top of page

*प्रार्थना-रहस्य* *भाग १* प्रार्थनेचा उद्देश काय ? प्रार्थनेने नेमके काय साध्य होते ?


*प्रार्थना — वस्तुस्थितीपासून अंतःशांतीपर्यंतचा प्रवास*



प्रार्थना आपण कधी मनापासून करतो… आणि कधी फक्त ओठांवरून म्हणतो.

कधी ती मागण्याची घाई असते, आणि कधी नुसती एक हाक असते.

पण प्रत्येक प्रार्थनेमागे एकच आतला प्रश्न दडलेला असतो *”प्रार्थनेतून मला नेमकं काय मिळणार?”*

उत्तर बाहेर नाही… प्रार्थनेतून आपल्या आत घडणाऱ्या प्रवासात आहे.


*प्रार्थना नेमके काय ?*

*शब्द की अंतर्मनाची दिशा?*

आपल्या संस्कृतीत प्रार्थनेला अनेक रूपं आहेत— देवघर, मंदिर, व्रत-वैकल्य, मंत्र, नामजप, आरती… म्हणूनच अनेकांना प्रार्थना म्हणजे “ठराविक शब्द” किंवा “ठराविक विधी” असे वाटते. पण

*प्रार्थनेचा गाभा शब्दांमध्ये नाही. शब्द हे फक्त वाहक आहेत.*


खरी प्रार्थना म्हणजे मनाची दिशा बदलणे.


दिवसभर आपल्या मनात नकळत अनेक “प्रार्थना” चालू असतात— चिंता, तक्रार, भीती, तुलना, अपराधभाव… ही सगळी मनाची चालू असलेली अंतर्गत प्रोग्राम्सच आहेत. प्रार्थना म्हणजे या विस्कळीत प्रवाहाला एक अर्थपूर्ण, उन्नत दिशेकडे वळवण्याची प्रक्रिया. म्हणूनच प्रार्थनेचा पहिला परिणाम बाहेर दिसत नाही; तो आत जाणवतो— मनाच्या आत “जागा” निर्माण होते.


*लोक प्रार्थना “मागण्यासाठी”करतात का? आणि मागण्यासाठी प्रार्थना करणे चुकीचे आहे का?*


मानवी मनाला तीन मूलभूत गरजा असतात— सुरक्षितता, आधार, आणि अर्थ. संकट आलं की सुरक्षितता हलते, आधार ढळतो, आणि अर्थ धूसर होतो. अशा वेळी माणूस नैसर्गिकपणे “वर” पाहतो— कुणाचा तरी धरायला हात हवा असतो.


म्हणून मागण्या साठीची प्रार्थना चुकीची नाही. ती माणसाच्या अंतर्मनाच्या दिशा प्रवासाची पहिली पायरी आहे.


कधी कधी मागितलेलं पूर्णही होतं— काम मिळतं, मदत मिळते, अडथळा सुटतो, आजारातून दिलासा मिळतो. मग लोक अनुभव सांगतात, इतरांनाही प्रेरणा मिळते, आणि मागण्यासाठी प्रार्थना सुरू होते. हे मानवी आहे.


पण इथे एक सूक्ष्म प्रश्न उभा राहतो:

अडचण सुटली म्हणजे प्रार्थनेचा उद्देश पूर्ण झाला का?

अनेकदा बाह्य परिस्थिती सुधारते, तरी मनाचा ताण, असुरक्षितता, भीती तशीच राहू शकते. इच्छा पूर्ण झाली तरी मन नव्या इच्छेच्या मागे धावू लागतं. त्यामुळे मागणीची प्रार्थना चूक नाही— पण ती अंतिमही नाही.


*प्रार्थना “सफल” का होते?— दोन स्तर*


प्रार्थनेचा परिणाम दिसण्यामागे मुख्यतः दोन स्तर काम करतात:


*एकाग्रता आणि स्पष्टता*


प्रार्थनेत मन एका केंद्रावर स्थिर होतं. विखुरलेली ऊर्जा एका दिशेला येते. त्यामुळे निर्णय स्पष्ट होतात, धैर्य वाढतं, कृती नीट होते. अनेकदा “चमत्कार” वाटणारी गोष्ट ही या स्पष्टतेतून घडलेली योग्य कृती असते.


*भावना + पुनरावृत्तीचा ठसा*


प्रार्थनेत आर्तता, कृतज्ञता, नम्रता अशी भावना असते. भावना ही नेणीवावर ठसा उमटवते. आणि पुनरावृत्ती हा ठसा खोल करते. म्हणूनच कधी बाह्य परिणाम दिसतो, कधी दिसत नाही; पण आतल्या पातळीवर काहीतरी हळूहळू आकार घेत असतं.


यातून एक गोष्ट स्पष्ट होते:

बाह्य परिणाम हा प्रार्थनेचा गौण परिणाम आहे. मुख्य परिणाम अंतर्मनातील बदल आहे.


*प्रार्थनेचा पहिला मोठा वळणबिंदू: वस्तुस्थितीचा स्वीकार*


सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात—


*वस्तुस्थितीचा स्वीकार करून परिस्थितीला योग्य वळण देण्यातच शहाणपण असते.*


प्रार्थनेचा पहिला गाभा इथे उघडतो. संकटात आपलं मन वास्तवाशी भांडायला लागते— हे असं का झालं? मला हे नको होतं! हा विरोध वाढला की दुःख वाढतं. म्हणून प्रार्थनेचा पहिला हेतू असा— वास्तवाशी लढाई थांबवणे.


