सनसनीचा मोह… आणि मनाचे शिक्षण
- ME Holistic Centre
- 7 days ago
- 4 min read

सुजाण नागरिकत्वाची आजची खरी परीक्षा
आजकाल एक नवीन सवय लागली आहे.
मोबाईलवर काहीतरी धक्कादायक दिसले की
बोट लगेच Forward वर जाते.
क्षणभर थांबून विचार करण्याची सवय मात्र
जणू delete झाली आहे.
⸻
आज मोबाईल उघडला की काही ना काही भडक, धक्कादायक, उत्तेजक मजकूर समोर येतो.
एखादा व्हिडिओ, एखादी पोस्ट, एखादा दावा— आणि काही क्षणांतच तो शेकडो लोकांपर्यंत पोहोचतो.
कधी कधी काही लोकांचा मोबाईल पाहिला की वाटते—
त्यांच्या हातात फोन नाही, तर जणू खरे-खोटे शहानिशा न करता माहिती पुढे पाठवण्याचेच एक केंद्र आहे.
पण प्रश्न एवढाच नाही की लोक काय पाठवतात.
खरा प्रश्न हा आहे— आपण स्वतः काय करतो?
एखादी पोस्ट पाहिल्यावर आपल्या मनात नेमके काय घडते?
ती गोष्ट खरी आहे की नाही, याचा विचार आधी होतो का?
की ती धक्कादायक आहे म्हणून आपण तिला पुढे ढकलतो?
हा प्रश्न केवळ सोशल मीडियाचा नाही.
तो माणसाच्या मनाचा आहे.
समजावून सांगितलेल्या, संतुलित आणि तपासलेल्या गोष्टींपेक्षा भडक, धक्कादायक, उत्तेजक गोष्टी मनाला फार लवकर भिडतात.
“मोठा खुलासा…”
“देश हादरला…”
“हे पाहिल्यावर तुम्ही थक्क व्हाल…”
अशा शब्दांनी मनात लगेच हालचाल सुरू होते. जिज्ञासा, राग, भीती, आश्चर्य— काही ना काही जागे होते.
सत्य अनेकदा शांत असते.
सनसनी मात्र ओरडत येते.
उथळ पाण्याला खळखळाट फार असतो;
खोलपणाला गोंगाटाची गरज नसते.
विवेक शांतपणे दरवाजा ठोठावतो.
उत्तेजना मात्र खिडकी फोडून आत घुसते.
म्हणून प्रश्न बाहेरच्या पोस्टचा नाही—
तो आतल्या मनाचा आहे.
आपण एखादी गोष्ट पुढे का पाठवतो?
कारण ती सत्य आहे म्हणून?
की कारण ती धक्कादायक आहे म्हणून?
कधी कधी आपल्या आत एक अदृश्य ओढ असते—
हे लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे!
पण का पोहोचले पाहिजे?
त्याचा उपयोग काय?
त्याने समज वाढेल की गैरसमज?
याच संदर्भात एका तत्त्ववेत्याने सांगितलेली Three Filter Test आठवते.
मी जे पुढे पाठवत आहे ते
सत्य आहे का?
ते चांगले काही निर्माण करेल का?
आणि त्याचा काही उपयोग आहे का?
या तीनपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर ठामपणे “हो” नसेल,
तर कदाचित ती गोष्ट पुढे न पाठवणेच अधिक शहाणपणाचे ठरेल.
कारण—
सत्य नसलेली माहिती गोंधळ वाढवते,
चांगुलपणा नसलेले शब्द कटुता वाढवतात,
आणि उपयोग नसलेली चर्चा विचारांचे प्रदूषण वाढवते.
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात—
*विचारांचे प्रदूषण हे सर्वांत जास्त घातक आहे.*
हवा प्रदूषित झाली तर श्वास घुसमटतो.
पाणी प्रदूषित झाले तर शरीर आजारी पडते.
पण विचार प्रदूषित झाले तर माणसाचा विवेकच कलुषित होतो.
सगळेच लोक वाईट हेतूने असे करत नाहीत.
पण काही प्रवृत्ती स्पष्ट दिसतात.
काहींना लक्ष वेधून घ्यायचे असते.
काहींना आपले मत खरे सिद्ध करायचे असते.
काहींना गटात सक्रिय दिसायचे असते.
काहींना फक्त “माझ्याकडेही काहीतरी भन्नाट आहे” हा भाव जपायचा असतो.
आणि काही जण सहज म्हणतात—
“मी काही बनवले नाही… फक्त forward केले!”
पण तसे नसते.
ज्योत दुसऱ्याने पेटवली असली,
तरी ती पुढे नेणारा हातही जबाबदारीपासून मुक्त नसतो.
हा प्रश्न नेहमीच मानसिक विकाराचा असतो असे नाही.
