top of page

मना सज्जना भक्तिपंथेची जावे…* मानसिक आरोग्यासाठी अंतर्मुखतेचा, कृतज्ञतेचा आणि प्रार्थनेचा शाश्वत मार्ग 🌸



ree

आज *जागतिक मानसिक आरोग्य दिन*.

आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

आपलं मन जर शांत, सुदृढ आणि समाधानी असेल, तरच आपलं आयुष्यही सुस्वरूप आणि सुंदर होतं.

म्हणूनच आजच्या दिवशी आपण ही सामूहिक प्रार्थना करूया —


*आपल्या सर्वांचे मानसिक आरोग्य*

*शेवटच्या श्वासापर्यंत सशक्त, स्थिर आणि समंजस राहो…*

हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना.


या दिवशी जागरण तर हवंच, पण त्याहीपेक्षा जाणीव होणं अधिक आवश्यक आहे.


*मानसिक आरोग्य म्हणजे काय?*

आरोग्य म्हटलं की आपल्याला प्रथम आठवतं ते शरीर — ताप, सर्दी, डोकेदुखी, मधुमेह, रक्तदाब…

पण मनाचं काय?


भावनांमधील अडथळे, विचारांचं ओझं, तणाव आणि असमाधान — हे सगळं मानसिक अस्वास्थ्याचं द्योतक आहे.

WHO च्या व्याख्येनुसार, *आरोग्य म्हणजे केवळ रोग नसणं नव्हे, तर शरीर, मन आणि समाज या तीनही स्तरांवर सुसंवाद आणि संतुलन असणं.*

त्यामुळे मानसिक आरोग्य म्हणजे भावनांचं स्थैर्य, तणाव हाताळण्याची ताकद, आत्मविश्वास आणि नात्यांमधील समजुतदारपणा.


मानसिक आरोग्य नीट असेल, तर माणूस स्वतःशी आणि जगाशीही प्रामाणिक संवाद साधू शकतो.


*शरीर आणि मन एकमेकांचे आरसे*

शरीर आणि मन यांचं नातं खोल आहे. मन अस्वस्थ असेल, तर शरीर आजारी पडतं. शरीर दुखत असेल, तर मनावर त्याचा खोल परिणाम होतो.

आज अनेक शारीरिक आजार हे मानसिक कारणांमुळे होतात — यालाच Psychosomatic Disorders म्हणतात. मन जर तणावात असेल तर झोप येत नाही, पचन बिघडतं, चिडचिड वाढते आणि प्रतिकारशक्ती कमी होते.


याच संदर्भात एक महत्त्वाचं निरीक्षण विज्ञानाने मांडलं आहे —

*सुमारे ८०% शारीरिक व्याधी या मानसिक असंतुलनातूनच जन्म घेतात.*

आपण फक्त शरीराला औषधं देतो, पण मनातलं विष साफ करत नाही — म्हणूनच आजार वारंवार परत येतात.


मन आणि शरीर एकमेकांचे आरसे आहेत. मन संतुलित नसेल, तर शरीर कितीही व्यायामशाळेत घडवलं तरी ते टिकणार नाही.


*आज मन अस्थिर का आहे?* कारण आजचं जग अतिशय वेगवान, स्पर्धात्मक आणि “स्वतःपुरतं” झालं आहे.

प्रत्येकजण दुसऱ्याला मागे टाकण्यासाठी धडपडतो आहे. या स्पर्धेमुळे दुसऱ्याच्या भावनांकडे बघण्याची शक्ती कमी झाली आहे.

दुसऱ्याचा विचार करण्याची मानसिक जागा उरलेलीच नाही.


या *मी-माझं-मला* च्या भोवऱ्यात विचार संकुचित होतात. मीपणा वाढतो.

स्वार्थ, तक्रारी, तुलनांमधून न्यूनगंड, आणि शेवटी — मानसिक थकवा, चिडचिड आणि नैराश्य यांचा उद्रेक होतो.

या असंतुलनाचं प्रतिबिंब आता समाजात ठळकपणे दिसू लागलं आहे.


*वाढतं मानसिक आरोग्याचं संकट*

WHO नुसार दर आठपैकी एक व्यक्ती मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहे.

भारतासारख्या देशात सुमारे १५ कोटी नागरिक anxiety, depression, burnout, एकाकीपणा यांना सामोरे जात आहेत.

कोविडनंतर ही समस्या अधिक गडद झाली आहे.

विशेषतः तरुण पिढीत आत्महत्या हे मोठं संकट बनून समोर आलं आहे.

ही एक शांत महामारी आहे — ती आरडाओरड करत नाही, पण माणसाला आतून पोखरत राहते.


*आरोग्याची आधुनिक व्याख्या*

आज आरोग्य म्हणजे केवळ रोगमुक्तता ही व्याख्या अपुरी ठरते.

