top of page

*स्पेस - स्वातंत्र्य आणि* *बंधन - विवेकाच्या* *प्रकाशात नात्यांचे नवे* *भान*

*अध्याय 3*

"बंधन अडथळा की दिशा ? जाच की समत्व ? बंदिस्तपणा की विकासाचे शिस्तबद्ध रेखाटन?"


आपण मागील दोन अध्यायांमध्ये *स्पेस* म्हणजे काय आणि *स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी की स्वैराचार* यावर चिंतन केले. आज आपण एक पायरी पुढे जात आहोत. *बंधन* या संकल्पनेच्या अधिक सूक्ष्म आणि सकारात्मकतेकडे आणि बंधनाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न करतोय. *बंधन म्हणजे अडथळा की दिशा? जाच की समत्व? बंदिस्तपणा की विकासाचे शिस्तबद्ध रेखाटन?*


बंधन हा शब्द ऐकला की पहिला विचार येतो "माझं काहीतरी हरवतंय" "माझं स्वातंत्र्य कोणीतरी बळजबरीने घेतलय" "कोणीतरी माझ्यावर बंधन लादलय" म्हणजेच बंधन म्हणजे काहीतरी नकारात्मक, अडथळा, अपमानजनक असं सहज समजलं जातं.

पण... ...

बंधन म्हणजे खरंच पाश आहे का? का कधी कधी बंधन हेच आपल्याला दिशा देणार मूल्य असतं किंवा स्थैर्य देणारा आधारस्तंभ असतो.

सामान्यतः बंधन या शब्दाचा उल्लेख ज्या अर्थाने केला जातो तो म्हणजे अडथळा, निर्बंध, आणि बंदिस्तपणा. परंतु खरं पाहता बंधने हेच जीवनाला दिशा देणारे असतात. हे बंधन जर विवेकातून आलेले असतील तर ते आयुष्याचा प्रवाह सुसंगत करतात.


सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात,

*आपल्या जीवनातील सर्व*

*समस्यांचे मूळ अज्ञानात*

*आहे. ज्ञान मिळवणं हेच*

*जीवनातील पहिलं पाऊल*

*आहे.*

गीतेत म्हटलं आहे

*नही ज्ञानेन सदृश्यम*

*पवित्रमिह विद्यते*

ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही.

पण याच ज्ञानाचा अतिरेकही कधी कधी बंधन ठरतो. शिवसूत्र आणि वेदांतात म्हटल आहे, *ज्ञानमं बंधनम* म्हणजे जेव्हा ज्ञान अहंकारात रूपांतरित होतं, जेव्हा *मला माहित आहे* हाच दृष्टिकोन प्रबळ ठरतो तेव्हा ते ज्ञान नवे विचार, नवे अनुभव यांना अडथळा ठरू लागतं. त्या ज्ञानामुळे दुसऱ्याचं म्हणणं ऐकाण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही आणि संवादाचे दरवाजे बंद होतात.

म्हणूनच *बंधन आणि दिशा* तसेच *ज्ञान आणि विवेक* यातील सीमारेषा ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

तर मग खरा बंधनकारक घटक काय आहे? नियम, दुसऱ्याच अस्तित्व, की आपल अपूर्ण ज्ञान.

याच एक सोप आणि जीवनाशी संबंधित उदाहरण बघू या-

*शेतातील बांध: बंधन की*

*समत्व*

शेती करताना शेतात बांध घातले जातात. हे बांध दोन मुख्य उद्देशांसाठी घातले जातात-

1. पाण्याचे समान वाटप व्हावं म्हणून-जेणेकरून सर्व पिकांना पोषण मिळेल.

2. शेतीच्या हद्दी जपण्यासाठी - म्हणजे माती वाहून जाऊ नये अथवा दुसऱ्याच्या शेतात अतिक्रमण होऊ नये.

