असुरक्षेतील सुरक्षा – सर्वसमावेशकतेतच खरी सुरक्षा*
- ME Holistic Centre
- Sep 22
- 3 min read
*

आपल्या जीवनाचा, व्यवसायाचा आणि आपल्या उद्याच्या रात्रीचा… म्हणजे भविष्यातील अनिश्चिततेचा विचार करून,
आपल्या भवितव्याचा विचार करणे ते सुरक्षित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते — आणि ही जबाबदारी पार पडणे हेच खरं शहाणपण असतं.
म्हणूनच, ‘सुरक्षित राहा’, ‘काळजी घ्या’ — हे अगदी बालपणापासून आपल्या कानावर येत राहिल्याने आपल्या मनात एक संपूर्ण *सुरक्षित जीवनपद्धती* तयार होत असते.
आजचं जग वेगवान, स्पर्धात्मक, आणि तणावाने भरलेलं झाल्यामुळे, तांत्रिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक, भावनिक अशा सगळ्या पातळ्यांवर सुरक्षिततेची खात्री करून घेण्याची आपल्याला सवयच लागली आहे.
आपलं शिक्षण, नोकरी, घर, गुंतवणूक, नातेसंबंध — सर्व काही ‘सुरक्षित’ आहे ना, हेच मुख्य निकष ठरू लागले आहेत.
*पण खरी सुरक्षा म्हणजे काय?*
सुरक्षितता हवीच, पण कशासाठी?
खरंच ‘सुरक्षित’ राहून आपण सुरक्षित होतोय?
की या नादात आपण *संपूर्णतेने* म्हणजेच उत्कटतेने जगणं विसरत चाललो आहोत?
मोठं घर हवं — पण बंद दरवाज्यांमागे झोप लागत नाही.
नोकरी हवी — पण नाविन्य टाळायला लागतो.
आर्थिक स्थैर्य हवं — पण ‘धाडस’ ही संकल्पनाच विसरतो.
आपल्याला जे ठरलेलं, ठरवलेलं, गणितीपणे स्पष्ट माहीत आहे — त्यातच ‘सुरक्षितता’ वाटू लागते.
पण हीच सुरक्षितता, कधीकधी आपल्या समग्र शक्यतांना मर्यादित करते.
*असुरक्षिता म्हणजे काय?*
असुरक्षा म्हणजे भीती.
नुकसान होईल याची भीती, नको ते घडेल याची भीती, हरवण्याची, उघडं पडण्याची, दुखवण्याची, अपयशाची…
ही आपल्याला अभिप्रेत असलेली असुरक्षितता म्हणजे अनिश्चितता — ज्यामध्ये ‘काय होणार’ हे माहीत नाही.
पण…
जगण्याची सगळी मजा, सारे चमत्कार, सर्जनशीलता, विकास — हे सगळं या अनिश्चिततेतच असतं.
सुरक्षेचा अतिरेक अनिश्चितेतील चांगल्या शक्यताही झाकतो.
आपण जेव्हा केवळ ठरवलेल्या वाटेवरूनच चालायचं ठरवतो, तेव्हा अनपेक्षित उंची गाठणाऱ्या संधी आपण गमावतो.
कधी कधी “जोखीम” घेतली तरच “जीवन” अधिक समृद्ध होत.
*झोपलेली धडपड… आणि कोमेजलेलं धाडस…*
जगणं म्हणजे झोक्याची झेप.
झोका हळूहळू उंच जातो, पण उंची गाठण्यासाठी प्रत्येक वेळेस त्याला मागे येऊन झेप घ्यावी लागते.
तसंच जीवनातही असतं —
कधी कधी पुढे जाण्यासाठी, मागे यावं लागतं,
म्हणजेच, असुरक्षिततेच्या प्रदेशात झेप घेण्यासाठी
थोडावेळ सुरक्षिततेच्या मोकळ्या जमिनीवर उभं राहावं लागतं.
पण आपण दोरी धरून झोका घेतच नाही —
भीती वाटते… पडू की काय!
आणि मग उरते फक्त : *निद्रिस्त धडपड… आणि कोमेजलेलं धाडस.*
हीच ती निद्रिस्त धडपड, आणि कोमेजलेलं धाडस —
जे अस्तित्वात असते, पण अजूनही जागृत नसते.
आणि इथेच सद्गुरू नेहमी एक सुंदर उदाहरण देतात —
“होडीने जर खरंच दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचायचं असेल,
तर होडीला किनाऱ्यावर बांधून ठेवणारा दोर आधी सोडावा लागतो.”
आज अनेकांची होडी सज्ज आहे, दिशाही ठरलेली आहे —
पण “सुरक्षिततेचा दोर” अजून हातात घट्ट पकडलेला…
उंच भरारी मारायची आहे ना?
मग “कम्फर्ट झोन”च्या दोराला सोडणं आलंच!
कारण अनिश्चिततेतच नव्या शक्यतांची खाण दडलेली असते.
ही झोपलेली धडपड —
जी आत कुठेतरी असते, पण जागृत नसते.