खरं आरोग्य तेव्हा आहे, जेव्हा *माणसात काम करण्याची स्फूर्ती आणि दुसऱ्यांविषयी करुणा असते.*

हे दोन घटक — उत्साह आणि सहवेदना — ही मानसिक स्वास्थ्याची खरी खूण आहेत.


जेव्हा मन संतुलित असतं, तेव्हा आपण केवळ स्वतःपुरते जगत नाही, तर इतरांचं दुःख समजून घेतो.

तेव्हा जगणं केवळ अस्तित्व नसतं, तर कृतीतून प्रार्थना बनतं.


*मानसिक स्वास्थ्यासाठी कृतीशील दिशा*

प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी प्रामाणिक संवाद सुरू करावा.

माझं मन आज कसं आहे, हे स्वतःला विचारण्याची सवय लागली पाहिजे.


शरीरासाठी चालणं, योग, प्राणायाम जितकं आवश्यक आहे, तितकंच भावना व्यक्त करणं, संवाद साधणं, तक्रारी बाजूला ठेवून स्वीकार वाढवणं हेही महत्त्वाचं आहे.


मन अस्वस्थ असेल, तर तज्ज्ञांच्या मदतीस घाबरू नये.

समुपदेशन हा कमकुवतपणाचं नाही, तर आत्मप्रेमाचं लक्षण आहे.


तसंच — दिवसाची सुरुवात आणि शेवट शांततेने, ध्यानाने आणि कृतज्ञतेने करणे — हे मानसिक आरोग्याचं रोजचं टॉनिक आहे.


*कृतज्ञतेचा मार्ग आणि सद्गुरूंचं मार्गदर्शन*

सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात —

*मन शांत हवं असेल, तर कृतज्ञतेची साधना करा.*

कृतज्ञता म्हणजे जे आहे, त्यासाठी धन्यवाद; जे नाही, त्यासाठी समज.

ही वृत्तीच आपल्याला संतुलित करते, स्वीकार शिकवते, आणि इतरांविषयी सहवेदना जागवते.


कृतज्ञतेतूनच शुभचिंतन जन्म घेतं — आणि शुभचिंतनाचं सर्वश्रेष्ठ माध्यम म्हणजे विश्वप्रार्थना.


*विश्वप्रार्थना — मन:स्वास्थ्याचं अमोघ साधन*

*देवा, सर्वांचं भलं कर.*

*देवा सर्वांच कल्याण कर*

*देवा सर्वांचं रक्षण कर.*

*देवा सर्वांची भरभराट होऊ दे…*


विश्व प्रार्थना, भलं कर आणि कृतज्ञता साधना या केवळ शाब्दिक प्रार्थना नाहीत, तर त्या आहेत प्रखर आणि प्रचंड मानसिक ऊर्जा निर्माण करणारे स्रोत.

त्या प्रार्थना, साधना प्रथम मनाला *मी* पासून *आपण* कडे घेऊन जातात आणि हळूहळू सर्वान कार्याचा प्रवास सुरू होतो.

जिथे स्वतःच्या सीमित स्वार्थाचा-अंत होतो, आणि तिथूनच समष्टीच्या कल्याणाची सुरुवात होते.

प्रार्थना आणि साधना म्हणजे — अंतर्मनात शांततेचं, सर्वांच्या भल्याचं बीज रोवणं.


*समर्थ विचार,समर्थ मन*

आजचं जग अस्वस्थ आहे, कारण मन अस्वस्थ आहे.

त्याला सावरण्यासाठी भक्तिपंथ हाच खरा उपाय आहे — कारण तो अहंकार हरवतो, आणि समर्पण जागवतो.


समर्थ रामदास स्वामी म्हणतात:

*मना सज्जना भक्तिपंथेची जावे…*

*तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे.*


भक्तिपंथ म्हणजे केवळ देवभक्ती नव्हे — तर मनाची शुद्धता, विचारांचा निग्रह, आणि कृतज्ञतेचं जगणं.


जग बदलणं कदाचित कठीण आहे.

पण जर आपल्या मनातला विचारांचा सूर बदलला, आपला दृष्टिकोन बदलला तर तोच बदल आपल्या जगण्याचं संगीत निर्माण करेल.


आजच्या मानसिक आरोग्य दिनी,

प्रत्येकाने आपल्या मनाला एक क्षण द्यावा — संवादाचा, समजूतदारपणाचा, आणि प्रार्थनेचा.


आपलं मन सुदृढ, स्थिर आणि सहवेदना जागवणारं होवो… हीच आजच्या जागतिक मानसिक आरोग्यदिनी सखोल शुभेच्छा.

शुभेच्छुक:*जयंत जोशी*

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page