परत फिरण्याची वेळ-*प्रवासाची नवी सुरुवात* *जागेपणाचा प्रवास* *l भाग १ |*
- ME Holistic Centre
- Mar 8
- 7 min read

जीवन आपल्याला सतत पुढे नेत असते,
पण कधी कधी थांबून मागे वळून पाहिल्याशिवाय दिशा समजत नाही.
हा प्रवास बाहेरच्या जगाचा नाही —
हा प्रवास स्वतःकडे परत येण्याचा आहे.
कधी कधी जीवन आपल्याला बाहेरून थांबवत नाही;
आपणच आतून थांबतो.
धावता-धावता एक क्षण असा येतो, जिथे बाहेर सर्व काही पूर्वीसारखंच चालू असतं-काम, जबाबदाऱ्या, नाती, प्रयत्न, यश, योजना-पण आत काहीतरी शांतपणे विचारायला लागतं:
*मी इतका धावत आहे… पण नेमकं कशासाठी?*
धावण्यात चूक नसते.
कर्तव्य निभावण्यात दोष नसतो.
कुटुंबासाठी, स्थैर्यासाठी, भविष्यासाठी झटण्यात काही कमीपणा नसतो.
पण एक गोष्ट नकळत घडते,
धाव ही केवळ कृती न राहता सवय बनते… आणि सवयच जीवन बनते.
आणि मग धाव सुरूच असते, पण आत कुठेतरी मन थकायला लागतं.
कारण कदाचित
*आपण धावत नाही आहोत…*
*आपण थांबण्यापासून पळत आहोत.*
*आयुष्य किती? प्रश्न वेगळा आहे*
आपण सर्वसाधारणपणे मानतो की माणसाचं आयुष्य शंभर वर्षांचं असतं.
वाढदिवशी आपण आशीर्वाद देतो-“जिवेत शरदः शतम्.”
काही परंपरा आणि निरीक्षणे मानवी शरीराची संभाव्य क्षमता सुमारे १२० वर्षांपर्यंत असल्याचे सूचित करतात.
पण इथे खरा मुद्दा वेगळा आहे.
आयुष्य किती वर्षांचं आहे, यापेक्षा
आयुष्याला किती अर्थ आहे-हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो.
कारण वर्षे वाढली तरी, दिशा नसेल तर
ते फक्त लांबलेली धाव ठरते.
आणि धाव वाढली की एक गोष्ट आपल्याला नकळत हरवते-
परत येण्याचा रस्ता.
*टॉल्स्टॉयची कथा-धाव आणि परतीची अट*
टॉल्स्टॉयची एक प्रसिद्ध कथा आहे.
ती कथा ऐकताना आपण एखाद्या पात्राची गोष्ट ऐकत नाही;
आपण आपलंच प्रतिबिंब पाहतो.
एक गरीब माणूस राजाकडे गेला.
तो म्हणाला, “माझ्याकडे काहीच नाही. मला थोडी जमीन हवी.”
राजा दयाळू होता. त्याने विचारले, “किती जमीन हवी?”
माणूस म्हणाला, “कसायला थोडी जमीन द्या. बस.”
राजा म्हणाला-
“उद्या सूर्योदयापासून तू जितकी जमीन चालून किंवा धावून मोजशील, ती जमीन तुझी.
पण एक अट लक्षात ठेव: जिथून सुरुवात केलीस तिथेच सूर्यास्तापूर्वी परत यायचं.
सूर्यास्तापर्यंत परत आलास तर जमीन तुझी; नाहीतर काहीच मिळणार नाही!”
माणूस खूश झाला.
सकाळी सूर्योदय होताच तो धावू लागला.
सकाळ गेली… दुपार झाली… सूर्य माथ्यावर आला…
पण तो थांबला नाही.
त्याच्या मनात एकच विचार:
“अजून थोडं… अजून थोडं… आज जितकं मिळवता येईल तितकं मिळवायचं!”
जशी जमीन वाढत होती,
तशीच त्याची इच्छा वाढत होती.
