प्रार्थना रहस्य *भाग २* प्रार्थना अंतर्मन कशी बदलते?
- ME Holistic Centre
- Mar 8
- 4 min read

*जाणीवेपासून नेणीवेपर्यंत-परिवर्तनाचा शांत प्रवास*
आपण अनेकदा म्हणतो— “मला सगळं कळतं… पण बदल होत नाही.”
प्रार्थना करतो, ठरवतो, प्रयत्न करतो— तरीही जुन्या सवयी, जुन्या प्रतिक्रिया परत येतात.
तेव्हा मनात शंका उभी राहते— प्रार्थना खरंच ‘काम’ करते का?
खरं पाहिलं तर प्रार्थनेचा परिणाम बाहेर दिसण्याआधी, तो आपल्या आत एका अतिशय शांत पद्धतीने आकार घेत असतो.
*बदल “दिसत नाही”- कारण आपण परिणाम पाहतो, प्रक्रिया नाही*
आपल्याला बदल हवा असतो तो पटकन दिसणारा— राग कमी व्हावा, चिंता संपावी, मन स्थिर व्हावं, परिस्थिती सुधारावी. पण अंतर्मनातील बदल हा स्विचसारखा “ऑन-ऑफ” नसतो. तो हळूहळू होत असतो— जसं बी पेरल्यावर झाड लगेच दिसत नाही, पण जमिनीखाली मुळं वाढू लागतात.
म्हणूनच बहुतेक वेळा आपण म्हणतो “काही होत नाही”, पण वास्तवात “खाली” खोलवर काहीतरी सुरू झालेलं असतं. प्रार्थना ही आधी मुळं बदलते— आणि मग हळूहळू स्वभाव, वर्तन, अनुभव बदलायला लागतो.
*जाणीव आणि नेणीव — आपल्या आत दोन भाषा*
आपण ठरवतो, विचार करतो, योजना करतो— हे जाणीवेच्या पातळीवर चालतं. पण आपलं बहुतेक वर्तन आणि प्रतिक्रिया नेणीवेच्या पातळीवरून उठतात.
*नेणीवेत काय असतं?*
बालपणीचे संस्कार, भीती, सवयी, आत्मप्रतिमा, प्रेम-अपेक्षा, अपमानाच्या नोंदी, “लोक काय म्हणतील”ची साठवण…
म्हणून आपण ठरवतो— “मी शांत राहीन.”
पण कुणी काही बोललं की लगेच चिडचिड, आवाजाची धार, मनाचा आक्रोश…
कारण तो “शांतपणा” जाणीवेतला निर्णय असतो, पण “राग” नेणीवेचा जुना साचा असतो.
*इथे एक साधा पण मूलभूत नियम समजून घ्यावा लागतो:*
*जाणीव माहिती स्वीकारते; नेणीव अनुभव स्वीकारते.*
म्हणजे समजून बदल होतो, पण तो मर्यादित असतो. नेणीव बदलायला अनुभव हवा— आणि प्रार्थना हा अनुभव देण्याचा मार्ग आहे.
*प्रार्थना म्हणजे शब्द नव्हे-“एक नवी अंतर्गत अवस्था”*
प्रार्थना म्हणजे केवळ शब्दांची माळ नाही. शब्द हा फक्त प्रवेश आहे. प्रार्थनेचा गाभा असा— मनाला एका अर्थपूर्ण केंद्रावर स्थिर करणे आणि त्या स्थिरतेतून एक नवी अंतर्गत अवस्था निर्माण करणे.
ही अवस्था फार मोठी नसते. कधी कधी ती फक्त काही सेकंद असते:
थोडी शांतता… थोडा आधार… थोडं “मी सुरक्षित आहे” असं वाटणं… थोडी कृतज्ञता… थोडा स्वीकार…
पण नेणीवेचा बदल अशाच क्षणांमधून सुरू होतो. कारण नेणीव “उपदेश” ऐकत नाही; ती “अवस्था” ऐकते. तुम्ही नेमके काय म्हणालात यापेक्षा, प्रार्थनेत तुम्ही कसे झालात-हे नेणीव नोंदवते.
