*राग : अदृश्य आग* *संरक्षक की भक्षक?*
- ME Holistic Centre
- Mar 8
- 4 min read

कधी कधी एखादी ऐतिहासिक घटना फक्त इतिहासात राहत नाही - ती आपल्या मनाचा आरसा बनते.
१८४५ साली आर्क्टिक महासागरात निघालेली एक मोहीम जगातील सर्वात गूढ समुद्री रहस्यांपैकी एक ठरली.
त्या खलाशांना हरवून बसलं ते बाहेरचं संकट नव्हतं—
ना थंडी, ना भूक.
त्यांना हरवून बसलं ते आत झिरपणारं अदृश्य विष.
आणि माणसाच्या आयुष्यातही अनेकदा संकट असंच असतं—
ते बाहेर नसतं… ते मनात पेटलेल्या अदृश्य आगीत असतं.
ब्रिटिश नौदलाची ती मोहीम होती—
Northwest Passage शोधण्याची.
दोन जहाजे होती—HMS Erebus आणि HMS Terror.
त्या काळासाठी ही जहाजे तंत्रज्ञानाची कमाल होती.
लाकडी संरचनेवर लोखंडी प्लेट्स—बर्फ फोडण्यासाठी.
वारा थांबला तरी पुढे जायचं म्हणून स्टीम इंजिन.
आणि आर्क्टिकच्या कडाक्याच्या थंडीतही उब टिकवण्यासाठी हीटिंगची व्यवस्था.
नेतृत्व करत होते Sir John Franklin.
सोबत होते १२८ प्रशिक्षित आणि अनुभवी खलाशी—धाडसी, कुशल, तयार.
पण या मोहिमेचा सर्वात मोठा “आत्मविश्वास” कोणता होता, माहीत आहे?
*अन्न.*
जहाजांच्या तळात ठेवलेले होते ८,००० पेक्षा अधिक canned food चे डबे.
सूप, भाज्या, मांस… सर्व काही डब्यात बंद.
समुद्रप्रवासात उपासमार, स्कर्व्ही—या सगळ्या जुन्या भीतींपासून आता सुटका झाल्यासारखी वाटत होती.
जणू त्या डब्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं-
“मी आहे. घाबरू नका.”
मग अचानक…
ती संपूर्ण मोहीम गायब झाली.
एक वर्ष गेले. दोन वर्षे गेली. मग दशक गेलं.
जहाजांचा आणि त्या १२८ माणसांचा काहीच पत्ता लागला नाही.
शोधमोहीमा निघाल्या.
आर्क्टिकचा बर्फ-थंड, शांत, निर्दय-काहीच सांगत नव्हता.
नंतर आर्क्टिकमधील स्थानिक इन्युइट (Inuit) शिकाऱ्यांकडून काही अंगावर काटा आणणाऱ्या कथा ऐकायला मिळाल्या.
ते म्हणाले-बर्फाच्या अथांग पसाऱ्यात त्यांनी काही गोरे पुरुष भटकताना पाहिले; ते अशक्त होते, गोंधळलेले होते, आणि कधी कधी विचित्ररीत्या आक्रमकही.
या कथांमध्ये फक्त थंडीचा उल्लेख नव्हता-एक वेगळाच धागा होता.
अशक्तपणा शरीराचा दिसत होता, पण गोंधळ… तो मनाचा वाटत होता.
जणू या लोकांचे बळ कमी झालेले नव्हते—त्यांची स्पष्टता हरवली होती.
पुढे काही कबरी सापडल्या.
काही सोडून दिलेले सामान सापडले.
एक नोट सापडली—जहाजे बर्फात अडकली, आणि खलाशांनी ती सोडून पायी निघण्याचा निर्णय घेतला.
पण एक प्रश्न सतत उभा राहात होता—
इतके अनुभवी खलाशी…
इतक्या तयारीनिशी…
इतक्या अन्नसाठ्यासह…
मग ते एवढे चुकीचे निर्णय कसे घेत होते?
थोडा काळ असं वाटत राहिलं की कदाचित थंडीने त्यांना हरवले असेल…
किंवा भुकेने…
पण सत्य याहूनही विचित्र होते.