त्याला वाटत होतं —
“आज थोडं अधिक मिळवून घेतलं की मग आयुष्यभर विश्रांती!”
संध्याकाळ जवळ आली तेव्हा अचानक त्याला आठवलं —
परतही जायचं आहे!
त्याने मागे वळून पाहिलं…
तो खूप दूर आला होता.
आता वेळ कमी… दम कमी… पण घाई जास्त.
तो जीव तोडून धावू लागला.
श्वास अडखळला… छाती जड झाली…
पाय लटपटले…
आणि शेवटी तो खाली कोसळला.
राजा हे सर्व पाहत होता.
तो जवळ आला, मृतदेहाकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला-
*याला शेवटी फक्त सात फूट जमीनच लागली.*
*ही कथा आपल्याला अस्वस्थ का करते?*
कारण ती केवळ त्या माणसाची कथा नाही.
ती आपल्या आतल्या धावण्याची कथा आहे.
आपल्या गरजा मर्यादित असतात.
पण इच्छांना मर्यादा नसते.
आपण म्हणतो — “अजून थोडं…”
आणि ते “थोडं” कधी संपतच नाही.
अजून पैसा…
अजून सुरक्षितता…
अजून प्रतिष्ठा…
अजून स्थैर्य…
अजून नाव… अजून प्रभाव…
हे सर्व चुकीचं नाही.
समस्या मिळवण्यात नाही;
समस्या आहे मर्यादा विसरण्यात.
आणि मर्यादा विसरली की
धावण्याची दिशा बदलत नाही…
धावण्याचा वेगच वाढतो.
पण वेग वाढला की आपण आवाज ऐकू शकत नाही —
मनाचा, शरीराचा, नात्यांचा… आणि आतल्या शांततेचा.
आणि मग एक दिवस प्रश्न उभा राहतो:
*मला परत यायचं कुठे आहे?*
हे परत येणं घराकडे नसतं.
हे परत येणं असतं — स्वतःकडे.
*परत फिरणे म्हणजे काय?*आणि ते अवघड का वाटते?*
परत फिरणे म्हणजे संसार सोडणे नाही.
जबाबदाऱ्या टाकून देणे नाही.
समाजापासून दूर जाणे नाही.
परत फिरणे म्हणजे —
आपल्या धावण्याला “थांबा” म्हणणे नाही,
तर धावण्याला दिशा आणि अर्थ देणे.
कारण कधीकधी आपल्याला जाणवतं:
मी जे मिळवत आहे, ते वाढत आहे…
पण माझ्या आतली शांतता कमी होत आहे.
मी बाहेरच जग व्यवस्थित करायला शिकतो,
पण आतला गोंधळ शांत करायला विसरतो.
म्हणूनच परत फिरणे अवघड वाटतं —
कारण पहिल्यांदाच आपण स्वतःला विचारतो:
• मी कुठे चाललो आहे?
• मला खरंच काय हवं
आहे?
• मी जे मिळवत आहे,
त्याचा उपयोग काय?
• आणि मी शेवटी कुठे
थांबणार?
याच ठिकाणी एक वाक्य मनात ठसतं:
*धावण्यात यश असू शकतं…*
*पण परत येण्यात समृद्धी असते.*
*जीवनाचे ५०–५० सूत्र-रचना समजली की संभ्रम कमी होतो*
स्वामी भौमानंदजी एक सुंदर आणि अतिशय व्यावहारिक जीवनसूत्र सांगतात.
मानवी आयुष्याच्या शंभर वर्षांचा विचार केला तर
मानवी आयुष्य दोन भागांत पाहा:
*पहिली ५० वर्षे*
*सर्व काही संपादनासाठी*
या काळात माणसाने पाया मजबूत करावा:
* शरीर संपादन करावे
आरोग्य, शिस्त, ऊर्जा
* ज्ञान संपादन (कौशल्य,
अनुभव, विवेक)
* धन संपादन (स्थैर्य,
साधनसंपत्ती)
* नाती संबंध - विश्वास,
संवाद, प्रेम)
हे सर्व आवश्यक आहे.
