अक्षय तृतीया : सोने घ्यायचे की जीवन अक्षय करायचे?*
- ME Holistic Centre
- 7 hours ago
- 2 min read
*
एका कलशातून सुवर्णमुद्रा… आणि दुसऱ्या कलशातून अक्षय दान
जीवनात काही क्षण असे असतात
जे फक्त साजरे करण्यासाठी नसतात;
ते स्वतःकडे नव्याने पाहण्यासाठी असतात.
आजचा दिवस तसाच आहे.
आज अक्षय तृतीया.
*अक्षय तृतीयेच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*
अक्षय तृतीया म्हटली की आपल्या डोळ्यांसमोर एक परिचित चित्र उभे राहते —
एक सुवर्ण कलश, आणि त्यातून झरत असलेल्या सुवर्णमुद्रा.
समृद्धीचे, धनलाभाचे आणि शुभारंभाचे ते प्रतीक आहे. परंपरेत त्याला स्थान आहेच.
पण आजच्या काळात या चित्राला अजून एक गहिरी बाजू जोडण्याची गरज आहे.
कल्पना करा — एक नव्हे, दोन कलश आहेत.
एका कलशातून सुवर्णमुद्रा झरत आहेत.
आणि दुसऱ्या कलशातून झरत आहेत —
प्रेम, मनःशांती, विश्वास, विवेक, सद्गुरूवचन, आचरण, माणुसकी.
पहिला कलश घर भरतो.
दुसरा कलश जीवन भरतो.
पहिला कलश सुखसोयी वाढवतो.
दुसरा कलश अस्तित्व समृद्ध करतो.
म्हणून अक्षय तृतीया हा केवळ सोनं विकत घेण्याचा दिवस नाही;
तो समृद्धीची व्याख्या समजून घेण्याचा दिवस आहे.
“*अक्षय” म्हणजे जे क्षय पावत नाही.*
*जे काळानुसार झिजत नाही.*
*जे संपत नाही.*
मात्र आपण बहुतेकदा जे साठवत असतो, ते सारे क्षय पावणारेच असते.
धन कमी-जास्त होते.
वस्तू झिजतात.
वैभव बदलते.
सोने मौल्यवान असते, पण त्यालाही तिजोरी लागते.
*मग खरे अक्षय काय?*
मनःशांती अक्षय.
प्रेम अक्षय.
विश्वास अक्षय.
ज्ञान अक्षय.
विवेक अक्षय.
सद्भाव अक्षय.
सत्कर्माचे फल अक्षय.
आणि याहूनही अधिक अक्षय काय असेल तर —
सद्गुरूंचे वचन आणि त्यांचे मार्गदर्शन.
कारण सद्गुरूंचे वचन हे केवळ शब्द नसतात;
ते जीवनाला दिशा देणारे
अ-क्षर असते — क्षय न होणारे.
पण तेवढे पुरेसे नाही.
त्या वचनाला आचरणाची जोड मिळाली,
तरच ते जीवनात फुलते.
तरच ते अक्षय होते.
ऐकलेले ज्ञान प्रेरणा देते;
पण जगलेले ज्ञान जीवन बदलते.
*आज आपण सोने घ्या, हरकत नाही;*
*पण सोन्यासारखी माणसेही जोडा.*
कारण सोने तिजोरीत ठेवतात;
पण सोन्यासारखी माणसे हृदयात ठेवतात.
आणि ज्याच्या आयुष्यात अशी माणसे असतात,
तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो.
अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती एकाच दिवशी येतात.
ही योगायोगाची गोष्ट नाही.
समृद्धी हवी,
पण तिला विवेकाची दिशा हवी.
शक्ती हवी,
पण ती धर्मासाठी वापरली गेली पाहिजे.
परशुरामाचा पराक्रम फक्त बाह्य शौर्याचा नाही;
तो स्वतःतील अधर्मावर घाव घालण्याचा संदेश देतो.
लोभावर घाव.
अहंकारावर घाव.
मत्सरावर घाव.
अन्यायावर घाव.
जो स्वतःच्या दुर्बलतांवर विजय मिळवतो,
तोच खरा पराक्रमी.
सद्गुरू श्री वामनराव पै यांची जीवनदृष्टी सांगते —
*माणूस स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार आहे.*
बाहेर साधने मिळवावीतच;
पण आतूनही घडले पाहिजे.
बाहेरचे सोने चकाकते;
पण आतला प्रकाशच जीवनाला दिशा देतो.
म्हणून आजच्या दिवशी आपण एक वेगळा संकल्प करू या.
फक्त खरेदी करायची नाही;
थोडे दानही करायचे.
फक्त शुभेच्छा द्यायच्या नाहीत;
एखाद्याच्या आयुष्यात प्रत्यक्ष शुभ घडवायचे.
फक्त सोने घ्यायचे नाही;
मनही सुवर्ण करायचे.
फक्त सद्गुरूवचन ऐकायचे नाही;
ते आचरणात आणायचे.
म्हणून आजच्या शुभेच्छा अशा असू देत —
*आपल्या घरात समृद्धी नांदो,*
*पण मनात शांतताही नांदो.*
*आपल्या हातात साधने येवोत,*
*पण त्यांना विवेकाची दिशा लाभो.*
*आपल्या आयुष्यात सोने येवो,*
*पण सोन्यासारखी माणसेही जोडली जावोत.*
आणि
*सद्गुरूंचे वचन लाभो,* *त्याला आचरणाची जोडही लाभो*
कारण शेवटी —
सोने तिजोरीत ठेवतात;
पण सोन्यासारखी माणसे हृदयात ठेवतात.
आणि ज्याच्या हृदयात अशी माणसे असतात,
तोच खऱ्या अर्थाने अक्षय श्रीमंत असतो.
*जयंत जोशी*




Comments