बालमन – ओली माती* *घट घडवण्यात वातावरणाचे महत्त्व
- ME Holistic Centre
- Sep 29
- 2 min read

बालक म्हणजे एक कोरी पाटी.
ओल्या मातीप्रमाणे त्याचं मन असतं. त्या मातीतून घडणारा घट सुंदर, मजबूत, टिकाऊ व्हावा की वाकडा-तिकडा, हे ठरतं ज्या वातावरणात ते वाढतात त्या वातावरणावर.
*बालक आणि नैसर्गिक अध्यात्म*
आपण लहानमुलांना नकळत सक्तीने धर्म, पंथ, तत्त्वज्ञान यांचे शिक्षण द्यायला लागतो. पण असे धर्म, पंथ, तत्त्वज्ञान यांचे शिक्षण लादण्याआधी आपण लक्षात घ्यायला हवं की आपण त्यांच्या नैसर्गिक विचार करण्याच्या क्षमतेला मर्यादित तर करत नाही ना? कारण मुलामध्ये नैसर्गिक जिज्ञासा आधीपासूनच असते.
जर आपण त्याला कृत्रिम बंधनं, मतं, अंधश्रद्धा यांचा पिंजरा घातला नाही, तर ही जिज्ञासा लहानपणी त्याला सतत “हे का?”, “ते कसं?”, “हे काय?” असे प्रश्न पाडते. हीच नैसर्गिक जिज्ञासा पुढे आयुष्यात परिपक्व होऊन “मी कोण?”, “माझं मूळ काय?”, “जगण्याचा अर्थ काय?” अशा अध्यात्मिक प्रश्नांत फुलते.
म्हणजेच बालवयात थेट तत्त्वज्ञानाचे प्रश्न पडत नाहीत, पण त्या प्रश्नांची बीजं जिज्ञासेच्या रूपात बालमनात दडलेली असतात.
आणि ही जिज्ञासा जर वातावरणाने शाबूत ठेवली, दाबली नाही, तर त्यातूनच अध्यात्माची सुरुवात होते.
म्हणजेच अध्यात्म कुणी बाहेरून शिकवायचं नसतं; मुलाचं वातावरण स्वच्छ, निरोगी, निर्भेळ ठेवलं, तर ते त्याच्या अंतःकरणातून नैसर्गिकपणे उमलतं.
*विज्ञान काय सांगतं?*
वैज्ञानिक संशोधन स्पष्ट सांगतं की मुलाच्या मेंदूला फक्त अन्न, कपडे, शाळा पुरेसं नाही.
* त्याला मायेचा स्पर्श हवा.
* प्रेमळ संवाद हवा.
* सुरक्षित वातावरण हवं.
* खेळ, हसू, भावनिक ऊब
हवी.
हे नसेल तर मेंदू नीट विकसित होत नाही.
रोमानियातील अनाथाश्रमात वाढलेल्या मुलांवरच्या अभ्यासातून दिसलं की, प्रेम आणि संवादाविना वाढलेल्या मुलांची भाषा नीट फुलली नाही, त्यांचा मेंदू मंदावला आणि शिकण्यात-नातेसंबंधात अडचणी आल्या.
शास्त्रज्ञ डॉ. चार्ल्स नेल्सन यांच्या संशोधनातून तर हेच दिसलं की अशा मुलांच्या म्हणजे जी मूल मायेचा स्पर्श, प्रेमळ संवाद, सुरक्षित वातावरण, खेळ, हसू, भावनिक ऊब यापासून वंचित राहतात त्यांच्या मेंदूमध्ये विजेच्या लहरींची हालचाल (न्यूरल अॅक्टिव्हिटी) अत्यंत कमी होती.
त्यांचा निष्कर्ष अगदी थेट होता –
*भावनिक आधार आणि ज्ञानात्मक प्रेरणा नसल्यास मानवी मेंदूचा सामान्य विकास होत नाही.*
*ज्ञानात्मक प्रेरणा म्हणजे काय?*
इथे ‘ज्ञानात्मक प्रेरणा’ म्हणजे मुलाच्या बुद्धीला विचार करायला, शोध घ्यायला आणि शिकायला मिळणाऱ्या संधी.
उदा.:
* मुलाशी संवाद साधणं,
त्यांचे प्रश्न ऐकणं.
* गोष्टी सांगणं आणि
ऐकवणं.
* रंग, चित्रं, आवाज यांचा
अनुभव देणं.
* खेळ, पझल्स, छोटे प्रयोग
घडवणं. करून घेणं.
* नवनवीन अनुभव देणं.
यामागचं विज्ञान
समजावणे.
* अशा अनुभवांमुळे
मेंदूतल्या अब्जावधी
न्यूरॉन्सची जोडणी
(synapses) बळकट
होतात.
* संवादामुळे भाषा केंद्र
सक्रिय होतं, शब्दसंग्रह
वाढतो.
* खेळ आणि पझल्समुळे
प्रिफ्रंटल कॉर्टेक्स
विकसित होतो,
निर्णयक्षमता आणि
तर्कशक्ती वाढते.
* प्रेम आणि सुरक्षिततेमुळे
ऑक्सिटोसिन आणि
सेरोटोनिन सारखी
सकारात्मक रसायनं
स्रवतात, ज्यामुळे मुलं
जिज्ञासू, आत्मविश्वासी
आणि आनंदी होतात.
*अध्यात्म आणि विज्ञान*
अध्यात्म असो वा विज्ञान — दोन्हींचा गाभा एकच आहे:
👉 मुलासाठी योग्य वातावरण हा सर्वात मोठा पाया आहे.
• वातावरण जर प्रेमहीन, दडपणारं असेल, तर मेंदू व्यवस्थित फुलत नाही आणि बुद्धी कुंठित होते.
• वातावरण जर प्रेमळ, ऊबदार, आणि स्वातंत्र्य देणारं असेल, तर मेंदू तेजस्वी होतो आणि मन नैसर्गिक अध्यात्माकडे वळतं.
बालक म्हणजे ओली माती.
त्या मातीतून घडणारा घट म्हणजे त्याचं आयुष्य.
आणि त्या घटाला आकार देणारं खरं माध्यम म्हणजे त्याचं वातावरण.
योग्य हात, योग्य दाब, योग्य पाणी मिळालं, तर घट सुंदर घडतो. चुकीच्या हाताळणीने तो फुटका किंवा वाकडा होतो.
तसंच मुलाच्या आयुष्याबाबतही आहे.
या लेखाचा हेतू पालकांना आणि समाजाला हे भान देणं आहे की —
*मुलाचं घडणं केवळ शाळा, अभ्यास, शिस्त यावर* *अवलंबून नसून घरातील वातावरणावर सर्वाधिक अवलंबून आहे.*
सुजाण पालकत्व म्हणजे *मुलांना काय शिकवतो यापेक्षा, त्यांना कोणतं* *वातावरण देतो याची जाणीव ठेवणं.*
एका सुजाण पालकाचे चिंतन:
*जयंत जोशी*










Comments