कारण पाया नसेल तर पुढचा प्रवासच डगमगतो.
*पुढची ५० वर्षे जे संपादन केले त्याचा सदुपयोगासाठी-वापरण्यासाठी*
इथून खरी समृद्धी सुरू होते.
याचा अर्थ “सगळं वाटून टाका” असा नाही.
याचा अर्थ — मिळवलेल्याला अर्थ द्या.
*धनाचा अर्थ-*
चांगल्या विधायक कामात उपयोगात आणणे.
*ज्ञानाचा अर्थ-*
मार्गदर्शक बनणे
*अनुभवाचा अर्थ-* शहाणपणाचा आधार बनवणे.
*नात्यांचा अर्थ*-
प्रेम, आदर आणि उपस्थिती वाढवणे.
*पहिल्या अर्ध्यात आपण जगात स्थान निर्माण करतो,*
*दुसऱ्या अर्ध्यात आपण जीवनात अर्थ निर्माण करतो*.
आणि इथेच पुढचा प्रश्न उभा राहतो:
सदुपयोग “कशाच्या” दिशेने करायचा?
यासाठी भारतीय चिंतन तीन ऋणांचे दिशादर्शन देते.
*तीन ऋण-जीवनाचा दिशादर्शक*
भारतीय चिंतन एक गूढ पण वास्तववादी गोष्ट सांगते —
मनुष्य जन्माला येतो तो रिकामा येत नाही;
तो ऋण घेऊनच जन्माला येतो.
हे ऋण आर्थिक नसते.
हे ऋण म्हणजे जीवनाने आपल्यावर केलेली कृपा,
ज्याची परतफेड आपण “जगण्याने” करायची असते.
म्हणूनच जीवनाला तीन ऋणांच्या स्वरूपात समजावले गेले —
जे माणसाला दिशा देतात, मर्यादा शिकवतात आणि परत फिरण्याचा मार्ग दाखवतात.
१) *मातृ-पितृ ऋण-* *अस्तित्वाची मुळे*
आपण या जगात आलो ते आपल्या प्रयत्नांनी नाही.
कोणीतरी आपल्यासाठी जागं राहिलं, कष्ट घेतले, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या.
आपण चालायला शिकण्यापूर्वी कोणीतरी आपल्याला धरून उभं केलं.
मातृ-पितृ ऋण फेडणे म्हणजे केवळ आर्थिक जबाबदारी पार पाडणे नव्हे.
ते म्हणजे —
सुज्ञ जीवन जगणे, मिळालेल्या संस्कारांना पुढे नेणे,
आपल्या पुढील पिढीला केवळ सुविधा नव्हे तर मूल्ये देणे,
आणि जशी आपण आपल्या मुलांची काळजी घेतो,
तशीच प्रेमाने वडीलधाऱ्यांचीही काळजी घेणे.
पालकांची खरी अपेक्षा संपत्ती नसते;
त्यांची अपेक्षा असते — आपण योग्य माणूस बनावे.
मातृ-पितृ ऋण फेडले की जीवनाला मुळे मिळतात.
२)*समाज ऋण-* *सहअस्तित्वाची जाणीव*
आपण एकटे वाढत नाही.
आपली भाषा, संस्कृती, शिक्षण, व्यवस्था, संधी — हे सर्व समाजाने दिलेले असते.
म्हणून समाज ऋण म्हणजे फक्त दानधर्म नव्हे.
ते म्हणजे —
समाजात प्रामाणिकपणे जगणे,
आपल्या कृतींमुळे इतरांचे जीवन कठीण न बनवणे,
आणि शक्य तितक्या प्रमाणात इतरांच्या जीवनात उपयोगी ठरणे.
संतपरंपरेत “समाज” म्हणजे केवळ माणसे नाहीत —
तो सर्व भूतमात्रांचा समावेश करणारा व्यापक अर्थ आहे.