या बांधांमुळे एखादं पीक अधिक पाणी घेऊन दुसऱ्याला वंचित करत नाही आणि शेतात दिशा समन्वय निर्माण होतो या अर्थाने बांध म्हणजे बंधनासह समत्व.

याचप्रमाणे जीवनातही जर काही बंधने नसतील-म्हणजे विवेक, मर्यादा, संवाद आणि जबाबदारी यांचा अभाव असेल तर माणूस स्वैराचारी होतो. काही नाती अधिक पाणी घेतात काही नात्यांना पोषणच मिळत नाही.

"*बंधनासह स्वातंत्र्य*

*म्हणजे सदाचार*" आणि *"बंधनाशिवाय स्वातंत्र्य*

*म्हणजे स्वैराचार"*

हेच आपण गेल्या अध्यायात बघितलं. परंतु या बंधनांना जर आपण शिस्त, दिशा आणि विकासासाठीची चौकट म्हणून पाहिलं तर ते बंधन न राहता ते मुक्ततेचे संरक्षण करणारे संरक्षक ठरतात.

*नदी आणि काठ*

नदी वाहते कारण तिला काठ असतात. आपण कधी विचार केला आहे का, की नदीचं खरं सौंदर्य, तिचा वेग, तिचा उपयोग हा तिच्या काठांमुळेच शक्य होतो. जर नदीला काठ नसतील तर तिचा प्रवाह बेढब होतो, ती चारही दिशांना धावू शकते मग तिचं पाणी साचेल, दलदल होईल, आणि ती स्वतःचं अस्तित्वच गमावून बसेल.

काठ हे नदीसाठी बंदिस्त करणारी गोष्ट नाही. ते नदीला दिशा देतात, गती देतात आणि तिचं अस्तित्व टिकवून ठेवतात. ज्यावेळी नदीला दिशा मिळते तेव्हा ती प्रवाहित होते, त्यामुळे सिंचन होते, जीवन मिळते आणि पाणीपुरवठा होतो.

तसंच माणसाच्या आयुष्यालाही विचारांचे, नीती मूल्यांचे, शिस्तीचे आणि मर्यादांचे काठ असणे आवश्यक आहे. अन्यथा तो स्वतःच आणि आजूबाजूचं सर्वकाही वाहून नेतो. आपल्या आयुष्यातील बंधने म्हणजे बंदिस्त करणारी साखळी नसून सद्विवेकातून मिळालेली दिशा आहे.

*पेट रॉक चे तत्वज्ञान*

सत्तरच्या दशकामध्ये

अमेरिकेत *पेट रॉक* हा एक विचित्र ट्रेंड आला. लोक एका सामान्य खडकाला डोळे लावून त्याला पाळीव प्राणी म्हणून घरात ठेवत. तो काही करत नसे - न प्रेम व्यक्त करत, न शेपटी हलवत, न मिठी मारत. पण लोकांना वाटायचं 'हा माझा आहे.'

*पेट रॉक* काहीच करत नसला तरी तो *माणसाच्या अंतरिक संवादाचा आरसा होता*. त्याने काही बंधन घातली नव्हती पण तरी त्याच्यासोबत एक 'मुक नातं' तयार झालं होतं.

हाच विचार जर आपण बंधनांकडे बघताना लावलात तर लक्षात येईल की अनेक बंधन आपल्या संवादासाठी आपुलकीसाठी आणि सुरक्षिततेसाठी अस्तित्वात आहेत. नात्यांमधील काही नियम, अपेक्षा आणि चौकटी या पेट रॉक सारख्या आहेत- त्या जिवंत नसतात पण त्यांचं अस्तित्वच नात्याला स्थैर्य देत.

*बंधनाबद्दल नव्या दृष्टीने*

*विचार*

बंधन म्हणजे अडथळा नव्हे तर एक मर्यादा - जी माणसाला विखुरण्यापासून वाचवते. जस गाडी चालवताना सिग्नल चे नियम असतात तसेच आयुष्यातील नियम हे सहजीवन सुरळीत ठेवण्यासाठी असतात.