*स्वीकार म्हणजे हार मानणे नाही. स्वीकार म्हणजे— जे आहे ते स्पष्ट पाहणे.*

कारण जेव्हा “हे आहे” ही वस्तुस्थिती मनाने मान्य केली, तेव्हाच पुढचा प्रश्न जन्माला येतो—

“आता योग्य कृती काय?”

हा प्रश्न विचारला की माणूस बळी राहत नाही; तो कर्ता बनतो. आणि इथेच प्रार्थना “मागणी”पासून “जागरूकतेकडे” वळते.


*येईल तैसा बोल हरी”—*

*सातत्याचे तत्त्व*


अनेकांना वाटतं प्रार्थनेला परिपूर्ण वातावरण लागते— शांत जागा, स्थिर मन, मोकळा वेळ. पण सद्गुरूंचा संदेश वेगळा आहे— परिपूर्ण क्षणाची वाट पाहू नका; जोड तुटू देऊ नका.


*”येईल तैसा बोल हरी”-*बसून, उभं राहून, चालता, काम करता…*

यामागचं तत्त्व सोपं आहे: प्रार्थना ही विधी नाही; प्रार्थना म्हणजे अंतर्मनाशी सततचा संपर्क.


औषध कसही आणि कशातूनही घेतलं यापेक्षा औषध शरीरात गेलं का हे महत्त्वाचं. तसंच प्रार्थनेत— पद्धत महत्त्वाची नाही; सातत्य महत्त्वाचं. *सातत्याने झालेला स्पर्श नेणीवेत नवीन संस्कार तयार करतो.*


*लक्ष नसताना प्रार्थना— काही “पोहोचतं” का?*


हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. उत्तर सूक्ष्म आहे.


लक्ष नसलेली प्रार्थना लगेच खोल परिवर्तन घडवत नाही— पण ती बीज पेरते.

जसं रेडिओ चालू असला तरी आपण ऐकत नसलो तर अनुभव होत नाही, पण आवाज वातावरणात असतो. तसंच शब्द मनाच्या दारात येतात. ठसा खोल बसण्यासाठी लक्ष आणि भावना आवश्यक असते, पण बीजासाठी सातत्य पुरेसं ठरू शकतं.


म्हणून साधना एकदम “उंच” होत नाही. ती पिकते—

आधी शब्द, मग अर्थ, मग भावना, आणि शेवटी शांत उपस्थिती.


*प्रार्थनेने नेमके काय साध्य होते?*


सुरुवातीला प्रार्थना परिस्थिती बदलण्यासाठी होते.

पुढे ती आपल्याला बदलण्यासाठी होते.

आणि शेवटी ती बदलण्याचीही भाषा सोडते— फक्त आधार देते.


प्रार्थनेने नेमकं काय साध्य होतं?

• वास्तवाशी भांडण कमी

होतं

• मनातली विस्कळीतता

कमी होऊन दिशा

मिळते

• आत आधार तयार होतो

• प्रतिक्रिया कमी होऊन

विवेक वाढतो

• आणि हळूहळू

अंतःशांतीची चव लागते


म्हणून प्रार्थनेचा अंतिम उद्देश “मला हे मिळो” इतकाच नसून,

“मी आतून स्थिर व्हावे” हा आहे.


🌸 *निष्कर्ष*


प्रार्थना म्हणजे देवाकडून काही मिळवण्याचा व्यवहार नाही;

प्रार्थना म्हणजे वस्तुस्थितीपासून सुरू होऊन अंतःशांतीपर्यंत नेणारा आतला प्रवास आहे.


आता प्रश्न इतकाच उरतो— प्रार्थना केल्यावर अंतर्मनात प्रत्यक्ष बदल कसा होतो?

नेणीवेत साठलेल्या जुन्या नोंदी कशा बदलतात, आणि त्या बदलाची चिन्हं काय असतात?

पुढच्या भागात आपण *अंतर्मन परिवर्तन* या प्रक्रियेला अगदी व्यावहारिक पातळीवर समजून घेऊ.


प्रार्थना : एक चिंतन

*जयंत जोशी*

 
 
 

Recent Posts

See All
मार्कशीट - टक्के-टोणपे की जीवनाचं शिक्षण?

सध्या निकालांचा सीझन सुरू आहे. दहावीचा निकाल… बारावीचा निकाल… घराघरांत उत्सुकता, आनंद, फोन, मेसेजेस, अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. *सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!* *त्यांच्या मेहनतीला,*

 
 
 
माता ते माऊली… जन्म नव्हे, सर्वसमावेशकतेचा प्रवास

*मातृदिनाच्या सर्व मातांना मनःपूर्वक शुभेच्छा…! 🌸* जन्म देणाऱ्या मातांना… संस्कार देणाऱ्या मातांना… स्वतः झिजून दुसऱ्यांना फुलवणाऱ्या मातांना… आणि “सर्व माझेच आहेत” या भावनेने जगणाऱ्या प्रत्येक माऊली

 
 
 
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन:* *मातीचा अभिमान, श्रमांचा सन्मान*

* १ मे हा दिवस महाराष्ट्रासाठी केवळ दिनदर्शिकेवरील एक दिवस नाही. हा दिवस आहे — अस्मितेचा, कृतज्ञतेचा आणि जबाबदारीचा. एका बाजूला १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून उभा राहिलेला महाराष्ट्र; आणि दुसऱ्या बाजू

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page