अभिषेक शिवलिंगावर नव्हे, अहंकारावर करण्याची रात्र* *महाशिवरात्र — जीवाचा शिवाकडे प्रवास* आत्मलिंगावर अभिषेक म्हणजे ‘मी’ स्वच्छ करून शिवत्व जागवणे

महाशिवरात्र म्हणजे फक्त उपवास, अभिषेक आणि जागरणाची रात्र आहे का?
की ती स्वतःला पुन्हा ओळखण्याची एक दुर्मीळ संधी आहे?
शिव मंदिरात सापडतो की मनाच्या शांततेत?
अभिषेक शिवलिंगावर करायचा की अहंकारावर?
महाशिवरात्रीचा खरा अर्थ समजला की जाणवतं —
शिव शोधायचा नसतो… तो जागा करायचा असतो.
*महाशिवरात्र म्हणजे काय?* भारतीय संस्कृतीतील सण हे केवळ उत्सव नसतात; ते जीवन समजून घेण्याची संधी असतात. प्रत्येक सण माणसाला थांबवतो, स्वतःकडे पाहायला शिकवतो. महाशिवरात्र ही अशीच एक अंतर्मुख करणारी रात्र आहे.
या दिवशी उपवास केला जातो, शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो, बेलपत्र अर्पण केले जाते, मंत्रजप केला जातो आणि रात्रभर जागरण केले जाते. पण भारतीय परंपरेत विधी हा अंतिम उद्देश नसतो; तो अंतर्मुखतेचा मार्ग असतो.
*महाशिवरात्र तीन स्तरांवर समजून घेतली पाहिजे-*
भौतिक स्तरावर, उपवास शरीर हलके करतो, जागरण सजगता वाढवते.
आध्यात्मिक स्तरावर, शिव म्हणजे शांत साक्षीभाव.
आधिभौतिक स्तरावर, ही रात्र स्थिरता आणि ऊर्जा यांचा संतुलन अनुभवण्याची संधी आहे.
योगपरंपरेत शिव म्हणजे केवळ देव-रूप नाही; शिव म्हणजे ‘स्थिर शांतता’, आणि शक्ति म्हणजे ‘स्पंदन’ किंवा ऊर्जा. जेव्हा स्पंदन शांततेला स्पर्श करते, तेव्हा जीवनाची गती सुरू होते. म्हणून महाशिवरात्र ही रात्र “स्थिरता” अनुभवण्याची—म्हणजेच आतल्या शिवत्वाशी जुळण्याची—संधी मानली जाते.
म्हणून महाशिवरात्र म्हणजे बाह्य पूजा नव्हे —
स्वतःकडे परतण्याची रात्र.
*विधीपासून अनुभूतीकडे*
सण बाहेर साजरा होतो; साधना आत सुरू होते.
शिवलिंगावर पाणी वाहतो,पण मनातील ताण तसाच राहतो;
रात्रभर जागरण होते, पण जीवनात जागृती येत नाही.
कारण विधी हा शेवट नसतो -तो अनुभवाचा दरवाजा असतो.
बाहेरचा अभिषेक आतल्या शुद्धीची आठवण करून देतो.
*आत्मलिंग — देवाचे खरे स्थान*
मंदिरातील शिवलिंग हे प्रतीक आहे.
आपल्या आत एक शांत साक्षी असतो — विचार, भावना आणि अनुभव यांचा निरीक्षक.
ही शांत उपस्थिती म्हणजेच आत्मलिंग.
*शिव बाहेर नसतो; तो आत जागृत होण्याची वाट पाहतो.*
*अभिषेक — पाण्याचा नव्हे, अहंकाराचा*
अभिषेक म्हणजे धुणे — शिवाला नव्हे, स्वतःला.
मनावर साचलेले राग, तक्रारी, भीती आणि अहंकार धुणे हीच खरी पूजा.
रागावर क्षमा,
भीतीवर विश्वास,
अहंकारावर नम्रता —
हा झाला खरा अभिषेक.
*जीव आणि शिव — फरक कुठे?*
“जीव” म्हणजे मर्यादित ‘मी’.
“शिव” म्हणजे त्या ‘मी’च्या पलीकडची शांत व्यापकता.
जीव विचारांमध्ये अडकतो; शिव विचारांमधील शांत अवकाश आहे.
महाशिवरात्र म्हणजे त्या अवकाशाची जाणीव होण्याचा क्षण.
*आत्मा नर्तकः-‘मी’* *विरघळला की नृत्य उरतं*
शिवसूत्रात एक सुंदर शब्द वापरला आहे -
*”आत्मा नर्तकः”*
अर्थ: आत्मा नर्तक व्हावा.
साध्या नृत्यात अनेकदा “मी नाचतोय”, “मी किती छान”, “मी इतरांपेक्षा बरा” — असा ‘मी’ मोठा असतो. पण जेव्हा नृत्यात आपण पूर्णपणे गुंततो, तेव्हा ‘मी’ची जाणीव कमी होते आणि फक्त नृत्य उरतं.
