स्पेस अध्याय 2 *स्वातंत्र - जबाबदारी की* *स्वैराचार*
- ME Holistic Centre
- Jul 9
- 5 min read
प्रस्तावना:
सद्गुरु श्री वामनराव पै यांनी परमेश्वराची खूप सुंदर व्याख्या केली आहे. सद्गुरु म्हणतात, *निसर्ग नियमांसहित,*
*स्वयंचलित,*
*स्वयंनियंत्रित,*
*नैसर्गिक, पद्धतशीर*
*व्यवस्था म्हणजे परमेश्वर*
ज्या ज्या ठिकाणी व्यवस्था असते त्या त्या ठिकाणी परमेश्वराचा वास असतो. व्यवस्था मग ती कोणतीही असो-कौटुंबिक, सामाजिक, संस्थात्मक, कार्यालयीन अथवा इतर. प्रत्येक ठिकाणी व्यवस्था व्यवस्थित कार्यरत ठेवण्यासाठी नियम हे आवश्यक आणि गरजेचे असतातच. जसे सरकारी व्यवस्थेत सरकारी नियम असतात तसेच कुटुंब व्यवस्थेमध्ये देखील काही नियम असतात. हे नियम कधीकधी परंपरांच्या स्वरूपात असतात किंवा काळानुरूप देखील असतात. कुटुंब गाडा व्यवस्थित चालावा यासाठी कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याने कुटुंब नियमांचे पालन करणे आवश्यक आणि गरजेचे असते.
परंतु आजकाल कोणत्याही व्यवस्थेतील नियम हे अनेकांना बंधन असल्यासारखे, आपल्या स्वातंत्र्यावरती घाला असल्यासारखे वाटतात. *खरोखर नियम हे बंधन असतात का?* यावर विवेचन आपण या लेखात करणार आहोत.
"आम्हाला आमचं स्वातंत्र्य हवंय"
"माझ आयुष्य हे माझ आहे, माझे निर्णय मला घेऊ द्या, मला कोणीही काहीही सांगू नये"
"माझी स्पेस-माझं स्वातंत्र्य- माझं अस्तित्व"
" तुम्ही कोण सांगणार आम्हाला काय बरोबर काय चूक? "
"तुम्हाला यावर बोलण्याचा अधिकारच नाही."
ही भाषा आजच्या काळात सर्वदूर ऐकू येते विशेषतः शिक्षित, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी, शहरी पिढीकडून हे जास्त प्रमाणात ऐकू येते.
स्वातंत्र्य ही मूलभूत गरज आहेच पण त्याचा अर्थ नेमका समजून घेतला जातो का? हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.
स्वातंत्र्य म्हणजे मी हवं ते करतो आणि कोणीच माझ्यात लक्ष घालू नये असा जर अर्थ घेतला गेला तर ते स्वातंत्र्य नसून तो स्वैराचार ठरतो.
स्वातंत्र्याची भाषा मोठी आकर्षक वाटते, पण हाच शब्द जेव्हा त्याला जबाबदारीची किनार नसते तेव्हा स्वैराचारात बदलतो.
आज समाजात विशेषत: शहरी आणि शिक्षित वर्गात जिथे व्यक्ती स्वातंत्र्य मोठ्या अभिमानाने मिरवलं जातं तिथेच नातेसंबंध मात्र कमकुवत विस्कळीत आणि तुटक झालेले दिसतात.
*स्वातंत्र्य म्हणजे नेमकं*
*काय?*
स्वातंत्र्य म्हणजे फक्त नियम तोडण्याची मोकळीक नाही तर स्वातंत्र्य मध्ये स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असला तरी त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वतःला घ्यावी लागते.
*बंधनासह स्वातंत्र्य म्हणजे*
*सदाचार* तर
*बंधनाशिवाय स्वातंत्र्य*
*म्हणजे स्वैराचार*
हीच ती अदृश्य सीमारेषा जिच्या पलीकडे गेले की स्वातंत्र्य नावाच्या संकल्पनेचा गैरवापर होतो.
या एका वाक्यातच *स्वातंत्र्य-सदाचार आणि स्वैराचार* यांच्यातील सीमारेषा स्पष्ट होतात. बंधनासह म्हणजेच विवेक, सुसंवाद, समंजसपणा आणि जबाबदारी. तर बंधनाशिवाय म्हणजे स्वतःपूरता विचार करणं, संवाद टाळण, आणि अहंकार पोसण.
स्वातंत्र्याची खरी समज म्हणजे अधिकार, कर्तव्य, आणि स्व जबाबदारी या तिन्ही गोष्टींचा समतोल राखणं.
हे तीन घटक म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा समभुज त्रिकोण आहेत.
