*वाढता वाढता वाढे… भेदिले शून्य मंडळा* वृद्धत्व आजार नाही — जागेपणाचा ऋतू
- ME Holistic Centre
- Mar 8
- 3 min read

वय वाढतं—हे सत्य आहे.
पण प्रश्न असा आहे की, वय वाढताना नेमकं काय वाढतं?
फक्त केस पांढरे होतात, चाल मंदावते, शरीर थकायला लागतं… एवढंच का?
की या बदलांच्या आड अजून एक शांत वाढ घडत असते—समजुतीची, स्थैर्याची, आणि जागेपणाची?
घर भरलेलं असतं, माणसं आसपास असतात, दिनक्रम चालू असतो—पण तरी कधी कधी मनात एक हलकी पोकळी जाणवते. कुणाला त्रास नको म्हणून आपण शांत राहतो; पण आत मात्र अनेक न बोललेले विचार फिरत राहतात. “आता माझी गरज किती उरली आहे?” हा प्रश्न नकळत मनाला स्पर्श करून जातो.
कदाचित म्हणूनच समर्थ रामदासस्वामींच्या भीमरूपी महारुद्रा या स्तोत्रातील एक ओळ आठवते —
*वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा.*
येथे वाढ म्हणजे केवळ आकार किंवा शक्तीची वाढ नाही; ती मर्यादांच्या पलीकडे जाणाऱ्या चेतनेची वाढ आहे. जीवनाच्या प्रवासात बाह्य विस्तार हळूहळू अंतर्मुखतेत रूपांतरित होतो, आणि माणूस स्वतःच्या आतल्या शांत अवकाशाला स्पर्श करू लागतो.
वाढ म्हणजे फक्त वर्षांची बेरीज नव्हे; कधी कधी वाढ म्हणजे मर्यादांच्या वर्तुळातून बाहेर पडणं—आतल्या शांततेला स्पर्श करणं.
*वृद्धत्वाला आपण अनेकदा आजार समजतो.*
पण वृद्धत्व हा आजार नाही; तो जीवनाचा एक ऋतू आहे.
जसा ऋतू बदलला की निसर्गाची चाल बदलते, तसंच जीवनाचा वेग बदलतो. जीवन थांबत नाही—फक्त त्याची दिशा आत वळू लागते.
*शरीर बदलतं; पण मन बदलायला तयार नसतं*
वृद्धत्वातील मोठा त्रास शरीरात नसतो; तो अपेक्षांमध्ये असतो.
शरीर हळूच सांगतं—“आता वेग कमी ठेव.”
पण मन अजूनही पूर्वीसारखं धावायचा प्रयत्न करतं.
तारुण्यात आपण बाहेरच्या जगात स्वतःला सिद्ध करत असतो.
काम, जबाबदाऱ्या, ध्येय, स्पर्धा—या सगळ्यांत मन गुंतलेलं असतं.
पण आयुष्याची संध्याकाळ एक वेगळं निमंत्रण घेऊन येते—थोडं थांब, आत बघ, आणि जीवनाचा अर्थ शांतपणे अनुभव.
जुळवून घेतलं तर हा काळ ओझं राहत नाही; तो स्थैर्याचा काळ बनतो.
*शरीर आधी थकत नाही; आधी मन थकतं*
मन सतत भूतकाळात जाऊन दुखतं आणि भविष्यकाळात जाऊन घाबरतं.
भूतकाळ आठवणींचं ओझं आणतो.
भविष्यकाळ चिंता आणतो.
आणि वर्तमान क्षण—जिथे प्रत्यक्ष जीवन आहे—तो हरवतो.
मोबाईलमध्ये background ला अनेक अॅप्स चालू असतील, तर battery लवकर संपते.
आपल्या मनातही असेच background विचार चालू असतात—नाराजी, अपेक्षा, तुलना, काळजी. बाहेरून आपण शांत असतो, पण आतून थकलेले असतो.
