गोपाल काला* *अनेकातल एकत्व* *एकतेचा प्रसाद*
- ME Holistic Centre
- Sep 22
- 3 min read

गोपाळ काला – एकतेचा प्रसाद,
*का-आला ?*
अस्तित्वाचा प्रश्न
कधी कधी एक साधा अन्नपदार्थ, एक बालकथा — आयुष्याचा गूढ अर्थ उलगडून दाखविते.
*गोपाळकाला* म्हणजे तसंच काहीसं. केवळ प्रसाद नव्हे, तर एक दृष्टिकोन.
*सवंगड्यांचा खाऊ, कृष्णाची समरसता*
एकदा गोपालकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत यमुनेच्या काठी खेळत होता. दुपारची वेळ. खेळून खेळून भूक लागली. सगळे झाडाखाली गोळा झाले. कुणाकडे पोळीभाजी, कुणाकडे लाडू, कुणाकडे साधा खाऊ — पण प्रत्येकाला वाटत होतं, “माझाच खाऊ कृष्णाने खावा!”
पण कृष्णानं विचार केला… वेगळा.
त्याने पानं जोडून एक मोठी पत्रावळ तयार केली आणि सर्वांचं अन्न एकत्र केलं.
सर्व खाऊ मिसळले गेले, आणि एक वेगळीच खमंग चव निर्माण झाली.
सगळे सवंगडी वर्तुळात बसले आणि कृष्ण स्वतः त्यांना भरवू लागला —
प्रत्येक घास स्नेहाने, आपुलकीने.
याच प्रसादाला नाव मिळालं – *गोपाळकाला*
*The whole is greater than the sum of its parts.*
एकत्रीत पदार्थाचे मूल्य हे घटक पदार्थांच्या वैयक्तिक मूल्यांच्या बेरजेपेक्षा कितीतरी अधिक असते.
कृष्णाने सर्व सवंगड्यांचा खाऊ एकत्र करून तयार केलेला ‘काला’ म्हणजे केवळ चविष्ट भेळ नव्हती.
तो होता एकतेचा, सख्याचा, आणि समर्पणभावनेचा प्रसाद.
प्रत्येक सवंगड्याचा खाऊ वेगळा होता — कुणाकडे थोडा, कुणाकडे जास्त; कुणाचा साधा, कुणाचा चविष्ट.
पण जेव्हा सगळं एकत्र आलं, तेव्हा ते केवळ एकेक पदार्थ नव्हते —
ते एक भावविश्व बनलं.
एक नविनच अवीट चवीचा स्वर्गीय अनुभूतीचा पदार्थ तयार झाला.
काला म्हणजे केवळ भेळ नव्हे
तर …
ती होती सहविचारांची, सहभोजनाची, आणि सहअस्तित्वाची अवीट चव —
जी त्या क्षणी निर्माण झाली… जी कोणाच्याच एकट्याच्या हातून शक्य झाली नसती.
*एक छोटी गोष्ट, पण एक गहन अर्थ…*
सवंगड्यांचा खाऊ एकत्र करून तयार झालेला “काला” हा केवळ मित्रत्वाचा क्षण नाही —
तो एक मोठा संकेत देतो. तो सांगतो, की… हे जग, हे जीवन, हे शरीर —
हेही तसंच काहीसं आहे.
कृष्णाच्या पत्रावळीवर सवंगड्यांचा खाऊ जसा मिसळतो,
तशीच सृष्टी देखील विविध घटकांनी बनलेली एक *दैवी काला- भेळ* आहे.
गोपाळकाला हा काही एका दिवसाचा प्रसाद नाही, तर या सृष्टीचीच प्रतिकृती आहे.
*सृष्टी म्हणजे - भगवंताचा ‘काला’*
भगवंताने या सृष्टीचा ‘काला’ तयार केला आहे —
एका स्नेहपूर्ण हेतूनं, एका विलक्षण सूत्रात गुंफलेला.
• पंचमहाभूते – पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश
• पंच तन्मात्रा – गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द
• पंच ज्ञानेद्रिये – डोळे, कान, त्वचा, जीभ, नाक
• पंच कर्मेंद्रिये – हात, पाय, वाणी, मल, उपस्थ
हे सगळे वेगवेगळे घटक…
पण एकत्र आले की निर्माण होतो एक जिवंत देह, एक विचारशील मन, आणि एक सृजनशील जीवन.
