खरे सुख कुठे आहे?
- ME Holistic Centre
- Jul 14
- 2 min read
आजच्या जगात अनेकांना अस वाटतं की,
*”एखादी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात आली, की आपलं सगळं काही सुरळीत होईल. आपण सुखी होऊ, आपल जीवन फुलून येईल.”*
ही कल्पना आपण लहानपणापासून अनेक गोष्टींतून ऐकत आलो आहोत — गोष्टी, कथा, सिनेमे, आणि अगदी मुलांसाठी लिहिलेली पुस्तकंसुद्धा.
पण हा विचार एक भ्रम आहे हे आपल्या सहजा सहजासहजी लक्षातच येत नाही.
सत्य हे आहे की, जो माणूस स्वतः आनंदी नाही, तो दुसऱ्या कोणत्याही माणसामुळे दीर्घकालीन आनंदी होऊ शकत नाही.
*बाह्य व्यक्तीचा आधार — एक भ्रम*
बघा ना, “दोन अर्धवट माणसं एकत्र आली, की एक पूर्ण माणूस तयार होतो.”
हे वाक्य ऐकायला आकर्षक वाटत असल तरी किती विचित्र आहे ना ? आणि वास्तवात ते किती धोकादायक आहे.
कारण ज्या व्यक्तीला स्वतःच्या मनात असलेली रिकामी जागा दुसऱ्याने भरावी, असं वाटतं — ती व्यक्ती कायम इतरांवर अवलंबून राहते, आणि त्यामुळे संबंधात अपेक्षांचं ओझं वाढत जातं.
*एक उदाहरण बघा*— दोन रिकामी भांडी एकमेकांवर आदळली तर काय होईल? आवाज होईल, तुकडे होऊ शकतात, पण त्यातून काही तयार होत नाही. पण जर *एक भरलेलं भांडं* दुसऱ्या रिकाम्या भांड्याजवळ गेलं, तर कदाचित त्यातून काही तरी वेगळच, चांगल घडण्याची शक्यता असते .
*संबंध म्हणजे भरपाई नाही, सामायिक आनंद आहे.*
खरं नातं म्हणजे दोन व्यक्तींचं केवळ गरज म्हणून एकत्र येण नाही, तर ते सामायिक म्हणजे दोघांच्या एकत्रित आनंदाच्या वाटचालीसाठी असावयास हवे. जिथे प्रत्येकजण स्वतः आनंदी आहे, समाधानात आहे, तिथे नातं ही त्या आनंदाची देवाण-घेवाण बनते.
*जेव्हा आनंद वाटला जातो, तेव्हा तो कमी होत नाही तर तो वाढतो.*
पण दुःख वाटताना ते कमी न होता अधिक तीव्र होतं.
सद्गुरू श्री. वामनराव पै म्हणतात,
*माणसाचा जन्म हा आनंद वाटण्यासाठी आहे.आनंद ही लुटण्याची गोष्ट नाही तर आनंद ही वाटण्याची गोष्ट आहे*
जो आनंद शोधतो, तो त्याला कधीच सापडत नाही.
पण जो दुसऱ्याला आनंद देतो, आनंद वाटतो त्याच्या हृदयात आनंद स्थिरावतो.
*संपूर्ण होण्याचा मार्ग:*
*आत्मसाधना*
खरं समाधान, खरं सुख, खरा आनंद हा कोणत्याही व्यक्तीतून, वस्तूतून किंवा परिस्थितीतून येत नाही.
ते आपल्याच अंतःकरणातून जन्मतं — स्व-स्वीकृतीतून म्हणजे स्व जबाबदारीच्या स्वीकृतीतून, स्व-समाधानातून, आणि आपण जे आहोत त्यावर प्रेम करण्यातून.
जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो, आपल्यावर प्रेम करतो, आपल्या चुका स्वीकारतो — तेव्हा आपण इतरांच्या आयुष्यातही प्रेम आणि शांतता घेऊन जातो आणि त्यांच्याही जीवनात आनंद निर्माण करतो.
दोन समाधानी, साक्षीभावात जगणारी माणसे जेव्हा एकत्र येतात — तेव्हा ते एकमेकांना गुलाम करत नाहीत, तर ते एकमेकांना मुक्त करतात.म्हणून केवळ प्रत्येकाने एकच गोष्ट केली,*माझ्यामुळे कोणाच्याही जीवनात दुःख निर्माण होणार नाही* तर जग सुखी आणि आनंदी होण्यास वेळ लागणार नाही.
म्हणूनच *माझी प्रत्येक कृती ही आनंद देणारी/राष्ट्र हिताची, विश्व शांतीची* असली पाहिजे.
शेवटी एक विचार…
*सुखी/आनंदी माणूस जेंव्हा दुसऱ्या सुखी माणसाला भेटतो तेव्हा जीवन हे एक उत्सव बनतं.*
पण दुःखी माणूस दुसऱ्या दुःखी माणसाला भेटतो, तेव्हा “जीवन एक संग्राम बनतो.”
म्हणूनच —
प्रथम स्वतः आनंदी व्हा, म्हणजेच खर म्हटल तर तुम्ही आनंदी आहातच, त्या आनंदाचा तुम्ही अनुभव घ्या आणि मगच दुसऱ्याशी संबंध जोडा.
आणि हो,*परिपूर्णतेची अपेक्षा करू नका*— *ती तुमच्याच अंतर्मनात आहे.*
धन्यवाद
सद्गुरुनाथ महाराज की जय
लेखांकन: जयंत जोशी.





Comments