हरितालिका व्रत : निष्ठा, संयम आणि नात्यांचा उत्सव* “हर तालीका व्रत 👏-प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित व्रत” ✨ एक दिवसाचा संकल्प नव्हे, तर आयुष्यभरासाठीचा जीवनमार्ग ✨
- ME Holistic Centre
- Sep 22
- 3 min read
🌿 *

आजच्या धावपळीच्या गतिमान काळात व्रत-उपवास, परंपरा आणि संस्कार हे अनेकांना “जुनाट” वाटतात.
विशेषतः करिअर, नोकरी आणि घर यांचा तोल सांभाळणाऱ्या आधुनिक स्त्रीला- *मी खरंच या व्रतांना वेळ द्यावा का? या व्रतवैकल्यांचा माझ्या जीवनाशी नेमका काय संबंध आहे?* असा प्रश्न पडतो.
पण जर आपण या परंपरांचा बाह्य विधी सोडून गाभा लक्षात घेतला, आमच्या पूर्वजांच्या दूरदृष्टीचा विचार केला तर *व्रत म्हणजे केवळ धार्मिक कृती नव्हे; तर निष्ठा, संयम, ध्येय आणि नातेसंबंधातील बांधिलकी यांचा उत्सव आहे.*
व्रतवैकल्ये, उत्सव,पूजा हे देवासाठी नसतातच-हे सर्व म्हणजे आपण आपल्या स्वतःसाठी केलेला जीवनसंकल्प आहे.
पवित्रता आणि मांगल्याच्या प्रतीकासमोर केलेली ही प्रतिज्ञा मनावर खोल ठसा उमटवते आणि मन नकळत संकल्पपूर्तीकडे प्रवास करतं.
हरितालिका व्रत हाच त्यापैकी एक सुंदर संस्कार.
🌸 *पौराणिक कथा*
हिमालयाची कन्या पार्वतीचा विवाह विष्णूंशी ठरविला गेला.
पण पार्वतीच्या अंतःकरणात शंकरांशिवाय इतर कोणताही पती मान्य नव्हता.
ती सख्यांसह हिरव्यागार वनात जाऊन कठोर तप करु लागली.
तिच्या अखंड श्रद्धा आणि ठाम निश्चयामुळे शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारले.
हा संदेश स्पष्ट आहे — *ध्येयाशी अखंड निष्ठा ठेवली, तर ते धेय्य निश्चित साध्य होतं.*
🌼 *कुमारींकांसाठी व्रताचा गाभा*
• या व्रताचा मूळ हेतू म्हणजे कुमारींकांनी सुयोग्य जीवनसाथीची प्रार्थना करणे.
• पण “सुयोग्य साथीदार” याचा अर्थ फक्त विवाहापुरता मर्यादित नाही.
• आजच्या काळात याचा अर्थ अधिक व्यापक आहे —
• जीवनात योग्य साथीदार मिळावा,
• योग्य मूल्यांवर आधारित जीवनमार्ग निवडता यावा,
• स्वतःच्या ध्येयाशी व श्रद्धेशी प्रामाणिक राहता यावं.
👉 म्हणून कुमारींसाठी हरितालिका व्रत हे स्वतःची ओळख आणि योग्य निर्णय घेण्याचं बळ देणारं प्रतीक आहे.
💍 *विवाहित स्त्रियांसाठी अर्थ*
• विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि नात्यातील निष्ठेसाठी हे व्रत करतात.
• शिव-पार्वतीप्रमाणे अखंड दाम्पत्यप्रेम ही प्रेरणा या व्रतातून मिळते.
• आधुनिक दृष्टिकोनातून पाहता —
• नात्यात परस्पर सन्मान,
• जोडीदारासाठी मानसिक उपवास (अहंकार, हट्ट, कटुता यांचा त्याग),
👉 मानसिक उपवास म्हणजे जसा उपाशी राहून शरीरावर संयम आणतो, तसा अहंकार, कटुता, हट्ट यांचा त्याग करून मनावर संयम आणणं.
• नात्याला प्राधान्य देणारा दृष्टीकोन — हेच या व्रताचं खऱ्या अर्थाने सार्थक आहे.
🌍 *सामाजिक आणि प्रातिनिधिक अर्थ*
• व्रत, सण आणि उत्सव हे फक्त “एक दिवसाचे” नसतात. ते आहेत नित्याच्या जीवनशैलीची आठवण करून देणारे प्रतीक.
• जसं दीपावली प्रकाशाची आठवण करून देते, तसं हरितालिका आपल्याला निष्ठा, संयम, आत्मपरीक्षण यांची जाणीव करून देते.
