top of page

साखर खाऊ नका* *साखर व्हा* *गोड रहा-ओढ आपोआप कमी होईल. Part 1




आज मकर संक्रांत. आपणा सर्वांना या मकर संक्रमण पर्वानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

संक्रांत म्हणजे ‘संक्रमण’-वळण. बाहेर सूर्याचं वळण; आणि *आत आपलं वळण, कडवटपणातून गोडव्याकडे, कंम्पल्शनमधून जागरूकतेकडे.*

म्हणून आज “तिळगूळ” हा फक्त पदार्थ नाही; तो आतली गोडी वाढवण्याचा संकेत आहे.


आपल्याकडे भेटणाऱ्याला आज आपण अतिशय सुंदररीतीने म्हणतो

*“तिळगूळ घ्या, गोड गोड बोला.”*

पण या लेखातला “गोडवा” हा फक्त जिभेचा नाही—तो मनाचा आहे. तिळगूळ हे निमित्त; खरा संदेश असा—*गोड बोला नाही, आधी गोड व्हा.*


आपल्या इथे एक जुनी म्हण आहे—

*साखरेचे खाणार त्याला देव देणार.*

पण इथे “साखर” म्हणजे मिठाई नव्हे; “साखर” म्हणजे मनाची सुखदता—pleasantness. आणि

“देव देणार” म्हणजे काही अलौकिक देणं नव्हे—तर जीवन अधिक हलकं, अधिक सहज, अधिक गोड होईल—इतकाच अर्थ.


कधी कधी एखादी “लोककथा” इतिहासाची खात्री देत नाही, पण जीवनाचा अर्थ मात्र उघड करून देते. पारशी लोक भारतात आले, तेव्हा गुजरातमध्ये त्यांना स्थायिक होण्यासाठी परवानगी मिळाली—यासंबंधी एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते. म्हणतात, स्थानिक राजाने दुधाने भरलेलं भांडं दाखवलं—जणू काही म्हणत होता, “इथे जागा नाही, राज्य भरलेलं आहे.” तेव्हा पारशी पुरोहिताने त्या दुधात साखर टाकली. दूध ओसंडलं नाही—पण दूध गोड झालं. संदेश असा—“आम्ही ओझं बनून ओसंडणार नाही; उलट समाजात गोडी वाढवून मिसळू.”


ही गोष्ट खाण्याची नाही—ही गोष्ट विरघळण्याची आहे. आणि आपलं मनदेखील अनेकदा “भरलेलं भांडं”च असतं—कामाचा ताण, अपेक्षा, तुलना, अपूर्णतेची जाणीव, धावपळ, घरची काळजी… अशा वेळी मनाला एक गोष्ट हवी असते—थोडी सुखदता. मग मन पटकन ज्या मार्गाने सुखदता मिळते त्या दिशेने धाव घेतं: “गोड”.


म्हणून गोड खाण्याची ओढ ही अनेकदा जिभेची नसते; ती असते मनाची. मन म्हणतं, “काहीतरी बरं वाटू दे.” आणि साखर/ मिठाई/ चॉकलेट हे “बरं वाटणं” पटकन देतात. कधी तीच ओढ दुसऱ्या रूपात येते—कौतुक, स्क्रीन, सतत स्क्रोलिंग, खरेदी… कारण मूळ गरज असते pleasantness.


इथेच आपण चुकतो. आपण म्हणतो, “आजपासून गोड बंद!” आणि मनाशी युद्ध सुरू करतो. युद्धात इच्छा दाबली जाते, पण आतली रुक्षता तशीच राहते. रुक्षता राहिली, की मन पुन्हा कुठून तरी “गोड” मागणारच—कधी अन्नातून, कधी सवयींतून.


म्हणून संदेश असा नाही की “गोड खा.” संदेश असा आहे—गोड खाण्याशी भांडू नका; आतली गोडी वाढवा.

आपण स्वतः आतून “साखर” झालो—म्हणजे अधिक सौम्य, अधिक स्वीकारक, अधिक प्रसन्न—तर बाहेरची ओढ आपोआप कमी होते. कारण मनाला जे हवं असतं ते मिळतं: सुखदता.


