स्पेस - एक गोंधळात* *टाकणारी जागा*
- ME Holistic Centre
- Jul 3
- 4 min read
प्रस्तावना:
यापूर्वी आपण संवाद म्हणजे *नातेसंबंधातील श्वास* हे बघितले आहे त्याचाच पुढचा भाग.
स्पेस हा आजकाल सर्रास ऐकू येणारा शब्द. हा शब्द मोठा गमतीचा आहे नाही का. हा शब्द मोठा गोंधळात टाकणारा आहे. आम्ही कधी हा शब्द ऐकलेलाच नव्हता. प्रथम जेव्हा मी कुटुंबातील काही सदस्यांकडून आम्हाला आमची स्पेस हवी आहे हे ऐकलं तेव्हा मला समजेनाच की त्यांना नक्की काय म्हणायचे आहे. मी त्यांना म्हटलं बाबांनो, आपला चांगला दोन हजार स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे आणि घरात आपण इनमिन चार माणसं तुम्हाला आणखी किती स्पेस हवी आहे? अगदी प्रत्येकाची वाटणी केली तरी प्रत्येकाला पाचशे स्क्वेअर फुट जागा येते. तुम्हाला काय या जागेची वाटणी करून पाहिजे आहे का? तेव्हा त्यांनी मला समजावून सांगितले बाबा, स्पेस म्हणजे तुम्ही समजता तसे नाही तर आम्हाला आमची मोकळीक हवी, आम्हाला आमचे स्वातंत्र्य आणि स्वतंत्र अस्तित्व हवे.
मग माझे यावर चिंतन सुरू झाले आणि त्या चिंतनाचा सार मी पुढे मांडला आहे.
*स्पेस-मोकळीक की दुरावा*
" मला माझी स्पेस हवी आहे "
हे वाक्य आज घराघरात, दांपत्यांमध्ये, पालकत्वात अगदी मैत्रीतही ऐकू येत. हे वाक्य कधी संयमाने सांगितले जाते तर कधी संतापाने फेकले जाते, कधी त्यामागे आत्मशोध असतो तर कधी
पलयनशीलता.
स्पेस हा शब्द जितका सोपा वाटतो तितकाच तो गोंधळ निर्माण करणारा आणि दुरावा वाढवणारा ठरतो जर त्या शब्दाचा योग्य अर्थ न समजता केवळ वापर केला गेला तर.
*स्पेस म्हणजे नेमकं काय?*
तर स्पेस म्हणजे संवाद टाळणे नव्हे किंवा जबाबदारीपासून सुटका नव्हे. "तुझा माझा काही संबंध नाही" असं ठसवण नव्हे आणि स्पेस म्हणजे भावनिक ताण तणावातून पळवाटही नव्हे.
*तर स्पेस म्हणजे*-
1. स्वतःला समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली अंतर्गत मोकळीक
2. कोणत्याही नात्यात आपल्या स्वत्वाची जागा राखून ठेवणं
3. संवादासाठीची मानसिक जागा.
4. निर्णय घेण्यापूर्वीचे विचारमग्न शांतता.
*अवकाश म्हणजे स्पेस-*
*जीवनविद्या तत्त्वज्ञानाचा*
*दृष्टिकोन*
सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात,
*स्पेस* म्हणजे *अवकाश* आपण श्वास घेतो आणि उछवास टाकतो. त्या दोघांमध्ये जो सूक्ष्म क्षण असतो तोच अवकाश. तोच क्षण आपल्या संस्कृतीत *संधी* म्हणून ओळखला जातो. संधी या शब्दाचे दोन अर्थ आहेत -
1. दोन गोष्टींना जोडणारी जागा
2. नवीन काही घडविण्यासाठीची संधी
या अर्थाने बघितलं तर स्पेस म्हणजे केवळ दूर जाणं नाही तर दोघांना पुन्हा एकत्र आणणारी मौनाची अंतर्मुखतेची जागा.
*स्पेस ही संधी आहे -*
रागातून संवादात येण्यासाठी,
गैरसमजातून स्पष्टतेकडे येण्यासाठी,
अहंकारातून आत्मबोधाकडे वळण्यासाठी.
जसं अवकाश नसेल तर श्वासच शक्य नाही - तसेच नात्यात स्पेस नसेल तर समतोलच शक्य नाही.
मानसशास्त्र सांगते की,
Mind needs pause to process, space to stabilize, and silence to see clearly.
माणूस जेव्हा सतत प्रतिसादाच्या गर्तेत असतो, तेव्हा तो रिऍक्टिव्ह मोड मध्ये जातो - अशावेळी थोडी स्पेस म्हणजेच विचारांसाठी, भावना समजून घेण्यासाठी आवश्यक विराम.
*स्पेस आणि नातेसंबंध*
1. वैवाहिक नात्यातील स्पेस:
समजून घेणं आणि समजून न घेता शांत बसणं यातील फरक म्हणजे स्पेसचा दर्जा.- संवाद तोडून किंवा थांबवून स्पेस मागणं म्हणजे अस्वस्थतेतून पळणं आहे. संवाद चालू ठेवून स्वतःला समजून घेण्यासाठी थोडा वेळ मागणं हे परिपक्वतेचे लक्षण आहे.
