top of page

मार्कशीट - टक्के-टोणपे की जीवनाचं शिक्षण?


सध्या निकालांचा सीझन सुरू आहे.

दहावीचा निकाल… बारावीचा निकाल…

घराघरांत उत्सुकता, आनंद, फोन, मेसेजेस, अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.


*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!*

*त्यांच्या मेहनतीला,* *चिकाटीला आणि पालक-*शिक्षकांच्या सहकार्याला* *मनापासून सलाम.*


पण हीच वेळ आहे —

फक्त निकाल साजरा करण्याची नाही,

तर निकालाचं परीक्षण करण्याचीही.


कारण आज निकाल पाहताना एक प्रश्न अस्वस्थ करतो —


*आपण खरोखर अधिक शिक्षित होत आहोत का…*

*की फक्त अधिक टक्केवारी मिळवत आहोत?*


आज ९५%, ९८%, ९९%, अगदी १००% गुण मिळवणारी मुलं दिसतात.

हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

पण त्याच वेळी ९०% मिळूनही अनेक मुलं आणि पालक निराश दिसतात, हे अधिक चिंताजनक आहे.


“फक्त ९२% आले…”

हे वाक्य आजकाल इतक्या दुःखी सुरात ऐकू येतं, की जणू काही आयुष्याची दिशा संपली आहे.


पूर्वी परिस्थिती वेगळी होती.

३५% मिळून पास झालं तरी घरात पेढे वाटले जायचे.

७०% मिळवणारा विद्यार्थी गावात चर्चेचा विषय व्हायचा.

कारण त्या काळात “पास होणं” हीसुद्धा मोठी गोष्ट होती.


आज मात्र गुण एवढे वाढलेत, की “हुशार” या शब्दाची व्याख्याच बदलून गेली आहे.


नेमकं बदललं काय?


शिक्षण बदललं.

स्पर्धा वाढली.

कटऑफ वाढले.

करिअरचे पर्याय वाढले.

जग अधिक वेगवान झालं.


पण त्याचबरोबर *शिक्षणाचं रूपांतर हळूहळू* *ज्ञानप्रक्रियेपासून आकड्यांच्या स्पर्धेत झालं.*


मुलांची किंमत टक्केवारीवर मोजली जाऊ लागली.

९९% म्हणजे हुशार.

७५% म्हणजे सरासरी.

६०% म्हणजे मागे पडलेला.

आणि त्यापेक्षा कमी म्हणजे जणू काही अपयशी.


गुणवान विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ आयोजित केले जातात.

क्लासेस घेणारी मंडळी टॉपर्सच्या मोठमोठ्या जाहिराती करतात.

बॅनर्स, पोस्टर्स, सोशल मीडियावरील अभिनंदनाच्या पोस्ट्स — सगळीकडे टक्केवारीचं प्रदर्शन सुरू असतं.


यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक चुकीचं नाही.

ते व्हायलाच हवं.

पण नकळत समाजात असा संदेश जातो की मार्क्सशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नाही.


मग ९८% मिळवणारा विद्यार्थी “आदर्श” ठरतो आणि ६५% मिळवणाऱ्या मुलाला स्वतःकडे कमीपणाने पाहावंसं वाटू लागतं.

इथेच शिक्षणाचा समतोल बिघडतो.


पण खरंच एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता, संवेदनशीलता, सर्जनशीलता, प्रामाणिकपणा, धैर्य, माणुसकी आणि जीवन जगण्याची क्षमता एका मार्कशीटमध्ये मोजता येते का?


गणितात १०० पैकी १०० मिळवणारा विद्यार्थी आयुष्याचं गणित नेहमीच सोडवू शकेल असं नाही.

इंग्रजीत परफेक्ट स्पेलिंग लिहिणारा विद्यार्थी स्वतःच्या भावना अचूक व्यक्त करू शकेलच असं नाही.

विज्ञानात टॉपर असलेलं मूल अपयश, भीती, ताण आणि एकटेपणाशी सामना करू शकेलच असं नाही.


कारण जीवनाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.


तिथे ठराविक अभ्यासक्रम नसतो.

तिथे पर्यायी प्रश्न नसतात.

तिथे कॉपी करता येत नाही.

तिथे प्रत्येक उत्तर स्वतः शोधावं लागतं.


आजची मुलं कमी बुद्धिमान नाहीत.

उलट ती प्रचंड माहिती, स्पर्धा, अपेक्षा आणि सततच्या तुलनेच्या वातावरणात वाढत आहेत.

म्हणून त्यांचं कौतुक करायलाच हवं.


पण त्याच वेळी आपण स्वतःलाही विचारलं पाहिजे —


*आपण मुलांना शिकवत आहोत…*

*की फक्त स्पर्धेत धावायला भाग पाडत आहोत?*


आज अनेक मुलांचं बालपण टक्केवारीच्या ओझ्याखाली दबत आहे.

खेळ कमी झाले.

छंद कमी झाले.

मोकळ्या गप्पा कमी झाल्या.

घरातील संवाद कमी झाला.

आणि “रिझल्ट” हा शब्द आयुष्याच्या केंद्रस्थानी येऊन बसला.


पूर्वी निकाल लागला की मित्र मैदानावर, विहिरीवर, सिनेमाला किंवा भेळ खायला जायचे.

