स्वतःवर शंका –* *जीवनशिल्प घडवण्याची* *पहिली पायरी*
- ME Holistic Centre
- Aug 2
- 3 min read

*आत्मविश्वास की आत्मपरीक्षण?*
आजच्या काळात सर्वत्र एकच संदेश ऐकू येतो –
“स्वतःवर विश्वास ठेवा. Believe in yourself.”
हा मंत्र अनेकांना प्रेरणा देतो, बळ देतो.
पण… जर मी तुम्हाला सांगितलं –
*स्वतःवर विश्वास ठेवा* नव्हे, तर *स्वतःवर शंका घ्या*—
तर तुम्हाला काय वाटेल?
कदाचित तुम्हाला हे विचित्र, उलटसुलट, किंबहुना निराशावादी, नकारात्मक वाटेल.
पण ऐका —
मी तुम्हाला पूर्ण खात्रीने सांगतो की हीच खरी आत्मपरीक्षणाची सुरुवात आहे,
हीच पहिली पायरी आहे आत्मविकासाची —
जी पार केल्यावरच आपण जीवनमंदिराच्या कळसाकडे वाटचाल करू शकतो.
चला तर मग…
या अंतर्मुख विचारयात्रेला सुरुवात करूया!
*अंध आत्मविश्वासाचे धोके – जेव्हा “मला सगळं माहीत आहे” असं वाटतं*
इतिहासात, समाजात, व्यक्तिगत आयुष्यात अनेक उदाहरणं सांगतात की
जेव्हा निर्णय ‘मला सगळं माहीत आहे’ या भावनेतून घेतले गेले, तेव्हा विनाश घडला.
*उदाहरण – 2008 चे जागतिक आर्थिक संकंट:*
अमेरिकेतील आर्थिक संस्था, बँका “आम्ही सगळं हाताळू शकतो” या अंध आत्मविश्वासातून धोरणं राबवत होत्या.
कर्जांची भरमसाठ वाटणी, चुकीची मॉडेल्स, बाजारावर अति विश्वास —
शंका कुणालाच आली नाही.
परिणाम – संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोसळली.
*तात्त्विक शहाणपण:*
“मला सगळं माहीत आहे” असा समज असेपर्यंत, प्रगतीचा मार्ग झाकोळलेला असतो.
पण जेंव्हा आपल्याला प्रामाणिकपणे जाणवतं की “माझं ज्ञान अपूर्ण आहे”,
तेंव्हाच आत्मविकासाची वाट उघडते.
सद्गुरू श्री वामनराव पै यांचा मूलमंत्र –
*तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार*
पण शिल्प घडवायचं असेल, तर सर्वप्रथम ‘दगड’ पाहावा लागतो.
दगडात मूर्ती असतेच – पण नको असलेला भाग दूर केल्याशिवाय ती प्रकट होत नाही.
शिल्पकाराचं काम मूर्ती ‘बनवणं’ नसतं — तर
“मूर्ती आहेच — मी फक्त तिच्या वाटेतले अडथळे दूर करतो.”
आपलं मन, आपले विचार, वर्तन – हे सगळं दगडासारखं असतं.
*स्वतःवर शंका* ही पहिली छिन्नी आहे – जी त्या दगडाला आकार देण्यास सुरुवात करते.
*शंका म्हणजे दुर्बलता नव्हे – ती जागृतीची खूण आहे*
“शंका घेणं” म्हणजे “मी चुकीचा आहे” हे मानणं नव्हे,
तर “मी अजून शिकतो आहे” ही नम्रतेची भावना आहे.
ही शंका विचारते –
* मी बोललो ते योग्य होतं
का?
* मी अहंकारातून बोलतोय
का?
* माझ्या वागण्यात
संकुचितता आहे का?
*ही शंका आत्मनिंदेची नाही, तर आत्मशुद्धीची आहे.*
*संतवाणी आणि उपनिषदांचा आधार*
संत कबीर म्हणतात:
*मन के हारे हार है, मन के जीते जीत।* म्हणजे
जो मनाने (भीती, भ्रम, अहंकाराने) हरतो, तोच खरा पराभूत होतो.
आणि जो मनावर (शांत विवेकाने) विजय मिळवतो, तोच खरा विजेता होतो.
