top of page

आनंदाचं मार्केटिंग ?



✨ आनंद हीच अंतर्मनाची खरी क्रांती ✨


एखादी गोष्ट जेंव्हा खऱ्या अर्थाने मौल्यवान ठरते, तेंव्हा तिचं तेज आपल्याला आपोआप खेचतं.

तिच्याकडे आपली पावलं वळतात, मन तिच्यासाठी आसुसतं, आणि ती मिळवण्यासाठी आपण झटत राहतो.

मौल्यवान गोष्टीचा खप वाढतो, तिचा प्रसार होतो, आणि ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते.


आपल्या जीवनातली सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे — आनंद.

त्यासाठी तर आपण आयुष्यभर धडपड करतो.

पण हाच आनंद इतका अमूल्य आहे की अनेकदा आपण त्याचं खरं मोलच ओळखत नाही.

कधी त्याला झाकून ठेवतो, तर कधी स्वतःलाच नाकारतो.

“आपल्याला ते झाकण काढून टाकायचं आहे.

म्हणजेच आनंद बाहेर शोधायचा नाहीये, तर आपल्याच आतील अमृतकुंभ जो आच्छादीत आहे, ते आच्छादन दूर सारून स्वतःलाच उलगडून द्यायचं आहे.

यालाच मी म्हणतो — आनंदाचं मार्केटिंग’…

जिथे ग्राहकही आपणच, व्यापारीही आपणच, आणि मिळकतही आपलीच!

पण उपभोक्ता मात्र सर्वजण— कारण ही मौल्यवान मिळकत अशी दिव्य स्वरूपाची आहे की तिचं जितकं जास्त वितरण होईल, तितकी तिची वृद्धीच होईल.

कसे ते पहा-


अठराव्या शतकात फ्रान्समध्ये एक भाजीपाला तिरस्काराचा विषय झाला होता — बटाटा.

होय, तोच बटाटा जो आज जगभरातील बहुसंख्य स्वयंपाकघरात रोजच्या जेवणाचा अविभाज्य घटक आहे.

तेव्हा मात्र त्याला “Devil’s Apple” म्हटलं जात होतं.

तो कुरूप आहे, चवीला फिका आहे, अगदी कुष्ठरोग पसरवतो अशीही अफवा होती.

लोक मानायचे की तो फक्त डुकरांसाठी योग्य आहे.


पण Antoine-Augustin Parmentier नावाच्या फ्रेंच शास्त्रज्ञाला या भाजीत जीवनदायी खजिना दिसला.

कैदेत असताना त्याने बटाट्यावरच पोट भरलं होत आणि त्याला कळलं होत की हा भाजीपाला सुरक्षित, पौष्टिक आणि पोषक आहे.

फ्रान्समध्ये परतल्यावर त्याने ठरवलं — बटाट्याची प्रतिमा बदलायची.

पण

लोकांना थेट पटवणं शक्य नव्हतं.

मग त्याने युक्ती लढवली.

पॅरिसच्या बाहेर मोठं शेत तयार करून त्यात बटाटे लावले. दिवसा राखणीसाठी शेतावर सैनिक ठेवले, पण रात्री मुद्दाम काढून घेतले.

लोकांनी विचार केला, “जपून ठेवला जातोय म्हणजे मौल्यवान असणार.”

त्यांनी बटाटे चोरून नेले आणि स्वतः पेरायला सुरुवात केली.


याचबरोबर Parmentier ने प्रतिष्ठित लोकांना खास डिनरला बोलावलं आणि प्रत्येक पदार्थात बटाटा दिला.

त्यात एक सोपी पण चवदार डिश होती — बटाट्याचे तुकडे करून तेलात तळलेले फ्रेंच फ्राइज.

त्या चवीची चटक लागली.

हळूहळू तोच “Devil’s Apple” लोकांच्या जिभेवर आणि मनावर राज्य करू लागला.


आज परिस्थिती अशी आहे की, फ्रेंच फ्राइजचा जागतिक बाजार ₹2 लाख कोटींपेक्षा जास्त आहे आणि पुढील काही वर्षांत तो ₹4 लाख कोटींहून अधिक होईल असा अंदाज आहे.

एकेकाळी तिरस्कृत ठरवलेली गोष्ट आज जगभरातील लोकांच्या जीवनात आवड, सवय आणि मोठं मूल्य बनली आहे.कस घडल हे? टीकेच रूपांतर कौतुकात-


आपल्या जीवनातला “Devil’s Apple”

आपल्याही मनात एक आतला टीकाकार असतो.