आज निकाल लागतो आणि पहिला प्रश्न असतो —

“*आता कटऑफ किती आहे?”*


म्हणून आता प्रश्न असा नाही की मुलांना किती मार्क मिळाले.

खरा प्रश्न असा आहे —

मुलं माणूस म्हणून किती घडली?


सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात —

*शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकणे.*

पण आजचं शिक्षण अनेकदा फक्त माहितीपुरतं मर्यादित होत चाललं आहे.

मेंदू भरला जातोय…

पण मन रिकामं होत चाललं आहे.


मुलांना गणित शिकवलं जातं,

पण नातं जपायला शिकवलं जात नाही.

विज्ञान शिकवलं जातं,

पण संवेदनशीलता शिकवली जात नाही.

करिअर घडवायला शिकवलं जातं,

पण जीवन जगायला शिकवलं जात नाही.


म्हणूनच आज कदाचित सर्वांत जास्त गरज आहे ती —

*हृदयाच्या शिक्षणाची.*


कारण…


*हृदयाचं शिक्षण हेच शिक्षणाचं हृदय आहे.*


माणूस किती हुशार आहे यापेक्षा,

तो किती सजग, संवेदनशील, संतुलित आणि माणुसकी जपणारा आहे —

हे अधिक महत्त्वाचं आहे.


म्हणून आता काही गोष्टी गंभीरपणे केल्या पाहिजेत.


मार्क हे मूल्यांकन असू शकतात; पण ते मुलाचं मूल्य ठरू नयेत.

९८% आले म्हणून मूल महान आणि ६५% आले म्हणून मूल कमी, अशी मानसिकता बदलली पाहिजे.


प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते.

कोणी गणितात पुढे असतो, कोणी भाषेत, कोणी कलेत, कोणी खेळात, कोणी नेतृत्वात, तर कोणी माणसं समजून घेण्यात.

सर्व मुलांना एकाच पट्टीने मोजणं म्हणजे अन्याय आहे.


शिक्षणात जीवनकौशल्यं आली पाहिजेत.

अपयश पचवणं, संवाद साधणं, ताण हाताळणं, पैशाचं भान ठेवणं, डिजिटल जगात संतुलन राखणं, नाती जपणं —

हे विषयं गुणपत्रिकेत नसले की तरी जीवनात फार महत्त्वाची आहेत.


पालकांनी मुलांना अटींवर प्रेम देऊ नये.

“मार्क चांगले आले तरच अभिमान” अशी भावना मुलांच्या मनावर खोल जखम करते.


मुलाला हे जाणवलं पाहिजे —


“मी अपयशी होऊ शकतो…

पण त्यामुळे मी निरर्थक होत नाही.”


मुलांना सतत धावत ठेवू नये.

रिकामा वेळ, खेळ, छंद, निसर्ग, वाचन, शांत बसणं, घरातील संवाद —

हे सगळंही शिक्षणाचाच भाग आहे.


सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात —

*विकासाला विवेकाची जोड हवी.*

आज विकास आहे.

गुण आहेत.

स्पर्धा आहे.

यश आहे.


पण या सगळ्याला विवेकाची जोड नसेल, तर मुलं पुढे जातील; पण स्वतःपासून दूर जातील.


मार्क महत्त्वाचे आहेतच.

मेहनत महत्त्वाची आहेच.

यशाचं कौतुक व्हायलाच हवं.


पण मार्कशीट माणसाची संपूर्ण ओळख नाही.


कारण शेवटी…


मार्कशीट तुमची टक्केवारी सांगते,

पण तुमची माणुसकी नाही.


ती तुमचं उत्तरपत्रिकेतील यश दाखवते,

पण जीवनातील समज दाखवत नाही.


गणिताच्या वहीतले आकडे आणि आयुष्याचं गणित

या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या असतात.


म्हणूनच आज निकालांच्या या सीझनमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला सांगावंसं वाटतं,

*तुमचे गुण महत्त्वाचे आहेत,*

*पण तुम्ही गुणांपेक्षा मोठे आहात.*


*तुमची मार्कशीट महत्त्वाची आहे,*

*पण तुमचं आयुष्य त्याहून मोठं आहे.*


आणि पालकांना सांगावंसं वाटतं —

*मुलांना टॉपर बनवा की बनवू नका,*

*पण त्यांना आनंदी,* *संवेदनशील, सक्षम आणि सजग माणूस नक्की बनवा.*


कारण शिक्षणाचा अंतिम उद्देश फक्त करिअर घडवणं नाही…

तर जीवन घडवणं आहे.


आणि म्हणूनच —

*हृदयाचं शिक्षण हेच शिक्षणाचं हृदय आहे.*


शिक्षण एक चिंतन

*जयंत जोशी*

 
 
 

Recent Posts

See All
कहाणी १९ डोळे-प्रकाशाचे दरवाजे नजर, दृष्टी, आणि पाहण्याची कला

*कहाणी १९* *डोळे - प्रकाशाचे दरवाजे* नजर, दृष्टी आणि पाहण्याची कला आपण डोळ्यांनी जग पाहतो. सूर्योदय पाहतो. माणसे पाहतो. रंग पाहतो. स्वप्ने पाहतो. पण कधी शांतपणे विचार केला आहे? *पाहणे आणि बघणे एकच असत

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page