नवरात्रोत्सव-दिवस चौथा* *कुष्मांडा देवी पूजन
- ME Holistic Centre
- Sep 25
- 1 min read

नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस कुष्मांडा देवीच्या उपासनेसाठी समर्पित आहे. ‘कु’ म्हणजे थोडं, ‘उष्म’ म्हणजे ऊर्जा, आणि ‘अंड’ म्हणजे ब्रह्मांड. या शब्दांपासून निर्माण झालेलं देवीच नाव सांगतं — *आपल्या स्मितहास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती करणारी माता.*
कथांमध्ये असं सांगितलं जातं की, जेव्हा ब्रह्मांड सर्वत्र अंधकारमय होतं, तेव्हा कुष्मांडाच्या तेजस्वी हास्याने प्रकाश निर्माण झाला आणि त्यातून सृष्टीचा प्रारंभ झाला. तिचं हे रूप केवळ पुराणकथा नाही, तर आपल्या जीवनासाठी एक सुंदर संदेश आहे — *आनंदाने, प्रसन्नतेने आणि सकारात्मकतेनेच नवं काही घडतं.*
कुष्मांडा देवीच तेजस्वी स्वरूप आठ हातांनी सजलेले आहे. तिच्या हातात जपमाळ, कमंडल, धनुष्य–बाण, कमल, अमृतकलश, गदा आणि चक्र आहेत. प्रत्येक आयुध सांगतं — *जीवनात साधना, संयम, सौंदर्य, ऊर्जा आणि सामर्थ्य हे सर्व गुण एकत्रित व्हायला हवेत.*
देवीच वाहन आहे सिंह. सिंह हे वाहन दाखवते की,
*आनंद आणि करुणा या अंतर्मनातील शक्तींना धैर्य आणि सामर्थ्याची जोड मिळाली, तर कुठलीही अडचण अडथळा राहात नाही.*
चौथा कुष्मांडा देवीचा दिवस हृदयचक्राशी संबंधित मानला जातो. हृदय म्हणजे करुणा, प्रेम आणि सर्जनशीलतेचं केंद्र. कुष्मांडाच्या पूजेनं मनातली कठोरता वितळते आणि माणसामधील सृजनशक्ती उमलते. जसं आईच्या एका हसऱ्या चेहऱ्याने संपूर्ण घर उजळून निघतं, तसं प्रसन्नतेने भरलेलं मन हेच जगासाठी सर्वात मोठं देणं आहे.
चौथ्या दिवसाचा रंग आहे पिवळा (Yellow). सूर्यप्रकाशासारखा तेजस्वी आणि उत्साहवर्धक. पिवळा रंग आपल्याला प्रकाश, सकारात्मकता आणि नव्या ऊर्जेची अनुभूती देतो. म्हणूनच या दिवशी पिवळ्या वस्त्रांचा स्वीकार करणं म्हणजे आपल्या जीवनात आनंदाचा किरण फुलवणं.
चौथ्या दिवसाचा हा संदेश आपल्याला जीवनाची नवी दिशा दाखवतो —
*हसणं म्हणजे जग घडवणं. प्रसन्नतेतूनच सर्जनशीलता जन्माला येते. आणि आनंदी मनाने जगायला शिकलो, तर संपूर्ण जग प्रकाशमान होतं*🌼
*जयंत जोशी*










Comments