कठोपनिषद म्हणतं:
*आत्मानं रथिनं विद्धि…*
बुद्धी सारथी आहे, मन लगाम आहे.
बुद्धीने जागरूकपणे मार्गदर्शन केलं, तरच जीवनरथ योग्य दिशेने जातो —
आणि त्यासाठी मनाचं प्रामाणिक निरीक्षण आवश्यक आहे.
*आत्मपरीक्षणानेच माणूस सजग आणि सौम्य होतो*
स्वतःवर थोडी शंका असणारा माणूस…
* हळुवार चालतो, कारण
त्याला स्वतःची- ज्ञानाची
अपूर्णता माहीत असते.
* शब्दात जबाबदारी असते,
कारण तो दुसऱ्याच्या
भावनांचा विचार करतो.
* तो अहंकाराने नव्हे, तर
विवेकाने निर्णय घेतो.
असा आत्मपरीक्षण करणारा माणूस ‘*सुपरहिरो*’ नसतो, पण खऱ्या अर्थाने ‘*सुपर-ह्युमन*’ असतो —
कारण तो माणूस असूनही सजग, शांत आणि शुद्ध असतो.
*ज्ञानाची सुरुवात शंकेनेच होते*
ज्ञान मिळवण्यासाठी पहिली शर्त म्हणजे –
*माझं आताचं ज्ञान अपूर्ण आहे* ही नम्र कबुली.
जो शंका घेत नाही, तो नवीन काही शिकू शकत नाही.
आणि जो शिकत नाही, तो स्थिरावतो – त्याचा विकास थांबतो.
*शंका ही विवेकाची वाट आहे*—
जिच्याशिवाय कोणतंच शाश्वत शहाणपण जन्माला येत नाही.
*प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेली शिल्पमूर्ती – आणि सद्गुरूंची छिन्नी*
प्रत्येक व्यक्तीमधल्या गाभ्यात एक सुंदर, कोमल, तेजस्वी मानवी शिल्प असतंच.
पण त्या शिल्पावर काळाच्या, संस्काराच्या, अहंकाराच्या, अनुभवांच्या थरांनी
घट्ट, कठीण आवरणं चढलेली असतात.
या थरांमुळे *मूळ स्वभाव, स्वच्छता, निर्मळता आणि आनंद* अदृश्य होतो.
ही आवरणं सहजासहजी निघत नाहीत.
तेव्हा लागतो—*छिन्नी आणि हातोडा*
मात्र…
*छिन्नी आणि हातोडा हातात घेणं ही फक्त तांत्रिक क्रिया नव्हे.*
त्या मागे लागते दृष्टी, ज्ञान, संयम, आणि करुणा.
आणि ही शिल्पकलेची शिकवण देतात — *सद्गुरू.*
तेच आपल्याला शिकवतात —
“कुठे मारायचं, किती खोल, किती सौम्य, आणि किती काळ थांबायचं.”
ते आपल्या मनावरची आवरणं
कधी शब्दांनी, कधी मौनानं, कधी स्पर्शानं आणि कधी डोळ्यांच्या भाषेनं अलगद बाजूला करत राहतात.
अखेर, आपल्यातलं खऱ्या अर्थाने *मानवी शिल्प* प्रकट होऊ लागतं.
*शंका ही शुद्धीची पहिली पायरी आहे*
आपण सर्वांनी स्वतःला दररोज विचारायला हवं –
* माझं हे बोलणं/वागणं
योग्य आहे का?”
* मी अजून कशात चुकतोय
का?
* मी माझ्यात आणखी काय
सुधारणा करणे
आवश्यक आहे.
ही प्रश्नांची शृंखला म्हणजेच आत्मप्रबोधनाची सुरुवात आहे.
शंका असणं म्हणजे अडथळा नव्हे —
ते म्हणजे स्वतःला घडवण्याची एक सुसंस्कृत सवय.
शंका येणं किंवा शंका घेणे म्हणजे अडथळा नाही —
*ती तर मूर्तीसाठी दगडात पहिली छिन्नी मारण्यासारखे आहे. प्रगतीकडे वाटचालीचा पहिला घाव.*
शंका → आत्मपरीक्षण → शुद्धी → स्पष्टता → आत्मविकास.
आणि हीच आहे *तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार* या महामंत्राची खरी सुरुवात.
एक चिंतन:
*जयंत जोशी.*










Comments