तो आपल्या लहानसहान आनंदांना “फाजील”, “लाजिरवाणं” किंवा “वेळ वाया घालवणं” असं ठरवतो, टीका करत असतो-

१. आपण म्हणतो

चित्रकला शिकायची इच्छा आहे.

तो म्हणतो: “तू कलाकार नाहीस. पैशांचा अपव्यय होईल.”

२. थोडा आराम करावा अस म्हटलं की तो टोचतो: “आळशी आहेस. अजून किती तरी कामं बाकी आहेत.”

३. थोडे रंगी बेरंगी कपडे घालावेडे वाटले तर तो लगेच घाबरवतो: “लोक काय म्हणतील, हे तुला तुझ्या स्टेट्सला शोभणारं आहे का?”

४. ⁠एक ना अनेक बाबतीत तो आपल्याला रोखत असतो.

हीच ती

आपल्या स्वभावातील “बटाटे”स्थिती

जसं समाजाने कधीकाळी बटाट्याला “Devil’s Apple” म्हटलं, तसेच काही स्वभावगुण माणसात असतात,

सुरुवातीला दोष मानले गेलेले, लाजिरवाणे वाटणारे, पण नंतर जीवनाची खरी ताकद ठरणारे.

* Albert Einstein लहानपणी सतत विचारांत हरवलेला, स्वप्नाळू दिसायचा. शिक्षक म्हणायचे, “हा कधीच काही शिकणार नाही.” पण हाच स्वप्नाळूपणा नंतर सापेक्षतावादाच्या सिद्धांताला जन्म देतो.

* महात्मा गांधी

वकिली करताना इतके बुजरे होते की पहिल्याच दिवशी न्यायालयात तोंड उघडू शकले नाहीत. लोक म्हणाले, “हा कधी टिकणार नाही.” पण हाच भीडस्त स्वभाव त्यांना अहिंसेच्या मार्गाने जग हलवायचं बळ देतो.

* Steve Jobs हट्टी, नियम मोडणारा, टीममध्ये न बसणारा समजला गेला. पण हाच हट्टीपणा Apple आणि iPhoneसारख्या क्रांतीचा पाया ठरतो.

* ⁠*संत गजानन महाराज* सुरुवातीला लोकांना “वेडे” वाटले. पण त्यांचा अलिप्त, जगावेगळा स्वभावच पुढे संतत्वाचा प्रकाश ठरला.


👉 म्हणजेच जे गुण समाजाने आधी दोष मानले, तेच गुण कालांतराने त्यांचं खरं सामर्थ्य ठरले.


हे सगळं खरं आहे — समाजाने जे दोष मानले, तेच गुण कालांतराने सामर्थ्य ठरू शकतात.

पण इथे एक दुसरं वास्तव आहे.

आपण सगळे Einstein, Gandhi, Jobs किंवा महाराज नसतो.

आपल्या स्वभावातील ‘बटाटे’ — म्हणजेच लहान आनंद, लहान गुण — हे समाजाच्या भीतीने, आतल्या टीकाकाराच्या दबावाने आपण अनेकदा दाबून टाकतो.

आणि जेव्हा असं वारंवार घडतं, तेव्हा त्याचे मानसिक परिणाम आपल्यावर उमटू लागतात.


या आतल्या आवाजाला आपण वारंवार मान दिला की मनात अपराधीपणा वाढतो, आत्मविश्वास कमी होतो, आणि हळूहळू आपण स्वतःलाच आनंदापासून वंचित ठेवतो.

आपलीच इच्छाशक्ती निस्तेज होते, कारण प्रत्येक वेळी आपला हा आतला टीकाकार जिंकतो.


पण मग ही नकारात्मकता येते तरी कुठून आणि कशी

आजूबाजूचे सगळे सांगत असतात-

“सकारात्मक रहा, सकारात्मक बोला, नकारात्मक उच्चारू नका!”

पण नकारात्मकता येतेच का?

मानसशास्त्र सांगतं की माणसाला नेहमी जास्त नकारात्मक विचार करण्याची नैसर्गिक सवय असते.

याला म्हणतात Negativity Bias.

* अपयश, टीका, अपूर्णता

हे मनात जास्त ठसतात.

* लोग क्या कहेंगे (LKK)

हा दबाव आपल्याला

खऱ्या आनंदापासून दूर

ठेवतो.

* सततची तुलना आणि

अपूर्ण इच्छा ह्या

नकारात्मकतेला

खतपाणी घालतात.

मग सकारात्मकतेकडे कसं जावं?