ती अस्तित्वात असते — पण तिच्यासाठी आवश्यक असलेलं पोषण नसल्यामुळे,
ती अंकुरायचं स्वप्न बाळगून… उब, पाणी, आणि मोकळेपणाच्या प्रतिक्षेत असते.
मोकळेपण, विश्वास, आणि धाडसाची ओल निर्माण झाली
की ती एकदम तरारून येते!
*सजगतेतून आलेली सुरक्षा*
म्हणूनच, सुरक्षा हवीच — पण ती भीतीवर आधारित नसावी.
भीतीतून उभी केलेली सुरक्षा कुंपण घालते.
सजगतेतून आणि आत्मविश्वासातून आलेली सुरक्षा मात्र मुळं रोवते, फुलते, बहरते.
सुरक्षा हवी — पण ती अशी हवी जी संकोच नाही तर विस्तार घडवते.
सुरक्षा हवी — पण जिच्यामुळं आपण जास्तीत जास्त स्वतःला उलगडतो, उभारत जातो.
जिथे मन खुलं राहतं… अनुभव खुले असतात… आणि जीवन संपूर्णतेने जगता येतं.
*”देव” ही कल्पनाही अशीच!*
भीतीच्या, असुरक्षेच्या भावना माणसाला इतक्या अस्वस्थ करत गेल्या, की…
त्याने स्वतःच्या संरक्षणासाठी एक अदृश्य शक्ती निर्माण केली —
ती म्हणजे “देव”.
सर्वशक्तिमान, सर्वत्र असलेला, सर्वकाही करणारा — एक रक्षक.
पण हळूहळू माणूस त्या देवाचाच गुलाम झाला.
तो रक्षण मागत राहिला, पण स्वतः धाडस करू शकला नाही.
तो प्रार्थना करत राहिला, पण प्रयत्न सोडून दिले.
देवाच्या सुरक्षित छायेत तो ‘दैववादी’ झाला — आणि आत्मविश्वास हरवून बसला.
*देव म्हणजे ‘घडवणारी’ शक्ती*
१२व्या शतकात आद्य शंकराचार्यांनी गणेश या देवतेच्या माध्यमातून
माणसाला नवदृष्टी दिली —
गणेश म्हणजे विघ्नहर्ता नाही, तो विवेकदर्शी आहे.
तो हातात कुऱ्हाड घेऊन आपल्या मनातल्या भीतीचेच मुळं छाटतो!
शंकराचार्यांच्या श्लोकांमध्ये तो ‘प्रज्ञेचा अधिपती’ आहे —
जो विचार देतो, सामर्थ्य देतो… आणि केवळ सुरक्षिततेची नाही, तर संपूर्णतेची प्रेरणा देतो.
२०व्या शतकात *सद्गुरू श्री वामनराव पै* यांनीही
भीतीवर आधारित देवकल्पनेला बाजूला ठेवून,
प्रयत्न, विवेक, आणि आत्मनिर्भरतेवर आधारलेली जीवनशैली घडवली.दैववादाकडून लोकांना प्रयत्नवादाकडे वळविले
त्यांनी सांगितलं —
*काळजी घ्या… पण काळजी करू नका!*
— हा काही फक्त शब्दांचा खेळ नाही, तर जीवनशैलीतला एक सूक्ष्म फरक आहे.
*काळजी घेणं म्हणजे सजगपणा.*
म्हणजे असुरक्षिततेची शक्यता ओळखून, भविष्यातील संभाव्य अडथळ्यांच भान ठेवून, स्वतःला समृद्ध व सक्षम बनवण्याचा प्रयत्न.तर
कधी काळजी घेणं म्हणजे अनिश्चिततेच्या सगळ्या शक्यतांच भान ठेवून सजगपणे पावलं टाकणं…
म्हणजेच असुरक्षिततेकडून सुरक्षेकडे जाण्याचा समजूतदार मार्ग.
पण *काळजी करणं म्हणजे भीतीच्या कडेलोटात जगणं.*
याचं केंद्र अनिश्चितता नाही, तर अनिष्ट शक्यतांचा चिकट गोंधळ असतो.
आपण नकारात्मक शक्यतांमध्ये अडकून पडतो.
आपण मनाने आधीच पराभूत होतो — आणि चांगल्या शक्यतांना वावच उरत नाही.
*सुरक्षित की संपूर्ण?*
विचार करा सुरक्षिततेचा विचार करता करता…
आणि सुरक्षा सर्टिफाय करता करता…
आपण उत्कटतेने, जिवंतपणे, संपूर्णपणे जगायचंच विसरत नाही ना?
*आता ठरवायचं आपल्यालाच*
🔹 सुरक्षित राहायचं — पण संकोचात?
🔹 की संपूर्ण जगायचं — पण सजगतेसह?
जीवन आपलंच आहे —
व्यवसाय आपलाच आहे —
आणि भविष्यही आपणच घडवणार आहोत.
*हेच वास्तवातील गणेशतत्त्व… हेच सजगतेतून आलेलं धाडस… आणि हेच सच्चं शहाणपण!*
एक सावध सुरक्षित ?
चिंतन : *जयंत जोशी*










Comments