बहुतेक वेळा तो मानसिक अपरिपक्वतेचा आणि असावधपणाचा प्रश्न असतो.
क्षणिक भावनेत वाहवत जाणे,
परिणामांचा विचार न करणे,
तपासण्याची सवय नसणे—
ही त्याची लक्षणे अधिक आहेत.
म्हणून हा प्रश्न शेवटी येऊन मनाच्या शिक्षणावर थांबतो.
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात—
*माणसाच्या मनाचा व्रात्यपणा काही कमी होत नाही.*
या वाक्यात मिश्किलपणा आहे,
पण त्यात मानवी वर्तनाचे अचूक निरीक्षणही आहे.
पोस्ट दिसली.
मन भडकले.
बोट चालले.
Forward झाले.
आणि नंतर सहज उत्तर—
“मी तर फक्त शेअर केले…”
संत म्हणतात—
*माणूस कितीही शिकला तरी जोपर्यंत त्याचे मन शिक्षित होत नाही, तोपर्यंत तो अडाणीच समजावा.*
आज माहिती आहे.
शिक्षण आहे.
मोठमोठ्या पदव्या आहेत.
मोबाईल आहे.
इंटरनेट आहे.
पण प्रश्न अजूनही तसाच आहे,
*मन शिक्षित झाले आहे का?*
कारण मन शिक्षित नसेल तर अक्षरओळख उपयोगाची ठरत नाही.
माहिती विवेक बनत नाही.
तंत्रज्ञान जबाबदारी वाढवत नाही.
डोकं माहितीने भरलेलं असू शकतं;
पण मन जर विवेकाने उजळलं नसेल,
तर आतला अंधार तसाच राहतो.
आज डिजिटल जगात प्रत्येक कृतीचा ठसा राहतो.
कोणती पोस्ट कोणी केली, कोणी share केली, कसा प्रसार झाला— हे शोधणे शक्य झाले आहे.
कायदेही कडक झाले आहेत.
तरीही लोक धजावतात.
कारण मन जेव्हा उत्तेजित असते, तेव्हा परिणाम दूर जातात.
क्षणाचा ताप उतरतो;
पण परिणामांचा हिशोब शांतपणे उभा राहतो.
म्हणून सामान्य माणसाने काय करावे?
उत्तर स्पष्ट आहे—
अशा भानगडीत पडूच नये.
याचा अर्थ जगापासून दूर पळणे नाही.
याचा अर्थ इतकाच—
जे तपासता येत नाही ते पसरवू नका.
जे समजत नाही त्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका.
जे समाजात गोंधळ वाढवेल ते पुढे ढकलू नका.
एक छोटा Forward
एखाद्या समाजात अविश्वास निर्माण करू शकतो.
ठिणगी छोटी असते;
पण निष्काळजीपणा तिला वणवा बनवू शकतो.
सद्गुरू सांगतात—
*सावध तो सुखी.*
आज सावधपणा म्हणजे माहितीबाबत सजग राहणे.
जे दिसते तेच सत्य नसते.
जे viral आहे तेच विश्वसनीय नसते.
कधी कधी काहीही पुढे न पाठवणे हीसुद्धा मोठी जबाबदार कृती असते.
आदरणीय प्रल्हाद दादा म्हणतात—
*प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची झाली पाहिजे.*
मी share केलेली माहिती
समाजात समज वाढवते का?
की संशय?
सद्गुरू म्हणतात—
*व्यवस्थेला मान देणे हेच पुण्य.*
समाजातील विश्वास, शांतता, विवेक आणि जबाबदारी
हीसुद्धा एक व्यवस्था आहे.
म्हणून सत्य तपासून बोलणे,
गैरसमज पुढे न ढकलणे
हे पुण्यकर्म आहे.
उलट गोंधळ वाढवणे
हे व्यवस्थेच्या विरोधी आचरण आहे.
आणि व्यवस्थेच्या विरोधी काम करणे
हेच पाप होय.
आपण जन्माने माणूस आहोत.
पण प्रश्न असा आहे—
आपण खरोखर माणूसपणाकडे वाढतो आहोत का?
माणूस जन्माने तयार होत नाही;
तो विवेकाने घडत जातो.
आजचा प्रश्न फक्त fake news चा नाही.
तो माणसाच्या मनाचा प्रश्न आहे.
म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारूया—
मी जे पाठवत आहे ते सत्य आहे का?
ते समाजात समज वाढवते का?
कदाचित सुजाण नागरिकत्वाची सुरुवात
मोठ्या घोषणांनी होत नाही.
ती सुरू होते
एका सजग मनाने,
एका थांबलेल्या बोटाने,
आणि एका जबाबदार Forward ने.
आणि तेव्हाच
सद्गुरूंचे वचन खरे ठरते—
*सावध तो सुखी.*
तंत्रयुगातील शहाणपण-एक चिंतन
*जयंत जोशी*





Comments