top of page

उपवास* *भूक नाही… विवेक जागवणारी विश्रांती* हलके पोट — जागे मन — शहाणपणाकडे जाणारा मार्ग


आज महाशिवरात्र.

अनेकांनी आज उपवास धरलेला आहे.

पण *उपवास म्हणजे नेमकं काय?*

सकाळपासून घराघरात तयारी सुरू —

साबुदाणा खिचडी, रताळ्याचा किस, गोड रताळ्याच्या चकत्या, राजगिरा लाडू, बटाट्याच्या काचऱ्या, शिंगाड्याचा किंवा राजगिऱ्याचा शिरा…

सोबत ताक, लस्सी, नारळपाणी, वेगवेगळी फळं, खजूर…

हे सगळं बघितल की नकळत मनात हसू येतं—

*एकादशी… आणि दुप्पट खाशी !*

हा उपवास आहे का?

की फक्त अन्नाचा प्रकार बदललेला असतो?

हा प्रश्न कुणाची टिंगल करण्यासाठी नाही.

कारण आपण सगळेच कधीतरी असा उपवास करत असतो.

पण कदाचित इथेच थांबून विचार करण्याची वेळ आहे -

उपवास म्हणजे खाण्याचे नियम बदलणे… की स्वतःशी नातं बदलणे?


कदाचित आपण उपवास करतो… पण उपवास आपल्यावर काय काम करतो, हे कधी पाहिलं आहे का?

कारण अन्न बदललं की उपवास होत नाही;

*जाणीव बदलली की उपवास सुरू होतो.*


*आजचा काळ “भुकेचा” नाही -“सुलभ उपलब्धतेचा” आहे*

आजकाल अन्नाची ample availability आणि easy availability झाली आहे.

दहा मिनिटांत हवा तो खाद्यपदार्थ घरात हजर होतो. अन्न मिळवण्यासाठी चालावं लागत नाही, शोधावं लागत नाही, कष्ट करावे लागत नाहीत. परिणाम असा की शारीरिक हालचाल कमी झाली, पण आहार मात्र सहज, वारंवार आणि वाजवीपेक्षा जास्त झाला.

पूर्वीच्या काळी दोन वेळचं अन्न मिळवण्यासाठी माणसाला दिवसभर कष्ट करावे लागत. शरीराचा घाम पडायचा, भूक नैसर्गिकपणे निर्माण व्हायची, आणि जेवण शरीरासाठी “इंधन” असायचं.

आज चित्र उलटं झालं आहे—कष्ट कमी, हालचाल कमी… पण खाणं अधिक. आणि म्हणूनच केवळ शरीरावरच नाही, मनावरही परिणाम दिसतो:

आळस, चिडचिड, बेचैनी, अपराधभाव, वजन, साखर, दाब… आणि त्यातून पुढे शारीरिक-मानसिक आजार बळावतात.

इथेच उपवासाचा अर्थ बदलतो. तो “डायट” किंवा “फॅड” राहत नाही.

तो बनतो— भूक आणि सवय यांची ओळख.


*शरीर थांबत नाही… फक्त इंधन बदलतं*

(वैज्ञानिक सत्य)

आपण खाल्लं की शरीराला ग्लुकोज मिळतं— सहज ऊर्जा.

पण काही तास अन्न नसलं तरी शरीर बंद पडत नाही.

तो एक नैसर्गिक बदल करतो— जसं वाहन इंधन बदललं तरी चालू राहतं, तसं.

शरीर साठवलेल्या ऊर्जेकडे वळतं आणि मेंदूला ऊर्जा मिळत राहते.

म्हणूनच निरोगी प्रौढांमध्ये उपवासामुळे “बुद्धी बोथट” होते असा ठोस अनुभव बहुतेक वेळा आढळत नाही.

भीती असते, पण वास्तव अनेकदा वेगळं असतं.

*पण मग अस्वस्थता कशाची?*


*भूके पेक्षा मोठा आवाज — सवयीचा*

उपवासात शरीराची भूक दिसतेच, पण त्याहून जास्त दिसते मनाची सवय.

आपण अनेकदा खातो:

• भूक म्हणून नाही,

• तर ताण कमी व्हावा

म्हणून,

• कंटाळा

घालवण्यासाठी,

• किंवा “वेळ झाली”

म्हणून.

अन्न थोडा वेळ बाजूला गेलं की हे सर्व स्पष्ट दिसू लागतं.

तेव्हा लक्षात येतं — शरीर शांत आहे, पण मन आग्रह करतंय.

इथेच उपवासाचे खरे फायदे सुरू होतात.

*उपवास अन्नापेक्षा स्वतःला समजून घेण्याचा मार्ग ठरतो.*


*विवेकाचा जन्म एका छोट्या थांब्यात*

सामान्य दिवशी: इच्छा आली → लगेच कृती.

उपवासात: इच्छा येते… पण लगेच पूर्ण होत नाही.

मग एक छोटा अवकाश तयार होतो:

इच्छा → थांबा → निर्णय

हा थांबा म्हणजेच विवेक.

सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात:

*विवेक म्हणजे शहाणपण.*

हे शहाणपण मोठ्या तत्त्वज्ञानातून नाही,

तर प्रतिक्रिया थांबवून निरीक्षण करण्यातून जन्माला येतं.