शंभर वर्षांनंतर आधुनिक शास्त्रज्ञांनी काही मृतदेहांची तपासणी केली.
आणि तेव्हा उघड झालं-
त्या canned food च्या डब्यांच्या सीलमध्ये lead solder (शिसं) वापरले होते.
काळाच्या ओघात ते शिसं अन्नात मिसळत गेलं.
दररोजच्या जेवणातून थोडं थोडं शिसं त्यांच्या शरीरात जात राहिलं.
Lead poisoning लगेच मारत नाही.
ते हळूहळू मनावर परिणाम करतं.
विचारशक्ती मंदावते.
निर्णयक्षमता धुसर होते.
संशय वाढतो.
चिडचिड आणि आक्रमकता वाढते.
ज्याच्यावर त्यांनी जगण्यासाठी सर्वाधिक विश्वास ठेवला—
त्याच गोष्टीने त्यांना आतून हरवले.
कॅन मजबूत दिसत होते, पण त्यांच्या सीलमधून विष झिरपत होतं.
आणि इथे एक महत्त्वाचा वैज्ञानिक धागा आहे:
मानसशास्त्र / मेंदू-विज्ञान सांगते की तीव्र रागाच्या क्षणीही काहीसं असंच घडतं,
भावनांचे केंद्र अचानक सक्रिय होते आणि मेंदूचा विवेकी भाग काही काळ मागे पडतो.
म्हणूनच त्या क्षणी माणूस जणू धुक्यात चालल्यासारखा निर्णय घेतो.
आणि कदाचित म्हणूनच ही कथा फक्त हरवलेल्या जहाजांची नाही.
ती थोड्याफार अर्थाने आपल्या रागाची कथा आहे.
जेव्हा आपल्याला अपमान वाटतो,
धोका वाटतो,
किंवा दुर्लक्षित झाल्यासारखं वाटतं—
तेव्हा राग उफाळून येतो.
त्या क्षणी तो आपल्याला शक्ती देतो.
आपल्याला वाटतं-
“मी स्वतःचं संरक्षण करतोय.”
जणू राग ही एक ढाल आहे.
पण कधी आपण विचार केला आहे का—
कदाचित त्या ढालीच्या सीलमधूनही
थोडं थोडं विष झिरपत असेल?
कारण रागाचं विष शरीरात आधी जाणवत नाही-
ते आधी नात्यांमध्ये झिरपतं.
रागाच्या क्षणी आपण कदाचित वाद जिंकतो.
पण त्याची किंमत काय असते?
नंतर मनात येणारी अपराधी भावना—ती मौनातली विषबाधा.
जवळच्या माणसांच्या डोळ्यात दिसणारी भीती—ती घरात पसरलेली आर्क्टिकची थंडी.
घरातली शांत पण जड हवा—जणू संवादाचं जहाज बर्फात अडकलेलं.
राग त्या क्षणी इतका “योग्य” का वाटतो?
कारण तो खरोखरच आपलं संरक्षण करायचा प्रयत्न करत असतो…
पण चुकीच्या पद्धतीने.
राग म्हणजे जणू एक असा अंगरक्षक—
जो आपल्याला वाचवू पाहतो,
पण कधी कधी आपल्या घरालाच आग लावतो.
म्हणून राग हा खलनायक नाही—
तो आतल्या भीतीचा आवाज आहे.
तो आपल्याला वाचवू पाहतो; पण तोच आपल्याला चुकीच्या दिशेने ढकलतो.
म्हणून खरी किमया रागाशी युद्ध करण्यात नाही;
ती आहे रागाच्या मागची मागणी समजण्यात.
राग आला की आपण स्वतःला विचारू शकतो—
मी नेमका कशामुळे पेटलो?
अपमान? असुरक्षितता? दुर्लक्षितपणा?
की “माझं म्हणणं कोणी ऐकत नाही” ही वेदना?
हा प्रश्न विचारला की राग लगेच संपत नाही—
पण त्याचं विष थांबायला लागतं.
आणि त्याचं रूपांतर सुरू होतं.
रागावर विजय मिळवायचा प्रयत्न करू नका—
रागाच्या मागच्या वेदनेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा.