जीवनातही हेच घडू शकतं. *अहंकार कमी झाला की कृती ओझं राहत नाही*; ती प्रवाह बनते. आणि प्रवाह बनला की आनंद हे काही “मिळवायचं” नसतं — तो जगण्याची अवस्था बनतो.
*जीवनातील तीन शक्ती — इच्छा, क्रिया आणि विद्या*
अपूर्णतेची भावना बहुतेक वेळा बाहेरून नाही, तर आतल्या विसंवादातून निर्माण होते.
*इच्छा शक्ति-दिशा*
जीवनाला दिलेला स्पष्ट संकल्प.
*क्रिया शक्ति-आनंदातून कृती*
आनंद मिळवण्यासाठी नव्हे, आनंदातून केलेली कृती.
*विद्या शक्ति-स्पष्टता*
माहिती नव्हे; जीवन समजण्याची स्वच्छ दृष्टी.
या तिन्ही शक्ती संतुलित झाल्या की मन स्थिर होते.
तेव्हा *सुख प्रसाद बनते आणि दुःख महाप्रसाद.*
*ध्वनी-शब्द नव्हे, स्पंदन*
आपण उच्चारलेला प्रत्येक शब्द आधी स्वतःवर परिणाम करतो.
सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात —
*”वचनी शुभ बोलावे.”*
कारण प्रत्येक शब्द हा संकल्प असतो.
आणि आत्मलिंगरूपी शिव त्या प्रत्येक संकल्पाला प्रतिसाद देतो —
*”तथास्तु.”*
*मंत्राचा / प्रार्थनेचा परिणाम फक्त उच्चारावर नाही, तर ग्रहणशीलतेवरही असतो.* म्हणून परंपरेत नंदीला “अंतिम प्रतीक्षा आणि ग्रहणशीलता”चे प्रतीक मानतात — आपण शांतपणे बसू शकतो, ऐकू शकतो, तेव्हाच मंत्र मनाच्या आत उतरतो.
म्हणून मंत्र/प्रार्थना हा “जपाचा आवाज” नाही; तो आतल्या शांततेशी सूर जुळवण्याचा सराव आहे.
*वृक्ष हे महादेव-शिवत्वाचा जिवंत अर्थ*
सद्गुरू वामनराव पै म्हणतात *वृक्ष हे महादेव आहेत.*
शंकराने विष धारण करून जग वाचवले, असे पुराण सांगते.
आज विज्ञान सांगते-*वृक्ष कार्बन डायऑक्साइड शोषून प्राणवायू देतात.*
आपण सोडलेले विष ते धारण करतात आणि जीवन देतात.
म्हणून वृक्ष म्हणजे *जिवंत शिवस्वरूप-महादेव*
*शिवत्व म्हणजे केवळ पूजा नव्हे- शिवत्व म्हणजे*
*इतरांच्या जीवनासाठी जगणे.*
*महाशिवरात्र आणि सद्गुरूंच्या साधना*
*विश्वप्रार्थना*
मीपासून विश्वाकडे जाण्याचा प्रवास.
*शुभचिंतन*
मनातील विष कमी करणे.
*भलं कर साधना*
दररोज एक भलं कार्य — हीच खरी शिवपूजा.
*कृतज्ञता साधना*
जे आहे त्याबद्दल आभार; तक्रार कमी झाली की मन शांत होते.
*महाशिवरात्र-साधा आचरणमार्ग*
आज:
* वचनी शुभ बोलावे
* मनातील एक नकारात्मक
भाव धुवायचा संकल्प
करा
* काही मिनिटे मंत्र-
विश्वप्रार्थना आणि काही
मिनिटे शांतता
* एक भलं कार्य करा
* निसर्गासाठी काही करा
-एक वृक्ष लावा
डोळे मिटा.
स्वतःला विचारा —
*माझ्या इच्छेला दिशा आहे का?*
*माझ्या कृतीत आनंद आहे का?*
*माझ्या दृष्टीत स्पष्टता आहे का?*
आपल्या अंतर्यामी शांत साक्षी बसलेला आहे.
आपण जे धारण करतो त्यावर तो मंद स्मित करून म्हणतो —
*तथास्तु. तथास्तु. तथास्तु.*
आत्मलिंगावर अहंकाराचा अभिषेक झाला की, जीवाला कळतं — तो कधीच शिवापासून वेगळा नव्हता.
*प्रार्थना*
हे शिवा, माझ्या वाणीला शुभ कर,
माझ्या मनाला शांत कर,
आणि माझ्या कृतीला कल्याणकारी कर.
*महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा*
शंकर म्हणतो -
*तथास्तु! तथास्तु! तथास्तु!*
*जयंत जोशी*




Comments