*नेणीवेत नोंद कशी होते?-भावना, पुनरावृत्ती, लक्ष*
नेणीव तीन गोष्टी “गंभीरपणे” नोंदवते:
1) *भावना (Emotion)*
आर्तता, प्रेम, नम्रता, कृतज्ञता-या भावनेतून केलेली प्रार्थना खोल जाते. कारण भावना म्हणजे मनावरची “शाई”.
2) *पुनरावृत्ती (Repetition)*
इथेच “येईल तैसा बोल हरी”चे रहस्य उघडते. प्रार्थना परिपूर्ण पद्धतीने झाली का नाही यापेक्षा, जोड टिकला का हे महत्त्वाचे. सततचा स्पर्श हळूहळू संस्कार बनतो.
3) *लक्ष (Attention)*
क्षणभर जरी पूर्ण लक्ष लागलं तरी तो क्षण नेणीवेत ठसा उमटवतो. कारण जिथे लक्ष तिथे ऊर्जा.
म्हणून प्रार्थना एकदाच करून “बदल” होत नाही. पण सातत्याने, छोट्या छोट्या क्षणांनी- सातत्याने केलेल्या प्रार्थनेने नेणीव नवा मार्ग शिकायला लागते.
*लक्ष नसताना प्रार्थना केली तर काही फायदा होतो का?*
हो, होतो— पण स्वरूप समजून घ्यायचं. लक्ष नसताना प्रार्थना लगेच *transformative* होत नाही; पण ती बीज पेरते.
जसं बाळ चालायला शिकताना अनेकदा पडतं-पडणं व्यर्थ नाही; तेच पडणं शरीराला संतुलन शिकवतं. तसंच प्रार्थनेत लक्ष उडतं, परत येतं, पुन्हा उडतं… हेच नेणीवेला शिकवते की “मी परत माझ्या आत येऊ शकतो.”
म्हणून साधनेत “लक्ष उडणं” ही चूक नाही. परत येणं ही साधना आहे.
*प्रार्थना ‘परिणामात’ कशी रूपांतरित होते? — आतली साखळी*
प्रार्थना परिस्थितीला थेट बदलते का? कधी अनुभव तसे येतात. पण व्यवहार्य आणि वैज्ञानिक अर्थ असा: प्रार्थना आधी आतील अवस्था बदलते. आणि ती अवस्था बदलली की बाहेरचे परिणाम बदलायला सुरुवात होते.
ही “अंतर्गत साखळी” नीट पाहा:
*प्रार्थना→शांतता स्पष्टता *→चांगले निर्णय→ योग्य* *कृती →बदललेले संबंध/**परिस्थिती → परिणाम*
म्हणजे प्रार्थना एखाद्या जादूसारखी बाहेर परिणाम निर्माण करत नाही; ती तुमच्या आतल्या “कर्ता”ला घडवत जाते— आणि बदललेला कर्ता जगाशी वेगळ्या प्रकारे वागतो. त्यामुळेच परिणाम बदलतात.
🌿*Scientific Insight* वाचकांची शंका आणि स्पष्ट उत्तर
वाचकांची शंका-
*Scientifically, prayer result मध्ये कशी convert होते? कारण काय?*
स्पष्टीकरण:
प्रार्थना तीन स्तरांवर परिणाम करते:
(१)*Stress Mode→* *Calm Mode*
श्वासाची लय + शब्दांची पुनरावृत्ती nervous system शांत करते. तणाव कमी झाला की निर्णयक्षमता वाढते.
(२)*Neuroplasticity:* *Mind rewiring*
पुनरावृत्ती + भावना यांनी मेंदूतील neural pathways मजबूत होतात. “जुना default pattern” बदलायला लागतो.
