*नवरात्र : दिवस २ — ब्रह्मचारिणी*🌸
- ME Holistic Centre
- Sep 24
- 2 min read
🌸

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजली जाते — ब्रह्मचारिणी माता.
नावातच अर्थ आहे —
“ब्रह्म” म्हणजे तप, साधना आणि सर्वोच्च सत्य;
“चारिणी” म्हणजे त्याचं आचरण करणारी.
म्हणूनच, ब्रह्मचारिणी म्हणजे तपाच आचरण करणारी देवी.
*ब्रह्मचारिणीचं स्वरूप*
माता ब्रह्मचारिणी श्वेत वस्त्र धारण केलेली आहे.
तिच्या उजव्या हातात जपमाळा — सातत्य, श्रद्धा आणि अखंड साधनेचं प्रतीक.
डाव्या हातात कमंडलू — संयम, तपश्चर्या आणि आत्मनियंत्रणाचं चिन्ह.
विशेष म्हणजे, ती कोणत्याही वाहनावर आरूढ नाही; ती पायी चालत असते.
यातून स्पष्ट होतं की — साधना ही इतरांच्या आधारावर नव्हे, तर स्वतःच्या पावलांवर चालणाऱ्या प्रवासाचं नाव आहे.
पौराणिक कथेनुसार, हिमालय आणि मैना यांची कन्या पार्वतीचं हे स्वरूप आहे.
भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली.
दीर्घ काळाच्या त्या कठीण साधनेनंतर तिची तपस्या फळाला आली आणि शिवजींनी तिला पत्नी म्हणून स्वीकारलं.
ही कथा सांगते — श्रद्धा, संयम आणि अखंड साधना यांचा शेवटी नेहमी विजयच होतो.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने साधकाच्या मनात तप, संयम, त्याग, वैराग्य आणि सदाचार या गुणांची वाढ होते.
कठीण संघर्षातही मन विचलित होत नाही.
जीवनातील आव्हानं कितीही कठीण असली तरी, श्रद्धा आणि संयमाच्या बळावर साधकाला विजय आणि सिद्धी प्राप्त होते.
ब्रह्मचारिणी म्हणजेच सातत्य, संयम आणि अखंड प्रयत्न.
तिचं स्वरूप आपल्याला सांगतं
*आरामाच्या गाडीत बसून ध्येय गाठता येत नाही.*
*तो प्रवास पाऊलोपावली चालत रहावा लागतो — तप,श्रद्धा आणि संयमाच्या आधाराने.*
आजच्या दिवसाचा रंग आहे लाल.
लाल रंग म्हणजे ऊर्जा आणि आवेश.
पण देवी शिकवते — हा आवेश व्यर्थ वाया घालवू नका.
तो साधनेत आणि प्रयत्नांत वळवा, ध्येयाकडे नेणाऱ्या ज्वालेत परिवर्तित करा.
“या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”
🌸 ब्रह्मचारिणी सांगते : *कितीही कठीण मार्ग असला तरी श्रद्धेचा हात धरून, संयमाचा दीप घेऊन चालत राहा.
कारण ध्येयाला पोहोचवणारी खरी साधना म्हणजेच अखंड प्रयत्न.*🌸
उद्या तिसऱ्या दिवशी दर्शन होईल — *चंद्रघंटा देवीचं.*
तिचा रंग आहे पिवळा.
हा रंग आनंद, उत्साह आणि आशावादाचं प्रतीक आहे.
पाहा, चंद्रघंटा आपल्याला काय संदेश देणार आहे…
*जयंत जोशी*










Comments