म्हणून समाज ऋण फेडणे म्हणजे —
निसर्गाशी सुसंवाद,
सहजीवनाची जाणीव,
आणि “मी” पासून “आपण” कडे जाण्याचा प्रवास.
*समाज ऋण फेडले की जीवनाला विस्तार मिळतो.*
३)*ऋषी ऋण-*
*जागृतीचा प्रवाह जिवंत ठेवणे*
पहिली दोन ऋणं माणूस नकळत फेडण्याचा प्रयत्न करतो.
पण तिसरं ऋण अनेकदा लक्षातही येत नाही — ते म्हणजे ऋषी ऋण.
ऋषी म्हणजे केवळ प्राचीन काळातील तपस्वी नव्हेत.
ऋषी म्हणजे ते, ज्यांनी जीवनाचा अर्थ शोधला,
स्वतः अनुभवला आणि समाजाला दिशा दिली.
आपण आज जे विचार करतो, जी मूल्ये जगतो,
जी आध्यात्मिक दिशा आपल्याला उपलब्ध आहे-
ती कोणीतरी आयुष्य अर्पण करून निर्माण केलेली आहे.
ऋषी ऋण फेडणे म्हणजे केवळ त्या ज्ञानाचा आदर करणे नव्हे;
ते जगणे आणि पुढे नेणे.
*ज्ञान पुस्तकात ठेवले तर ते माहिती राहते.*
*ज्ञान आचरणात आले की ते संस्कृती बनते.*
आणि
*संस्कृती पुढे गेली की समाज उत्क्रांत होतो.*
इथेच जीवनाचा प्रवास वैयक्तिक राहत नाही;
तो व्यापक होतो.
याच ठिकाणी एक प्रश्न शांतपणे उभा राहतो-
आपल्याला जे ज्ञान मिळालं,
जे मार्गदर्शन मिळालं,
जे जीवन समजायला मदत झाली-
ते आपण स्वतःपुरतंच ठेवणार आहोत का?
की त्या प्रवाहाचा एक जिवंत दुवा बनणार आहोत?
याच प्रश्नातून पुढचा टप्पा जन्म घेतो —
*सद्गुरूंचे मार्गदर्शन आणि सद्गुरू कार्य.*
*सद्गुरूंचे मार्गदर्शन-थांबण्याचे शहाणपण*
सद्गुरू श्री वामनराव पै अतिशय साध्या शब्दांत एक गूढ सत्य सांगतात —*माणसाला थांबायचे कुठे हे समजले पाहिजे; आणि ही समज शहाणपणातून येते.*
जीवनात धावणे अनेकांना जमतं.
मिळवणेही जमतं.
पण “किती पुरेसं आहे” हे ओळखणं-ही खरी बुद्धी.
*थांबणे म्हणजे हार नाही;*
*थांबणे म्हणजे जागे होणे.*
जेव्हा शहाणपण जागं होतं,
तेव्हा माणूस धाव थांबवत नाही —
तो धावण्याची दिशा बदलतो.
आणि हाच क्षण “परत फिरण्याचा” आरंभ ठरतो
*सद्गुरू कृपेची अमूल्य संधी -ऋषी ऋण फेडण्याचा जिवंत मार्ग*
आपण सद्गुरू श्री वामनराव पै यांचे नामधारक म्हणून खरोखर भाग्यवान आहोत.
कारण आपल्याला केवळ तत्वज्ञान मिळालेले नाही-तर
आपल्याला सद्गुरू कार्याची संधी लाभली आहे.
अनेकांना प्रेरणादायी शब्द ऐकायला मिळतात,
काहींना भाव येतो,
काहींना क्षणभर समाधान मिळतं…
पण त्या प्रेरणेचं रूपांतर जीवनात करण्यासाठी जी ‘संधी’ आणि ‘व्यवस्था’ लागते, ती सगळ्यांना मिळत नाही.
सद्गुरूंनी आपल्याला ती संधी दिली आहे.
कधी कधी आपण असा समज करून घेतो की सद्गुरू कार्य म्हणजे काही निवडक लोकांची जबाबदारी आहे.
