राम भजन्यासाठी नाही, राम ‘होण्यासाठी’*– *प्रक्रिया अध्यात्माची*
- ME Holistic Centre
- Jul 29
- 3 min read

*राम* ही काही केवळ एक श्रद्धेची मूर्ती नाही.
*राम म्हणजे पुरुषोत्तम.* एक उन्नत मानवी अवस्थेचं प्रतीक —
*राम*
जिथे संयम आहे, विवेक आहे, करुणा आहे, आणि समत्वही आहे.
आपणही पुरुषोत्तम म्हणजे उत्तम पुरुष होऊ शकतो का ?
हो निश्चितच होऊ शकतो जर रामाच्या अंगी असलेले गुण आपण आपल्यात उमलवले, रूजवले आणि अवलंबिले तर आपणही उत्तम पुरुष म्हणजे उत्तम व्यक्ती होऊ शकतो.
पण राम होण्यासाठीच्या या सगळ्या गुणांचा जन्म सहज होतो का?
की त्यासाठी एक निश्चित प्रक्रिया आवश्यक असते?
आज जगभर विज्ञानाने भरारी घेतली आहे.
ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती — सगळं काही भरपूर आहे.
मात्र त्याच वेळी मानवी संबंधांमध्ये कोरडेपणा, मानसिक अस्थिरता, आणि आतून उधळलेपणाही वाढत चालला आहे.
हे का घडतंय?
याचं उत्तर विज्ञानातही आहे, आणि अध्यात्मातही.
आपल्या मेंदूच्या रचनेचा विचार केला तर लक्षात येतं की,
माणसाचं बाह्य रूप जरी आधुनिक असलं, तरी त्याचं अंतःप्रवृत्तीचं केंद्र मात्र लाखो वर्षांपूर्वीपासूनचं आहे.
मेंदूचा जुना भाग — जो आपल्याला भीती, आक्रमकता, मालकी भावना यासाठी प्रेरित करतो —
तो आजही आपोआप कार्यरत असतो.
हेच ते जुने “प्रतिक्रिया-स्वरूप” असलेलं मेंदूचं हार्डवेअर.
मग माणसामध्ये दया, क्षमा, संयम, विवेक, करुणा या भावना कुठून येतात?
याचं उत्तर आहे — मेंदूचा तो नवीनतम भाग, ज्याला ‘Neocortex’ म्हणतात.
हा भाग तुलनात्मकदृष्ट्या अलीकडेच विकसित झाला आहे.
त्यामुळे त्यातील भावना — क्षमाशीलता, नम्रता, दया,
करूणा, सहानुभूती, कृतज्ञता, ज्या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात —
त्या सहज उगम पावत नाहीत.
त्या विकसित कराव्या लागतात.
त्यासाठी रोजच्या रोज सराव करावा लागतो. रोजच्या सरावातून, अनुभवातून सजगतेतून, आणि अंतर्मुखतेतून या भावना घडवाव्या लागतात.
या नात्याने पाहिलं तर, "राम" होणं म्हणजे
या सुसंस्कारित भागाचा-भावनांचा जाणीवपूर्वक उपयोग करणं.
त्या स्वतःमध्ये उतरवणं.आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या
आचरणात आणणं.
हे जे सहज घडत नाही, तेच 'राम भजनं' म्हणजे केवळ मुखाने राम नाम जपणे पुरेसं नसल्याचं सूचित करतं.
"राम भजणं" म्हणजे श्रद्धेने, प्रेमाने त्याचं नाम
“राम नाम “ घेणं —
ते नक्कीच आवश्यक आहे.
पण केवळ नाव घेऊनच जर आपल्या वृत्ती बदलत नसतील,
आपल्या प्रतिक्रिया संयमित होत नसतील
तर त्या “राम नाम” जपाची, भजनाची मर्यादा अधोरेखित होते.
कारण, खऱ्या अर्थाने "राम होणं" म्हणजे —
स्वतःमध्ये ‘रामत्व’ म्हणजे रामाचे गुण जागवणं.
आपल्या कृतींमध्ये, भावनांमध्ये, बोलण्यात आणि प्रतिक्रियांमध्ये
त्या समत्वाचा आणि करुणेचा झरा वाहता ठेवणं.
आणि हे शक्य होतं — केवळ आणि केवळ आध्यात्मिक प्रक्रियेच्या मदतीने.
ध्यान, नामस्मरण, विश्वप्रार्थना,साधना-भल कर साधना, आत्मपरीक्षण, सेवा, विवेक, आणि वैराग्य —
या गोष्टी केवळ धार्मिक विधी नाहीत.
या म्हणजे आपल्या मेंदूच्या त्या नव्याने विकसित झालेल्या भागाचं प्रशिक्षण आहे.
जिथे भावना केवळ स्वार्थ आणि प्रतिक्रियांपुरत्या मर्यादित राहत नाहीत,
तर त्या सर्वांतील एकत्वाची जाणीव निर्माण करतात.
सर्वांमधील एकत्वाचे दर्शन घडवितात.
हे ईश्वरा,
सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर. ही भावना अंतर्मनातून प्रकट होते.
यालाच म्हणतात *पुरुषोत्तम* होण्याची प्रक्रिया.
आज विज्ञान मान्य करतं की आपल्या मेंदूची क्षमता अपार आहे,
पण ती केवळ सजगतेनेच वापरता येते.
जे वर्तन लाखो वर्षांचं जुने आहे, ते आपोआप चालतं.
पण जे वर्तन आपल्याला "राम" बनवेल, ते साधनेतूनच उगम पावेल.
म्हणूनच…
*राम भजन्यासाठी नाही, राम 'होण्यासाठी' – प्रक्रिया आध्यात्माची!*
ही केवळ एक काव्यात्मक घोषणा नाही,
तर एकाअंतर्मुख जागृतीचं सूत्र आहे.
आजच्या माणसाला केवळ श्रद्धेची नव्हे,
तर जागरूकतेची, विवेकाची आणि कृतीशीलतेची अध्यात्मशिक्षा हवी आहे —
अशी अध्यात्मशिक्षा जी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मार्गदर्शक ठरेल,
जी विचारसरणी बदलून जीवनसरणी घडवेल,
आणि जी आधुनिक वैज्ञानिक जाणिवेशी सुसंगत राहील.
अशी शाश्वत आणि सर्वंकष जीवनदृष्टी देणारं एक तत्वज्ञान आज आपल्यासमोर आहे —
जीवनविद्या – सद्गुरू वामनराव पै यांनी दिलेलं, जीवन जगण्याचं विज्ञान.
"राम" भजनं हे सुरूवात आहे,
पण "राम" होणं हीच अंतिम साधना आहे —
आणि त्या दिशेने जाणारा मार्ग आज आपल्यासमोर आहे.
आता हा मार्ग अवलंबून उत्तम माणूस व्हायच की नाही हे तुमच्या तुम्हालाच ठरवायचं आहे. कारण सद्गुरू म्हणतात,
*तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार*
एक चिंतन: जयंत जोशी.










Comments