बंधन हे बाहेरून लादलेलं नसून जर ते आतून आलेल असेल म्हणजेच विवेकातून, प्रेमातून आणि जबाबदारीतून निर्माण झालेल असेल तर ती बंधने नसून ते आनंदी जीवनाकडे घेऊन जाणारी दिशा असते.

निसर्गात देखील प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट बंधनात असते, ऋतूंचा क्रम, सूर्याचा उदय अस्ताचा नियम, गुरुत्वाकर्षणाचा नियम. गुरुत्व नसतं तर पृथ्वीवरील जीवनाला आधारच नसता- म्हणजेच बंधन म्हणजे पायातील बेड्या नाहीत तर तो आनंदी जीवनाचा पाया होऊ शकतो.

म्हणूनच बंधनाशिवाय स्वातंत्र्य हे वास्तवात विस्फोटक ठरू शकते आणि बंधनासह स्वातंत्र्य म्हणजे सदाचार, शहाणपण आणि परस्पर समजूतीचा प्रवास होय.

*बंधनाच्या सकारात्मक*

*बाजु*

1. मर्यादा ही रक्षण करणारी असते. जसे भिंत ही घराचा आडोसा आणि संरक्षण असते. तशी काही बंधन आपल्याला अंतरिक संरक्षण देतात.

2. बंधने हे मूल्य संवर्धनाचे साधन - आई वडील, गुरु, समाज यांचे बंधन हे आपल्या वागणुकीत एक नम्रता आणि सुसंस्कृती निर्माण करत.

3. बंधन म्हणजे सहजीवनाची सुसंवादी चौकट- संवाद, शिस्त, आचार विचारांचे काही नियम हे सगळे बंध समजून घेतल्यास ते आपल्याला स्वतंत्रतेची खरी उंची गाठून देतात.

4. बंधनातूनच आत्म नियंत्रण निर्माण होतं- ज्याला आपण शिस्त किंवा Self Regulation म्हणतो ती बंधनाच्या जाणिवेतूनच जन्म घेते. मानसशास्त्र सांगते की *Freedom without*

*regulatio breeds*

*chaos*.

5. बंधन आपल्याला एका सुसंगत, सुसंस्कृत आणि सुयोग्य आयुष्याची चौकट देत.

बंधने नाकारायची नाहीत तर स्वीकारायची. बंधने नात्याला रूप देतात, जीवनाला धार देतात, स्वातंत्र्याला मर्यादा देतात, आणि संपूर्ण जीवनाचं सौंदर्य राखतात.

शेतातील बांध, नदीचा काठ, आणि पेट रॉक या सगळ्यांच्या मदतीने आपण हेच शिकलो की -

*बंधनाशिवाय स्वातंत्र्य*

*असू शकतं पण ते टिकत*

*नाही*.


*बंधन आणि संबंध*

बंधन हा शब्द संबंध या शब्दाशी जवळचा आहे. संबंध याचा अर्थ बंधनासह. एक चांगला संबंध टिकविण्यासाठी काही गोष्टी आपण आपोआप टाळतो. ही बंधने नसतात का?

तर असतात. पण ती बंधने आपल्याला ओझं वाटत नाहीत, कारण त्यामागे असते प्रेम, आदर आणि आपुलकी.

आजची जी पिढी

*No boundaries, No*

*commitment* चे तत्वज्ञान घेऊन जगते, तिथे तुटलेली नाती, एकटेपणा आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. कारण स्वातंत्र्य दिशाहीन झालं की त्याचा परिणाम विखुरलेपणात होतो.

*बंधने म्हणजे एक प्रकारचे*

*संरक्षण*

लाल दिवा लागला की आपण सिग्नल वर थांबतो. तो सिग्नल आपल्याला बंधन वाटतो पण तोच आपल्याला अपघातापासून वाचवतो. शाळेत सकस शिक्षणाचा कार्यक्रम ठरतो, ती नियमावली वाटते, पण त्यामुळेच भावी आयुष्यातली सुदृढ पिढी घडते. आपल्या नात्यांमध्ये देखील काही गोष्टी आपण समोरच्याची फिकर करून करत नाही, हे बंधन आहे, पण हेच त्या नात्याचं संरक्षण करतं.