• एकत्र येणं, कथा-कीर्तन करणं यामुळे स्त्रीशक्तीचं ऐक्य, सामूहिक ऊर्जा आणि सांस्कृतिक सातत्य निर्माण होतं.
🧘 *मानसिक अर्थ*
1. कुमारींसाठी — आत्मपरीक्षणाचा क्षण : “मी कोण आहे? मला कसा साथीदार हवा आहे? माझी मूल्यं कोणती आहेत?”
2. विवाहितांसाठी — चिंतनाचा क्षण : “मी माझ्या नात्यात किती सन्मान, प्रेम आणि समंजसपणा आणतो/आणते?”
3. सर्वांसाठी — ध्येयाशी निष्ठा, संयम आणि अंतरिक प्रामाणिकता.
👉 पूजा म्हणजे याच आत्मपरीक्षणाचा दृढ संकल्प. सर्वोच्च तत्त्वासमोर केलेली प्रतिज्ञा मनाला आपोआप संकल्पपूर्तीकडे नेते.
💞 *वैवाहिक नात्यांसाठी संदेश*
आज अनेक वैवाहिक नाती तणावपूर्ण आहेत, अल्पायुषी ठरत आहेत. अशा वेळी हरितालिका व्रताचा संदेश असा असावा :
• फक्त पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना नको, तर नात्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रयत्न हवा.
• दीर्घायुष्याचा अर्थ केवळ शरीराने जास्त जगणं नसून, नात्यात प्रेम, समजूतदारपणा आणि एकनिष्ठता जास्त काळ टिकणं आहे.
👉 कारण केवळ दीर्घायुष्य असलं आणि नात्यात कडवटपणा असेल, तर त्या दीर्घ आयुष्याचा उपयोग तरी काय?
• संवाद, सन्मान आणि सामंजस्य हे नात्याचे प्राण आहेत.
• शिव-पार्वतीप्रमाणे एकमेकांना स्वीकारणं आणि पूजनीय मानणं हेच नात्याला दीर्घायुष्य देऊ शकतं.
🌱 *तरुण पिढीसाठी हरितालिकेचा धडा*
आजच्या तरुणाईत मैत्री, प्रेमसंबंध आणि लिव्ह-इन रिलेशनशिप हे वास्तव आहे. या वास्तवाला नाकारणं हा उपाय नाही; तर त्याला मूल्यांची दिशा देणं आवश्यक आहे.
• मैत्री पवित्रता आणि जबाबदारीसह असावी
पार्वतीच्या सख्यांनी तिला तपासाठी साथ दिली, तसंच खरी मैत्री म्हणजे एकमेकांच्या उन्नतीसाठी पाठीराखा होणं.
• Love = Commitment
Boyfriend/Girlfriend ही फक्त ओळख नाही; ती जबाबदारी आणि निष्ठेची बांधिलकी आहे.
नातं फक्त नावावर टिकत नाही, ते टिकतं संयम, प्रामाणिकपणा आणि विश्वासावर.
• Living Together vs. Living with Commitment
लिव्ह-इन रिलेशनशिप ही वैयक्तिक निवड आहे. पण फक्त सोबत राहणं म्हणजे नातं नव्हे.
जर त्यात प्रामाणिक बांधिलकी आणि भविष्यदृष्टी नसेल, तर ते केवळ एक प्रयोग ठरतं.
• *प्रत्येक नातं ही पूजा व्हावयास हवी.
पूजा म्हणजे देवासाठी नव्हे; तर पूजा म्हणजे स्वतःसाठीचा संकल्प.
त्याचप्रमाणे प्रत्येक नातं हे “मी या नात्यातून अधिक चांगला माणूस होतोय का?” हा प्रश्न विचारणारं असायला हवं.
✨ *हरितालिका व्रत म्हणजे*
• कुमारिकांसाठी सुयोग्य साथीदार आणि योग्य मूल्यांची प्रार्थना,
• विवाहितांसाठी नात्यातील निष्ठा आणि कल्याण,
• तरुणांसाठी मैत्री आणि प्रेमाला जबाबदारी व मूल्यांची दिशा,
• आणि सर्वांसाठी आत्मपरीक्षण, संयम आणि अंतरिक बांधिलकी.
म्हणूनच हा दिवस केवळ एकदाच उपवास करण्याचा नसून,
*संपूर्ण जीवनात नात्यांची पूजा, ध्येयाची निष्ठा आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा संकल्प करण्याचा आहे.*
जयजय गौरीशंकर
शुंभम भवतू
शंकर म्हणतो *तथास्तु, तथास्तु तथास्तु*
हरतालिकेच्या निमित्ताने
एक चिंतन: *जयंत जोशी*










Comments