सकारात्मकता ही अचानक मिळणारी अवस्था नाही.

ती म्हणजे रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या आनंदांचे उत्सव साजरे करण्याची कला.

* आवडतं गाणं ऐकताना थोडं थांबून त्याचा आनंद मनाशी नोंदवा.

* पावसात भिजताना “ही माझी आठवण आहे” असं म्हणून स्वतःला स्मित द्या.

* मित्रांसोबत हसताना त्या क्षणाला मनापासून साजरा करा.

* रोजच्या आयुष्यात कृतज्ञतेची सवय लावा — जे आहे त्यात समाधान शोधा.

* “मी नाही करू शकत” ऐवजी “मी प्रयत्न करतोय” असा सकारात्मक उच्चार करा.

* चांगल्या सहवासात म्हणजे सत्संगात रहा, सकारात्मक लोकांचा प्रभाव मनावर खोलवर पडतो.


विज्ञान सांगतं की अशा लहान आनंदांच्या वारंवार उत्सवामुळे मेंदूत “हॅपी हार्मोन्स” (डोपामिन, सेरोटोनिन) निर्माण होतात, ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो.

हळूहळू नकारात्मकतेची पकड कमी होते, आणि मन उजळू लागतं.


आनंदाचा सर्वात मोठा अडसर – LKK फॅक्टर

या टीकाकाराला सर्वात जास्त ताकद मिळते ती LKK फॅक्टरमुळे-

लोग क्या कहेंगे?

इतरांना काय वाटेल या भीतीने आपण आपल्या खऱ्या आनंदाला दडपून टाकतो.

* लग्नात आवडत्या सुरावटीवर मनसोक्त नाचावंसं वाटतं, पण लोक हसतील म्हणून आपण कचरतो.

* पावसात बेभान होऊन भिजायची इच्छा होते, पण “वेडं समजतील” या विचाराने आपण थांबतो.

* साधे रंगीत वस्त्रं परिधान करायची हौस होते, पण “आपल्याला आपल्या स्टेटसला शोभेल का म्हणून आपण दाबून टाकतो.

असं करताना आपण आपल्या आनंदाची बीजं उगवायच्या आधीच कोमेजवून टाकतो.


मग काय करायचं?-तर आनंदाचं मार्केटिंग

Parmentier प्रमाणे आपणही आपल्या आनंदाला थेट बचाव करून नाही, तर हुशारीने मौल्यवान ठरवून आत आणायचं आहे.त्यासाठी

1. टीकाकार ओळखा

तो काय म्हणतोय, हे फक्त लक्षात घ्या. वाद घालू नका.

2. आनंदाला मौल्यवान बनवा. उदा. “मी आळशी आहे” असं न मानता —

“आज मी माझ्यासाठी एक खास अस शांतीस्थान तयार करतोय. आवडता चहा, पुस्तक, ब्लँकेट- आणि हो हा केवळ माझा आणि माझाच मौल्यवान वेळ असणार आहे.”

किंवा

“आज मी माझ्या खास छंदासाठी वेळ राखून ठेवला आहे. मस्त आवडतं गाणं लावून निवांत बसणार, बरोबर गरमागरम कॉफी आणि कांदा भजी. हा माझा छोटासा उत्सव आहे — फक्त माझ्यासाठी. कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या!”

3. लहान लहान आनंदाची चटक लावा.

4. कुटुंबातील सदस्यांबरीबरोबर वेळ घालवा, त्या क्षणांचा निर्भेळ आनंद घ्या.

लक्षात ठेवा आनंद नेहमी छोट्या छोट्या गोष्टीत दडलेला असतो.

जसं फ्रेंच फ्राइजनी बटाट्याची प्रतिमा बदलली, तसंच एखादी छोटीशी आनंदाची कृती तुमचं मन उजळवू शकते.

• एकदा का या छोट्या छोट्या आनंदांची चटक लागली, की मनाला हळूहळू स्वतःवर विश्वास बसतो.मन स्थिर व्हायला लागतं. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल सुरू होते.


आनंदाला गमवू नका.

आनंदाचं मार्केटिंग करा.

छोटे छोटे आनंद साजरे करा,

नकारात्मकता घालवा, सकारात्मक व्हा

आणि जीवन सुवर्णमय करा.


चला तर मग-आपल्या आनंदाचं मार्केटिंग करण्याची कला अवगत करूयात!

कारण-आनंद आणि आनंदी राहण हीच अंतर्मनाची खरी क्रांती!


एक आनंदमयी होण्यासाठीचे चिंतन : जयंत जोशी

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page