*अधिकार* याचा अर्थ निर्णय घेण्याचा स्वाभाविक हक्क, पण जर असा निर्णय जबाबदारी शिवाय घेतला गेल्यास त्याचे रूपांतर स्वैराचारात होते.
*कर्तव्य* म्हणजे नात्यातील सहभाग आणि बांधिलकी मात्र कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकार न दिल्यास तगमग आणि अशांतता निर्माण होते.
*स्व जबाबदारी* म्हणजे निर्णयाच्या परिणामांची सजगता आणि जर अशी सजग जबाबदारी नसेल तर मात्र दोषारोप आणि पलायन घडते.
या त्रिकोणातील कोणतीही एक बाजू जास्त ताणली गेली की संपूर्ण जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणूनच स्वातंत्र्य हवे असेल तर त्या स्वातंत्र्याला या तीन बाजूंचा आधार द्यावा लागतो.
*हा समभुज त्रिकोण*
*म्हणजे शहाणपण*
सद्गुरु म्हणतात कौटुंबिक स्वास्थ्यासाठी कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याकडे शहाणपण असलेच पाहिजे. कौटुंबिक जीवन सुखी,आनंदी ठेवायचे असेल तर *शहाणपणाला पर्याय नाही.*
स्वातंत्र्याचा अतिरेक म्हणजे स्वैराचार.
उदाहरण:
शालिनी ही एक उच्चशिक्षित, करिअरमध्ये यशस्वी तरुणी. लग्नानंतर तिने आपल्या पतीला आणि सासरच्या लोकांना स्पष्ट सांगितले, "माझ्या आयुष्यात कोणी हस्तक्षेप करू नये. मी स्वतंत्र आहे. माझे निर्णय घ्यायला मी सक्षम आहे."
तिच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली संपूर्ण संवाद तुटला. नातं तणावात गेलं. तिच्या पतीशी तिचे मतभेद होऊ लागले. संवाद संपला. स्वातंत्र्याच्या नावाखाली तिचा *मी* एवठा मोठा होत गेला की *आपण* नामशेष झाला. आणि परिणाम जो व्हायचा तोच झाला, त्या नात्याचा शेवट झाला.
*इथे नेमकी काय चूक*
*घडली*
1. संवाद नाही.
2. निर्णयात सहभागीपणा
नाही.
3. स्वतःच्या मर्यादा आणि
समोरच्याच्या भावनांची
जाण न ठेवता निर्णय घेणे.
4. माझं स्वातंत्र्य याचा अर्थ
तुला काही बोलण्याचा
अधिकार नाही असा
लावण.
*स्वातंत्र्य म्हणजे फक्त हक्क समजणं आणि कर्तव्य विसरणं नव्हे*
भारतीय सनातन तत्त्वज्ञान सांगते,
*बंध मुक्त होणे म्हणजे*
*स्वातंत्र्य नव्हे.*
*स्वभावातून,* *दृष्टिकोनातून आणि*
*आत्ममूल्यांकनातून मुक्त*
*होणे* हेच खरे स्वातंत्र्य.
स्वातंत्र्य हे केवळ व्यवहारातील मोकळीक नसून विवेकनिष्ठ आणि मूल्याधिष्ठित स्वातंत्र्य आहे.
स्वातंत्र्य जर स्वतःचा विकास, नात्याचा सन्मान आणि संवादाचा विस्तार करत असेल तर ते कौटुंबिक स्थैर्याचं फळ देत.
पण ते जर इतरांवर वर्चस्व, स्वतःच्या चुकांपासून पळवाट, किंवा अहंकार जोपासण्याचे साधन बनलं तर ते स्वराचारात बदलत. परिणामी सर्व कुटुंबालाच दुःखाला सामोरे जावे लागते.
*स्वातंत्र्य हा एक सहमतेचा प्रवास आहे*
बंधनासह स्वातंत्र्य म्हणजे सदाचार याचा अर्थ असा की माझे निर्णय हे माझ्या विकासासाठी असावेत पण ते इतरांच्या वेदनेचे कारण नसावेत
याउलट बंधनाशिवाय स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार. याचाच अर्थ असा की जेव्हा कुणाच्याही भावनांचा विचार न करता "हे माझ आयुष्य आहे" असं सांगून मी सर्व संबंध झिडकारतो तेव्हा तो स्वैराचार होतो.