(३)*Behavior & Social Feedback*
तुमची अवस्था बदलली की तुमचा आवाज, शब्द, प्रतिक्रिया, ऐकण्याची क्षमता बदलते. त्यामुळे इतरांचा प्रतिसाद बदलतो. हीच “क्रिया-प्रतिक्रिया”ची व्यवहार्य बाजू.
म्हणून प्रार्थना परिणामात कशी बदलते?
ती प्रथम मन–मेंदू–वर्तन बदलते— आणि तिथून परिणाम तयार होतात.
*Scientific Takeaway*
• Prayer first changes your inner state: stress कमी होतो, clarity वाढते.
• Stable thought becomes intention: लक्ष केंद्रित होते, निर्णय स्पष्ट होतात.
• Repetition + emotion rewires the mind: नेणीवेत नवे संस्कार तयार होतात.
• Changed mind changes behavior: कृती/संवाद बदलतो, परिणाम बदलतात.
• Thought takes form through 4 supports: शक्ती- युक्ती-मती-व्यक्ती.
*सद्गुरूंची चौकट:*
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात-
*विचारांना आकाराकडे सरकण्यासाठी प्रार्थना चार मार्ग अवलंबिते-*
*शक्ती–युक्ती–मती–व्यक्ती*
परमेश्वर विचारांना आकारात आणण्यासाठी चार प्रकारे मदत करतो:
*शक्ती*— ऊर्जा आणि धैर्य
भीती कमी होते, प्रयत्न टिकतो.
*युक्ती* — योग्य मार्ग
गोंधळ कमी होतो आणि उपाय दिसू लागतो.
*मती* - बुद्धीला योग्य दिशेची चालना
फक्त उपाय नव्हे— योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची परिपक्वता जागृत होते.
*व्यक्ती*— योग्य लोक आणि सहकार्य
संवाद बदलतो, संबंधांत सहकार्य वाढतं, योग्य व्यक्ती भेटू लागतात.
ही चौकट लक्षात ठेवली की प्रार्थनेचा परिणाम “अस्पष्ट” राहत नाही— तो “ओळखता” येतो.
*अंतर्मन बदलतंय हे कसं ओळखायचं? — सूक्ष्म पण ठोस चिन्हं*
बदलाचा पुरावा मोठ्या चमत्कारात नसतो; तो छोट्या चिन्हांत असतो:
• प्रतिक्रिया देण्याआधी क्षणभर जागा तयार होते
• रागाची तीव्रता आणि कालावधी कमी होतो
• चिंता येते पण लगेच गिळून टाकत नाही
• मन लवकर स्थिर होतं
• कृतज्ञतेचे क्षण वाढतात
• एकटेपणा कमी जाणवतो
ही चिन्हं म्हणजे नेणीवेत नवीन “संस्कार” तयार होऊ लागला आहे.
*शेवटची किल्ली: प्रार्थनेत ‘परत येणे’*
प्रार्थना करताना लक्ष उडेल. विचार येतील. मन भटकेल.
पण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही परत येता— तेव्हा नेणीवेला एक नवा संदेश मिळतो:
“मी माझ्या आत परत येऊ शकतो.”
हा संदेश जेव्हा स्वभाव बनतो, तेव्हा प्रार्थना “कृती” राहत नाही. ती तुमची पार्श्वभूमी बनते— शांत, स्थिर, आधार देणारी.
🌸 प्रार्थना परिस्थिती बदलतेच असे नाही…
पण ती परिस्थितीकडे पाहणारा ‘मी’ बदलते.
आणि तेव्हाच जीवनाचा अर्थ बदलायला सुरुवात होते.
➤ पुढील भाग ३
“स्वीकार” आणि “समर्पण” यातला सूक्ष्म फरक, आणि प्रार्थना ध्यानात कशी रूपांतरित होते— हे पुढील टप्पात पाहू.
प्रार्थनेचे रहस्य-चिंतन
*जयंत जोशी*


Comments