घडलेलं नाही… घडवायचंय!* तुझे तुलाच !
- ME Holistic Centre
- Aug 2
- 2 min read
*तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार*

“फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार,
विठ्ठला तू वेडा कुंभार…
माती, पाणी, उजेड, वारा —
तूच मिसळशी सर्व पसारा!”
— ग. दि. माडगूळकर, संगीत: सुधीर फडके, चित्रपट: प्रपंच
हा भावपूर्ण अभंग आपण सर्वांनीच अनेकदा ऐकला असेलच.
या अभंगात विठ्ठलाचा “वेडा कुंभार” असा उल्लेख आहे —
आणि ‘वेडा’ हा शब्द इथे गहन अर्थाने वापरलेला आहे.
सामान्य अर्थाने ‘वेडा’ म्हणजे विचारशक्ती नसलेला, अतीभावनिक, असंतुलित वागणारा माणूस.
पण इथे विठ्ठल ‘वेडा’ आहे, कारण तो उत्कृष्ट घडविण्याच्या ध्यासाने झपाटलेला आहे!
त्याचं वेड म्हणजे भरकटलेपण नाही,
तर सजगतेने, संयमानं, आणि समर्पणानं
प्रत्येक घटाला योग्य प्रमाणात माती, पाणी, उजेड, वारा मिसळून
एक सुंदर शिल्प तयार करण्याची अद्वितीय तल्लीनता.
हा वेडेपणा म्हणजे न विचार करता कृती करणं नव्हे —
तर सारासार विचारानं, प्रेमानं, ध्यासानं,
एक अमूर्त विचार मूर्त रूपात उतरवण्याची गहन निर्मितीप्रक्रिया आहे.
या कुंभाराच्या चाकावर आपण सगळेच फिरत आहोत.
एकेकजण म्हणून नाही, तर एकेक घट म्हणून.
आणि प्रत्येकाच्या हातात आहे…
स्वतःच्या आयुष्याला सुंदर शिल्पात रूपांतर करण्याची संधी.
*घडलेलं काहीच नसत,*
*घडवायचं असत* —
आणि ते घडविणार इतर दुसरा कोणी नाही तर तूच तो आहेस
*तत त्वं असि*
*कॅनव्हास कोरा आहे… कोणते रंग तू भरणार?*
आपल्याला वाटतं — “हे आयुष्य आधीच घडविल गेल आहे.” “जे व्हायचे आहे ते होणारच”
पण खरंतर… ते घडविलेल नसतं — घडत असतं, घडणार असत कारण ते
अजूनही घडवता येतं.
*देवाने आपल्याला “fix” केलेलं नाही —*
जसं बाकी प्राण्यांचं जीवन ठरलेलं असतं —
माशी उडतेच, सिंह शिकार करतोच…
माणूस मात्र ठरलेला नसतो.
तो काय बनतो हे त्याच्या सजगतेवर आणि निर्णयावर अवलंबून असतं.
*डोकं भरलेलं असेल, तर आकार येत नाही*
एका गावात शिक्षक वर्गात येतात.
रक्ताभिसरण शिकवताना डोक्यावर उभं राहून विचारतात,
“उलटं उभं राहिलो की चेहरा लाल होतो, पण सरळ उभं राहिलो की का होत नाही?”
एक छोटा मुलगा पटकन उत्तरतो:
*कारण तुमचे पाय रिकामे नाहीत!*
ही गोष्ट गमतीशीर वाटते — पण खूप काही सांगून जाते.
*आपलंही डोकं भरलेलं असतं*—
पूर्वग्रह, मतं-मतांतर, अनुभव, निष्कर्ष…
त्यामुळे नवीन काही ‘दिसत’च नाही!
आपण “मी असाच आहे” असं ठरवून मोकळे होतो.
पण हेच तर अडथळा ठरतं —
घडवायचं असेल तर मोकळं मन हवं. सजग मन हवं.
*सद्गुरू श्री.वामनराव पै यांचं तत्त्वज्ञान: सजगतेची वाट*
सद्गुरू श्री.वामनराव पैं म्हणतात,
*”माणूस म्हणजे प्रक्रिया… तो ‘ठरलेला’ नसतो,*
*तो सतत ‘घडणारा’ असतो.”*
सद्गुरुंच्या तत्त्वज्ञानात *सजगतेला* केंद्रस्थानी स्थान आहे.
जन्म, परिस्थती, प्रारब्ध हे फक्त सुरुवातीचे रंग आहेत.
पण त्यातून काय चित्र घडवायचं — याचा निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो. ते आपल्यावरच अवलंबून असतं.
सद्गुरू स्पष्ट सांगतात —
*तूझ जीवन पूर्वलिखित नाही म्हणजे पूर्वीपासून ठरलेल नाही… तुझ जीवन तुझे तुलाच घडवायचं आहे!*
आणि हे घडणं म्हणजे केवळ अनुभवांवर चालणं नाहीये,
तर योग्य ज्ञानावर आधारित सजग कृती करणं आहे.
*शिल्प घडविण्यासाठी कच्चा माल आहे, पण ज्ञान अपूर्ण असेल तर…*
हो, देवाने आपल्याला कच्चा माल दिला आहे —
माती, पाणी, उजेड, वारा…
पण हा माल कसा वापरायचा, कोणत्या प्रमाणात, कोणत्या पद्धतीने?
याचं ज्ञान प्रत्येकाला सहज मिळतच असं नाही.
आपण आपल्या “मला वाटतं” या अपूर्ण ज्ञानावर आधारित शिल्प घडवतो…
आणि मग —
*करायला गेलो गणपती… आणि झाला मारुती!*अशी अवस्था होते.
म्हणूनच — सद्गुरूंचं मार्गदर्शन हे जीवनशिल्पासाठी आवश्यक आहे.
सद्गुरू कृपेने, त्यांच्या दृष्टीनं,
आणि आपल्या पूर्वसंचिताच्या पुण्याईनं
जेव्हा खरंखुरं ज्ञान मिळतं…
तेव्हाच –
*आभाळच मग आकाराला येतं*
आयुष्य कोरं आहे.
सगळे रंग तुझ्याकडे आहेत.
देव आहे सोबतीला, पण रेखाटायचे आहे तुलाच.
*सजगतेनं पाहिलं,मोकळ्या मनानं स्वीकारलं,आणि निस्वार्थ कृतीत उतरवलं की मग आयुष्यही एक सुंदर कलाकृती होतं!*
आणि
*मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार* हे सिद्ध होत.
जीवनविद्या तत्वज्ञानावर आधारित
एक चिंतन:*जयंत जोशी*










Comments