विजयाचा मोह कमी झाला, की समजुतीची शक्यता वाढते.
इथेच सद्गुरू श्री वामनराव पै यांचा एक अत्यंत नेमका विचार आठवतो.
ते म्हणतात—
*काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षड्रिपू म्हणजे शत्रू नाहीत;*
*त्या मानवी प्रेरणा आहेत.*
*फक्त त्यांचे रूपांतर करण्याचे शहाणपण पाहिजे.*
म्हणजे प्रेरणा दडपायच्या नाहीत.
पण त्यांना तसेच कच्च सोडायचंही नाही.
त्यांचं रूपांतर—हाच खरा जीवनकलेचा अभ्यास.
म्हणून रागाची भीती “रागामुळे” नसते—
भीती असते ती अदृश्य धगीची,
जी योग्य वेळी ओळखली नाही तर
हळूहळू आग बनते
…आणि नात्यांतून धूर सोडायला लागते.
आणि इथेच आपल्या परंपरेतलं एक विलक्षण रूपक आठवतं—
समुद्रमंथनातून जेव्हा भयंकर हलाहल-विष प्रकट झालं,
तेव्हा संपूर्ण सृष्टी संकटात आली.
तेव्हा भगवान शंकरांनी ते विष कंठात धारण केलं.
ते विष त्यांनी गिळलं नाही, कारण ते विनाशकारी होतं.
आणि ते बाहेरही टाकलं नाही, कारण त्याने सृष्टी जळाली असती.
त्यांनी ते धारण केलं—जागरूकतेने.
म्हणून ते नीलकंठ झाले.
रागाचंही कदाचित असंच असतं.
तो गिळायचा नसतो, कारण मग तो आत साचून विष बनतो.
आणि तो उडवायचाही नसतो, कारण मग तो नात्यांना जाळतो.
तो फक्त जाणिवेच्या कंठात धारण करायचा असतो—
म्हणजे दाबून नाही… उडवूनही नाही…
फक्त थांबून, पाहून, समजून.
राग आला की त्या क्षणी एक छोटी सवय करा—
बोलण्याआधी १० सेकंद थांबा.
आणि स्वतःला एवढंच विचारा: *मी आत्ता सुरक्षित होण्यासाठी बोलतोय, की समजून घेण्यासाठी?*
आणि मग त्या रागाच्या आत लपलेली खरी मागणी स्पष्ट होते—
“मला ऐका.”
“मला मान द्या.”
“मला सुरक्षित वाटू द्या.”
“मला पुन्हा दुखवू नका.”
जीवनकलेची परीक्षा त्या एका क्षणी होते—
जेव्हा राग उफाळतो आणि आपण पुन्हा “जुन्या सवयीचा कॅन” उघडणार असतो.
त्या क्षणी काही मोठं करायची गरज नसते.
फक्त थोडा अवकाश तयार करायचा असतो—
एक श्वास… दोन श्वास… आणि एक प्रश्न:
“माझ्यातली ही धग नेमकी कशासाठी पेटली आहे?”
हा प्रश्न विचारला की संवादाचा चेहरा बदलतो.
शब्द कमी जळजळीत होतात.
आवाजातली धार कमी होते.
आणि “समोरच्याला हरवायचं” नाही—“समजायचं” आहे, हे आठवतं.
कारण शेवटी प्रश्न हा नसतो की राग आला का नाही.
प्रश्न हा असतो—
राग आला की आपण कोण होतो?
अंगरक्षकाच्या ताब्यात गेलेला माणूस?
की जागेपणात उभा राहिलेला नीलकंठ?
आध्यात्म म्हणजे राग येऊ न देणं नाही—
राग आला तरी आपण त्याच्या ताब्यात न जाणं हेच खरं जागेपण.
आणि त्या जागेपणात एक शांत जाणीव उमटते—
मी राग नाही.
मी त्या रागाला पाहणारी जाणीव आहे.
शिवोऽहं… शिवोऽहं.
*राग जिंकला की वाद जिंकतो;*
*राग समजला की जीवन जिंकते*
*जयंत जोशी*


Comments