परंतु सत्य अगदी वेगळं आहे.
*सद्गुरू कार्य हे कोणाचं “काम” नसतं-*
*ते ज्याच्या अंतर्मनाला स्पर्श करत त्याची नैसर्गिक अभिव्यक्ती बनतं.*
कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला दिशा मिळते,
तेव्हा तो शांत बसू शकत नाही.
त्याच्या जगण्यातूनच त्या प्रकाशाचा प्रसार होऊ लागतो.
सद्गुरू आपल्याकडून मोठी कामे मागत नाहीत;
ते फक्त जागेपण मागतात.
कधी उपस्थिती,
कधी वेळ,
कधी एक शब्द,
कधी एक संवेदनशील कृती,
इतक्यानेही कार्य पुढे सरकत असते.
आणि हळूहळू लक्षात येतं —
*आपण कार्य करत नाही आहोत;*
*कार्य आपल्याला घडवत आहे.*
इथेच जीवनात एक सूक्ष्म पण मोठा बदल घडतो:
पूर्वी आपण जीवनातून काय मिळेल हे विचारत होतो;
आता आपल्या जीवनातून काय देऊ शकतो हा प्रश्न जागा होतो.
आणि हा प्रश्न जागा झाला की
ऋषी ऋण फेडण्याचा प्रवास सुरू होतो.
म्हणूनच *सद्गुरू कार्यात सहभागी होणे म्हणजे*
*फक्त पुण्य मिळवणे नाही;*
*ते ऋणमुक्त होण्याचा मार्ग आहे.*
आज प्रश्न इतकाच —
सद्गुरूकृपेच्या स्पर्शाने चेतन व्हायचे
की कोरडे पाषाणच राहायचे,
हा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे.
कारण —
*तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
🌿
एक वेळ अशी येते की जीवन आपल्याला काही नवीन देत नाही,
तर आपण मिळवलेल्या सर्व गोष्टींकडे नव्याने पाहायला शिकवतं.
ज्या गोष्टींसाठी आपण आयुष्यभर धावलो,
त्या गोष्टींपेक्षा धावताना आपण कोण झालो —
हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो.
कारण शेवटी माणूस आपल्या संपत्तीने मोठा होत नाही,
तर आपल्या स्पर्शाने किती जीवनं हलकी झाली याने मोठा होतो.
मिळवलेलं मागे राहणारच आहे;
पण दिलेला प्रकाश पुढे चालत राहतो.
आणि कदाचित जीवनाचं खरं यश हेच असावं —
रिकाम्या हाताने न जाता, उबदार ठसा ठेवून परत जाण
🌅*परतीतच नवी सुरुवात*
एक दिवस सूर्य मावळेल.
धावपळ थांबेल.
नावे, पदे, संपत्ती — मागे राहतील.
पण जर आपल्या अस्तित्वामुळे
कुणाच्या आयुष्यात थोडासा प्रकाश वाढला असेल,
कुणाला दिशा मिळाली असेल,
कुणाच्या मनात शांतता उतरली असेल-
तर आपण रिकामे परत जाणार नाही.
कदाचित म्हणूनच आजचा हा क्षण महत्त्वाचा आहे —
हा केवळ थांबण्याचा क्षण नाही,
ही नव्या प्रवासाची सुरुवात आहे.
🌿
जीवनाची दिशा समजली की पुढचा प्रश्न उभा राहतो —
ही दिशा प्रत्यक्ष जगायची कशी?
आपल्या ऋषींनी जीवनाला चार आश्रमांच्या रूपाने एक अद्भुत रचना दिली होती.
आजच्या काळात त्या रचनेचा नव्याने अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे…
*पुढील भाग-चार आश्रम*: *इतिहास आणि आजचा अर्थ*
*तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार*
*जागेपणाने घडव, शांततेने जग.*
…आणि मग प्रवास बाहेरचा राहत नाही.
थांबणे एक चिंतन:
*जयंत जोशी*


Comments