*उपवासाचा आध्यात्मिक अर्थ: “परमेश्वराच्या सानिध्यात बसणे”*

उपवासाचा शब्दार्थच मार्ग दाखवतो:

उप म्हणजे जवळ, वास म्हणजे बसणे/राहणे— परमेश्वराच्या सानिध्यात बसणे.

पण मग प्रश्न उभा राहतो— *परमेश्वर कुठे?*

आणि इथेच सद्गुरूंचं वाक्य अर्थपूर्ण होतं:

*हे शरीर साक्षात परमेश्वर.*

म्हणजे उपवासाचा खरा अर्थ “देवासाठी भूक सहन करणं” नाही.

तो अर्थ असा— शरीररूपी परमेश्वराच्या अधिक जवळ बसणं.

आपण रोज शरीराकडे लक्ष देतो असं वाटतं, पण प्रत्यक्षात आपण शरीराचं ऐकत नाही; आपण सवयीचं ऐकतो.

उपवासात आपण पहिल्यांदाच शरीराला विचारतो:

*खरंच तुला अन्न हवंय का?* हा प्रश्न विचारण्याची गरज निर्माण होणं म्हणजेच सानिध्य.

*हा संवाद म्हणजेच साधना.*


*हलके पोट-हलके मन (मिताहाराचा अर्थ)*

जड जेवणानंतर डोळे जड, मन मंद, शरीर सुस्त… हे अनुभव सर्वांनाच येतात.

कारण शरीराची ऊर्जा पचनाकडे वळते.

उलट हलका आहार किंवा उपवासात:

• श्वास मोकळा,

• शरीर हलकं,

• विचार स्पष्ट.

योगातील “मिताहार” यामागे हेच साधं सत्य आहे:

पोटावरचा भार कमी झाला की मनावरचा भार कमी होतो.


*उपवास म्हणजे शरीराला कष्ट नाही तर — विश्रांती*

उपवास जबरदस्तीने केला तर चिडचिड वाढते.

पण जागरूकतेने केला तर तो शरीर-मनाला विश्रांती देतो.

*योग्य अवस्था म्हणजे:*

हलकी भूक + शांत मन = जागेपण.


*पण उपवास सर्वांसाठी सारखा नाही*

लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये

“खाल्लं नाही तर लक्ष कमी” असा परिणाम दिसू शकतो, कारण वाढत्या वयात शरीराची गरज वेगळी असते.

तसंच दिवसभराच्या शेवटी काम जास्त मेंदू-केंद्री असेल,

आणि झोप/पाणी कमी असेल,

तर उपवासात चिडचिड वाढू शकते.

म्हणून उपवासाचा नियम एकच:

*जबरदस्ती नाही—जागृती.*


Life-Art पद्धत — सौम्य सुरुवात

* आठवड्यात १ दिवस दोन

आहारात १२-१४ तास

अंतर

* पाणी पुरेसं

* हलकी हालचाल

* भूक लागली की लगेच

प्रतिक्रिया नाही — फक्त

निरीक्षण

त्या निरीक्षणातच उपवासाचं सौंदर्य आहे.


*पूर्णब्रह्म की ब्रह्मराक्षस*? (सद्गुरूंचा निर्णायक संदेश)

सद्गुरू श्री वामनराव पै अत्यंत मार्मिकपणे म्हणतात:

*”भूक लागली असता खाल्लेलं अन्न हे पूर्णब्रह्म आहे;*

*आणि भूक लागलेली नसताना खाल्लेलं अन्न हे ब्रह्मराक्षस आहे.”*

हा संदेश अन्नाला दोष देत नाही.

तो आपल्याला आपल्या अवस्थेची जाणीव करून देतो.

भूक असेल तेव्हा अन्न जीवन पोसतं.

पण भूक नसताना, फक्त चव-सवय-ताणामुळे खाल्लं तर तेच अन्न शरीराला भार देतं आणि मनाला गुलाम बनवतं.


✅ *उपवास म्हणजे अन्नापासून दूर जाणं नाही*

उपवास म्हणजे शरीररूपी परमेश्वराच्या अधिक जवळ बसणं.

भूक लागली तरी क्षणभर थांबून स्वतःकडे पाहता आलं,

की समजतं— मी भूक नाही… मी भुकेला पाहणारा आहे.

आणि त्या जागेपणात जे उमटतं,

तेच सद्गुरू म्हणतात— *विवेक, म्हणजे शहाणपण* आणि *शहाणपण हाच नारायण.*


✨ *5 Takeaways*

* आज अन्न सहज मिळतं;

श्रम कमी झाले—म्हणून

सवयी वाढल्या.

* उपवास शरीर थांबवत

नाही; जाणीव वाढवतो.

* इच्छा आणि कृती यातील

थांबा म्हणजे विवेक.

* हलके पोट → स्पष्ट मन

→ योग्य निर्णय.

* भुक असता खाल्लं तर

पूर्णब्रह्म; सवयीवर खाल्लं

तर ब्रह्मराक्षस.


उपवासाचे उप-वासातून एक चिंतन

*जयंत जोशी*

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page