*बंधन म्हणजे आधार*

जसा एखादा महाकाय वृक्ष आपल्या मुळांमुळे उभा असतो, तसेच नाती ही आपल्या मूल्यांच्या बंधनांवर उभी असतात.

कुठे संयम, कुठे नम्रता, कुठे स्वतःची ओळख, कुठे दुसऱ्याच्या भावना जपण, कुठे संवाद, कुठे मौन, ही सगळी एक प्रकारची बंधन आहेत, पण तीच तर आपल्याला माणूस बनवतात.

*बंध आणि भावनिक*

*स्वातंत्र्य यांचा संतुलन*

या आधुनिक जगात आपण कुठल्याही एका टोकाला गेलो की नातं तुटत. बंधन इतकी कडक नसावीत की माणूस गुदमरून जाईल आणि स्वातंत्र्य इतकं अमर्याद नसावं की दुसऱ्याच्या अस्तित्वाला धोका पोहोचेल.

*बंधनातही प्रेम असावं*

*लागतं आणि*

*स्वातंत्र्यातही*

*जबाबदारी असावी लागते*

म्हणूनच पुन्हा एकदा-

नदीसारख स्वच्छ, प्रवाही,सुंदर आणि जीवन दायी आयुष्य जगायचं असेल तर काठांची गरज आहे, म्हणजेच बंधनांची गरज आहे. ही बंधनं जर संस्कार, सुसंवाद, मूल्य आणि विवेक यातून आली असतील तर ती आपल्याला आनंदी जीवनाची संधी देतात, मर्यादा नाही.

*बांधिलकी असलेली*

*मोकळीक म्हणजे*

*स्वातंत्र्य आणि दिशाहीन*

*मोकळीक म्हणजे* *स्वैराचार.*


*बंधने ही जीवनाची*

*सुंदरता आहे*

म्हणूनच आपण हे मान्य करूया की-

1. बंधने हे पाश नसून आधार आहेत.

2. जशी नदी काठामुळे प्रवाहित राहते तसेच बंधनांमुळे आयुष्य प्रवाहित होतं, ते बिघडत नाही किंवा भरकटत नाही.

3. बंधनांमुळे नात्याचं बांधणं घडतं. बंधनांमुळे आपण समजूतदार होतो. बंधनांमुळेच आपल्या स्वातंत्र्याला योग्य दिशा मिळते.

4. बंधने ही श्रृंखला न राहता आत्मविकासाची रेलिंग झाली पाहिजे आणि यासाठी आवश्यक आहे *ज्ञानाचा विवेक पूर्ण उपयोग* आणि *स्पेसचा संवेदनशील वापर.*

5. जिथे बंधने आहेत तिथेच स्थैर्य आहे.

6. बंधनासह स्वातंत्र्य म्हणजे सदाचार, विवेकासह ज्ञान म्हणजे मुक्ती.

7. नियम, नीती आणि मर्यादा ही बंधने नाहीत तर हेच परमेश्वराचे साक्षात रूप आहे.


*देवा सर्वांचं भलं कर,*

*कल्याणकर, रक्षण कर.*

धन्यवाद.

सद्गुरु नाथ महाराज की जय

लेखांकन : जयंत जोशी.

 
 
 

Recent Posts

See All
माझा स्वातंत्र्यदिन* एक अंतर्मुख प्रवास — ‘मी’ पासून ‘सर्वां’ पर्यंत

❝*तूच आहेस तुझ्या स्वातंत्र्याचा स्वातंत्र्यवीर❞* १५ ऑगस्ट. प्रत्येक वर्षी झेंडे फडकतात, भाषणं होतात, गाणी वाजतात… आणि तरीही – कुठेतरी आत...

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page