आपलं शरीर म्हणजे भगवंताचा एक *दैवी काला’*
तो केवळ भोगासाठी नाही, तर योग, सेवा, आणि समर्पणासाठी आहे.
*देवतांची असूया आणि कृष्णाची सावध कृपा*
या प्रसादाचं सौंदर्य पाहून आकाशातील देवतांना देखील हेवा वाटला, ईर्षा वाटली.
“आपल्यालाही कृष्णाच्या हातून तो प्रसाद मिळावा म्हणून त्यांनी किडे-मुंग्यांचं रूप घेतलं.
पण मुलांनी एकही अन्नकण सांडू दिला नाही.
मग देवांनी मासे होऊन यमुनेत प्रवेश केला,
वाटलं — मुलं हात धुवायला येतील,
तेव्हा त्यांच्या हाताला लागलेले अन्नकण आपल्याला मिळतील.
पण कृष्ण जाणता…
त्याने हे हेरलं आणि सवंगड्यांना सांगितलं:
*काल्याचिये आसे, देव जळीं जाले मासे*
*कळले घननिळा, सांगतसे गोपाळा!*
आज कोणीही हात धुवायचा नाही!
हात कपड्यांवरच पुसायचे.”
हा संदेश होता —
*प्रसाद पचवायचा नसतो*
*तो आठवायचा असतो*
*सद्गुरू वामनराव पै आणि ‘भेळ’*
सद्गुरूंना देखील भेळ-काला फार आवडत असे.
पण त्या काही खाण्याच्या गोष्टी नव्हत्या — त्या शिकवणीच्या, समरसतेच्या प्रतीक होत्या.
भेळ म्हणजे विविध पदार्थांचा मेळ.
प्रत्येक घटक वेगळा — चव, रंग, रूप.
पण जेव्हा ते सगळं सहर्षतेनं एकत्र येतं,
तेव्हा चव वाढते — जीवनातही तसंच असतं.
सद्गुरू म्हणत —
*स्वतःचं अस्तित्व जपताना, समष्टीसाठी एकत्र मिसळणं — हाच खराखुरा आध्यात्मिक पंथ!*
*’काला’ म्हणजे ‘का आला?’ – जीवन अस्तित्वाचा प्रश्न*
‘काला’ म्हणजे केवळ भेळ नव्हे…
*’काला’ म्हणजे*
*का-आला ?*
मी जन्माला का आलो?
या देहाचं, या आयुष्याचं प्रयोजन काय?
फक्त खाणं-पिणं, स्वतःपुरतं जगणं?
की समाजासाठी, राष्ट्रासाठी काही तरी करून जाणं?
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात:
*देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो.*
*आणि त्या देशाचं आपण देणं लागतो.”*
*एकदा आजूबाजूचं जग* *आपलं मानल की…*
*जीवन एकदम सोप होत*
या संपूर्ण गोष्टीचा गाभा एका वाक्यात साठवता येईल —
“एकदा आजूबाजूचं जग आपलंसं वाटू लागलं,
की जगणं फारच सहजसोपं होतं!”जस काल्यात प्रत्येक पदार्थ आपल वैयक्तिक अस्तित्व लय पावल आणि समष्टीत समरस झाला आणि सहज एक अवीट चवीचा स्वर्गीय पदार्थ बनला तसे जेंव्हा आपण आजूबाजूच्या जगाला आपल मानायला लागलो आणि समष्टीशी एकरूप झालो की नवीन सुंदर स्वर्गीय आनंदाच्या जीवनाची निर्मिती होते.
*गोपाळकाला म्हणजे फक्त एक कृष्णलीला नव्हे,*
*तर ती स्नेह, समर्पण, आणि सख्य यांची आरती आहे.*
*देह, सृष्टी आणि दिशा*
गोपाळकाला म्हणजे एका हातात चविष्ट अन्न,
तर दुसऱ्या हातात विचारांचा प्रसाद.
ज्या दिवशी आपण
*’का - आलो ?’* याचा शोध घेऊ लागतो,
*त्या दिवशी आपण खऱ्या* *अर्थाने कृष्णाचे सवंगडी होतो!*
*आणि त्या क्षणीच — आपला देह, आपलं जीवन…ते सुद्धा एक गोपालकाला होत. भगवंताच्या हातून तयार झालेला एक सुंदर ‘प्रसाद’.*
🚩 l *जय श्रीकृष्ण* ।
ll *जय सद्गुरू* ll
गोपालकाल्याच्या निमित्ताने
एक चिंतन : *जयंत जोशी*










Comments