म्हणून वृद्धावस्थेत सर्वात मोठी गरज असते—
मनाची ऊर्जा जपण्याची.
*मनाला शांततेचा श्वास*
शरीराला जपायचं असेल, तर मनाला शांततेचा श्वास द्यावा लागतो.
इथे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी दिलेल्या साधना अत्यंत साध्या असूनही खोल परिणाम घडवतात—*विश्वप्रार्थना, शुभचिंतन, भलं कर आणि कृतज्ञता.*
विश्वप्रार्थना मनाचा परीघ वाढवते. “मी” पासून “आपण” कडे नेते.
शुभचिंतन विचारांची दिशा सौम्य करते.
भलं कर ही भावना माणसाला पुन्हा उपयोगी असल्याची जाणीव देते.
कृतज्ञता मनाला अभावातून पूर्णतेकडे घेऊन जाते.
*औषध शरीराला मदत करतं.*
*पण शांत मन शरीराला आधार देतं.*
*एक छोटा अनुभव*
नाशिकच्या एका कॉलनीतील पंच्याहत्तर वर्षांचे काका. औषधं नियमित, काळजी व्यवस्थित—तरी मन अस्वस्थ. झोप लागत नव्हती. विचार थांबत नव्हते.
त्यांनी मोठं काही केलं नाही.
फक्त सकाळी विश्वप्रार्थना, दिवसातून एक शुभचिंतन, एखादं छोटं भलं, आणि रात्री कृतज्ञता.
हळूहळू बदल दिसू लागला.
तक्रारी कमी झाल्या.
आवाज सौम्य झाला.
झोप सुधारली.
औषधं तीच होती.
पण मनाला श्वास मिळाला होता.
*इच्छा, अपेक्षा आणि समत्व*
वृद्धत्वाचा संघर्ष अनेकदा शरीराशी नसतो; तो इच्छांच्या ओझ्याशी असतो.
शरीर कमी होत असताना जर अपेक्षा वाढत राहिल्या, तर मन अस्वस्थ होतं.
समत्व म्हणजे हार मानणं नाही.
ते शहाणपणाचं बळ आहे.
कधी कधी फक्त एवढा निर्णय पुरतो—
आज मला शांत राहायचं आहे; जिंकायचं नाही.
*शहाणपण आयुष्याच्या संध्याकाळी*
सद्गुरूंच्या प्रवचनांतून वारंवार जाणवणारा एक विचार असा,
माणसाला जे शहाणपण लवकर यायला हवं, ते अनेकदा आयुष्याच्या संध्याकाळी उमजतं.
तारुण्यात वेग असतो;
संध्याकाळी दृष्टी येते.
जीवनाचा वेग कमी झाला की माणूस पहिल्यांदा स्वतःकडे पाहू लागतो. काही गोष्टी ज्या मोठ्या वाटत होत्या, त्या लहान वाटू लागतात. आणि या जाणिवेतून शांत विवेक जन्म घेतो.
🌟 *अंतिम कळस*
इथेच सद्गुरू श्री वामनराव पै यांची ती ओळ अर्थपूर्ण होते.
वयाच्या नव्वदीतही ते हसत म्हणत—
*मी म्हातारा नाही… मी*
*महा-तारा आहे.*
म्हातारा — देहाची ओळख.
महा-तारा — जागेपणाची अवस्था.
शरीराला वय असतं.
जागेपणाला नसतं.
वृद्धत्व हा शेवट नाही.
तो बाहेरची धाव कमी होण्याचा आणि आतला प्रकाश वाढण्याचा काळ आहे.
आणि म्हणून—
वर्षं वाढत राहतात;
पण जर जागेपण वाढत राहिलं,
तर वृद्धत्व आजार राहत नाही…
तो जागेपणाचा ऋतू बनतो.
म्हातारा की महा-तारा
एक चिंतन
*जयंत जोशी*


Comments