इथे एक गोष्ट स्पष्ट: “साखर खाऊ नका” म्हणजे रोजच्या रोज अति-गोड/रिफाइन्ड शुगरची ओढ—जी अनेकदा ताण भरून काढण्यासाठी येते. संक्रांतचा तिळगूळ मात्र उब, मैत्री, समेट यांचा संकेत आहे—म्हणूनच “गोड गोड बोला” असं आपण म्हणतो.


गोडी म्हणजे काय? केवळ गोड शब्द नाहीत.

गोडी म्हणजे अवस्थेची मृदुता.


तुमचा श्वास थोडा मऊ झाला…

तुमची नजर कमी ताठर झाली…

तुमचा आवाज कमी धारदार झाला…

तुमच्या मनात “काहीतरी सिद्ध करायचं” या धडपडीऐवजी “थोडं शांत राहायचं” ही क्षमता वाढली…

हे म्हणजे गोडी.


मानसशास्त्रात “गोडवा/pleasantness” याला positive emotions + compassion म्हणतात. अभ्यासांमध्ये दिसतं की सकारात्मक भावना आणि दयाळूपणा वाढला की शरीराची ताण-प्रतिक्रिया (stress response) काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि recovery सुधारू शकते. म्हणून “गोड रहा” हा केवळ उपदेश नाही—तो एक व्यावहारिक प्रशिक्षणाचा मार्ग आहे.


आणि इथेच नसीरुद्दीन मुलाची एक गोष्ट आपल्याला हसवून आरसा दाखवते. नसीरुद्दीन एक मित्राकडे जेवायला जातो, तेंव्हा तो बायकोला सतत म्हणतो—“My Sweet Heart” शुगर… हनी… हनीबन…” मित्र भारावतो: “वा! किती प्रेमळ!” आणि मुल्ला म्हणतो: “चार वर्षांपासून तिचं नावच विसरलोय, म्हणून हे शब्द!”

हसू येतं, पण एक प्रश्नही उभा राहतो—आपण गोड आहोत, की फक्त गोड शब्द पेरतो? कारण खरं गोडपण शब्दांत नसतं; ते उपस्थितीत असतं—तुमचं ऐकणं, तुमचा प्रतिसाद, तुमची ऊर्जा… इथेच खरी गोडी असते.


*आता करायचं काय—अगदी साधं.*

गोडाची ओढ आली की स्वतःला दोष देण्याऐवजी एक क्षण थांबा.

मनाला विचारा—“मला साखर हवीय, की मला सुखदता हवीय?”

हा प्रश्नच मनाला थोडं शहाणं करतो.


मग ६० सेकंद श्वास संथ करा—खोल नाही, संथ.

कधी कधी एवढ्यानंच ओढ विरघळते—जशी साखर दुधात विरघळते तशी.


आणि तरीही तुम्ही गोड खाल्लंच, तर अपराधभाव नको. अपराधभाव हा कडवटपणा आहे—तो वाढला की पुन्हा गोड हवं वाटतं. म्हणून सजगपणे, हळू, लक्ष देऊन खा—आणि पुढच्या क्षणी पुन्हा स्वतःशी गोड रहा.


*कृतज्ञता—गोडाची ओढ कमी करण्याची सर्वात सोपी साधना*

आपल्या आतली सुखदता वाढवायची असेल, तर कृतज्ञता ही अतिशय प्रभावी आणि सौम्य साधना आहे. दिवसातून फक्त एकदा—रात्री झोपण्यापूर्वी—आजच्या दिवसातल्या तीन लहान गोष्टी आठवा ज्यासाठी “धन्यवाद” वाटतो: एखादं चांगलं बोलणं, वेळेवर मिळालेली मदत, शरीराने दिलेली साथ, घरातला साधा निवांत क्षण… हे लिहिलं किंवा मनात म्हटलं तरी पुरे. मनाची नजर “काय कमी आहे?” कडून “काय आहे?” कडे वळते—आणि हीच नजर वळली, की आतली गोडी वाढते; मग बाहेरून गोड शोधण्याची घाई कमी होते.


*शेवटी एवढंच:*

दूध भरलेलं असताना त्यात दगड टाकला, तर ओसंडेल.

पण त्यात साखर टाकली, तर विरघळून गोड होईल.


आपलं मनही तसंच आहे.

म्हणूनच—साखर खाऊ नका—साखर व्हा.

गोड रहा—ओढ आपोआप कमी होईल.


एक गोड चिंतन

*जयंत जोशी*

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page