खरं स्वातंत्र्य म्हणजे मी माझे मत मांडतो पण इतरांचे मतही ऐकतो पण ज्यावेळी मी माझे स्वतःचेच म्हणणे फक्त खरे आहे असे म्हणतो तेव्हा तो स्वैराचार होतो
जेव्हा विचारपूर्वक आणि उत्तरदायित्व स्वीकारून समविचाराने निर्णय घेतले जातात तेव्हा ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असते पण जेव्हा क्षणिक भावनेच्या आहारी जाऊन जबाबदारी नाकारून स्वतःहून लादलेले निर्णय घेतले जातात तेव्हा तो स्वैराचार असतो.
सहजीवनाची भूमिका म्हणजे खरे स्वातंत्र्य तर एकाकीपणा, एकलकोंडेपणा म्हणजे स्वैराचार.
नातं परस्पर समजुतीने निभावले जाते तेव्हा ते खरे स्वातंत्र्य असते परंतु ज्यावेळी नाते एकतर्फी अहंकाराने निभावले जाते तेव्हा तो स्वैराचार असतो.
सबका साथ सबका विकास म्हणजे खरे स्वातंत्र्य आणि फक्त स्व विचार आणि दुसऱ्याचे अस्तित्व नाकारणे म्हणजे स्वैराचार.
मानसशास्त्र सांगते,
*Free will without self*
*regulation is chaos.*
माणसाने स्वतःच्या इच्छांना जर शिस्तबद्ध मर्यादांमध्ये वापरलं नाही तर त्याचं स्वातंत्र्य त्यालाच जखमी करत.
संत एकनाथ महाराज म्हणतात,
*अहंकार* म्हणजे स्वैराचाराची सुरुवात आणि *विवेक- शहाणपण* म्हणजे स्वातंत्र्याच शाश्वत दार.
सदाचार कि स्वैराचार यासाठी काही चिंतनात्मक प्रश्न:
1. मी माझ्या स्वातंत्र्याचा
उपयोग केवळ स्वतःसाठी
करतोय का? माझं
स्वातंत्र्य दुसऱ्याच्या
शांततेला हानी पोहोचवते
का?
2. माझे निर्णय इतरांवर
परिणाम करत असतील
तर मी त्यांच्या भावना
गृहीत धरतो का?
3. माझे निर्णय घेताना मी
संवाद करतो का निर्णय
सांगून टाकतो?
4.मी जेव्हा माझं मत मांडतो
तेव्हा दुसऱ्याचं ऐकायला
मी तयार असतो का?
5.माझ्या स्वातंत्र्यात सन्मान
सुसंवाद आणि जबाबदारी
आहे का?
6.माझ्या स्वातंत्र्याचा पाया
कर्तव्य आणि स्वजबाबदारी
या दोन दगडांवर आहे का?
7.मी जेव्हा माझी स्पेस किंवा
माझं आयुष्य असं म्हणतो
तेव्हा त्यात आपण साठी
जागा आहे का?
स्वातंत्र्य ही सुंदर कल्पना आहे पण ती,
*माझं स्वातंत्र्य, तुझा*
*सन्मान, आपलं*
*उत्तरदायित्व*
या त्रीसुत्री वर उभे राहते.
स्वातंत्र्य हे जीवनाचं अत्यंत सुंदर मूल्य आहे पण ते जबाबदारी समजत आणि संवादाच्या चौकटीतच फुलतं.
स्वातंत्र्य हे बंधनाच्या विरोधात नसून बंधनाला अर्थ देणाऱ्या विवेकाच्या बाजूने असावं लागतं.
जिथे
स्वातंत्र्य म्हणजे माझा स्वभाव सुधारण्याची संधी.
संवाद टिकवण्याचा प्रयत्न.
आणि सुसंवादातून फुलणार नातं.
तिथेच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य म्हणजे आपुलकी.
यालाच म्हणतात,
*बंधनासह स्वातंत्र्य म्हणजे*
*सदाचार* आणि
*बंधनाशिवाय स्वातंत्र्य*
*म्हणजे स्वैराचार.*
स्वातंत्र्य म्हणजे मी जे वाटेल ते करणं नव्हे तर मी जे करतो त्याच्या परिणामांची सजग जबाबदारी स्वीकारणे होय.
अंतर्मुख होऊन स्वतःलाच प्रश्न विचारा
मी माझं स्वातंत्र्य विवेकाने जगतोय की अहंकाराने? माझा अधिकार माझ्या कर्तव्या सोबत चालतोय की त्याच्या सावलीत माझी जबाबदारी हरवतेय?
माझं स्वातंत्र्य इतरांच्या आनंदाची वाट छेदतंय का जोडतेय?
बंधनासह स्वातंत्र्य मी जगतोय का बंधनाशिवाय?
हे ईश्वरा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर कल्याण कर, रक्षण कर.
धन्यवाद
*सदगुरु नाथ महाराज की*
*जय*
लेखांकन : जयंत जोशी
Comments