

तू उंदीरावर आरूढ नाही, तर तू इंद्रियांवर आरूढ आहेस. त्यांचा स्वामी आहेस.

तू विघ्नहर्ता नाही, तू आहेस अहंहर्ता.

तू पूजेसाठी नाही, तर तू आहेस प्रत्येक श्वासात अनुभवण्यासाठी.

आणि म्हणून

तू आमच्यातलाच *आपण* आहेस.मी पासून आपण आणि सर्वांपर्यंतच्या प्रवासाचा साथीदार आहेस.


🙏 *गणपती बाप्पा मोरया…*बाप्पा पुन्हा भेटूच-*

*पण या वेळी, केवळ आरश्यात नव्हे… तर अंतःकरणात*


*तू तोच आहेस*

एक चिंतन: *जयंत जोशी.*

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page