top of page

तीन दिवासाची सहल* एक अंतर्जागृतीचा थांबा !!!

*

ree

“कधी कधी शरीराला विश्रांतीची गरज असते त्यासाठी आपण सहलिंना जातो… पण कधीकधी या सहली आंतरजागृतीचा प्रवास घडवितात.”


आजचं आपल्या सर्वांचे जीवन म्हणजे सतत धावपळ, स्पर्धा, जबाबदाऱ्या, टाईमटेबल्स…

या धकाधकीत माणूस इतका हरवतो, की इतरांकडे तर सोडाच, पण स्वतःकडे बघायलाही वेळ राहत नाही.

आपण यंत्रवत जगत असतो — काम करत राहतो,

गडबडीत राहतो… आणि या सगळ्यात आपल्या जाणिवाच बोथट होतात.


अशा वेळी जर जरा थांबता आलं, निसर्गाच्या सान्निध्यात जाता आलं,

तर… ते थांबणं नसत ती सुट्टी नसते – ती असते, एक *conscious shock process* -

एक आत्मशुद्धीची जागृती.


तीन दिवसांच्या सुट्टीत आम्ही प्रवास केला — फक्त स्थळांचा नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वाचा.


स्वातंत्र्य दिनाच्या सुट्ट्यांनिमित्त आम्ही काही मित्रांनी कुटुंबियांसह मिळून तीन दिवसांची एक सहल आखली.

सुरुवातीला हा प्रवास म्हणजे निसर्ग, विश्रांती, दर्शन, गप्पा, हास्यविनोद… एवढाच वाटला.

पण जसजसे दिवस पुढे सरकले,

तसतसे प्रत्येक स्थळ, प्रत्येक क्षण — एक गूढ अर्थ सांगू लागला.


⛰️ *सप्तशृंगी देवी – शक्तीच्या दिशेने चढाई*

सात डोंगर पार करून उंच शिखरावर देवी आहे.

वाईटाचा नाश करणारी ती देवी सहज मिळत नाही –

आतल्या अंधाराशी झगडल्याशिवाय, बाहेरचा प्रकाश कसा गवसणार?

हा चढणारा प्रवास शारीरिक थकवा देतो – पण मानसिक जागर देतो.


🔱 *त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग – आत्मदीप उजळवणारा अनुभव*

ज्योतिर्लिंग म्हणजे केवळ एक दगड नाही – तो एक ऊर्जा-स्रोत आहे.

ते विश्वातील विशिष्ट रचनेतील स्थान आहे –

ही एक निसर्गाशी जोडणारी, आत्म्याशी जुळणारी भव्य संगती आहे.

म्हणूनच ते बघताना वाटलं –

*बाहेरच्या ज्योतीला वंदन करताना, आतली ज्योत विसरू नये.*


🧘 *निवृत्तीनाथ समाधी – शांतीचं आणि निवांतपणाच गमक*

ज्ञानेश्वरांचे गुरु, निवृत्तीनाथ…

त्यांची समाधी सांगून गेली की,

निवृत्ती म्हणजे पलायन नव्हे, तर स्वीकार आणि स्थैर्य.

हे जीवनाचं शहाणपण आहे –

सगळं करत राहायचं, पण

*मी* पणा न ठेवता.


💧 *वैतरणा नदी – स्वच्छतेचा संवाद*

शांत, स्वच्छ, आणि वाहतं पाणी…

पाणी कधीही अस्वच्छतेचा राग करत नाही –

प्रवाहित पाणी गिळतं, शोषतं, आणि शुद्ध करतं…

माणसानेही जीवन सुंदर करण्यासाठी हे शिकायला हवं.

वैतरणेच्या पाण्याकडे पाहताना वाटलं –

आपल्यात किती धूळ साचलेली आहे… पण तिचीही निर्मलता शक्य आहे.


🛕 *स्वामीनारायण मंदिर – सुव्यवस्थेतील सौंदर्य*

हे मंदिर केवळ भव्य नव्हतं – ते होते शिस्त, श्रद्धा आणि संतुलनाचे प्रतीक.

तेथील प्रत्येक कोन, रंग, गंध…

एक अलिखित संदेश सांगत होता – *जे सुव्यवस्थीत आहे, ते सुंदर आहे.*

*जेथे जेथे व्यवस्था असते तिथे परमेश्वराचा वास असतो.*

मनात असाच सुव्यवस्थेचा दीप लागला —

शिस्तीतही आनंद असतो, आणि भक्तीतही समाधान.


🔦 *हे सर्व मिळून झाला एक ‘Conscious Shock’*

सततच्या व्यवहारात मन थकलेलं असतं…

अशा अनुभवांनी – निसर्ग, साधना, सहवासाने –

मन पुन्हा एकदा स्थिर होतं.

चित्त ठिकाणी येतं.

जाणीव ताजी होते.


🙏 *स्वामीनारायणांची शिकवण – अनुभवाला दिशा देणारी*

या प्रवासात शेवटचा अनुभव म्हणजे स्वामीनारायण मंदिरातील शांतता आणि शिकवण.

त्यांच्या जीवनशिक्षेने आमच्या अनुभवांना अर्थ दिला…

✅ *व्यवहारासाठी संकल्प:*

1. मी सत्य बोलेन, कुणालाही दुखावणार नाही.

2. मी सदाचरण राखेन – आचार-विचारात पावित्र्य ठेवीन.

3. मी प्रत्येक प्राणीमात्रात परमेश्वर पाहण्याचा प्रयत्न करीन.

4. मी संयम, सेवा, आणि नम्रता यांचा मार्ग पत्करीन.

5. मी नित्य साधना, नामस्मरण, आणि आत्मचिंतन करीन.


तीन दिवसांत काही प्रेक्षणीय स्थळं पाहिली — आणि मनातले कित्येक कोपरे उजळले.आत्मदर्शन झालं.


🤝 *स्थळं शिकवतात… पण सहप्रवासी अनुभव घडवतात!* या संपूर्ण प्रवासाचं एक अनमोल अंग म्हणजे –

ज्यांच्यासोबत तो घडला.

प्रत्येक मित्र, कुटुंबीय, सहप्रवासी —

सगळ्यांचा समजूतदारपणा, लवचिकता, सहवेदना आणि आपुलकी —

यामुळे ही सहल केवळ ‘प्रवास’ न ठरता ‘प्रसाद’ झाला आहे.


💖 *मनापासून कृतज्ञता*

ही तीन दिवसांची सहल केवळ विश्रांती नव्हती –

ती होती एक एकत्रित सहवासाची अनुभूती. आपल्या

सर्वांच्या सहवासात मन उल्हसित झालं,

आणि पुढील वाटचालीसाठी नव्याने ऊर्जा, उमेद मिळाली.

क्षण निघून गेले,

पण आठवणी ठेऊन गेले –

आणि आंतरमनाच्या कपाटात एक नवीन दीप लावून गेले.


🌟 *निष्कर्ष – सुट्टी संपली नाही… अंतरप्रवास सुरू झाला*

सर्वांना धन्यवाद.

*जयंत जोशी*

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page