ही गोष्ट उदाहरणाणे जास्त स्पष्ट होईल
अवनी आणि समीर यांच्या नात्यात वाद वाढत होते. एक दिवस अवनी म्हणाली, "मला काही दिवस स्पेस हवी. मी सासरी न राहता माहेरी राहीन."
तेव्हा समीरने तिला विचारले "तू माझ्याशी बोलणारच नाही आहेस का? आईकडे गेल्यावर तू माझ्याशी बोलणे थांबवणार आहेस का?"
तेव्हा ती म्हणाली, "नाही, बोलायचं आहे, पण रोजच्या भांडणाच्या रिंगणातून बाहेर येण्यासाठी मला थोडं स्वतःचं भान हवं आहे"
ही स्पेस संवादातून जन्माला येते आणि संवादाचे रक्षण करते.
2. पालक-मुलं यांच्यातील स्पेस:
आजची तरुण पिढी "माझं आयुष्य, माझी स्पेस" या घोषणांमध्ये असते. पण अशी ही स्पेस जर फक्त स्वार्थाच्या चौकटीत असेल तर ती त्यांचं मानसिक भावनिक आरोग्य खालावते.
3. पालकांनीही मुलांना ही जागा द्यायला हवी. पण "नियंत्रण गमावणे" या भावनेतून नाही तर "विश्वास देणे" या भावनेतून.
*स्पेस* चा वापर योग्य की चुकीचा
1. संवाद करताना थोडा वेळ विराम पण संवाद चालू म्हणजे योग्य वापर आणि पूर्ण संवाद बंदी म्हणजे चुकीचा वापर
2. परिपक्वतेने घेतलेला निर्णय म्हणजे योग्य वापर व टाळाटाळ करणे, पलायन करणे म्हणजे चुकीचा वापर
3. भावनिक जाणीव ठेवून स्वतःची जबाबदारी घेणे म्हणजे योग्य वापर आणि दुसऱ्याला दोष देत राहणे म्हणजे चुकीचा वापर
4. नातं जर विश्रांतीसाठी थांबलेल असेल तर तो संवादाचा-स्पेसचा योग्य वापर आणि जर नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर असेल तर तो चुकीचा वापर.
सद्गुरु म्हणतात,
*जशी दृष्टी तशी सृष्टी*
या अर्थाने स्पेस म्हणजे दृष्टिकोन बदलण्याची जागा, दोष मूल्यांकनाची जागा नव्हे.
*स्पेस ही अंतर्मनाला*
*ऐकण्याची संधी आहे*,
*शांततेचा अडोसा आहे*,
*आणि प्रतिक्रिया ऐवजी*
*विचारांची जागा आहे.*
स्पेस देणे म्हणजे नातं संपवणे नव्हे. अनेक जोडीदार, मित्र, आईबाप, स्पेस देण्यासाठी घाबरतात, कारण त्यांना असं वाटत असतं की, स्पेस दिली म्हणजे नातं संपेल की काय? पण नाही, स्पेस दिली तर नातं टिकतं, घट्ट होतं, मात्र ते विश्वासावर आधारित असावं लागतं.
मग सहाजिकच प्रश्न निर्माण होतो की स्पेस हवी असेल तर काय करावे?
1. स्पष्टपणे सांगा- "मला काही वेळ हवा आहे, स्वतःसाठी, पण संवाद मी बंद करणार नाही"
2. गरजेपेक्षा जास्त स्पेस असेल तर नात्यातील अंतर वाढते
म्हणून स्पेस देताना
3. जाणीवपूर्वक प्रश्न करा- "काही मदतीची गरज आहे का?"
4. आपण नियंत्रण गमावतोय असं वाटून अस्वस्थ होऊ नका
5. संवादाच्या दोऱ्या हलक्या ठेवा-पण तुटू देऊ नका
6. नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही कारणाने परतीचे दोर कापू नका. परतीचे दोर कायम शाबूत ठेवा.
स्पेस ही हवीच पण ती परस्पर सन्मानातून, विश्वासातून, आणि संवादातून जन्मली पाहिजे. जेव्हा स्पेस "मी- मी- मी" या गर्जनेतून नव्हे तर ""आपण"" या अंतर्मुखतेतून घेतली जाते तेव्हा ती दुरावा न बनता सख्यत्व घडवते.
स्वतः अंतर्मुख होऊन प्रश्न विचारा
1. मी जेव्हा स्पेस घेतो/ घेते तेव्हा मी संवाद सुरू ठेवतो का तोडतो/ तोडते.
2. माझी स्पेस ही खरोखरच आत्मचिंतनासाठीची वेळ असते की ती एक पळवाट असते
3. मी दुसऱ्याला स्पेस देतो तेव्हा मी त्यावर विश्वास ठेवतो का मी असुरक्षित होतो.
4. स्पेसमुळे माझं नातं समृद्ध झाले की नाजूक झालय.
शुभम भवतूं.
धन्यवाद
लेखांकन : जयंत जोशी.
*सद्गुरु नाथ महाराज की*
*जय*










Comments