top of page

अमावस्या – अंधारातून आत्मप्रकाशाकडे : एकदर्शनाची वाटचाल



✍🏻 दर्श अमावस्या विशेष चिंतनलेख

“प्रकाश शोधायचा असेल,

तर अंधारातच जावं लागतं…

आणि जेव्हा आपण अंधारात उतरत जातो,

तेव्हाच अंतरंगात दीप उजळतो!”


🔶 साधकाने विचारलं…

एक दिवस एका साधकाने गुरूंना विचारलं –

“गुरुदेव, पौर्णिमा आम्हाला समजते – प्रकाश, उत्सव, सौंदर्य.

पण ही अमावस्या?

ही अंधाराची रात्र आपल्याला काय शिकवते?”


गुरु हसले. म्हणाले –

“पौर्णिमा बाहेरचा प्रकाश दाखवते…

पण अमावस्या?

ती आपल्या अंतरात लपलेलं दिव्यत्व जागं करत असते.”


🔶 *गैरसमजांचं झाकोळ – आणि त्यात हरवलेली अमावस्या*

आपल्या संस्कृतीत अमावास्येला ‘अशुभ’ मानण्याची पद्धत इतकी खोल रुतली आहे, की आजही अनेकजण या दिवशी:

• कुठलंच काम करत

नाहीत

• प्रवास टाळतात

• आणि काही जण

गटारी

अमावस्येसारख्या

विकृत कल्पनांत

अडकतात.

पण हा ‘काही करू नका’ असा आदेश नव्हता…

तो होता – ‘स्वतःशी संवाद साधा…’

‘बाहेर थांबा,आत वळा’


🔶 *प्रदर्शन विरुद्ध दर्शन*

आजच्या युगात प्रत्येकाला “प्रदर्शन” हवं आहे –

📸 Insta-post, 💬 WhatsApp-Status, 🎭 बाह्य प्रतिमा…

*पण दर्शन?*

खऱ्या अर्थानं स्वतःला समजून घेणं, दोषांशी नजरेला नजर देणं, मौनात उतरणं…

*प्रदर्शन सोपं आहे… दर्शन मात्र कष्टसाध्य.*

प्रदर्शनात प्रसिद्धी मिळते,

दर्शनात प्रामाणिकता लागते.

प्रदर्शन बाहेर घडतं,

पण दर्शन… ते फक्त आत घडतं.


🔶 *अमावस्येचं गूढ खगोलशास्त्र — आणि त्यात दडलंय आध्यात्म*

अमावास्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी सम पातळीवर येतात.

चंद्र सूर्याच्या प्रकाशात झाकोळतो — म्हणून आपल्याला बाहेर अंधार दिसतो.

पण…

जेव्हा जीवनात –

शरीर स्थिर,

मन शांत,

आत्मा जागरूक होतो…

तेव्हा या त्रयींच्या समपातळीवर येण्यानं

आत्मप्रकाश उजळतो – अनुभव म्हणून, शांती म्हणून, समाधान म्हणून.


🌑 *बाहेर अंधार असतो,*

*पण अंतरात प्रकाशाची उधळण होते.*


🔶 *संतांचे बोल – अंधार नाकारू नका, समजून घ्या*


संत म्हणतात:

*अंधारात ना पाहे ज्योती, तो का म्हणावा ज्ञानी?*

*अंतःकरण निर्मळ न करता, उपासना व्यर्थ होय.*

या संतवचनांमध्ये अमावस्येचा गाभा स्पष्ट आहे –

बाह्य अंधाराची भीती बाळगू नका,

तर अंतर्मनातील अंधार ओळखून त्यातून उर्जा प्रकट करून प्रसारित करा.


🔶 *आधीची परंपरा — सशक्त ज्ञानाचा वारसा*

• या दिवशी घरातले जुने

दिवे शोधून, स्वच्छ

करून दीपपूजन केलं

जाई

• घर बांधकामासाठीची

लाकूडतोड

अमावस्येच्या रात्रीच

होत असे – कारण

झाडात रससंचार

थांबलेला असे

• उपवास, मौन, ध्यान,

ग्रंथवाचन – ही

अमावस्येची खरी

उपासना होती

*आमच्या पूर्वजांनी अमावस्येला अधोगती नव्हे, शुद्धी आणि जाणीव यांचे पर्व मानले.*


🔶 *आज अमावस्येला काय कराव ?*

मौनात थांबा –

चंद्र नसतो,पण तुमचा आतला प्रकाश जागा होऊ शकतो.


✅ विश्व प्रार्थनेचा जप करा

✅ एक दीप स्वतःच्या

अंतरात लावा

✅ बाह्य आळस टाळा –

आंतरिक जागृती घडवा

✅ मनाला शांत करणारा

एखादा संकल्प करा


🔶 *गटारी की दर्श? आपण ठरवायचं…*

“गटारी अमावस्या” म्हणजे नशेचं सोंग, परंपरेचा विकृत अर्थ.

“दर्श अमावस्या” म्हणजे —

स्वतःकडे, आपल्या वागणुकीकडे, आपल्या दुर्बलतेकडे निर्भयपणे पाहण्याचा दिवस.


🪔 *अंधार नाकारू नका… त्यातून उगम होतो प्रकाशाचा*

“अमावस्या ही अशुभ नसते… ती स्वतःकडे वळण्याची संधी असते.”

ज्याला आपण अंधार समजतो…

तोच अंधार आपल्या अंतर्मनातील चंद्राला उजळवतो!”

दर्श अमावस्येच्या निमित्ताने एक चिंतन

जयंत जोशी.

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page