top of page

यशाचा प्रवास: टीका, चुका शहाणपण, आणि सहनशीलता

जीवन हा एक प्रवास आहे — अनुभवांचा, प्रयत्नांचा, चुकांचा आणि शिकण्याचा.

या प्रवासात टीका, चूक, प्रयत्न, अपयश आणि यश या साऱ्याच टप्प्यांना आपल्याला कधीना कधी सामोरे जावे लागतेच.

कधी कोणी टीका करतं, कधी आपण चुका करतो, कधी प्रयत्न करतो आणि कधी यश मिळवतो.


पण आजचा प्रश्न असा आहे

*खरी हुशारी नेमकी कश्यात आहे?*

*टीकेमध्ये की नव निर्माणात?*

*चुका टाळण्यात की त्यातून शिकण्यात?*


*टीका*– *एक सोपा मार्ग, पण अपूर्ण विचार*


आज अनेकदा असे दिसते की टीका करणारे लोक *हुशार*

वाटतात.

कारण ते बोलतात, शंका घेतात, दोष दाखवतात — मात्र अशाप्रकारे टीका करणाऱ्यांनची स्वतः मात्र काही करण्याची जबाबदारी घेण्याची तयारी आणि ईच्छा नसते.

टीका करणं हे झटपट प्रसिद्ध होण्याचं, पण फारसं परिणामकारक नसलेलं साधन आहे.


*हे चालणार नाही*, *असं कुणी करतं का?*,*यात काही अर्थ नाही*–

अशी वक्तव्यं करणं खूप सोपं असतं, पण त्यामागे समाधान कमी आणि आत्मगौरवच अधिक असतो.


*चुकणे*– विकासाची पहिली पायरी


कोणतीही प्रगती चुकांशिवाय होत नाही.

बालक जेव्हा चालायला शिकतं, तेव्हा ते कितीतरी वेळा पडतं. पण त्या पडल्यानं ते चालणं मात्र सोडत नाही.


विज्ञान, कला, समाजकारण, अध्यात्म, सार्वजनिक संस्था – कुठल्याही क्षेत्रात, मोठं काम नेहमी प्रयोगांतूनच घडलं आहे.

*प्रयोग म्हणजे चुकांची शाळा.*

चुकणे म्हणजे काही अपयश नसतं – ती शिकवण असते.


*प्रयत्न करणे– हेच खरे शौर्य आणि यशाच्या पाठीमागचे सामर्थ्य असते.*


प्रयत्न करणं म्हणजे संधी देणं — स्वतःला, आयुष्याला, आणि समाजाला.

प्रयत्न करणाऱ्याला चुकायची भीती असते, पण तो त्यावर मात करतो.

त्याला टीकेचा सामना करावा लागतो, तरीही तो पुढे जातो.


*खरं शौर्य म्हणजे युद्ध जिंकणं नव्हे*

तर जरी जखम झाली तरी उठून पुन्हा पुढे जाणं.


*टीका सहन करणे – एक अनमोल जीवनकला*


काम करणं जरी कठीण असलं, तरी त्यावर टीका होणं आणि ती सहन करणं — हे अजूनच कठीण असतं.

कारण ती टीका आपल्या प्रयत्नांवर, आपल्यावर असते.

कधी ती टीका चुकीची असते, कधी उपयुक्त.

म्हणूनच…

*टीका सहन करणं म्हणजे केवळ सहनशीलता नव्हे, ती शहाणपणाची कसोटी असते*


*निंदकाचे घर असावे शेजारी*–

संत तुकाराम महाराज म्हणतात:

“निंदकाचे घर असावे शेजारी.”

कारण निंदक आपल्याला आपल्या उणिवा दाखवतो, ज्या आपल्याला सुधारण्याची संधी देतात, आपण सुधारना करतो आणि अधिक सजग होतो.


पण यामागे एक सूक्ष्म विनोद आणि गहन शिक्षणाचा भाग देखील आहे —

तुकाराम महाराज म्हणतात, निंदक शेजारी असावा, पण तो घरात नसावा! कारण

* निंदक शेजारी असेल तर – त्याचं म्हणणं ऐकू येईल, त्यातून बोध घेता येईल.

* ⁠पण तोच जर घरात असेल तर – तो सतत मनात राहील, आत्मविश्वास कमी करेल, आणि आपल्याला नकारात्मक बनवेल.


शेजार म्हणजे निरीक्षणाचं अंतर; घर म्हणजे आतल्या भावनांचं स्थान.

निंदकाला बघा, त्याला ऐका पण त्याला आत-मनात राहू देऊ नका.


*टीका आणि संतविचार*

* समतोल साधा

* ⁠काही वेळा टीका उपेक्षा मागते/करते.

* ⁠काही वेळा ती सुधारणेची संधी असते.

* ⁠आणि काही वेळा ती मनाची परीक्षाही असते.


*निंदकाचे घर असावे शेजारी,*

पण *मनात मात्र आपली श्रद्धा, प्रेरणा आणि आत्मबळच कायम असावे*


*खरी हुशारी – कृतीत आणि समजुतीत*


जे फक्त बोलतात, टीका करतात, शंका घेतात – ते जीवन प्रवासात थांबतात.

जे प्रयत्न करतात, चुकतात, टीका सहन करतात, सुधारतात – तेच जीवनात नवीन काही घडवतात.प्रगती करतात.


चुका करून शिकणारा माणूस,

टीका करून थांबलेल्या माणसापेक्षा हजारपटीने उपयुक्त ठरतो.


आपण या समाजात, कुटुंबात, समाज कार्यात…

टीकेच्या मागे न धावता, म्हणजे टीका फारशी मनावर न घेता, सकारात्मक कृतीला प्राधान्य दिलं पाहिजे.

चुकणाऱ्याला साथ दिली पाहिजे.प्रोत्साहन दिलं पाहिजे.

टीकेला समजून घेतलं पाहिजे.

आणि निंदकाला… शेजारी ठेवून दूरदृष्टी वाढवली पाहिजे.


कारण शेवटी…

*यश हा एक प्रवास आहे – टीकेतून शिकण्याचा, चुकांमधून घडण्याचा आणि प्रयत्नांतून फुलण्याचा.*


प्रश्न तुमच्यासमोर आहे –

*आपण कोण व्हायचं ठरवणार?*

* टीका करणारे?

* की नवनिर्माण घडवणारे?

* की संतविचारांचे शहाणपण अंगीकारणारे?


धन्यवाद.

सद्गुरू नाथ महाराज की जय

लेखांकन: जयंत जोशी.

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page